आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vandana Khare Article About Women’s Image In Tv Serials,Madhurima

कुछ तो गडबड है !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कधी एकदा या निवडणुका आटोपतील असं वाटायला लागलंय मला! सकाळी उठल्यावर चहासोबत पेपर हातात घेतला, की सगळ्या निवडणुकीबद्दलच्याच बातम्या. पुढे दिवसभर इकडेतिकडे याच बातम्यांवर चर्चा! आणि दिवसभराच्या कामानंतर दमूनभागून घरी यावं आणि शिणवटा घालवण्यासाठी टीव्ही जरी पाहावा म्हटलं, तरी सकाळच्या पेपरातल्या बातम्यांचंच रूप पडद्यावर पुन्हा पाहावं लागतं. शिवाय त्या बातम्यांच्या मध्येमध्ये प्रत्येक पक्षाने केलेल्या जाहिरातीदेखील निवडणुकीशीच जोडलेल्या! शेवटी नाइलाज म्हणून मी पुन्हा आपली निमूटपणे ‘मनोरंजक’ मालिका बघायचा प्रयत्न करायला लागले! पण सर्व हिंदी वाहिन्यांवर पूर्वीसारखाच चकचकीत साड्या नेसून कौटुंबिक हिंसाचार चाललेला दिसला. म्हणून मी जेव्हा मराठी वाहिन्यांकडे रिमोट वळवला, तेव्हा मला लक्षात आलं, की नेहमीच्या रडारडप्रधान घरगुती मालिकांपेक्षा आणखी काही वेगळ्याच मालिकांचा प्रकार नव्याने अस्तित्वात आलाय! जरी लोकप्रिय प्राइम टाइमला तोच तो जुनापुराणा नात्यागोत्यांचा रेशीमगोफ विणला जात असला तरी रात्री नऊ वाजल्यानंतर मात्र वकील, खासगी गुप्तहेर, पोलिस इन्स्पेक्टर अशा पुरुषी मानल्या जाणा-या व्यवसायात काम करणा-या तरुण तडफदार मुलींचं चित्रण असलेल्या काहीशा नवीन मालिका दाखवल्या जातायत!

मुख्य म्हणजे या मालिकांमधली लोकेशन्स घराबाहेरची असतात. कारण घराबाहेर जाऊन काम करणे हे या मालिकांमधल्या नायिकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे या मालिकांमधलं वातावरण नेहमीच्या रडकथांपेक्षा आपोआपच थोडं वेगळं दिसतंय! तशी आजवर अनेक मराठी मालिकांमध्ये नोकरी करणारी मध्यमवर्गीय नायिका ब-याच वेळा दिसलेली आहे. पण त्यांचं घराबाहेरचं काम हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, असे मात्र कधीच जाणवलेले नव्हते. ‘सुंदर माझं घर’ची नायिका आर्किटेक्ट असली तरी लग्नानंतर लगेच ती भरजरी साड्या नेसून घरातच राहायला लागली. त्यामुळे ती फक्त लग्न जुळण्यापुरतीच नोकरी करीत होती असं वाटायला लागलं! ‘बे दुणे चार’ची नायिकादेखील अशीच लग्नानंतर नुसती मुलाबाळांची काळजी घेण्यातच गुंतून गेलेली दिसली. इतर अनेक मालिकांमध्ये तर नायिकेला घराबाहेर पडायचं निमित्त मिळण्यापुरताच तिच्या नोकरीचा संबंध दिसला होता! पण अस्मिता मालिकेची नायिका खासगी गुप्तहेर आहे. त्यामुळे ती रस्त्यावर, जंगलात किंवा कधीकधी तर अगदी धोकादायक ठिकाणीसुद्धा वावरताना दिसते.
‘जयोस्तुते’मधली प्रगती राजवाडे वकील असल्यामुळे त्यात कोर्टातले वातावरण असते. शिवाय या नायिकांच्या कामातले सहकारी त्यांच्या सोबत असल्यामुळे त्यांचे परस्परातले नातेसंबंध आणि त्यांच्या कामाविषयी किंवा कामाशिवाय असलेल्या वेळातल्या गप्पादेखील रक्ताच्या नात्यांच्या मानपानाच्या परिघाच्या पलीकडच्या असतात. घराबाहेरच्या त्यांच्या कामात चालतील असे सुटसुटीत कपडे त्या घालताहेत. ‘लक्ष्य’ किंवा ‘जय हो’ नावाच्या पोलिसी चातुर्यकथांमध्ये पुरुष सहका-यांच्या बरोबरीने काम करणा-या मुली तर शर्ट-ट्राउजर्समध्येच वावरतात. अशा कपड्यांमुळे त्यांचा फिटनेस त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण हालचालीतून डोळ्यात भरतो. अशा या स्मार्ट नायिका, कुठल्यातरी समस्या घेऊन त्यांच्याकडे येणा-या लोकांच्या समस्या चटाचट एकदोन एपिसोडमध्ये सोडवून टाकतात. त्यामुळे एकच एक लांबलचक चालणारी कथा आणि त्यातल्या त्याच त्या माणसांचे रटाळ नातेसंबंध आपल्याला पाहत बसावे लागत नाहीत. पण त्यात ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या दिसतात – त्यात मात्र कुछ तो गडबड है!

