आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आटत चाललेली शक्‍ती!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्त्रियांनी घराबाहेर पडून काम करणं हे केवळ अर्थार्जनाशीच संबंधित असतं असं नाही. या मुद्द्याला इतरही अनेक बाजू आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत नोकरी करणाऱ्या महिलांची टक्केवारी सातत्यानं घसरते आहे. ती देशाच्या आर्थिक विकासाशीही जोडलेली आहे.

‘भारतातल्या बायका आळशी आहेत, त्यांना दिवसभर टीव्ही बघत टंगळमंगळ करायची असते!’ हे मी म्हणत नाहीये; तर ते आहे भारतीय पुरुषांचे एक प्रातिनिधिक मत. 

काही दिवसांपूर्वी टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रात सुबोध वर्मा या पत्रकाराचा एक लेख प्रकाशित झाला होता. त्या लेखात म्हटले होते की, जगात सगळीकडे जरी नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या वाढत चाललेली असली तरी भारतात मात्र हे प्रमाण घसरत चाललेले आहे. हा लेख जागतिक बँकेच्या एका ताज्या अभ्यासाच्या अहवालावर आधारलेला आहे. या अभ्यासात असे दिसले की, आपल्यासारखीच सामाजिक परिस्थिती असलेल्या श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळ या आपल्यापेक्षा गरीब देशांतदेखील घराबाहेर जाऊन काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण बरेच जास्त आहे. भारतात हे प्रमाण फक्त २७% आहे, पण बांगलादेशात ते ५४% आणि नेपाळमध्ये ८०% आहे ! गेल्या काही वर्षांत भारताची आर्थिक प्रगती झपाट्याने झालेली असूनसुद्धा श्रमशक्तीमधील महिलांचा सहभाग कमी होत चाललेला आहे. या घसरणाऱ्या आकडेवारीची कारणं आपल्या देशातल्या पितृसत्ताक विचारसरणीमध्ये आहेत, असंही या लेखकाने सुचवलेलं आहे! पण या लेखात मांडलेले विचार अनेक पुरुषांना अजिबात आवडले नाहीत; त्यामुळे त्यावर अशा अनेक विरोधी प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींना लेखातली आकडेवारीच मान्य नाही! काहीजण म्हणताहेत की, पत्रकार मंडळींना उगाच काहीतरी धक्कादायक लिहायची हौस असते, म्हणून हा असा लेख लिहिला आहे! एकजण म्हणतोय की, भारत आणि नेपाळची तुलना करणेच चुकीचे आहे! तर कुणी म्हणतं आहे की, ‘बायकांनी घरी बसून कुटुंबाकडेच लक्ष द्यावे, म्हणजे घटस्फोट होणार नाहीत आणि समाजात गुन्हेगारी वाढणार नाही.’ ‘सनातन धर्माने बायकांवर घर सांभाळायची आणि पुरुषांवर बाहेर जाऊन पैसे कमवायची जबाबदारी दिली आहे!’ लेखावरच्या प्रतिक्रियांमध्ये अशी बरीच मुक्ताफळं उधळलेली आहेत! थोडक्यात, स्त्रियांचा कामगारवर्गातला सहभाग कमी होण्यातलं गांभीर्य अनेकांच्या लक्षातच आलेलं नाही! 

खरं म्हणजे जागतिक बँकेच्या या ताज्या अहवालाच्या आधीपासूनच वेगवेगळे संशोधक आपल्या देशात अर्थार्जन करणाऱ्या महिलांची संख्या कमी होत चालल्याचे निरीक्षण मांडत आहेत. आपली सरकारी आकडेवारी सांगते की, महिलांचा श्रमशक्तीमधील सहभाग २००५पासून २०१४पर्यंत ३७%पासून २७%पर्यंत घसरलेला आहे. २०१३मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनेसुद्धा नोकरी करणाऱ्या महिलांच्या प्रमाणावरून जगातल्या १३१ देशांची क्रमवारी लावली होती, त्यात भारताला १२१वा क्रमांक दिला होता. २०११-१२मध्ये झालेल्या नॅशनल सँपल सर्व्हेमध्ये असे दिसून आले होते की, आपल्या देशात शहरी भागात फक्त १४.७% नोकरदार महिला आहेत. २००५मध्ये ४९% ग्रामीण महिला कामगार होत्या त्यांचे प्रमाण २०१५पर्यंत ३६% इतके कमी झाले आणि २०१७पर्यंत ते आणखीनच घसरले आहे. एकीकडे आपल्या देशात शिकणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढत चालले आहे; या सुशिक्षित महिलांना काम करून पैसे कमावण्याची इच्छा असल्याचेही त्या बोलून दाखवत आहेत. तरीही त्याच वेळी अर्थार्जन करणाऱ्या महिलांचे प्रमाण मात्र कमी होत चाललेले आहे. चालू वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांमध्ये तब्बल २४ लाख महिलांनी नोकऱ्या सोडल्या आहेत. जगातील बहुसंख्य देशांत देशाच्या आर्थिक प्रगतीच्या बरोबरीने स्त्रियांचा कामगारवर्गातला सहभाग वाढलेलाच दिसतो. पण भारतात मात्र उलट परिस्थिती आहे!

