आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकोत गुणगानाचे पोकळ ढोल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काल संध्याकाळी अचानक एक अनोळखी बाई माझ्या बिल्डिंगमध्ये आल्या आणि त्यांनी आमच्या मजल्यावरच्या सर्वांच्या घराची बेल वाजवली. आम्ही चौघी शेजारणींनी दार उघडताच त्यांनी आमच्यापैकी कुणाकडे एखादी सहासात वर्षांची लहान मुलगी आहे का, म्हणून चौकशी केली. त्यांना म्हणे नवरात्रात नऊ दिवस नऊ मुलींना जेवायला घालायचे आहे, त्यात दोन/तीन मुली कमी पडत होत्या... त्यांना हवी तशी लहान मुलगी आमच्याकडे तरी काही सापडली नाही! पण त्या निमित्ताने नवरात्रात केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्रतांची चर्चा सुरू झाली. माझी उत्तर भारतीय शेजारीण सांगायला लागली की, कुमारिकेच्या पूजेशिवाय नवरात्रातल्या कुठल्याच व्रताचं फळ मिळत नाही, अशी तिच्या सासरी श्रद्धा आहे. कुणी म्हणे नऊ दिवस नुसती फळं खाण्याचा उपास करते, कुणी एकच वेळ जेवते, कुणी नवरात्रात चप्पल घालत नाही! प्रत्येकाच्या कुलस्वामिनीच्या प्रसादाच्या वेगवेगळ्या रीतीभाती, नवरात्र म्हणजे देवीचा सण, देवीची वेगवेगळी रूपं, जणू काही स्त्रीशक्तीचेच विविध आविष्कार. एकजण म्हणाली की, आपण घरातल्या बाईलासुद्धा गृहलक्ष्मी म्हणतो, अन्नपूर्णा म्हणतो. संस्कृतीमध्ये स्त्रीशक्तीलाच एवढं महत्त्व आहे की, आपल्याला स्त्रीमुक्तीसारख्या पाश्चिमात्त्य कल्पनांची गरजच नाहीये! तुमचा ‘विमेन्स डे’ तर वर्षातून एकदाच असतो, भारतात तर नवरात्रीचे नऊ दिवस स्त्रीशक्तीचा जागर केला जातो. पण जी भारतीय संस्कृती वर्षातले नऊ दिवस स्त्रीशक्तीचे पूजन करते, तिला वर्षभर स्त्रियांवर होणारा अन्याय दिसत नाही का? की वर्षातले नऊ दिवस देवीची भक्ती केल्यावर उरलेले सगळे दिवस जिवंत स्त्रियांचे सगळे हक्क पायदळी तुडवले जाण्याचं पाप भरून निघत असेल?  जरी संस्कृतीमध्ये बाईला देवी अन्नपूर्णेचं स्थान असलं तरी घराघरातल्या बाईच्या पोटात अन्नाचा घास सगळ्यात शेवटीच पडतो. घरातल्या पुरुषांचे आणि मुलाबाळांचे जेवण झाल्यानंतरच बायकांनी जेवायचे अशीच आपल्या संस्कृतीची शिकवण आहे ना? आपणच शिजवलेलं अन्न घरातल्या सगळ्यांना पुरवून उरलेलं आपण खायचं, या परंपरेमुळे अनेकदा बायकांना कमी अन्नावर भूक भागवावी लागते. मध्यमवर्गीय घरातल्या बायकांना एखाद्या दिवशी अन्न कमी पडलं तर फारसा फरक पडत नसेल, पण गरीब घरातल्या बाईवर आठवड्यातून अनेकदा उपाशी राहायची वेळ येते! 

