आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सक्षमीकरण की सापळा?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्या ठिकाणी पुरुषांसाठी हंड्या बांधल्या जातात, तिथेच तशाच वातावरणात महिलांसाठी हंड्या बांधल्या जातात. एकीकडे स्त्रियांनी सार्वजनिक ठिकाणी मोकळेपणाने वावरू नये अशी सामाजिक परिस्थिती तयार केली जात आहे आणि दुसरीकडे उत्सवांचा पुरुषी ढाचा न मोडता त्यात महिलांना सामावून घेतले जात आहे. पुरुषांनी केलेल्या मूर्खपणाची बरोबरी करण्याला सक्षमीकरणाचे नाव देणे खूपच धोक्याचे आहे...

“अगर लडके कुछ कर सकते हैं , तो हम क्यों नहीं?”
“आजच्या जगात जर बायका डॉक्टर, इंजिनिअर, पायलटसुद्धा होऊ शकतात – तर दहीहंडी का नाही फोडू शकणार?”
“हमें भी कुछ करना चाहिये, यही सोच कर हमने दहीहंडी में हिस्सा लिया!’
“आम्ही जेव्हा पहिल्यांदाच रस्त्यावर उतरलो आणि पहिला थर लावला तेव्हा लोक आपापली कामं सोडून आमच्याकडेच पाहत राहिले.”
“आम्हाला पूर्वी वाटायचं की, आपल्याला हे जमणार नाही, पण आम्ही करून दाखवलं! आम्ही एकत्र आलो तर मुलांच्या बरोबरीने काहीही करू शकतो!”
हे शब्द आहेत दहीहंडी पथकांतल्या काही मुलींचे. दहाबारा वर्षांपासून मुंबईत दहीहंडी फोडणाऱ्या महिला पथकांची संख्या वाढत चालली आहे. अशाच एका महिला पथकाविषयी एका स्त्रीवादी संस्थेने बनवलेली एक फिल्म नुकतीच पाहण्यात आली. मुलांसारखे कपडे घालून थरावर थर रचायचा सराव करणाऱ्या मुली, निरनिराळ्या रस्त्यांवर मजेने नाचत गात फिरून दहीहंड्या फोडणाऱ्या आणि विजयामुळे मुलांसारखाच आनंदाने जल्लोष करणाऱ्या मुली जागोजाग या फिल्ममध्ये दिसत होत्या. ती दृश्ये पाहून आणि पथकातल्या मुलींच्या ज्या मुलाखती घेतलेल्या होत्या, त्यातल्या मुलींच्या तोंडचे हे शब्द ऐकून मी चांगलीच विचारात पडले! एकीकडे फिल्ममध्ये दिसणाऱ्या त्या मुलींच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वासाचे मला कौतुक वाटत होते, पण दुसरीकडे त्यासाठी त्यांनी शोधलेले निमित्त काही पटत नव्हते.
 
मागच्याच आठवड्यात दहीहंडी झाली! आमच्या मुंबईत दहीहंडी उत्सवाचं मोठंच प्रस्थ आहे. कृष्णजन्माच्या सोहळ्यातल्या भक्तिभावनेपेक्षा दुसऱ्या दिवशी होणाऱ्या दहीहंडीच्या धिंगाण्यालाच खूप जास्त महत्त्व असते. ज्या दिवशी दहीहंडी फोडली जाते त्या दिवशी तर सार्वजनिक सुटीच असते. पण त्या दिवसाच्या दोनतीन दिवस आधीपासूनच दहीहंडीबद्दलच्या बातम्या झळकायला लागतात. अनेक लोकांना दहीहंडी म्हणजे मुंबईचे अभिमानास्पद वैशिष्ट्य वाटते. कोणकोणत्या ठिकाणी किती उंचीवर हंड्या बांधल्या जाणार आहेत, कोणत्या ठिकाणी किती लाख रुपयांची बक्षिसं लावलेली आहेत, कुठल्या पथकाने मागच्या वर्षी किती थर लावून हंडी फोडायचा विक्रम केला होता, याचे तपशील देणाऱ्या बातम्यांनी पेपरांच्या पुरवण्या भरल्या जात असतात. दहीहंडीची उंची आणि त्यात भाग घेणाऱ्यांची सुरक्षितता याबद्दल काही नियम आणायचा प्रयत्न केला जाणे आणि त्या नियमांना धुडकावले जाणे, यावरून होणारे वाददेखील याच सुमाराला चिघळायला लागतात.

