आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर कर करा मर मर मरा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गृहिणीचंं काम सरसकट गृहीत धरलं जातं. ते तिचं कर्तव्यच, असं मानणाऱ्यांची भारतात कमी नाही. अशा स्त्रियांच्या घरकामाच्या श्रमाची किंमत कधीच केली जात नाही. मग जिथं शारीरिक श्रमांकडे दुर्लक्ष तिथं भावनिक श्रमाचं मोल कसं कळायचं?


कर कर करा
मर मर मरा
दळ दळ दळा
मळ मळ मळा
तळ तळ तळा
तळा आणि जळा.
धूव धूव धुवा
शीव शीव शिवा
चीर चीर चिरा
चिरा आणि झुरा
कूढ कूढ कुढा
चीड चीड चिडा
झीज झीज झिजा
शिजवा आणि शिजा
कर कर करा
मर मर मरा


विंदा करंदीकर यांची ही कविता तुम्ही नक्कीच कधी तरी वाचली, ऐकली असेल. गृहिणीच्या कामातला तोचतोपणा आणि कुणीच तिच्या कामाची दाखल घेत नसल्यामुळे तिला येणारा वैताग या कवितेमधून किती नेमकेपणाने मांडलेला आहे ना! कविता तशी बरीच जुनी आहे, मग आजच या कवितेची आठवण काढायचं कारण काय? तर या कवितेची आठवण येण्यासारख्या दोन महत्त्वाच्या घटना नुकत्याच घडल्या. पहिली घटना अगदी चीड आणणारी होती तर दुसरी मजेदार आणि विचार करायला लावणारी! एका घटनेत गृहिणीच्या कामांना गृहीत धरणे आहे तर दुसऱ्या घटनेत तिच्या श्रमांचे मूल्य समजून घेणे आहे.


घटना क्र. १ - राजस्थान सरकारतर्फे प्रकाशित होणाऱ्या मासिकात आरोग्य राखण्यासाठी काही व्यायाम सांगितलेले आहेत. महिलांनी जात्यावर दळण दळणे, पाणी भरणे आणि झाडूपोछा करणे ही कामे केल्याने त्यांना चांगला व्यायाम मिळू शकतो - अशी भलामण या मासिकात केलेली आहे. घरकाम हे जणू फक्त बायकांनीच करायचे असते - या पारंपरिक समजुतीला अशा प्रकारे सरकारी मासिकातून बळकटी दिली जाणे आणि घरकाम करण्यात बायकांचेच भले होणार आहे - अशी मखलाशी करणे अगदीच आक्षेपार्ह आहे. एकीकडे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा देणारे सरकार दुसरीकडे ‘बायकांची जागा चुलीपाशी’ असल्याचेच सुचवते आहे! या मासिकाचा राजस्थानातल्या महिला संघटनांनी जोरदार विरोध केला होता. जेव्हा देशभरात या घटनेवरच्या प्रतिक्रिया उमटत होत्या तेव्हा माझ्या मनात विंदा करंदीकरांची ‘कर कर करा’ ही कविता सतत पार्श्वसंगीतासारखी वाजत होती! या रडगाण्याला ब्रेक लागला एका सुंदर सिनेमाने.


घटना क्र. २ - ‘तुम्हारी सुलू’ हा सिनेमा! एका सामान्य गृहिणीला नायिकेच्या जागी ठेवणारा हा सिनेमा म्हणजे भारतीय समाजाच्या इतिहासातली एक महत्त्वाची घटना आहे. या सिनेमात गृहिणीच्या भावनिक श्रमांचीसुद्धा दाखल घेतलेली आहे. विद्या बालनने साकारलेली ही सुलू अगदी घरोघरी दिसणाऱ्या गृहिणीसारखीच आहे. कुटुंबाला आनंदी ठेवणारी, हसतमुख आणि छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणारी! जगण्यासाठी घराबाहेर लढून, थकून आणि हरून येणाऱ्या नवऱ्याला सगळ्याच गृहिणी जशा भावनिक आधार देतात तशीच सुलूदेखील देते! त्याच्यासोबत स्वप्नं पाहाते, गाणी म्हणते, रोमान्स करते, सल्ला देते, धीर देते, शिवाय त्याला हसवतेसुद्धा! पण घरासाठी ती करत असलेले हे भावनिक श्रम जेव्हा ती घराबाहेरच्यांसाठी करायला लागते – तेव्हा काय होते? त्याचीच गोष्ट आहे ‘तुम्हारी सुलू’. सामान्य गृहिणीपासून रेडिओ जॉकी बनण्याचा सुलूचा प्रवास मनोरंजक तर आहेच, पण त्यात गृहिणीच्या भावनिक कौशल्यांचे महत्त्व फार सुंदर प्रकारे अधोरेखित केलेले आहे! 


