आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vanita Tambake Article In Madhurima, Divya Marathi.

धीर धरा यश तुमचेच...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक महिलेत सुप्त गुण असतात. मला चांगले पदार्थ बनवता येतात. या गुणाच्या आधारावर मी व्यवसायात उतरले. या व्यवसायानेच माझ्या कुटुंबाला आधार मिळाला. कोणताही व्यवसाय करताना प्रथम ना नफा ना तोटा या तत्त्वानुसार सुरुवात केली पाहिजे. प्रारंभी नुकसान झाले तरी हिमतीने मार्गक्रमण करावे.
पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल, नुकताच विवाह झाला होता. वर्ष-दोन वर्षं चांगली गेली. त्यानंतर पतीच्या व्यवसायात मोठा तोटा सहन करावा लागला. घर चालविणे मुश्कील बनले. अशा काळात माहेरची मंडळी धावून आली. छोट्याशा भांडवलात घरातच किराणा दुकान सुरू केले. अक्कलकोट स्टेशनसारख्या छोट्या गावात किराणा दुकानावर गुजराण शक्य नव्हते. त्यामुळे जोडधंदा करण्याचे प्रयत्न सुरू झाले. लहानपणापासून मला विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवण्याची आवड होती. चकली करण्यात माझा हातखंडा होता. काही लोकांनी तू चांगले पदार्थ बनवतेस, तर घरीच करून विकायला काय हरकत आहे, असा सल्ला दिला. तेव्हापासून चकली व इतर पदार्थ बनवून दुकानातच विकायला सुरुवात केली.
चांगली चव आणि खुसखुशीतपणामुळे या पदार्थांना मागणी वाढली. किराणा दुकानापेक्षा मी बनवलेल्या पदार्थांना मागणी वाढली. विशेषत: चकलीला ग्राहकांची पसंती होती. दररोज पहाटे चारला उठून चकली करत असे. रोज ताजा माल दुकानात ठेवल्याने हळूहळू इतर दुकाने आणि आसपासच्या गावातून चकलीला मागणी वाढली. याच काळात बचतगटाच्या माध्यमातून अडलेल्या-नडलेल्या महिला एकत्र येत होत्या. माझ्यासारख्या महिलांना एकत्र आणून प्रियदर्शनी महिला बचतगटाची स्थापना केली. या बचतगटाच्या माध्यमातून चकली विक्रीस सुरुवात केली. इतर महिलांनाही रोजगार मिळाला.
सुरुवातीला बचतगटाचा माल कुणी घेत नव्हते. दर पाडून मागायचे. अपमानास्पद वागणूक मिळायची. हेलपाटे मारावे लागत. पण हिंमत न हारता काम सुरू ठेवले. या काळात माझे पती सुनिल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. घरोघरी, दुकानात जाऊन माल विकला.
बचतगटांसाठीच्या प्रदर्शनांमुळे बळ मिळाले. बाजारपेठ मिळाली. चकलीबरोबरच शेंगाचटणी, जवस, कारळे चटणी, ज्वारी रवा, आवळा जाम आणि काळे/लाल तिखट आदी पदार्थ विक्रीस ठेवू लागलो. तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनात बचतगटांच्या पदार्थांना चांगला प्रतिसाद मिळाला.
जोड व्यवसाय म्हणून सुरू केलेल्या चकली व्यवसायाने कुटुंबाला आधार दिला. सोलापूर जिल्ह्यासह पुणे, नाशिक, उस्मानाबाद, कर्नाटकातील गुलबर्गा, विजापूर जिल्ह्यातून मागणी वाढली. त्यामुळे चकली बनविण्याचं यंत्र घेण्याचं ठरवलं. पैसे उभे केले आणि तीन लाख रुपयांचं यंत्र बुक केलं आहे. बचतगटांच्या पदार्थांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर मार्केट मिळवून देणे आणि मॉल्समध्येही ते विक्रीसाठी ठेवण्याचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने बचतगटांच्या पदार्थांना ब्रँड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझ्या छोट्याशा व्यवसायाने आता चांगलेच बाळसे धरले आहे. समाजकार्यातही बचतगट अग्रेसर आहे. व्याख्यानासाठी बोलावणे येते.
महिला विचारतात, तुम्ही कसे मिळविले यश? तेव्हा सुरुवातीचे हालाखीचे दिवस आठवतात. महिलांना एकच सांगणे आहे, प्रत्येक महिलेत सुप्त गुण असतात. मला चांगले पदार्थ बनवता यायचे, याचाच वापर करून मी व्यवसायात उतरले. त्यानेच मला आधार दिला. तुम्ही तुमच्यातील अशा गुणाची दखल घ्या, तो वाढवा. कोणताही व्यवसाय करताना प्रथम ना नफा ना तोटा या तत्त्वानुसार सुरुवात केली पाहिजे. प्रारंभी नुकसान झाले तरी हिमतीने मार्गक्रमण करा. धीर सोडू नका. यश एक ना एक दिवस मिळतेच.
- शब्दांकन : उमेश कदम
umesh.k@dbcorp.in
पुढील स्‍लाइडवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो....