आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृढनिश्चयी बेबी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘‘आपण जिथे आहोत तिथपासून आणि आपल्या हाती या क्षणी जे आहे तेवढ्यापासून सुरुवात करावी; आणि निश्चयाने पुढे जात राहावे...म्हणजे यश नक्की मिळते.’’
लातूरजवळच्या एका छोट्याशा खेड्यात राहणा-या बेबीने हे वाक्य कधी ऐकले आहे की नाही कोणास ठाऊक! पण तिने तिच्या अवघ्या 20 वर्षांच्या आयुष्यात हे वाक्य श्रद्धेने अमलात आणलेय हे मात्र अगदी खरे!
तिच्या गावात तिच्या आजूबाजूला आणि अगदी स्वत:च्या आयुष्यातदेखील अशा असंख्य गोष्टी होत्या, ज्या तिला अजिबात पसंत नव्हत्या! अनेक गोष्टी एका झपाट्यात बदलून टाकाव्यात असे तिला मनापासून वाटायचे. पण त्याचबरोबर सगळ्याच गोष्टी बदलण्याएवढी ताकद आपल्यात नाही हे समजण्याइतके शहाणपणदेखील तिच्याकडे होते! त्यामुळेच ती निराश झाली नाही, की हातपाय गाळूनही बसली नाही. जेव्हा आणि जशी संधी मिळेल तेव्हा आपल्या पूर्ण शक्तीनिशी ती सातत्याने प्रयत्न करत राहिली आणि परिस्थितीला बदलण्यासाठी घाव घालत राहिली.
जेमतेम साडेचार फूट उंचीची ही नाजूकशी काळीसावळी मुलगी आतून किती खंबीर आहे, हे तिच्याशी बोलल्याखेरीज लक्षात येत नाही. खेड्यात राहणा-या कुठल्याही मुलीच्या आयुष्यात जो भेदभाव येतो तो बेबीलाही चुकला नव्हता. तिच्या शिक्षणाबद्दल तिच्या वडिलांना फारशी आपुलकी नव्हती. तिच्या काकांनी आग्रह धरला म्हणून तिचे शिक्षण सुरू तरी झाले. ती म्हणते, ‘‘माझ्या शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी माझी कधी फिकीर केली नाही.
मला शाळेत घालायचीही त्यांची इच्छा नव्हती. मला वह्या-पुस्तके आणून द्यायलाही ते राजी नसायचे. माझा भाऊ मात्र त्यांचा लाडका होता. म्हणजे त्यांनी काही मला तशी मारझोड केली नाही कधी; पण माझी दहावीची परीक्षा झाल्यावर माझ्या वडिलांनी मला साफ सांगून टाकले, की ते यापुढे मला शिकवू शकणार नाहीत. कारण त्यांना माझ्या भावाच्या आणि माझ्या शिक्षणाचा खर्च परवडणार नव्हता! खरे तर माझा भाऊ माझ्यापेक्षा लहान होता आणि अजून दहावीत गेलाही नव्हता. पण त्यांनी अर्थातच माझ्या भावालाच शिक्षण द्यायचे ठरवले होते! मलाही फारसे आश्चर्य वाटले नाही. आणि यापुढे आपल्याला शिकता येणार नाही हे ओळखून मी चूपचाप घरी बसले.’’
शालेय शिक्षण जरी थांबले तरी बेबीच्या मनात ज्ञान मिळवण्याची इच्छा मात्र प्रबळ होती. साधारण त्याच सुमारास, गावातल्या अंगणवाडीतार्इंनी एका स्वयंसेवी संस्थेबरोबर गावात होणा-या बैठकीसाठी बेबीला बोलावले. काही दिवसांनी साथ संस्थेतर्फे बेबीच्या गावामध्ये एक शिबिर झाले. त्या शिबिरात स्त्रियांचे आरोग्य, बालविवाह, लसीकरण अशा अनेक विषयांची माहिती देण्यात आली. शिबिर संपताना गावातल्या पाच जणींना लातूरला होणा-या पुढच्या ट्रेनिंगसाठी निवडले गेले. या पाच जणींमध्ये बेबीचीदेखील निवड झाली. तिच्या वडिलांनी इतक्या दूर पाठवायला विरोध केला, पण तिची आई खंबीरपणे तिच्या पाठीशी उभी राहिली. त्यामुळे तिला ही संधी मिळू शकली. ‘‘तरुण मुलींची साध्या साध्या बाबतीत काळजी घेतली गेली तर कितीतरी प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतात, हे प्रशिक्षणातून माझ्या लक्षात आले. माझ्या हेही लक्षात आले की आमच्या गावात दिसून येणारे बरेचसे प्रश्न अज्ञानातून आणि महिलांकडे दुर्लक्ष करण्यामुळे तयार झालेले आहेत. तरुण महिलांच्या आरोग्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत होते. आमच्या गावात अल्पवयातच अनेक मुलींची लग्ने होत असत. त्यानंतर लवकरच एक मूल झाले की त्या मुलींची हालत पाहावत नसे. बालमृत्यू आणि बाळंतपणात आई दगावणे हे तर लोकांच्या अंगवळणीच पडून गेले होते.’’ आपण गावात जाणीव-जागृतीचे जे काम करणार आहोत, ते किती महत्त्वाचे आहे याबद्दल प्रशिक्षणानंतर तिची पुरेपूर खात्री पटली. हाच आत्मविश्वास नंतर गावक-यांच्या विरोधासमोर ठामपणाने उभे राहण्यासाठी बेबीला उपयोगी पडला. लातूरमध्ये मिळालेल्या या प्रशिक्षणामुळे बेबीच्या आत्मविश्वासात खूप मोठी भर पडली.
