आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोष्टी ताबेदारीच्या आणि विरोधाच्याही....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काश्मीर म्हणजे अशांतता, काश्मीर म्हणजे अस्वस्थता, काश्मीर म्हणजे फुटीरवादी नेत्यांचे नंदनवन, अशी प्रतिमा जपलेल्यांना फहाद शाह यांनी प्रस्तुत पुस्तकाद्वारे सांगितलेल्या कहाण्या आणि त्यातून दिसणारा काश्मिरी माणूस हादरवून टाकतो...

मुंबईच्या सुरक्षित वातावरणात बसून काश्मीरच्या स्वातंत्र्याची चर्चा करणे आणि वास्तव व तात्त्विक पैलू लक्षात घेऊन एखाद्या निष्कर्षाला पोहोचणे वेगळे. परंतु बरोबर किंवा चूक असलेल्या स्वातंत्र्याच्या चळवळीमुळे, परक्या वाटणाऱ्या सैन्याच्या ताब्यात असणाऱ्या भूभागावर जन्म घेणे व मोठे होणे वेगळे! ‘ऑफ ऑक्युपेशन अँड रेझिस्टन्स : रायटिंग्ज फ्रॉम कश्मीर’ पुस्तक वाचताना हे पदोपदी जाणवते. म्हणूनच पुस्तक सलग वाचणे अशक्य होते. कुणाच्याही मुलांना असे आयुष्य जगायला लागू नये, हे वाटत राहते. सर्वच कथनं लहान मुलांची नाहीत, परंतु त्यांच्यासाठी हळहळ जास्त वाटते. मोठ्यांनी शांत आयुष्य पाहिलेले आहे, परंतु मुलांचा जन्मच या अशांत वातावरणात झाला; त्यांनी जन्मल्यापासून भयग्रस्त वातावरण, अत्याचार हेच पाहिले. ‘आजादी’चा अर्थ न कळताच आजादीचे नारे ऐकले, कधी चळवळीत भाग घेतलेले वा त्याच्याशी दुरन्वयेही संबंध नसलेले नातेवाईक गायब होताना वा अत्याचाराचे बळी झालेले पाहिले, म्हणून आजचा काश्मिरी माणूस स्वातंत्र्य चळवळीच्या योग्यायोग्यतेची चर्चा अजिबात करणार नाही. चुकीच्या मार्गाने जाणाऱ्यांवरही अमानवी अत्याचार करण्याचा परवाना कुणीही स्वत:कडे घेऊ नये. कारण असे केल्यानंतर स्वत:ला सुसंस्कृत समजण्याचा अधिकार हा समाज गमावून बसतो...
असे काय या पुस्तकात आहे, ज्यामुळे ही अस्वस्थता वाटते? ९०च्या दशकाच्या सुरुवातीला, भारतीय सैन्याने सरसकट सर्वच काश्मिरींना संशयित ठरवून अत्याचार केले, हे जरा तरी पचवणे शक्य आहे. कारण या सैन्याला स्वकीयांशी लढण्याचा अनुभव नव्हता व त्यांना स्वत:लाच असुरक्षित वाटत होते. एक लहान मुलगा हे सांगतोही. पण २००८-२०१० मध्येही अत्याचारांच्या पद्धतीत मुळीच फरक पडलेला िदसून येत नाही. म्हणजे, ९० मध्ये जन्मलेल्या मुलांनी भारतीय सेनेचे, भारतधार्जिण्या सरकारचे फक्त अत्याचारच पािहले. मग भारत त्यांना आपला का वाटावा? दिल्लीत, जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या मुलाचा अनुभव सांगतो की, दिल्लीत हॉटेलात रूम मिळवणे अथवा इतर ठिकाणी घर घेणे, काश्मिरी मुसलमानाला अवघड जावे? मुंबईचा माझा अनुभवही हेच सांगतो. दिल्लीतील मुलाला याही गोष्टीचे अप्रूप वाटते की, त्याने निदर्शनांत भाग घेतला पण त्यांच्यावर गोळीबार झाला नाही. मुंबई वा इतर ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्यावर हा मुलगा स्वत:ला खोलीत कोंडून घेतो. त्याला भीती वाटते की, संशयित म्हणून पोलिस त्याला पकडतील. दिल्लीत शिकण्याचे फायदेही तो सांगतो. पण त्याला वाटते, जेएनयूसारखी संस्था श्रीनगरमध्ये असावी, म्हणजे त्याच्यासारख्या विद्यार्थ्यांना खोऱ्याबाहेर शिकायला निघायला नको. कारण इथे त्याला परके व असुरक्षित वाटते. हा तरुण हेही लिहितो की, जेएनयूची विद्यार्थी संघटना काश्मीरमधील मानवाधिकाराच्या उल्लंघनाविषयी चर्चासत्र, निदर्शने आयोिजत करते. त्याला
वाटते की, म्हणूनच काश्मीरमध्ये विद्यार्थी संघटनांवर बंदी आहे.