नवरात्रातल्या नऊ दिवसांत अनेकांच्या घरी कुमारिकांना कौतुकाने जेवायला घालण्याची प्रथा आहे, पण याच समाजात बहुसंख्य मुली कुपोषित असतात हे एक कटू वास्तव आहे! लहानपणापासूनच मुलींच्या आहार-आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. देशात एक ते पाच वयोगटात जे बालमृत्यू होतात त्यात मुलींची संख्या मुलग्यांपेक्षा १७ टक्क्यांनी जास्त आहे; असे युनिसेफच्या ताज्या आकडेवारीत म्हटलेले आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका या शेजारी देशांपेक्षाही हे प्रमाण जास्त आहे. अन्न, पोषण आणि आरोग्याची काळजी या तिन्ही बाबतीत मुलींकडे होणारे दुर्लक्ष हे याचे मुख्य कारण असल्याचे समाजशास्त्रज्ञांचे मत आहे.  देशात बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण जरी मोठे असले तरी त्यातही मुलींचे प्रमाण जास्त असते. कमालीच्या कुपोषणामुळे दवाखान्यात दाखल करण्यात येणाऱ्या मुलांमध्ये ६८% मुली असतात. मुलींना किशोरवयात तसंच गरोदरपणी आणि स्तनपानाच्या काळातही विशेष पोषक आहाराची गरज असते. पण भारतातल्या १०  ते १८ वयोगटातल्या निम्म्यापेक्षा जास्त (५६%) मुलींना अॅनिमिया असतो, असे सरकारी सर्वेक्षणातून दिसून येते. याचाच अर्थ, किशोरवयीन मुलींच्या पोषणाकडे आपण कमालीचे दुर्लक्ष करतो. आपल्या देशात मुलींचे लग्नाचे सरासरी वय १७ वर्षे असते. म्हणजे रक्तपांढरीला बळी पडलेल्या याच मुली मोठ्या होऊन जेव्हा आई बनतात, तेव्हा कमी वजनाच्या मुलांना जन्म देतात. भारतातल्या कुपोषित मुलांचे प्रमाण सबसहारन आफ्रिकेतल्या प्रमाणापेक्षाही जास्त आहे. एवढंच नाही तर अॅनिमिया हेच देशात बाळंतपणातल्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे. आंतरराष्ट्रीय अन्न धोरणाविषयी संशोधन करणाऱ्या पूर्णिमा मेनन म्हणतात की, स्त्री-पुरुषांमधली विषमता हे भारतातल्या कुपोषणाचे महत्त्वाचे कारण आहे. 

राजस्थानातल्या काही गावांमध्ये ‘राजस्थान न्यूट्रिशन प्रोजेक्ट’तर्फे २०१५मध्ये आदिवासी भागात एक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात असे लक्षात आले की, पुरुष आणि स्त्रियांना मिळणाऱ्या अन्नाच्या प्रमाणात बरीच तफावत आहे. एकाच घरात राहणाऱ्या माणसांपैकी पुरुषांचे पोट भरत असले तरी बायका आणि मुलांना उपाशी राहावे लागत असे. बहुतेक घरांमध्ये किती माणसांसाठी केवढे अन्न शिजवले जाणार याचा निर्णय पुरुषांच्याच हातात होता. घरातल्या पुरुषांचे जेवण झाल्यावरच बायकांनी जेवायची प्रथा इथेदेखील होतीच! ज्या घरात अन्नाविषयीच्या निर्णयात महिलांचा नगण्य सहभाग होता, त्या घरातल्या महिला आणि मुले कमालीची कुपोषित होती. यावरचा उपाय म्हणून घरातल्या सर्व सदस्यांनी एकाच वेळी जेवायला बसणे हा पर्याय या गावात राबवला गेला. हा उपाय कमालीचा यशस्वी ठरला. प्रकल्पाच्या शेवटी बायका आणि मुलांच्या पोषणात दुप्पट वाढ झालेली दिसली. शिवाय अन्नाविषयीच्या घरातल्या निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसला. या उदाहरणावरून हेच दिसून येते की, स्त्रियांना निर्णयप्रक्रियेत स्थान असण्यामुळे कुटुंबाच्या आरोग्याच्या पातळीत सकारात्मक फरक पडतो. उदिशातदेखील भूकबळीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या कालाहंडीसारख्या भागांमध्ये केअर या संस्थेने असेच प्रयोग केले गेलेले आहेत. युनिसेफसारख्या संस्थाही महिला आणि मुलींमधील कुपोषण कमी करण्याचे जे प्रयत्न करतात, त्यातदेखील लोहाच्या गोळ्या पुरवण्यासोबत स्त्रियांच्या सर्वांगीण सक्षमीकरणावरही भर देतात. बायकांचे एकूण सामाजिक स्थान आणि त्यांचे आरोग्य यांचा अतिशय जवळचा संबंध आहे, हे अनेक अभ्यासातून दिसून आलेले आहे. थोडक्यात आपल्या देशात स्त्रियांच्या आरोग्याची जी वाईट अवस्था आहे त्याचे कारण त्यांच्या दुय्यम सामाजिक स्थानात आहे. ज्या संस्कृतीत स्त्रियांना रोज पोटभर जेवायला मिळत नाही, त्यांच्या आरोग्याची सातत्याने काळजी घेतली जात नाही, त्यांना निर्णयप्रक्रियेत स्थान नाही, आर्थिक स्वातंत्र्य नाही, सार्वजनिक ठिकाणी मोकळेपणाने वावरण्यासारखी सामाजिक परिस्थिती नाही, त्या संस्कृतीने देवीच्या गुणगानाचे पोकळ ढोल बडवू नयेत!
 
- वंदना खरे,  मुंबई
vandanakhare2014@gmail.com
बातम्या आणखी आहेत...