आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vasudha Shivgan Article About Woman Freedom, Divya Maratahi

स्त्री स्वातंत्र्य की स्वैराचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्री स्वातंत्र्य ही वरवर पाहता राजकीय संकल्पना वाटते. पण संस्कृतीनुसार स्त्रीला स्वातंत्र्य आहे का? राजकीयदृष्ट्या जसा देश स्वतंत्र असतो तशी स्त्री स्वतंत्र आहे का असा प्रश्न विचारल्यास स्वातंत्र्य अनुभवणे म्हणजे नेमके आपण काय करतो, तर गाणे ऐकणे, फिरायला जाणे, खाणे-पिणे, मोकळ्या वेळेचा वापर मनाप्रमाणे करणे, संधी स्वीकारणे, व्यवहार करणे, करिअर निवडणे अशा गोष्टी डोळ्यासमोर येतात. ओव्हरऑल विचार करता माझ्या संदर्भात निर्णय मला घेता आला पाहिजे असा त्याचा अर्थ होतो.

एक क्षेत्र म्हणून कुटुंब, घर, मित्रमैत्रिणींचे घर, प्रवासाचे ठिकाण, क्लासेस, शाळा, कॉलेज अशा वेगवेगळ्या ठिकाणी स्वातंत्र्य ही संकल्पना लागू पडते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्वातंत्र्याची संकल्पना ही काही प्रमाणात बदलत जाताना दिसते.

नेहमी घरातून पुढीलप्रमाणे संवाद ऐकू येतात, ‘अरे कान फुटतील, बहिरेपणा येईल, अगं, किती वेळ त्या मोबाइलवर बोलतेस. एकतर मोबाइलवर बोलणं नाही तर कानात टाकून गाणी ऐकणं, काय चाललंय काय? आता मोठी झालीस तू! काय होणार आहे या नवीन पिढीचं कुणास ठाऊक? इतका स्वैराचार बोकाळलाय ना सिनेमा जाहिरातींमुळे! आमच्या वेळेस नव्हतं काही असं! आजकालच्या पिढीसमोर कसला आदर्शच नाही. आपल्या आणि आधीच्या पिढीसमोर होता. आताचे काय आदर्श आहेत? नुसतंच फक्त ग्लॅमर...’ या घराघरातून ऐकू येणार्‍या संवादांवरून आईवडिलांना दिली जाणारी उत्तरे यावरून आपल्याला अनुभवत असलेल्या स्वातंत्र्याची संकल्पना लक्षात येते.

- स्वातंत्र्य विरुद्ध बंधने
- स्वातंत्र्याची भावना खरं तर प्रकर्षाने आपल्याला या वयातच (किशोरावस्था) जाणवायला लागते.
-‘मला कळत नाही का?
- काय करावं आणि काय करू नये ते?
- मी आता लहान आहे का? मला कळतंय काय चांगलं आणि वाईट?’

अनेकदा पालक आणि मुलं यांच्यात याच गोष्टीवरून वाद होतात. पण पालक मुलांना मोकळीक द्यायला तयार नसतात. कारण या वयात धोके आहेत, वाया जाईल, बिघडेल अशी भीती त्यांना वाटत असते आणि मुलांना मात्र ते स्वातंत्र्य अनुभवायचं असतं.
अनेकदा असं होतं की मुलं ‘वास्तव स्व’ आणि ‘आदर्श स्व’ यांच्यामध्ये तुलना करत असतात. एकीकडे ‘सामाजिक स्व’ असतो. या ‘सामाजिक स्व’मध्ये आपल्यापेक्षा वरचढ मित्र-मैत्रिणी कुणी असतील किंवा तशी मुबलक साधनं असतील. त्या साधनांच्या आहारी जाऊन, त्या साधनांच्या सोबत किंवा मित्रमैत्रिणींच्या सोबत सामाजिक स्व त्यांना घडवायचा असतो. आपण अनेकदा अशा घटना ऐकतो किंवा आपल्या आजूबाजूला ज्या अनेक घटना घडतात की, मुली घरातून लवकर बाहेर पडतात. पण कॉलेजला मात्र लवकर येत नाहीत किंवा मुलं काही तरी कारण सांगून दुसरीकडेच जातात. मग हे स्वातंत्र्य म्हणायचं का?

सध्याच्या पिढीमध्ये स्वातंत्र्य विरुद्ध बंधने हा विचार वाढीस लागताना दिसतो. आता बंधने म्हणजे काय तर नियंत्रणात ठेवले जाणे असे मानल्यामुळे संघर्ष होतात किंवा नाराजी निर्माण होते. माझ्यावर नियंत्रण ठेवले जातेय म्हणजेच मला हवे तसे करू देत नाहीत. मला हवं तसं वागता येत नाही ही भावना वाढीस लागते व त्यामुळेच नवीन पिढी बंड पुकारताना दिसते. नैसर्गिक, वर्तन, गुण याबाबतीत स्त्री आणि पुरुषांमध्ये काही फरक जाणवतात.

