आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vandana Khare Article About Gulab Gang, Divya Marathi

नावात काय आहे?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागच्या आठवड्यात मी दोन सिनेमे पाहिले. एक ‘गुलाबी गँग’ आणि दुसरा ‘गुलाब गँग’! एक माहितीपट आणि दुसरा बॉलीवूडमध्ये बनलेला तद्दन मसालापट; पण दोन्हींचे मूळ स्फूर्तिस्थान एकच. उत्तर प्रदेशातल्या संपत पाल या अल्पशिक्षित बाईने चालवलेली महिलांची एक संघटना! एकाच पार्श्वभूमीवर आधारित माहितीपट आणि चित्रपट एकापाठोपाठ पाहायला मिळायचा योग फारच दुर्मिळ असतो, नाही का? त्यामुळे काही झाले तरी मी दोन्ही सिनेमे पाहायचेच असं पक्कं ठरवून ठेवलं होतं.

गुलाबी साड्या गणवेश म्हणून वापरणार्‍या आणि हातात दंडुका घेऊन फिरणार्‍या महिला संघटनेबद्दल मला बर्‍याच दिवसांपासून कुतूहल होतं! ‘गुलाबी गँग’ याच नावाने असलेल्या त्यांच्या वेबसाइटवर अगदीच त्रोटक माहिती होती - मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या बांदा जिल्ह्यात महिलांना बालविवाह, हुंडाबळी, कौटुंबिक अत्याचार अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागे. अन्याय मुकाट्याने सहन करण्याऐवजी संपतदेवी पालने त्याचा प्रतिकार करण्यासाठी महिलांना संघटित करायला सुरुवात केली. 2006 मध्ये त्यांनी ‘गुलाबी गँग’ या नावाने आपली संस्था नोंदणीकृतकेलेली आहे. लाठी चालवण्याचे प्रशिक्षण दाखवणारी एक छोटीशी व्हिडिओ क्लिपदेखील तिथे पाहायला मिळाली. पण या बायका हातातल्या काठ्यांनी पुरुषांना खरोखर झोडपून काढत असतील का? एका बाईने दुसर्‍या एखाद्या बाईवरचा अन्याय दूर करण्यासाठी घेतलेल्या पुढाकारापासून एक मोठी संस्था तयार होईपर्यंत काय प्रक्रिया घडली असेल, या प्रश्नांची उत्तरे त्या माहितीतून गवसत नव्हती.

या संस्थेविषयी निष्ठा जैनने बनवलेला ‘गुलाबी गँग’ हा माहितीपट घराजवळच्या चित्रपटगृहात मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाला; पण खरं तर हा सिनेमा पाहताना आपण एक माहितीपट पाहतोय हेच मी विसरून गेले! एका पंधरा वर्षांच्या मुलीचा तिच्या सासरच्यांनी खून केल्याच्या घटनेपासून सुरू होणारा हा सिनेमा; त्या घटनेकडे पाहण्याचा समाजाचा निर्लज्ज दृष्टिकोन दाखवत असतानाच त्या घटनेचा माग काढणार्‍या संपत पालशी ओळख करून देतो. तिच्यासोबत आपणदेखील त्या खुनाच्या तपासात सामील होतो! तिच्या संघटनेची जडणघडण समजून घेऊ लागतो, ज्या विषमतेविरुद्ध लढण्यासाठी ही संघटना तयार झाली आहे, त्याच मानसिकतेने वैयक्तिक पातळीवर मात्र संघटनेच्या सदस्यांना कसे जखडून ठेवलेले आहे या गुंतागुंतीच्या वास्तवाचे आपल्याला दर्शन घडते. ‘गुलाबी गँग’च्या कामाला असलेल्या मर्यादा समजतात आणि त्याच वेळी त्यांच्या कामाचे काम महत्त्वदेखील उमजते. ‘गुलाबी गँग’ टिकून राहील की संपून जाईल, हा प्रश्न अस्वस्थ करीत राहतो.

