आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 वर्षांपुढील समस्या कठीण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मधुरिमामध्ये ‘ऑटिझम’विषयी अंबिका टाकळकर व नमिता देशपांडे यांचे सविस्तर लेख आणि साधना गोडबोले यांची माहिती छापून ऑटिझम या सातत्याने वाढत असलेल्या विकाराबद्दल जनजागृतीचे कार्य सुरू केल्याबद्दल आपणास धन्यवाद!

सुदैवाने काही शैक्षणिक-सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विशेष मुलांसाठी निवासी शाळा, कार्यशाळा बऱ्याच ठिकाणी सुरू केल्या आहेत. त्या ठिकाणी त्यांच्या दैनंदिन गरजा, खाणे-पिणे वगैरे भागविण्याचे काम चालू आहे. याबद्दल विशेष मुलांचे पालक त्यांच्या सदैव ऋणात राहतील, यात शंका नाही.

परंतु या ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते की, सध्या अशा विविध निवासी शाळा व संस्थांमध्ये ऑटिस्टिक मुलांना प्रवेश दिला जात नाही. काही ठिकाणी प्रवेश दिला जातो, तेथे ऑटिझमव्यतिरिक्त इतर मेंदू विकारांनी ग्रस्त विकलांग मुलांचा भरणा मोठ्या संख्येने आहे. त्यांच्यात ऑटिस्टिक मुले मिसळू शकत नाहीत व समरस होऊ शकत नाहीत. कारण ते बौद्धिकदृष्ट्या जरी कमकुवत असले, तरी शारीरिक दृष्टीने सक्षम असतात व त्यांची बौद्धिक पातळीही थोडी उच्च प्रतीची असते. त्यामुळे त्यांच्या पालकांनी विशेष मेहनत घेऊन त्यांचा थोडाफार विकास घडवून आणलेला असतो, तोही तेथे खुंटतो. ती हिंसक होतात. त्या ठिकाणचे प्रशिक्षित शिक्षक व कर्मचारी वर्ग त्यांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतात; परंतु त्यामुळे प्रश्न सुटत नाही व त्या मुलांची प्रगती होत नाही. म्हणून अशा ऑटिस्टिक मुलांसाठीच फक्त स्वतंत्र निवासी शाळा, कार्यशाळा सुरू करण्याची आवश्यकता प्रकर्षाने जाणवते. अशा स्वतंत्र शाळांमधून या मुलांची सकारात्मक क्षमता, त्यांच्या अंगी असलेले गुण व कौशल्य तपासून त्यानुसार त्यांना विशेष प्रशिक्षण दिल्यास ते स्वावलंबी व कार्यनिपुण होऊन कुटुंबात व समाजात त्यांचे पुनर्वसन होण्याची शक्यता फार मोठी असू शकते.

हे मी स्वानुभवावरून सांगत आहे. माझा १८ वर्षांचा नातू हेमंत ऑटिस्टिक आहे. मुंबईत उपचार सुरू केले व अजूनही सुरू आहेत. साधनाताईंच्या प्रसन्न ऑटिझम सेंटरमध्ये पाचव्या वर्षापासून आणि त्यानंतर १८ वर्षांपर्यंत त्यांच्याच मार्गदर्शनाप्रमाणे ‘फिनिक्स स्कूल’मध्ये हेमंतला दाखल करून शिक्षण दिले. त्यामुळे तो प्राथमिक स्वरूपाचे चौथीपर्यंतचे गणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार शिकला. इंग्रजी, हिंदी, मराठी भाषांमधून लिहिणे, वाचणे यात तो चांगल्या प्रकारे प्रशिक्षित झाला. इतर विषय भूगोल, इतिहास वगैरेंचेही आकलन त्याचे चांगले होते. त्याला घरगुती खासगी शिकविण्या लावून हार्मोनियम वाजवणे आणि विविध संगीताचे राग वगैरेसुद्धा शिकविले होते. त्यामुळे आज ना उद्या त्याला सामान्य मुलांप्रमाणेच अभ्यास करता येईल व सामान्य शाळेत उशिरा का होईना त्याला प्रवेश मिळेल, अशी आशा वाटू लागलेली होती.

परंतु १८ वर्षे वयानंतर फिनिक्स स्कूलमध्ये ठेवत नसल्याने त्याच्यासाठी इतर दुसऱ्या कार्यशाळा शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले. भरपूर ठिकाणी स्वत: जाऊन आणि इंटरनेटवरसुद्धा चौकशी केली. परंतु ऑटिस्टिक मुलांसाठी अशी विशेष कार्यशाळा (निवासी शाळा) कुठेही सापडली नाही. म्हणून नाइलाजाने घरीच ठेवावे लागले. तेथे काही उद्योग नसल्याने व पालक विशेष प्रशिक्षित नसल्याने तो रिकामा राहू लागला. त्यामुळे हिंसक होऊ लागला. म्हणून नाइलाजाने इतर विशेष मुलांसाठी असलेल्या निवासी कार्यशाळांमधून एक-दोन ठिकाणी त्याला दाखल करावे लागले. परंतु तेथे तो एकटा पडल्याने प्रगती शून्य!

आमच्यासारखी परिस्थिती अनेक पालकांची असेल. त्यामुळे अशा मुलांसाठी विशेष निवासी कार्यशाळा कोण्या समाजसुधारक, सुजाण व्यक्ती किंवा संस्था यांनी स्वतंत्रपणे सुरू केल्यास अशा मुलांचे पालक त्यांचे निश्चितच स्वागत करतील. अशा विशेष शाळांमधून विशेष प्रशिक्षित शिक्षक वर्गाकडून आणि काळजीवाहकांकडून त्यांच्या अंगभूत कौशल्यांवर आधारित शिक्षण दिल्यास त्यांचा बौद्धिक आणि मानसिक विकास होण्याची शक्यता फार मोठी असू शकेल. त्यामुळे अशी मुले स्वावलंबी बनून समाजात सन्मानाने वावरू शकतील आणि त्यांच्या पालकांनासुद्धा त्यांचा अभिमान वाटेल.
बातम्या आणखी आहेत...