‘लक्ष्य’ आणि ‘जय हो’सारख्या पोलिसकथांमध्ये बहुधा एखादा खून कोणी आणि का केला त्याची उकल करायची असते; ‘अस्मिता’मध्ये अनेकदा कुणाला तरी पळवून नेलेले असते, त्याची किंवा तिची सोडवणूक असते तर ‘जयोस्तुते’मध्ये गुन्ह्याच्या खोट्या आरोपात अडकलेल्या माणसाला न्याय मिळवून द्यायचा असतो. हे सगळे करत असताना हुशार आणि तडफदार नायिका स्वत:ची बुद्धी आणि शक्ती वापरतात, अशी काहीशी कथा दाखवली जाते. रडूबाई परोपजीवी सिंड्रेलापेक्षा कर्तृत्व गाजवणा-या रूपातल्या तरुण मुलींचे चित्रण होणे नक्कीच स्वागतार्ह आहे. पण तडफदार नायिकेशिवाय ज्या इतर बायका या मालिकेत दिसतात त्यांचे चित्रण कसे केले जाते, त्याचादेखील एक विशिष्ट पॅटर्न आहे! ‘अस्मिता’ आणि ‘जयोस्तुते’मधल्या नायिकांचे थोडेफार घरगुती आयुष्याचे जे चित्रण दिसते त्यात त्यांच्या आईची महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. आणि प्रत्येक एपिसोडमध्ये या दोघी आया आपापल्या मुलींना ‘तुझा विजय असो’ असे म्हणत राहिल्या तरी त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी करणा-या, मुलींचे वेळेवारी लग्न व्हावे म्हणून प्रयत्न करणा-या पारंपरिक आईसारख्याच आहेत. समस्या घेऊन येणा-या महिलाही बहुधा रडणा-या, गरीब बिच्चा-या, घराबाहेरच्या दुष्ट जगाची फारशी जाणीव नसणा-या म्हणजेच जशा इतर मालिकांमध्ये असतात तशाच दिसतात! कदाचित अशा टोकाच्या चित्रणातून या अपारंपरिक नायिकांचे मजबूत व्यक्तिमत्त्व दिग्दर्शकांना जास्त परिणामकारकपणे उभे करायचे असेल. मदत मागायला बायकांप्रमाणे अन्यायग्रस्त पुरुषदेखील आलेले बघायला मिळतात. शिवाय जे गुन्हेगार असतात, त्यात मोठ्या प्रमाणावर पुरुषच असले तरी काही वेळा स्त्रियादेखील गुन्हेगारांच्या भूमिकेत दिसतात.
पण या गुन्हेगार स्त्रिया आणि त्यांच्यावरचे आरोप आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची कारणं यात मात्र गडबड आहे! जेव्हा हुंडाबळीसारखी एखादी केस असते तेव्हा त्या खुनाची उकल करताना अत्याचार करणा-या नव-याला गुन्हा करताना हमखास त्याच्या आईचीच साथ मिळाल्याचे दाखवले जाते. तिथे त्या बाईचा नवरा म्हणजे खुनी मुलाचे वडील कधीच दाखवलेले नसतात. याखेरीज या सगळ्याच मालिकांमध्ये एका खास प्रकारच्या कथा मला वारंवार पाहायला मिळाल्या. त्या म्हणजे लैंगिक छळाच्या खोट्या आरोपामध्ये अडकलेला गरीब बिच्चारा साधासुधा पुरुष! एखादी लबाड बाई पैशांच्या किंवा इतर कुठल्यातरी मोहापायी साध्याशा पुरुषावर लैंगिक छळ केल्याचा खोटा आरोप करते आणि वकील, खासगी गुप्तहेर किंवा पोलिस इन्स्पेक्टर असलेली नायिका चातुर्याने लबाडी उघडकीला आणते, अशी कथा मी पंधरा दिवसात किमान चार वेळा तरी पाहिली. ज्या मालिकांमध्ये पुरुषी समजलेल्या व्यवसायांमध्ये धडाडीने काम करून यशस्वी होणा-या तडफदार नायिका दाखवल्या जातात त्याच मालिकांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर लैंगिक बाबतीत खोटे आरोप करणा-या महिलांचे चित्रण का केले जात असेल? मालिकेत नाट्य आणायच्या नादात ते असे चित्रण करत असतील का? मुळात खरोखरीच लैंगिक छळ झाला तरी त्याबद्दल कुणाकडे तक्रार न करण्याकडे महिलांचा कल असतो हे या मालिकांच्या दिग्दर्शकांना माहीतच नसेल का? गरीब बिचा-या पुरुषांवर दुष्ट बायका उगाचच लैंगिक छळाचे खोटेनाटे आरोप करतात अशी लोकप्रिय गैरसमजूत आहे, याची कल्पना असल्यामुळे या मालिकांचे दिग्दर्शक जाणीवपूर्वक असे चित्रण करतात? की या सगळ्या मालिकांचे निर्माते, लेखक आणि दिग्दर्शक पुरुष आहेत म्हणून नायिकेव्यतिरिक्त इतर महिलांच्या चित्रणात अजाणता असा पुरुषी दृष्टिकोन येत असेल? बायकांवर पुरुष अन्याय करतात तशा पुरुषांवर बायका अन्याय करतात, असे सम प्रमाणात दाखवून आपण वास्तवाचे चित्रण करतो आहोत अशी त्यांची कल्पना असते, की काय? कशी शोधणार या प्रश्नांची उत्तरं? कोण करेल तपास? सीआयडीमधल्या एसीपी प्रद्युम्नकडे जावं का? कारण कुछ तो गडबड है!