दहीहंडीच्या पथकातल्या मुलांना ‘गोविंदा’ म्हणायची पद्धत आहे. कदाचित त्यामुळे पथकातली ही मुलं स्वत:ला कृष्णाचे अवतार समजून आजूबाजूला दिसणाऱ्या महिलांना गोपी समजतात आणि त्ेयांची भरपूर छेडछाड करायचा हक्क बजावून घेतात. सकाळपासून घराबाहेर पडल्यावर गोविंदा पथकांकरिता ठिकठिकाणी खाण्यापिण्याची सोय केली जाते. मात्र, पोटपूजा केल्यानंतर प्लॅस्टिकच्या ताटल्या, पाण्याच्या बाटल्या रस्त्यावरच टाकण्यात येतात. त्यामुळे दहीहंडी परिसरातील रस्त्यांवर जागोजागी कचऱ्याचा खच पडलेला पाहायला मिळतो. दहीहंडी बांधलेली असते त्या परिसरात वातावरण निर्मितीसाठी अावाजावरच्या सगळ्या मर्यादा ओलांडून कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात गाणी लावलेली असतात. आयोजकांच्या ऐपतीनुसार त्यात नाचगाणी, सिनेतारकांच्या भेटी यांची भर पडत जाते. सायकलवरून किंवा ट्रक भरून घोळक्याने जाणारे गोविंदा रस्त्यात थांबून जो धांगडधिंगा करतात त्यामुळे सगळीकडे ट्रॅफिक जाम होत असतो. अशा अनेक गोष्टींना घाबरून दहीहंडीच्या दिवशी तर बहुतेक सर्वसामान्य माणसं गुपचूप घरातच बसून राहणं पसंत करतात! गेल्या अनेक वर्षांपासून जसजसं या सणाचं व्यापारीकरण होत चाललेलं आहे, तसतसा या सणाशी जोडलेला धांगडधिंगा, ध्वनिप्रदूषण, ट्रॅफिक जाम, मुलींची छेडछाड अशा स्वरूपातला त्रासच वाढत चालल्याचा अनुभव यायला लागलेला आहे!
 
दहीहंडीच्या दिवशी बहुतेक सगळ्या वृत्तवाहिन्या ठाण्यापासून पालघरपर्यंत चालू असलेल्या कुठल्या न कुठल्या ठिकाणची दृश्यं आलटूनपालटून दाखवत असतात. ज्या ठिकाणी लाखो रुपयांची बक्षिसे लावलेली असतात, तिथे अनेक सिनेकलाकार आपापल्या सिनेमांच्या प्रमोशनसाठी येतात, वेगवेगळे राजकीय नेते येतात, त्यांच्यासमोर आणि त्यांच्यासोबत स्थानिक लोक थोडा वेळ नाचून घेतात. दिवसभर ठिकठिकाणी उंचावर टांगलेल्या हंड्या फोडण्यासाठी पुन्हापुन्हा नव्या उत्साहाने थरावर थर लावणारे तरुण, त्यांचे उंचावरून कोसळणे हा थरार टीव्हीवर दिसत राहतो! त्या कोसळलेल्या माणसांचे पुढे काय होते, हे सांगायला आणि ऐकायला त्या दिवशी तरी कुणालाच सवड नसते. कारण सगळे वातावरण ताकदीचे प्रदर्शन करणाऱ्या मर्दानगीच्या उन्मादाने भरलेले असते. काही लोकांच्या आर्थिक आणि राजकीय ताकदीचे प्रदर्शन करण्यासाठी काही जणांची शारीरिक ताकद पणाला लावली जात असते. पारंपरिक पितृसत्ताक विचारांच्या चौकटीत पुरुषांनी बेधडकपणे कसलीही जोखीम घेणे याचे खूप कौतुक केले जात असते. दहीहंडीच्या सणानिमित्त अशी जोखीम घेण्याला एक धार्मिक अधिष्ठान दिले जाते. उंचच उंच दहीहंडी फोडण्यासाठी हातपाय मोडण्याची किंवा प्रसंगी जीव गमावण्याची जोखीम घेण्याचे प्रदर्शन करणाऱ्या पुरुषांचा एका दिवसभरासाठी गौरव केला जातो, त्यांना बक्षीस दिले जाते!
 