पुस्तकात बरेच संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे, पाकव्याप्त काश्मीरमधील एक मनोगत आहे. पाकिस्तानातही काश्मिरी लोकांना कसलेही अधिकार नाहीत, असे हा लेख म्हणतो. तसेच दोन-तीन लेख स्थलांतरित हिंदू पंडित समाजातील लेखकांचे आहेत. आपले घर सुटण्याचे दु:ख या समाजाला तर आहेच; तसे हेही वाटते आहे की, काही काळानंतर पंडित समाज निश्चितच भारतीय समाजात मिसळून जाईल, काश्मिरी हिंदू संस्कृती लयास जाईल. लहानपणापासून आजादीचे नारे ऐकत, बंदुका व मशीनगनच्या धमाक्यात मोठे झाल्याने तरुणांनी संस्कृतीबद्दल फारसा विचार केल्याचे, बहुतेक कहाण्यांमधून आढळत नाही. हे संपूर्ण पुस्तक वाचल्यावर, आजादी म्हणजे या पोरांच्या मनात काय होते? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. हा केवळ शिवाजी महाराज किंवा हिंदुत्व यासारखा फक्त भावनिक प्रश्न असू शकत नाही. याची वास्तविक अंगेही आहेत. याबद्दल फारसा विचार केलेला दिसत नाही. सगळे अत्याचार फक्त भारतीय सैन्याने केले? हे सर्व चालू असताना अनेक काश्मिरी मुसलमान म्हणायचे की, तुम्हाला फक्त पंडितांची काळजी आहे. त्यांना तर सरकारी मदत मिळते. आमचे काय? ‘कोई भी अनपढ गंवार मिलिटंट बंदूक की नोक पर कहता है कि, आपकी बेटी से हमारी शादी करा दो। बेटे थोडे जवाँ होते ही मिलिटंट उस को पटाने की कोशिश करते हैं और इंडियन आर्मी को पता चलते ही वह भी आ जाते हंै। हम तो दोनों तरफ से मारे जाते हंै।’ या बाजूचे चित्रण अजिबात आलेले नाही. दोन कथनांमधून मात्र आजादीच्या चळवळीविषयी भ्रमनिरास झाल्याचे आले आहे. एका कथानकात दगड फेकताना गोळी लागून जखमी झालेला तरुण सांगतो की, हुरियत नेता गिलानी इस्पितळात भेटायला आल्यावर गरीब तरुण मदत मागतात. त्यावर नेता त्यांना म्हणतो की, आम्ही तुम्हाला सांगितले नव्हते, दगड मारा म्हणून! तसेच दुसरा एक बारावीपर्यंत शिकलेला तरुण जो नेहमीच दगडफेकीत पुढे असायचा, एक िदवस गोळी लागून तो जखमी होतो. त्याच्या डोळ्यांना इजा होते. तो अपंगही होतो. गावाकडील शेतजमीन विकून वडील त्याचा इलाज करण्याचा प्रयत्न करतात. श्रीनगरचे डॉक्टर चुकीचा इलाज करतात. दिल्लीला नेल्यावर त्यांना कळते की, इलाजाला २० दिवस उशीर झाला आहे. आज तो अपंग व आंधळा होऊन विचार करताना त्याला उमगते की, त्याला ना हुरियतचे लोक मदत करतात, ना ओमर अब्दुल्ला. मदतीचे वचन तर दोघांनीही दिले होते. चळवळीतील त्याचे साथीदारही काही दिवसच त्याला भेटायला आले. तो म्हणतो, आजादीविषयी चळवळीत वा हुरियतमध्येच एकवाक्यता नाही. अशा परिस्थितीत चळवळ यशस्वी कशी होणार? यातील एक जण म्हणतो की, आपल्याजवळ पाणी आहे; आपण वीज निर्माण करू शकतो. सुपीक जमीन आहे; आपण फळे व औषधी वनस्पती विकू. एक चांगला पुढारी मिळाल्यास आपण आपले स्वातंत्र्य चांगले राखू शकू. पण घोडे तिथेच पेंड खात असेल तर? या पुस्तकाचा संपादक फाहद शाह याला मात्र भारतातील परिस्थितीची चांगली जाण आहे. तो काश्मीरच्या लढ्याला आदिवासी व दलित लढ्याशी जोडून घेतो. पण ती एक वेगळीच चर्चा होईल. पुस्तकात बरेच काही आहे. ज्यांना काश्मिरी लोकांबद्दल,
मानवतेबद्दल आस्था आहे, त्यांनी हे पुस्तक जरूर वाचायलाच हवे.
Á ऑफ ऑक्युपेशन अँड रेझिस्टन्स
रायटिंग्ज फ्रॉम कश्मीर
Á संपादन - फाहद शाह
Á प्रकाशक - ट्रान्कोबार (Tranqueber)
Á मूल्य - ३९५
vasantidamle@hotmail.com