Home | Magazine | Madhurima | vat purnima madhurima

वटपौर्णिमा स्त्रीशक्तीचा अदम्य आविष्कार

डॉ. वृंदा देशपांडे-जोशी | Update - Jun 17, 2011, 09:06 AM IST

संसार आनंदाने फुलवत नेण्याऐवजी तो मोडू नये याचीच जास्त काळजी घ्यावी लागते. त्यामुळे एक प्रकारची सामाजिक अस्वस्थता, असुरक्षितता सर्वत्र प्रत्ययाला येते

 • vat purnima madhurima

  संसार आनंदाने फुलवत नेण्याऐवजी तो मोडू नये याचीच जास्त काळजी घ्यावी लागते. त्यामुळे एक प्रकारची सामाजिक अस्वस्थता, असुरक्षितता सर्वत्र प्रत्ययाला येते. वटपौर्णिमा नुकतीच साजरी झाली. त्यानिमित्ताने...
  नुकतीच वटसावित्री पौर्णिमा होऊन गेली. जरी-काठाच्या साड्या घालून पूजेचे तबक हातात घेऊन वडाच्या झाडाकडे उत्साहाने जाणा-या स्त्रिया ठिकठिकाणी दिसत होत्या. अक्षय्य सौभाग्यासाठी वडाला साकडं घालणा-या आणि या पूजेने अखंड सौभाग्यवती होऊ, अशी श्रद्धा असणा-या या स्त्रियांना ‘जन्मसावित्री हो’ असा आशीर्वादही वडिलधा-यांकडून मिळत होता. सावित्री-भारतीय स्त्रियांसाठीचा एक महान आदर्श. सावित्रीची कथा म्हणजे स्त्रीशक्तीचा अदम्य आविष्कार आहे.
  राजा अश्वपतीची ही बुद्धिमान कन्या स्वयंवर संशोधनासाठी निघते. जंगलात राहून अंध आई-वडिलांची सेवा करणाºया सत्यवानाशी विवाहबद्ध होण्याचा निश्चय करते. सत्यवानाच्या अल्पायुष्याची नारदमुनींनी दिलेली वार्ताही सावित्रीला तिच्या निर्णयापासून परावृत्त करू शकत नाही. राजा-राणीही चिंतित होतात. मात्र, सावित्रीच्या दृढनिश्चयामुळे विवाह लावून देण्याशिवाय कोणताही पर्याय त्यांच्याकडे शिल्लक राहत नाही.
  सावित्री-सत्यवानाचा विवाह होऊन राजकुलातील जोडप्याचा जंगलात सुखाचा संसार सुरू होतो. पाहता पाहता आनंदात वर्ष सरतं. धोक्याची घंटा सावित्रीला जाणवायला लागते. सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस येऊन ठेपतो. त्या दिवशी सावित्रीही त्याच्याबरोबर जंगलात जाते. झाडावर बसून लाकूडतोड करणारा सत्यवान एकाएकी कोसळतो. मृत्यू आपले काम चोखपणे पार पाडतो. सावित्री मात्र प्रत्यक्ष यमाला आडवी येते. सत्यावानाचे प्राण घेऊन जाणाºया यमाचा पाठलाग करत राहते. स्वत:च्या बुद्धिचातुर्याने व वाक्चातुर्याने ती सासर-माहेरच्या सुखसमृद्धीसह सत्यवानाचे प्राण परत आणते. ती सावित्री भारतीय स्त्रीस पूज्य आहे.
  सावित्रीची निर्णयक्षमता, धैर्य, बौद्धिक सामर्थ्य, पतिनिष्ठा, कुटुंबनिष्ठा, सासू-सासºयांबद्दलचा आदरभाव मृत्यूलाही परतवून लावणारी चिकाटी या साºया गुणांचे दर्शन तिच्या व्यक्तिमत्त्वातून घडते. माणसाचे नियंत्रण नसल्याने त्याला मृत्यूचे भय सातत्याने वाटत राहते. मग साक्षात मृत्युदेवतेला प्रसन्न करून घेणाºया सावित्रीचे कर्तृत्व वंदनीय न ठरले तरच नवल.