‘‘मी प्रशिक्षणाहून आल्यानंतर मला संस्थेने एक महत्त्वाचे काम सोपवले. ते म्हणजे, दर बैठकीला दोन नवीन मुलींना घेऊन यायचे. पण वाटते तितके हे काम सोपे नव्हते. कारण बैठकीमध्ये स्त्रियांचे आरोग्य, मुलींची मासिक पाळी असे जे विषय बोलले जात असत, ते कळल्यावर कुठल्याच मुलीला तिच्या घरून पाठवले गेले नसते. मग माझ्या काकूने एक शक्कल लढवली. तिने मला शिवणवर्ग सुरू करायला सुचवले. आमच्याकडे शिवणाचे मशीनही होतेच! या शिवणवर्गाच्या निमित्ताने मुली आपोआप माझ्याकडे येऊ लागल्या. त्यांच्याशी बोलता बोलता मला प्रशिक्षणादरम्यान मिळालेली माहिती मी त्यांना सांगू लागले. लवकरच माझ्यासोबत गावात बदल घडवून आणायला तयार झालेला मुलींचा गट मी उभा केला.’’
‘‘गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांची बैठक घेऊन सुरुवात करावी, असे आम्ही ठरवले. पण सरपंचांपासूनच विरोधाला सुरुवात झाली. मी गावातल्या बायकांना काहीबाही सांगून बिघडवणार आहे, असे त्यांना वाटायला लागले. मी काहीतरी उपयोगाची आणि हिताची माहिती देईन, हे त्यांना पटायला तयार नव्हते. म्हणून त्यांनी मला ग्रामसभेसमोर ही माहिती देण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवायला लावले. ग्रामसभेत मी दिलेली माहिती ऐकून त्यांची खात्री पटली, तेव्हा कुठे महिलांच्या बैठका घ्यायची परवानगी मला मिळाली. पण पुढे जाऊन माझ्या कामाचे महत्त्व त्यांना इतके चांगल्या प्रकारे पटले, की त्यांनी या विषयावर स्वत: ग्रामसभा भरवायला सुरुवात केली.’’
‘‘आमच्या गावातले प्राथमिक आरोग्य केंद्र पुन्हा सुरू करणे, हा आमचा मुख्य उद्देश होता. सर्वांना सोयीचे ठरावे म्हणून आम्ही एकदा रात्री बैठक घेतली होती, तेव्हा काही लोकांनी आमच्यावर दगडफेक केली. पण आम्ही आमचा मुद्दा लावून धरला. हळूहळू या बाबतीतला विरोध मावळत गेला आणि आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र पुन्हा सुरू करण्यात यश मिळवले. त्यानंतर आम्ही बंद पडलेली अंगणवाडी सुरू करण्याकडे लक्ष वळवले.’’ बेबीचा गट यानंतर जोमाने नवनवीन कामे करत राहिला. त्यांनी बालवयात होणारे विवाह आणि बालमजुरी थांबवण्यातही यश मिळवले. गावात त्यांनी बालविवाहाविरुद्ध मोहीम चालवली होती, तेव्हा तर बेबीने लहान वयात लग्न झाल्यामुळे मुलीच्या आरोग्यावर आणि बाळाच्या वजनावर होणा-या दुष्परिणामांचा परस्पर संबंध दाखवून देणारे एक गाणेही लिहिले आहे. आज बेबी अभिमानाने सांगते की 2007 मध्ये गटाचे काम सुरू झाल्यापासून गावात बालमृत्यू किंवा बाळंतपणात आई दगावण्याची एकही घटना घडलेली नाही.
बेबीने स्वत:च्या आयुष्यातही आरोग्यविषयक जाणिवेचा उपयोग करून घेतलेला आहे. तिचे लग्न ठरवले जात असताना तिने लग्नापूर्वी भावी पतीची टेस्ट करून घेण्याचा आग्रह धरला आणि अमलातही आणला. आज तिचे लग्न झाले आहे आणि ती नव्या घरी जुळवून घेण्यात मग्न आहे. तरीही ती नर्सिंगचा कोर्स करते आहे आणि त्याचसोबत गर्भारपणी जाणीवपूर्वक स्वत:ची काळजी घेत आहे.
सगळ्या धावपळीतही तिने तिच्या हिमोग्लोबिनची पातळी 14च्या खाली येऊ दिलेली नाही. सध्या सामाजिक कामाकडे तिला फारसे लक्ष देता येत नसले तरी लवकरात लवकर गावातले काम सुरू करायची तिची इच्छा आहे. या धडाडीच्या मुलीला नेहमीच सगळ्या ठिकाणी यश मिळेल आणि सगळ्या अडीअडचणीतून मार्ग काढण्याची शक्ती मिळेल अशी मला खात्री आहे!
  kharevandana@gmail.com