आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजि मी ब्रह्म पाहिले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अवनीचा जन्म अमेरिकेत झाला. तिथे प्रीनेटल क्लासेसला जाण्याची पद्धत आहे. तिथे आम्हाला डिलिव्हरीबद्दल सगळी माहिती दिली गेली. सिझेरियन कसं होतं, एपिड्युरल इंजेक्शनची मोठी सुई, ती कुठे लावली जाते, आदी सगळं आधीच कळलं होतं, त्यामुळे मनाची तयारी होती. बाळाला लागणाऱ्या सर्व वस्तूही - कपडे, डापयर, कार सीट, वगैरे - डिलिव्हरीच्या आधीच आणून ठेवणं आवश्यक आहे, हे सांगण्यात आलं. हॉस्पिटलमधली आमची खोलीही आम्हाला आधीपासून दाखवलेली होती.
अमेरिकेत हे गृहीतच असते की नवरा लेबर रूममध्ये असणार. फक्त रक्त पाहून त्रास होणार असेल तरच तिथे न राहण्याचा सल्ला देण्यात येतो. बाळाची नाळ कापायची संधीही पित्याला दिली जाते. आई नऊ महिने त्रास सहन करतेच, पण जन्म देताना तिला किती यातनांना सामोरे जावे लागते, ते या अनुभवावरून कळले. डॉक्टरांबद्दलचा आदर वाढला. आणि आपलं बाळ सगळ्यात आधी पाहायला मिळालं, या गोष्टीचा आनंद मोठा होता.
जेव्हा बायकोला कळा येत होत्या, तेव्हा वाटत होतं की हा त्रास कधी एकदा संपेल. तिचे आईवडील तेव्हा तिथे नसल्याने मीच तिला सोबत करायला होतो. या अनुभवानंतर महिलांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात नक्कीच फरक पडलाय. त्यांच्याबद्दलच्या आदरात वाढ झाली. खासकरून आई व आजीच्या कष्टांची. तेव्हा तर अशी सुसज्ज हॉस्पिटल्स पण नव्हती, त्यामुळे त्यांचं कौतुकही वाटतं. मी जेव्हा अवनीची नाळ कापली, तेव्हा मनात धाकधूक होती की काही चुकणार तर नाही. पण त्याच वेळी प्रत्यक्ष सहभागाचा आनंद होता. व छानही वाटलं की आपल्या बाळाला जगात आणण्यात व आईपासून स्वतंत्र करण्यात आपला छोटासा का होईना पण वाटा आहे. दुसऱ्या मुलाच्या वेळी आम्ही भारतात होतो. इथे वडिलांना परवानगी देत नाहीत, असं कळलं होतं. मग डॉक्टरांना विनंती केली.
आताही बायकोचे आईवडील जवळ नव्हते, त्यामुळे मी आत असणं आवश्यक होतं. डॉक्टर परदेशात शिकून आलेल्या असल्याने त्यांनी मला आत येण्याची परवानगी दिली, पण मी कोपऱ्यात उभा होतो फक्त. माझा काहीच सहभाग नव्हता. तसंच, डॉक्टर वगळता इतरांना माझ्यामुळे काहीसं ऑड वाटत होतं, त्यामुळे मीही थोडा अस्वस्थ होतो. शेवटी एवढंच सांगेन, हा अनुभव जगातील प्रत्येक बापाने घ्यावा. आतल्या मुलाला वा मुलीला या जगात आणण्याच्या प्रक्रियेचा भाग होण्याची संधी कधीही गमावू नका, यासारखा दुसरा आनंद जगात नाही.