काही लाखांच्या छोट्याशा बजेटमध्ये बनलेला एक माहितीपट जर इतका नाट्यपूर्ण असेल तर मग त्याच पार्श्वभूमीवर बेतलेला 25 कोटी रुपयांचा व्यावसायिक चित्रपट किती धमाल मजेदार असेल? आंतरराष्ट्रीय महिला दिनाची वेळ साधून येणारा सिनेमा म्हणून मला ‘गुलाब गँग’बद्दल जास्तच आपुलकी वाटायला लागली. पण संपत पालने या सिनेमावर बंदी आणायचा प्रयत्न केल्याच्या बातम्या वाचल्या आणि मी थोडीशी बुचकळ्यात पडले. सिनेमातल्या हिंसाचाराच्या चित्रणामुळे आपली बदनामी होईल, असे मत गुलाबी गँगच्या सदस्यांनी व्यक्त केले होते. शिवाय सिनेमाचे नाव वापरताना आपली परवानगी घेतली नसल्यामुळेही गुलाबी गँग नाराज होती. एवढे 25 कोटी रुपये खर्च करून सिनेमा बनवताना ‘गुलाब गँग’च्या निर्मात्यांनी ज्यांचे नाव वापरायचे त्यांची परवानगी का बरे विचारू नये? एकीकडे आपण महिलांच्या सक्षमीकरणाच्या विषयावर चित्रपट बनवत असल्याचा डांगोरा पिटायचा आणि दुसरीकडे खरोखर काम करणार्‍या महिलांचे हक्क मात्र डावलायचे, अशी ही दुटप्पी नीती होती तर! उच्च न्यायालयाने मूळच्या गुलाबी गँग संघटनेने घेतलेला आक्षेप मंजूर केला होता आणि ‘गुलाब गँग’चे प्रदर्शन लांबणीवर पडल्याची बातमीदेखील आली; पण दुसर्‍याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाने ती बंदी उठवली!

त्यामुळे ‘गुलाब गँग’च्या सुरुवातीलाच संपत पाल आणि तिच्या ‘गुलाबी गँग’शी कथेचा काही संबंध नसल्याचे जाहीर केले जाते; पण पुढे मात्र माधुरी आणि तिच्या आश्रमातल्या बायकांच्या गुलाबी साड्या आणि लाठ्यांमुळे सतत ‘गुलाबी गँग’ची आठवण येत राहते. कौटुंबिक हिंसेला बळी पडलेल्या एका बाईचे महत्त्वाचे पात्रदेखील या सिनेमात आहे. शिवाय मनोरंजनासाठी सिनेमात भरपूर गाणी आहेत, नाच आहेत, राजकारण आहे, निवडणुका आहेत, खून आहेत, दर दहा मिनिटांनी मारामार्‍या आहेत. नुसत्या लाठ्याकाठ्या वापरूनच नव्हे, तर त्रिशूळ, चाकू, सुरे, पिस्तुले अशी मिळतील ती हत्यारे घेऊन माधुरी आणि तिची गँग अगदी सलमान खान, अक्षयकुमारच्या पद्धतीची हाणामारी करीत होत्या; पण एवढा मसाला असूनसुद्धा कथेत गुंतवून ठेवणारे काहीच नव्हते. पटकथेत पुढे काय घडणार याची उत्सुकता वाटत नाही किंवा कशाचे आश्चर्यही वाटत नाही.

जशी दोन पुरुषांमधल्या भांडणाची गोष्ट असते तशी ही दोन बायकांची सूडकथा. या मूर्ख सिनेमाचा ‘गुलाबी गँग’शी काही संबंध नाही असं म्हटलंय तेच बरोबर आहे - एवढं म्हणून मी हा सिनेमा विसरून जायचं ठरवलं! पण सिनेमा संपता संपता पडद्यावर देशभरात वेगवेगळ्या प्रकारे संघर्ष करून यशस्वी झालेल्या महिलांचे फोटो आणि माहिती दिसायला सुरुवात झाली.

एकीकडे स्वत:ची हिंसाचाराने भरलेली बेगडी गोष्ट खपवण्यासाठी संपत पालच्या आणि ‘गुलाबी गँग’च्या गुलाबी साड्या आणि लाठ्यांचा वापर दृश्यात्मकतेसाठी करून घ्यायचा, नावाचे साधर्म्यदेखील वापरायचे आणि शिवाय त्याच्याशी आपला काही संबंध नसल्याचे सांगायचे! आणि त्याच वेळी दुसरीकडे विषमतेविरुद्ध लढणार्‍या बायकांना मुजरा केल्याचा आव आणायचा -किती हा साळसूदपणा? मुख्य धारेतली प्रसारमाध्यमे महिलांना कशी वापरून घेतात त्याचे हे आणखी एक उदाहरणच यानिमित्ताने आपल्याला पाहायला मिळाले.

जर निष्ठा जैनने ‘गुलाबी गँग’ हा माहितीपट प्रदर्शित केला नसता तर कदाचित संपत पालचा खरा संघर्ष आपल्यापर्यंत पोहोचला नसता. मुख्य धारेतल्या माध्यमांच्या दांडगाईला वैकल्पिक माध्यमातूनदेखील उत्तर देता येऊ शकते याचेही हे चांगले उदाहरण आहे.

kharevandana.@gmail.com