स्त्री ही भावनाप्रधान असते तर पुरुष हा शरीरप्रधान असतो. पण स्त्री मात्र स्वत:च्या बाबतीत मनाला महत्त्व देणारी असते.
निसर्ग आणि आत्मिकता यांचा शास्त्रीय मेळ घातला, तारुण्यभान पाळलं तर स्वातंत्र्याचा फायदा आपल्याला घेता येईल. हे करत असताना ‘सामाजिक स्व’ वाढवत असताना कधी आपण वाहवत जातो. मित्रमैत्रिणींच्या आग्रहाला बळी पडतो. पण हे करत असताना कुणाच्या भिडेला बळी न पडता योग्य ठिकाणी नाही म्हणणं, स्वमताग्रह राखणं, म्हणजेच स्वत:चा विचार करणं आणि स्वत:चं मत मांडणं या भूमिकेवर आपण ठाम राहिलं पाहिजे. स्वत:मधली एनर्जी चॅनलाइज केली पाहिजे. करिअर बाबतही आईवडिलांबरोबर चर्चा करावी. त्यातील धोके व संधीबरोबर जबाबदार्‍याही जाणून घेतल्या तर मला नाही वाटत की आपल्या स्वातंत्र्यावर कुणी गदा आणेल. जर तुम्हाला हे वाटत असेल की हे आउट ऑफ ट्रॅक होतंय तर पालकांशी चर्चा करून निर्णय घेतला गेला पाहिजे. हे झालं वैयक्तिक पातळीवर. पण जेव्हा आपण समाजामध्ये राहतोय तर काही नियम स्वत:चे स्वत: पाळणं खूप आवश्यक असतं.

Law of Respect - दुसर्‍याला जाणून घेणे. माझ्याशी कुणी कसं वागावं असं मला वाटतं तसं इतरांशी मी वागते का? थोडक्यात मी इतरांना Respect देऊन त्यांच्या माझ्याबद्दल भावभावना काय आहेत हे जाणून घेतले पाहिजे. ते पालक असतील किंवा शेजारी किंवा मित्रमैत्रिणी, ते आपल्याबद्दल असा विचार का करत आहेत याचा जर विचार केला व थोडासा त्यांच्याबद्दल आदरभाव जागृत केला तर त्यांचे वागणे आपल्याला जाणता येईल व ते असे का वागतात याचा अंदाज बांधता येईल.

Law of Responsibility - मी जे काही वागतेय ते जबाबदारीपूर्वक आहे का? म्हणजे मी एकीकडे म्हणायचं की, मी स्वातंत्र्य उपभोगतेय पण प्रत्यक्षात स्वैराचार. त्याच्यामुळे पारदर्शकता ठेवणं गरजेचं आहे. पारदर्शकता कोणाशी? शिक्षकांशी वा पालकांशी. किमान पालकांशी पारदर्शकता ठेवायला हवी. दोघा पालकांपैकी एका पालकाला तरी मी कशी आहे, कुठे जाते, काय करते याची पूर्ण कल्पना असली पाहिजे. म्हणजेच माझ्या विकासामध्ये माझ्या आजूबाजूच्या माणसांना त्रास होणार नाही असं वागणं पाहिजे.

Law of Evaluation- सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या कृतीचे मी वागण्यापूर्वी Evaluation करायला हवं. मी वागल्यानंतर काय होईल यापेक्षा किंवा प्रत्यक्ष घडून जाण्यापूर्वी एखादी ठराविक कृती मी केली तर त्याच्या परिणामांचा विचार वागण्यापूर्वी केला पाहिजे.

याच्यातूनच स्वातंत्र्य ही संकल्पना कोणालाही बंधन वाटणार नाही. स्वातंत्र्य पूर्णपणे स्वत:च्या विकासासाठी आहे असं मात्र नक्की म्हणता येईल. स्वातंत्र्याचा अर्थ एकट्याने वेगळेपणाने पुढे जाणे असा होतच नाही मुळी. तर आपल्याबरोबरीच्या लोकांना सोबत घेऊन पण तरीही आपले अस्तित्व राखून पुढे जाणे असा होतो. कारण तेव्हाच खर्‍या अर्थाने आपण विचारांनीची स्वतंत्र होण्याच्या वाटेवर मार्गक्रमण करायला लागू.
(प्रकाशक - रेवती कुरंभट्टी, कृपा प्रकाशन, जळगाव. फोन - 02572221191. ईमेल - krupaprakashan@gmail.com)