  आजच्या काळातील वैवाहिक जीवनाची व कुटुंबजीवनाची स्थिती पाहिली तर तारेवरची कसरत करत संसार सांभाळले जाताना दिसतात. संसार आनंदाने फुलवत नेण्याऐवजी तो मोडू नये याचीच जास्त काळजी घ्यावी लागते. त्यामुळे एक प्रकारची सामाजिक अस्वस्थता, असुरक्षितता सर्वत्र प्रत्ययाला येते. साहजिकच वटसावित्री पूजा म्हणे वडा-पावचा विनोद. हा जन्म सातवा असू दे, अशी विनंती. आतापर्यंत हा दुरुस्त केलेलाच पती पुन्हा मिळावा, सात वर्षं सोबत राहिलो तरी खूप... अशा प्रकारचे विनोद ऐकायला येतात. विनोदाचा भाग सोडून देऊ. मात्र, मृत्यूवर विजय मिळवू शकलेली सावित्रीची अमर कथा या परिस्थितीवर विजय मिळवायला मार्गदर्शक ठरेल का? असा प्रश्न मनात येत राहतो. किमानपक्षी सुखी व स्वस्थ जीवनासाठी काही बाबी जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक कराव्या लागतात. मीच का?
  हा अहंला कुरवाळणारा प्रश्न बाजूला ठेवून कुटुंबाचे हित साधावे लागते. जोडीदाराला त्याच्या जबाबदाºयांची प्रेमाने जाणीव करून देऊन मागचा- पुढचा सेतू सांधू शकलो तरच मानवी जीवनाच्या अखंड प्रवाहात मोलाचे योगदान देता येईल.
  मानवी जीवनाच्या अभ्युदयाचे हे मर्म श्री अरविंद घोषांना सावित्रीच्या कथेत सापडले. त्यांच्या उत्तुंग प्रतिभेने त्यातून महाकाव्य साकारले. मानवाच्या अभ्युदयासाठी दिव्य शक्तीचे व दिव्य कृपेचे अवतरण हा त्यांच्या सावित्री महाकाव्याचा गाभा आहे. मृत्यूच्या आसमंमात सत्य प्रस्थापित करण्याचा निष्फळ प्रयत्न करणारा मानव म्हणजे सत्यवान तर मृत्यूच्या मगरमिठीत व अज्ञानात उतरलेल्या आत्म्याला वाचविण्यासाठी पृथ्वीतलावर अवतरलेली सावित्री यांच्या रूपकातून अंतरंग योगाचे दर्शन श्री. अरविंद घडवतात. केवळ आपणच स्वर्गीय सुख उपभोगण्यापेक्षा स्वर्गच पृथ्वीतलावर अवतरीत करावा ही सावित्री सत्यवानाची भूमिका जीवनाची व्यापकता, सखोलता आणि उदारता व्यक्त करून भावना व्यक्त केली जाते.
  god must be born on earth and be as man
  that man being human may grow even as god
  he who would save the world must be one with the world
  निर्वाणाच्या दिशेने जाताना सावित्रीला आलेला हा आवाज आजच्या सावित्री सत्यवानाच्या प्रतिसादाची वाट पाहतोय. भौतिकदृष्ट्या समृद्ध व विकसित झालेले, विज्ञान-तंत्रज्ञानाला स्वत:चे दास केलेले आम्ही प्रगत अध्यात्मिक पाऊल उचलणार की कर्मकांड करत अथवा त्याची खिल्ली उडवत जैसे थे परिस्थितीत जगत राहणार? प्रेम करणे व एकत्वाचा अनुभव घेणे म्हणजे जीवन, असे ही कथा सांगते तेव्हाच या जीवनाकडून प्रगल्भ सृजनाची अपेक्षाही ठेवते. वटपौर्णिमेच्या निमित्ताने हा विचार आपण गांभीर्याने करायलाच हवाच.

Trending