आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेखिकांना भावनाऱ्या नायिका...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलांनी प्राचीन काळापासून साहित्यामध्ये आपले योगदान दिलेले आहे. लेखिकांनी त्यांच्याभोवती असलेल्या अदृश्य अशा लेखनासाठीच्या मर्यादा ओलांडायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला फक्त नातेसंबंध, स्त्रियांचे घरगुती आयुष्य आणि चार भिंतींमधील त्यांचे अस्तित्व याबद्दलच लिहिले जात होते; मात्र आता या चौकटीच्या पलीकडे लेखिका लिहिताना दिसत आहेत. महिलांच्या साहित्यातून महिला शक्तीचा जागर आणि स्त्री सक्षमीकरणाचे काम होण्यास मदतच होत आहे. महिला दिनाच्या निमित्ताने नामवंत साहित्यिकांशी बोलून त्यांना त्यांनीच निर्माण केलेल्या, त्यांच्या कथा, कादंबरी, कवितांमधील कोणत्या नायिका अधिक भावतात, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
अन्यायाविरुद्ध लढणारी अनुराधा
डॉ. प्रतिमा इंगोले या महाराष्ट्र लोकसाहित्याच्या अभ्यासक आहेत. साधारणपणे ऐंशीहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेल्या प्रतिमाताईंनी बालसाहित्य, कविता आणि वैचारिक लेखनात मुशाफिरी केली आहे.  नक्षलवाद, शेतमजूर, पंचमहाभुते, बलुतेदारी यांसारखे विविध विषय त्यांनी आपल्या साहित्यातून हाताळले अाहेत. राज्य शासनाच्या यशवंतराव चव्हाण वाङ‌्मय पुरस्कारातील श्रीपाद गोपाळ कृष्ण कोल्हटकर पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 
 
मी लिहिलेल्या लेखनातील प्रत्येक नायिका मला भावलेली आहे. उलट मी तर असे म्हणेन की, त्या सर्व नायिका या माझ्या मानसकन्याच आहेत. मी माझ्या पुस्तकात मांडलेल्या नायिका या प्रत्यक्ष जीवनात मला कुठेतरी भेटलेल्या आहेत. कधी कधी तर अनेक महिला मला अशा आजूबाजूला दिसल्या की, जेव्हा मी काही लेखन केले तेव्हा त्या एकाच नायिकेमध्ये मला भेटलेल्या महिलांची छबी दिसून आली. माझी ‘पार्ट टाइम’ ही कादंबरी पाहा. यामधली अनुराधा ही नायिका मला अधिक भावली. अनुराधा अन्यायाविरुद्ध संघर्ष करते. ज्या महाविद्यालयात ती प्राध्यापिका म्हणून काम करते, ती तिची पार्ट टाइम नोकरी असते. ही नोकरी करत असताना अनेकदा तिची कुचंबणा होते. महाविद्यालयीन कामामध्ये येणारा संघर्ष, प्राचार्यांमार्फत वेळोवेळी तिची करण्यात येणारी अडचण अशा परिस्थितीत ती अन्यायाविरुद्ध लढा देते. वेळोवेळी शिक्षणक्षेत्रामध्ये बदल घडविण्यासाठी प्रयत्न करते. हे सगळे मला खूप आवडते. अन्यायाविरोधात संघर्ष करताना अनुराधा तिचे काम शांतपणे करत राहते. ग्रामीण लोककथेवर आधारित आगामी ‘साशाटे’ या कादंबरीतील नायिकाही अशीच आहे, जी संघर्ष करते. आपली माय गेल्यावर भूमीला आपली माय समजून ती अन्यायाविरोधात बंड करते. आजपर्यंत मला ज्या महिला आजूबाजूला दिसल्या, त्यांचे प्रतिनिधित्व कुठे ना कुठे माझ्या लेखनातून वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न मी आतापर्यंत केला आहे आणि यापुढेही करत राहणार आहे.
डॉ. प्रतिमा इंगोले 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, हक्कासांठीचा मानसिक संघर्ष...
-------------------------
संकलन 
वर्षा फडके, मुंबई
varsha100780@gmail.com
बातम्या आणखी आहेत...