आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाहिरातीमधील सामाजिक भान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूट्यूबवरBrave & Beautiful ही डाबर वाटिकाची जाहिरात बघितली. ती मनाला खूप भावली. ब-याच दिवसांनी सुंदर जाहिरात बघितल्याचे समाधान वाटले. एका स्त्रीचे कर्करोगातून बाहेर पडणे, दैनंदिन आयुष्य नव्याने सुरू करताना डळमळलेला आत्मविश्वास परत मिळवताना कुटुंब व समाजाने केलेले सहकार्य मनाला स्पर्शून जाते.

एक तरुण नोकरदार स्त्री. कर्करोगाच्या विळख्यातून नुकतीच बाहेर आलेली. सकाळची वेळ. तिचा केसासहितचा फॅमिली फोटो. मुलीला शाळेसाठी तयार करण्याची लगबग. नकळत सवयीने केसांकडे जाणारा हात आणि केस नाहीत असे जाणवल्यावर मनाची झालेली घालमेल. कुटुंबासमवेतचे आनंदाचे क्षण, मुलीला दारापर्यंत पोहोचवताना कुणी पाहिले तर नाही ना म्हणून पटकन दार बंद करणे. आजारपणानंतर पहिल्यांदा ऑफिसला जाताना पोशाख कसा करावा, या अवस्थेत आपल्याला काय चांगलं दिसेल, डोकं कव्हर करावं की नको म्हणून झालेला संभ्रम, शेवटी साडी नेसून समाजाला तोंड द्यायला सज्ज होणारी ती. तिच्या पतीने गालबोट म्हणून लावलेली ती टिकली खूप काही सांगून जाते. मनात शंका. संकोचाने ती ऑफिसला जाते. आता कोण काय बोलतील म्हणून मनाची घालमेल; पण क्षणभरच. कारण सहकारी मैत्रिणींना थोड चुकल्यासारखं झालं तरी त्यांनी लगेच आपापल्या टिकल्या काढत तिच्या टकलाच्या एका बाजूला लावून नकारात्मक ऊर्जा दूर करत अन् तिला नजर लागू नये म्हणून जणू सर्वांनी तिचे वेलकम केले. शेवटचे तिचे ते पाणावलेले डोळे खूप काही बोलतात. आणि स्क्रीनवर जेव्हा “Some people don’t need hair to look beautiful” हे वाक्य येतं तेव्हा ते आपल्याही मनाचा ठाव घेतं.

जाहिरात चालू असताना तिच्या फक्त चेह-यावरचे भाव बोलतात. पार्श्वगीताच्या माध्यमातून कुठल्याही संवादाशिवाय अतिशय प्रभावीपणे जाहिरात खूप काही सांगून जाते. अतिशय भावनिक स्वरूपाची ही जाहिरात आहे. गाण्याचे बोलदेखील जणू त्या स्त्रीला प्रेरणा देत आहेत असे वाटते.
खूबसूरती चेहरे पे नहीं दिल में होती है|
तेरी जिंदगी सीप में छिपा अनमोल मोती है|
लकीरों के बदले तू ले उसुल,
तू फौलाद है, तू है फूल|
लड लडके तूने जो पाया, सर पे तेरे उस का साया
निखरी बन के तू सोना, खुद को इतना पिघलाया
जलाकर खुद को किया अंधेरा दूर
तू फौलाद है, तू हे फूल|
एखाद्या तेलाच्या जाहिरातदाराने काही लोकांना सुंदर दिसण्यासाठी केसांची गरज नसते, असे म्हणणे धीटपणाचे म्हणावे लागेल. सहसा ज्या उत्पादनाविषयीची जाहिरात असते तिचे गोडवे न गाता अगदी ठामपणे जाहिरात वास्तव मांडते. ब्रँड्स नेहमी म्हणतात, स्त्री केसांमुळे अधिक सुंदर दिसते वा स्त्रीच्या सौंदर्याचा एक मापदंड केस आहे. आपणही आपल्या आतापर्यंतच्या संकल्पनांत केस व सौंदर्य याच्याविषयी साहित्य वाचले-ऐकलेले आहे; पण या जाहिरातीने समीकरणच बदलूनच टाकले.
ज्या स्त्रिया कॅन्सरसारख्या आजारातून जात आहेत वा बाहेर पडल्या आहेत, त्यांचे केमोथेरपीमुळे केस जातात व टकलामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यातून सावरताना साधारण आयुष्याला सुरुवात करताना आपण समाजाने त्यांना सहजतेने घ्यावे. या जाहिरातीने समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. हा बदल कौतुकास्पद आहे.
आपणही कर्करोगातून सावरणा-या स्त्रियांना, समाजाच्या, कुटुंबाच्या साथीने खंबीरपणे नव्या उमेदीने पुनरागमन करण्यासाठी साथ देऊया.
varshavg3@gmail.com