या चमत्कारिक परिस्थितीला हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधील अर्थतज्ज्ञ डॉक्टर रोहिणी पांडे यांनी “श्रिंकिंग शक्ती” (Shrinking Shaktiकमी होत चाललेली शक्ती) असे नाव दिलेले आहे. स्त्रियांचे अर्थार्जन आणि त्याबरोबर होणारे सामाजिक बदल या विषयाच्या अनुषंगाने डॉक्टर पांडे काही वर्षांपासून संशोधन करीत आहेत. भारतातल्या कामगारवर्गातून महिला का नाहीशा होत चालल्या आहेत याचा शोध घेणे त्यांना अतिशय महत्त्वाचे वाटते. 

मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी या विषयावर “श्रिकिंग शक्ती” या नावाची परिषद दिल्लीमध्ये आयोजित केली होती. डॉक्टर पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशभरात केलेल्या विविध संशोधनांतून असे दिसून आले आहे की, अर्थार्जनासाठी काम करण्यात महिलांना दोन मुख्य अडथळे येतात. पहिली मोठी अडचण म्हणजे स्त्रियांवरची सामाजिक बंधने. आपल्या देशात बहुसंख्य स्त्रियांना घराबाहेर पडण्यासाठी कुटुंबाची परवानगी घ्यावी लागते. देशभरातल्या सर्वेक्षणात ७५ ते ८० टक्के महिलांना आरोग्य केंद्रात आणि नातेवाइकांकडे जाण्यासाठीसुद्धा घरातल्या पुरुषांची परवानगी घ्यावी लागते असे दिसून आले आहे. जर घरातून बाहेर पडणेच इतके अवघड असेल तर त्या काम शोधणार तरी कशा? अनेक पुरुषांना आपल्या बायकोने पैसे मिळवणे अपमानास्पद वाटते; शिवाय लग्न झालेल्या महिलांवर घरकामाच्या अनेक जबाबदाऱ्या असतात. बाईला घरासाठी स्वयंपाक करणे, पाणी भरणे, कपडे धुणे, आजाऱ्याची सेवा अशी अनेक कामे करावीच लागतात. या कामांचे तिला पैसेही मिळत नाहीत आणि त्यांची ‘काम’ म्हणून कधी दखलसुद्धा घेतली जात नाही. नोकरी करणाऱ्या बाईला कुटुंबासाठी करायला लागणाऱ्या बिनपैशाच्या कामातून सूट मिळत नाही! अनेक जणींना घरकामाच्या ओझ्यामुळे किंवा मुलांची काळजी घ्यायला पुरेशा सोयी नाहीत म्हणून नोकरी सोडावी लागल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. कामाच्या ठिकाणी जर पाळणाघराच्या सोयी उपलब्ध झाल्या तर अनेक महिलांना नोकरी करणे परवडेल. 

याशिवाय कामाच्या ठिकाणची असुरक्षितता ही नोकरदार महिलांची दुसरी अडचण असते! कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ आणि सारख्याच कामासाठी पुरुषांपेक्षा कमी पगार मिळणे यामुळे बायकांच्या वैतागात भरच पडते. अनेक बायकांना कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत सोयीदेखील मिळत नाहीत. घरापासून कामाचे ठिकाण दूर असेल तर तिथपर्यंत पोचण्याच्या रस्त्यावरची सुरक्षितता हादेखील एक काळजीचा मुद्दा असतो. यामुळे बऱ्याच जणी घराजवळ मिळणारे काम पसंत करतात. आपल्या देशात एखाद्या बाईने घराबाहेर पडून पैसे कमवायचे ठरवले तर तिच्यासमोर इतक्या प्रकारचे अडथळे उभे असतात. थोडक्यात, देशाच्या श्रमशक्तीमधला स्त्रियांचा सहभाग हा त्यांच्या आळशीपणामुळे कमी राहिलेला नसून पितृसत्ताक समाजाने महिलांवर टाकलेल्या दडपणामुळे तो आक्रसला आहे. जर स्त्रियांचा सहभाग पुरुषांइतका वाढला तर देशाचं सकल राष्ट्रीय उत्पन्न तब्बल ६० टक्क्यांनी वाढेल, असं मॅकिन्से ग्लोबल इन्स्टिट्यूट या आंतरराष्ट्रीय पाहणी संस्थेचे मत आहे. पण स्त्रियांच्या या आक्रसलेल्या श्रमशक्तीचा विस्तार व्हायला हवा असेल तर अर्थातच पुरुषप्रधान मानसिकता बदलावी लागेल आणि त्याच्यासाठी पुरुषांनाच पुढाकार घ्यायला लागेल!
 
- वंदना खरे, मुंबई vandanakhare2014@gmail.com 
बातम्या आणखी आहेत...