आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vandana Khare Article About Sensitive Portrayal Of The Third Gender In Films Plays

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यशस्वी फॉर्म्युल्यामागचे तृतीयपंथी सत्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंगापिंडाने पुरुषांसारखी असणारी आणि बायकांसारखा पेहराव आणि हावभाव करणारी माणसं आपण सगळ्यांनीच कधी ना कधी पाहिलेली असतात. कधी एखाद्या दुकानासमोर टोळक्याने उभं राहून किंवा ट्रॅफिक सिग्नलवर आपण जेव्हा त्यांना टाळ्या वाजवत पैसे मागताना पाहतो, तेव्हा त्यांच्याकडे जास्तीत जास्त दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतो. त्यांनी आपल्या जवळ उभे राहू नये, अगदी आपल्याकडे पाहूदेखील नये, असेच आपल्याला वाटते! छक्का, हिजडा, कोथी, किन्नर, ट्रान्सजेंडर किंवा तृतीयपंथी असे अनेक शब्द ज्यांच्यासाठी वापरले जातात. कधी त्यांची भीती वाटते, तर काहींना त्यांच्या हावभावांची किळस येते, काहींना त्यांचा राग येतो, क्वचित कुणाला त्यांच्याविषयी दया वाटते. पण सहसा कुणी त्यांच्याशी बोलत नाही, त्यांचा स्पर्श होऊ देत नाही किंवा त्यांच्याकडे पाहतही नाही. ती जणू काही अस्तित्वातच नाहीत, असं आपल्याला मानायचं असतं. जी माणसे पुरुष किंवा बाई यापैकी कुठल्याही एकाच साच्यामध्ये बसत नाहीत त्यांना कदाचित आपण ‘माणूस’देखील मानत नाही!

एकीकडे रोजच्या आयुष्यात भेटणार्‍या अशा माणसांकडे माणूस म्हणून पाहण्याची आपण अशी टाळाटाळ करतो. पण त्याच वेळी सिनेमा-नाटकातून मात्र पुरुषांसारखे दिसणे आणि बायकांसारखे पेहराव असे मिश्रण असलेल्या व्यक्तिरेखा पाहून आपण आपली करमणूक करून घेतो. पन्नास वर्षांपूर्वीचे ‘मोरूची मावशी’ नाटक असेल किंवा पंचवीस- तीस वर्षांपूर्वीचा ‘अशी ही बनवाबनवी’सारखा मराठी सिनेमा असेल, नाही तर अगदी ताज्या ‘हमशकल्स’सारख्या हिंदी सिनेमाचं उदाहरण बघा! कुठल्या तरी मजबुरीमुळे स्त्रीवेषात वावरणारे पुरुष आणि त्यांच्या वागणुकीतून घडणार्‍या गमतीजमती हा हशा वसूल करण्यासाठीचा हमखास यशस्वी फॉर्म्युला ठरून गेलेला आहे. अगदी ‘कॉमेडी नाइट विथ कपिल शर्मा’ आणि ‘फू बाई फू’सारख्या टीव्ही शोजमध्येदेखील हाच फॉर्म्युला घोळवलेला असतो. एकीकडे वास्तव आयुष्यात पुरुषी शरीरयष्टीच्या माणसांनी बायकांचे कपडे घातले तर आपल्याला किळस येते, पण या सगळ्या कार्यक्रमांना घवघवीत लोकप्रियता देणारे प्रेक्षकदेखील आपणच असतो. नाटक, सिनेमा किंवा टीव्ही मालिकांमध्ये जेव्हा हिजड्यांसारखी दिसणारी ही माणसे वावरताना आपण पाहतो; तेव्हा ती माणसं खरी नाहीत - काल्पनिक आहेत या जाणिवेनेच आपल्याला सुरक्षित वाटत असेल! कदाचित म्हणूनच प्रत्यक्षात जरी अशा माणसांकडे पाहून हसणे शक्य नसले तरी अशा काल्पनिक पात्रांच्या निमित्ताने आपण त्यांना खदखदून हसतो. हिजडा या व्यक्तीकडे सर्वसामान्य माणूस म्हणून पाहून तिची सुखदु:खं मांडण्याचा प्रयत्न नाटक, सिनेमात क्वचितच केलेला असतो. गेल्या पन्नास वर्षातला हिंदी, मराठी सिनेमा-नाटकांचा इतिहास चाळला तर अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच उदाहरणे सापडतील!

आपल्याला कदाचित ‘कुंवारा बाप’ सिनेमातल्या गाण्यात नाचणारे किंवा ‘तय्यबअल्ली प्यार का दुश्मन’ म्हणणारे हिजडे चटकन आठवतील. पण एखादा हिजडा हीच प्रमुख व्यक्तिरेखा असलेले किती सिनेमे आठवतायत? किती मराठी चित्रपटांमध्ये आपल्याला आजवर हिजड्यांची व्यक्तिचित्रे पाहायला मिळाली? ‘नटरंग’ किंवा ‘जोगवा’मधल्या नायकांनी साडी नेसली होती, तरीही हे चित्रपट ‘पुरुष माणसाचीच’ गोष्ट सांगत होते. त्या मानाने हिंदी सिनेमात असा प्रयत्न काही प्रमाणात झालेला दिसतो. बापाने टाकून दिलेल्या मुलीला वाढवणारा ‘तमन्ना’मधला परेश रावलने साकार केलेला प्रेमळ हिजडा आठवतो का? ‘सडक’मधली सदाशिव अमरापूरकरांनी रंगवलेली वेश्या व्यवसाय चालवणारी ‘महारानी’ आठवत असेल, आशुतोष राणाची ‘शबनम मौसी’ आठवेल, पण श्याम बेनेगल यांच्या ‘वेलकम टू सज्जनपूर’मधल्या तशाच आणखी एका पात्राचे नाव आठवते का? ‘दरमियाँ’मध्ये तर मुख्य व्यक्तिरेखा ट्रान्सजेंडर होती. या चित्रपटाला प्रदेशातल्या चित्रपट महोत्सवात पारितोषिकं मिळाली होती. पण या चित्रपटाचं नाव आज किती जणांना आठवेल? वर्षाला शेकडो चित्रपट बनवणार्‍या आपल्या चित्रपट उद्योगात जेमतेम एखाद-दुसर्‍या चित्रपटांतूनच ‘स्त्री किंवा पुरुष नसलेल्या’ म्हणजेच ट्रान्सजेंडर व्यक्तिरेखा दिसतात. त्यातही बर्‍याचदा अशा व्यक्तिरेखा अत्याचारांच्या बळी ठरलेल्या तरी असतात किंवा खलनायकी भूमिकेत तरी दिसतात! थोडक्यात, एका विशिष्ट साच्यामध्ये त्यांना बसवून ठेवलेले असते, पण ‘माणूस’ म्हणून त्यांचे अंतरंग जाणून घेण्याचा आणि सुखदु:खे मांडण्याचा प्रयत्न सहसा होत नाही.