आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आला वसंत राणा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

याद पिया की आए, ये दुख सहा ना जाए
बाली उमरिया सूनी कजरिया, यौवन बीतो जाए
बैरी कोयलिया कूक सुनाए, मुझ बिरहन का जियरा जलाए
आँखी दिन रैन जगाए

येत्या चोवीस तारखेला पहाटे जर उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांच्या या ठुमरीने जाग आली तर आपण वसंतागमनाशी सहृदय झालो आहोत असे म्हणण्यास हरकत नाही! आपल्या प्रेमाचा रंग अग्निज्वाळेसारखा लालसर पिवळा आहे. त्याचा वास आंब्याच्या मोहोराचा आहे. त्याचा आवाज भ्रमराचा आहे. त्याच्या देवता रती आणि मदन आहेत. मैथुन त्याचे कर्मव्रत आहे. स्वत:ची सौंदर्यदृष्टी तयार करणे आणि स्वत:तील सौंदर्य ओळखणे हा त्याचा उद्देश आहे. त्याचा स्थायीभाव रती आहे आणि रस शृंगार आहे. प्रेमी याचे विभाव आहेत, तर चंद्र, तारे, फुले, भ्रमराचा आवाज, नदी, तलाव, समुद्रावरून वाहणारे वारे आणि अर्थात वसंतागमन हे याचे उद्दीपन विभाव आहेत. मैथुन याचा अनुभाव आहे आणि लज्जा, खळखळून हसणे, आळस वाटणे हे याचे संचारी भाव आहेत. खरे तर वसंत ऋतूचे कौतुक हे भारतीय मनाला सहज भावणारे असले पाहिजे कारण यात निसर्गाशी एकरूपता आहे. ही प्रेमाची भाषा शिकण्याची, शिकवण्याची, समजण्याची वेळ. प्रेमाची सहजता आणि उत्स्फूर्तता अनुभवणे म्हणजे वसंताची आराधना करणे. एरवी सामाजिक मूल्यांमुळे, केवळ भीतीमुळे, न्यूनगंडामुळे व अशाच अनेक कारणांमुळे आपण आपली सौंदर्यदृष्टी झाकून ठेवलेली असते. मात्र, वसंतागमनाने ही दृष्टी पुन्हा प्रकाशमान करावी, सभोवताली पाहावे, प्रेम अनुभवावे आणि निसर्गाच्या या प्रेरणेचे कौतुक करावे. त्याचा उत्सव करावा तो वसंतपंचमीला म्हणजेच माघ शुद्ध पंचमीला. या दिवशी पिवळे कपडे परिधान करावे. संभोगशृंगार आणि विप्रलंभशृंगार असे शृंगाररसाचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात प्रिय जवळ आहे आणि प्रेम प्रकट करणे व अनुभवणे शक्य आहे. मैथुन शक्य आहे. दुसºया प्रकारात भेट शक्य नाही. या दोन्हींचे आपापले स्थान आहे. त्यात बरे वाईट, चूक बरोबर काहीच नाही. दोन्हीमधे शृंगाररस प्राप्त होतोच.
कुसुमजन्म ततो नवपल्लवास्तदनु षट्पदकोकिलकूजितम।
इति यथाक्रममाविरभून्मधुर्द्रुमवतीमवतीर्य वनस्थलीम।
अभिनयान परिचेतुमिवोद्यता मलयमारुतकम्पितपल्लवा।
अमदयत सहकारलता मन: सकलिका कलिकामजितामपि?

कालिदासाने कुमारसंभवात वसंताच्या उन्मादक सौंदर्याची किमया अत्यंत प्रभावी शैलीत वर्णिली आहे. कालिदास, माघ, भारवी, श्रीहर्ष इत्यादींनी वसंतश्रीचे सौंदर्य वर्णिले आहे.
मकर संक्रांतीनंतरचे सध्याचे हे दिवस खरोखरीच चैतन्यमयी. माघ शुद्ध पंचमीपासून सुरू होणाºया या वसंतोत्सवाने साºया जनमानसात एक वेगळेच चैतन्य पसरते. माघ शुद्ध पंचमी ते फाल्गुन वद्य पंचमी हा दीड महिन्याचा काळ म्हणजे वसंतोत्सव. याचे प्रमुख कारण म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाने निसर्गात अनेक बदल होतात. हेमंत ऋतूतील पानगळीनंतर निसर्गाचा नूर पालटलेला असतो. सर्वत्र उदासी, मळभ पसरलेले असते, बाहेरचे वातावरण ज्याप्रमाणे, तसेच मनालाही मळभ आलेले असते. विरह, हुरहूर आणि एकटेपणाच्या छटांनी सारा माहौल मरगळलेला असतो.
अशातच निसर्गाला हिरवा साज चढू लागतो आणि ही उदासी हळूहळू दूर होते. चंद्र, तारे, सूर्य, समुद्राच्या लाटा सारे पूर्ववत चित्तवृत्ती खुलवू लागतात. मनातील औदासीन्य तर केव्हाच मावळलेले असते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव या तिन्ही सणांच्या समीकरणाने जनमानसात आनंद पसरू लागतो. फाल्गुन कृष्ण पंचमी अर्थात रंगपंचमीला तर एकच बहर असतो. पांढºया रंगाचे कपडे परिधान केलेली, नाजूकशी प्रेयसी समोर येताच तिला लाल गुलाबी रंगात चिंब भिजवून टाकण्याचा मोह अनावर होणारा प्रियकर आणि त्यामुळे छेडल्या गेलेल्या मनाच्या तारांनी आरक्त होऊन लाजून लाल झालेली प्रेयसी ही देखील वसंतोत्सवाचीच कमाल.
प्राचीन संस्कृत साहित्यात वसंतोत्सवालाच मदनोत्सव असेही संबोधले आहे. वनविहार, डोलोत्सव, पुष्पशृंगार असेही यास म्हटले जाते. पौराणिक कथांच्या अनुसारे कामदेवांच्या घरी पुत्ररूपी वसंत ऋतूचा जन्म होतो. वृक्ष नव्या पालवीचा पाळणा वसंतासाठी करतात आणि फुलेपाने त्याच्यासाठी नवीन वस्त्रांची भेट घेऊन येतात. मंद वाºयाची झुळूक त्याला झोके देते आणि कोकीळ पक्षी त्याच्या मनोरंजनासाठी गाणी गातो. असा हा आल्हाददायक वसंत.
वसंताच्या आगमनापासूनच धान्य पेरणीला सुरुवात होते. हे धान्य पिकून धरेला पिवळा साज चढतो. त्यामुळेच बंगाल, मध्य प्रदेश येथे पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करून वसंतोत्सव साजरा केला जातो. घरात केशरी भात किंवा पिवळ्या रंगाचे पदार्थ आवर्जून केले जातात. पंजाबात आणि पाकिस्तानातही याच सुमारास पतंगोत्सव साजरा होतो. आजच्या घडीला आपल्याकडे मात्र रंगपंचमीनेच वसंतोत्सव साजरा केला जातो. थंडगार पाणी आणि त्याच्या जोडीने रंगांची उधळण एकमेकांवर करताना आबालवृद्ध आनंदतात. रंगाच्या पखरणीने दैनंदिन आयुष्याला झळाळी तर मिळतेच परंतु आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन देखील मिळतो. चैतन्य आणि रंगांच्या साथीने झालेली प्रफुल्लित मने यांनी रंगोत्सव अर्थात वसंतोत्सवाला नवा साज चढतो. आणि पुन्हा पुढील वर्षाच्या वसंतोत्सवाची आस प्रत्येकाच्याच मनाला लागते.