माझ्या लहानपणी हे प्रदर्शन केवळ पुरुषांपुरतेच मर्यादित होते, पण गेल्या काही वर्षांपासून यात महिलादेखील सामील व्हायला लागल्या आहेत. ज्या ठिकाणी पुरुषांसाठी हंड्या बांधल्या जातात, तिथेच तशाच वातावरणात महिलांसाठी हंड्या बांधल्या जातात. पण पुरुषांसाठी जशी लाखो रुपयांची  बक्षिसे असतात त्याऐवजी महिलांसाठी मात्र काही हजारांचीच बक्षिसे लावली जातात. यूट्यूबवर या महिला पथकांच्या कामगिरीचे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओमध्ये अगदी नऊवारी साड्या नेसून दहीहंडी फोडणाऱ्या मुलीदेखील दिसतात. पण बहुतेक वेळा दहीहंडी पथकातल्या मुली अगदी मुलांसारखेच कपडे घालून थरावर थर रचताना आणि हंडी फोडून तसाच जल्लोष करताना दिसतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या या सामीलकीचे पारंपरिक विचारांच्या राजकीय पक्षांकडूनसुद्धा जाहीर कौतुक केले जात असते. एरवी जेव्हा सार्वजनिक ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल भूमिका घ्यायची वेळ येते, तेव्हा याच राजकीय पक्षांचे नेते महिलांच्या विरोधात भूमिका घेतात. बायकांनी कसे कपडे घालावेत, कोणासोबत कोणत्या वेळी घराबाहेर जावे, याचे सल्ले देणारे हेच राजकीय पक्ष दहीहंडीच्या दिवशी मात्र भिजलेल्या अवस्थेत टी-शर्ट आणि हाफ पँट घालून रस्त्यात नाचणाऱ्या मुलींना बक्षिसे देताना दिसतात. फक्त दहीहंडी उत्सवापुरतीच या पक्षांची मानसिकता बदलते याचा अर्थ काय बरं असावा? या पारंपरिक पुरुषी मानसिकतेमध्ये अडकलेल्या राजकीय नेत्यांना अचानक स्त्रीवादी विचारांना पाठिंबा देण्याचा झटका कशामुळे येत असावा?
 
मला तर वाटतं की, धार्मिकतेच्या आणि उत्सवाच्या आवरणाखाली महिलांच्या स्वातंत्र्याला पुरुषी वागणुकीच्या साच्यात कोंबण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न आहे. एकीकडे स्त्रियांनी सार्वजनिक ठिकाणी मोकळेपणाने वावरू नये अशी सामाजिक परिस्थिती तयार केली जात आहे आणि दुसरीकडे उत्सवांचा पुरुषी ढाचा न मोडता त्यात महिलांना सामावून घेतले जात आहे. पुरुषांनी केलेल्या मूर्खपणाची बरोबरी करण्याला सक्षमीकरणाचे नाव देणे खूपच धोक्याचे आहे! किमान दहीहंडीच्या निमित्ताने का होईना; पण तरुण मुलींना रस्त्यावर मोकळेपणाने हुंदडायला मिळते आहे, स्वत:ची शारीरिक ताकद आजमावायला मिळते आहे याबद्दल आपण आनंद मानत बसलो तर रोजच्या आयुष्यात सहजपणे सार्वजनिक ठिकाणी वावरायचा हक्क आपण कधी गमावून बसू, ते लक्षातदेखील येणार नाही.
 
vandanakhare2014@gmail.com
बातम्या आणखी आहेत...