असंख्य गृहिणी वर्षानुवर्षं घरादारासाठी राबत असतात. घरातल्या लहानमोठ्या माणसांना सकाळच्या चहा-नाष्ट्यापासून, अंघोळीचे पाणी, धुतलेले आणि इस्त्री केलेले कपडे, घराबाहेर जाताना जेवणाचा डबा आणि पुन्हा घरी आल्यावर गरमागरम सुग्रास जेवण इथपर्यंत सगळं काही गृहिणीच्या कष्टामुळे घरातल्या माणसांना बिनबोभाट मिळत राहतं. जोपर्यंत घरात सगळ्यांना सगळं काही वेळेवारी मिळत असतं, तोपर्यंत तिचे आभार मानणे दूर, कुणी तिच्या कष्टाची साधी दखलही घेत नाही! खरं तर घराचे व्यवस्थापन हे अतिशय कौशल्याचं काम असतं, कारण त्यासाठी नुसते शारीरिक श्रमच नाही, तर भावनिक श्रमदेखील करावे लागतात. घरातल्या सगळ्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी सांभाळणे, गळके नळ आणि बंद पडलेली यंत्रं दुरुस्त करून घेणे,  मुलांचा अभ्यास, सतत हसतमुखाने वावरणे यासाठी जी शक्ती खर्च करावी लागते – ते असतात गृहिणीचे भावनिक श्रम! या श्रमांमुळेसुद्धा शारीरिक कष्टासारखाच थकवा येतो. पण या भावनिक श्रमांची कधी स्वत: गृहिणीदेखील मोजदाद करीत नाही आणि बहुसंख्य पुरुषांना तर त्याची कल्पनाच नसते! पुरुषांनी लहान सहान कारणांनी संतापणे, हात उगारणे, मारहाण करणे, निराश होऊन दारू ढोसणे – या सगळ्याला समाज मान्यता असते. घरगुती बाबतीत पुरुषांना भावनिक साक्षरता नसणे – हे जणू गृहीतच आहे.कारण त्याचा भार पेलते घरातली गृहिणी! बहुसंख्य घरातले पुरुष या भावनिक श्रमांचे ओझे घरातल्या बायकांवर टाकून बिनधास्त होतात. कारण एखादी स्त्री पूर्णवेळ गृहिणी असेल किंवा नोकरी करत असेल तरीही तिने कुटुंब जोडून ठेवण्यासाठी हे सगळे करणे हे तिचे कर्तव्य आहे असेच मानले जाते. किंबहुना या तिच्या भावनिक श्रमांच्या ताकदीवरच पुरुषांच्या श्रमशक्तीचे अर्थकारण टिकून असते. घराबाहेर जाऊन काम करणाऱ्या पुरुषांच्या श्रमशक्तीचे पुनर्निर्माण करण्यासाठी गृहिणीचे शारीरिक-भावनिक श्रम खर्ची पडतात. पण या श्रमांना प्रेम, त्याग, समर्पणाच्या गोंडस आवरणाखाली झाकून ठेवले जाते. स्त्रियांनी घरकामाच्या खुंट्याला बांधून घेणं प्रतिष्ठेचं मानले जाते. घरासाठी तिने स्वत:च्या आर्थिक, शारीरिक आणि मानसिक गरजांना बाजूला ठेवावे, अशी अपेक्षा असते. स्त्रियांनी पैसे मिळवण्याच्या कामासाठी घराबाहेर पडणे हे अनेक नवऱ्यांना अपमानाचे वाटते. पण त्यांच्या घरातल्या कामाची दखल घ्यायची मात्र कुणाची तयारी नसते. 


स्त्रियांच्या घरकामातल्या शारीरिक कष्टांची अनेक सर्वेक्षणातून मोजदाद झाली आहे. भारतातले पुरुष दिवसातली फक्त १९ मिनिटे घरकामासाठी देतात आणि भारतीय महिला दिवसातले पाच तास घरकामावर खर्च करतात, असेही दिसून आलेले आहे. पण शारीरिक कष्टांच्या व्यतिरिक्त कराव्या लागणाऱ्या तिच्या भावनिक श्रमांची मोजदाद कशी करणार? मुळात या श्रमांचे महत्त्व कसे उमगणार? आणि या भावनिक श्रमांचा भार पुरूष कधी उचलणार? कदाचित ‘तुम्हारी सुलू’सारखे सिनेमे याबद्दल जागरुकता निर्माण करू शकतील.
तोपर्यंत – कर कर करा आणि मर मर मरा!’ 


- वंदना खरे, मुंबई
vandanakhare2014@gmail.com 

बातम्या आणखी आहेत...