Home | Magazine | Rasik | vaushakh-marriage-india-funny-marathi-article

वैशाखातच विवाह का होतात?

रवी तांबोळी, विनोदी लेखक | Update - Jun 02, 2011, 11:54 AM IST

या वैशाखात किंवा मे महिन्यात मुलांना उन्हाल्याच्या सुटया लागलेल्या असतात. नोकरदारांना मार्चअखेरीस झालेल्या अजीर्णावर लंघन करायचे असते. शेतकऱ्याना शेतीकामे नसतात. या बांधबंदिस्तीसोबत भर वैशाखात लग्न लावले जाते.

 • vaushakh-marriage-india-funny-marathi-article

  सर्वत्र उन्हं तापलेली आहेत. दिवस खूपच मोठा झालेला आहे. दिवसभरातील बहुतांश वेळी वारा थांबून आहे. सूर्याचा दाह नकोसा वाटतो आहे. तापल्या रस्त्यावर भरदुपारी चालण्याची कल्पनाच मनाला दचकवणारी आहे. हे असे वर्तमान दरवर्षीच वैशाख महिन्यात प्रत्येकाच्या वाट्याला आलेले असते. यालाच वैशाखदाह म्हणतात. हा प्राक्तनात लिहिलेला ऋतुभोग आहे. शरीर आणि आसमंत होरपळून टाकणारा हा महिना मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाची एक घटना लिहून टाकत असतो. ही घटना ज्याच्या त्याच्या तारुण्यात घडून गेलेली असते. या घटनेला सोहळा म्हटले जाते. हाच सोहळा विवाह सोहळा असतो.


  भरवैशाखातच आणि जिवाची लाही होण्याच्या काळात विवाह का उरकले जातात, हा एक शाश्वत प्रश्न आहे. या प्रश्नाचे खरे उत्तर संतांची आणि संथांची भूमी मराठवाडा येथूनच मिळून जाणे, हे औचित्याचे आहे. हे औचित्य राखण्यासाठी जे काही संशोधन करण्यात आले, त्यात असे सापडले की, चैत्र आणि वैशाख हे दोन्ही महिने वसंत ऋतूच्या प्रभावाचे असून, या दोघांपैकी चैत्रात सारी सृष्टी बहरलेली, मोहरलेली, फुललेली असते. अनेक सजीवांमध्ये मनसोक्त हर्षपालवी फुललेली असते. हा वसंतसंकेत ज्ञात असतो तो फक्त वधूपित्याला. त्याला हे माहीत असते की, या 'वसंत इफेक्ट'मुळे संभाव्य वरपक्षातील सारेजण विरोधात जरी गेले तरी वरमहोदय हे उतावळा नवरा बनणार आहेत. लवकर तिथी काढा हा आग्रह धरणार आहेत.
  हा कार्यक्रम घडतो. तिकडून पसंती येते आणि म्हणूनच वसंत इफेक्ट संपण्याआधीच जो तो वधूपिता भर वैशाखातच जिवाचा आटापिटा करून आपल्या मुलीचा विवाह आटोपून घेण्याचा अट्टाहास धरतो. हे एकीकडे असते तर दुसरीकडे या वैशाखात किंवा मे महिन्यात मुलांना उन्हाल्याच्या सुटया लागलेल्या असतात. नोकरदारांना मार्चअखेरीस झालेल्या अजीर्णावर लंघन करायचे असते. शेतकऱ्याना शेतीकामे नसतात. या बांधबंदिस्तीसोबत भर वैशाखात लग्न लावले जाते. खरे तर तीव्र वैशाखात लग्न होण्याचा क्षण हा आयुष्यभरासाठी मोलाचा ठरतो, तो नवविवाहितेला. या नवविवाहितेला हे ज्ञात नसते की, संपूर्ण वैशाखज्वरात आसमंतात कोठेही काहीही नेत्रसुखद नसते. या काळात बहरात आलेला असतो तो फक्त मोगरा. या मोगऱ्याचा मादक गंध आणि या नवविवाहितेचा मोहक रंग, फक्त या दोन गोष्टी सोडल्या तर त्या नवथर वराला दुसरे काही सुंदर आणि मनमोहक वाटत नसते. अशा काळात या नवविवाहित जोडप्यात सुरू होतो, तो एकमेकांना ओळखण्याचा खेळ. या कौटुंबिक क्रीडाप्रकारात जो आनंद सुरू होतो, त्यात कटाक्ष, कुजबूज, इशारे, नकार या आकलन अभियानाचे विभ्रम असतात. या आकलनातूनच कधीतरी पुढे स्थिर कौटुंबिक संस्थेची परंपरा कायम राहते. या परंपरेला अनुसरून प्रत्येक भारतीय पुरुषाला विवाहसफलतेची कसोटी द्यावी लागते, त्या कसोटीप्रमाणे कोणत्याही नवविवाहित दाम्पत्याला लग्नानंतरच्या पहिल्या वर्षात अपत्यलाभ झालाच पाहिजे, असे मानले जाते. ज्या दाम्पत्याला आपल्या लग्नाच्या प्रथम वर्धापन काळात दुसऱ्या विवाह सोह
  याला जाण्याचा योग येतो तेव्हा तो नूतन पिता बनलेला असला की त्याला परिसरात आदर प्राप्त होत असतो.
  याच वेळी त्याची भार्या ही प्रेम, शृंगार, विरह या उत्साह रसातून वात्सल्य, माया, जिव्हाळा आणि आपुलकी या मनोव्यापात झुकलेली असते. याला कारणीभूत असते ते निव्वळ एका वर्षातल्या कर्माचे फळ. हे कर्मफळ जेव्हा एखाद्याची पत्नी दुसऱ्याच्या लग्नात चारचौघांत जाहीरपणे ''अहो याला जरा घेता का?'' अशा आदेशवजा सूचनेने अशा कारणमात्र पुरुषाच्या हाती देते तेव्हा असा नवभार्योत्तम, हेची फळ मम कर्माला म्हणून त्याला नाइलाजाने आपल्या जवळ घेतो. त्याच वेळेस तो दुसऱ्या एखाद्या महिलेकडे चोरदृष्टीने पाहून घेतो. या साध्या पाहण्यातही त्याला भीती वाटत असते. या भीतीमागे कारणीभूत आहे तो कुटुंबसंस्थेने घातलेला हँडल लॉक. या कुलपामुळेच प्रत्येक भारतीय पुरुष हा परस्त्रीसमोर पोपटासारखे विचारप्रदर्शन करतो, तर प्रत्येक महिलेला मात्र आयुष्यभरासाठी दैनंदिन महिला दिन प्राप्त झालेला असतो. वैशाख महिन्यातच मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे संपन्न करण्यामागची ही पारंपरिक कारणे जरी असली तरी यामागचे खरे रहस्य अतिशय सुंदर आहे. आपले मराठी महिने ज्या नावांनी ओळखले जातात त्यामागे असे मानले जाते की, ज्या महिन्यावर ज्या नक्षत्राचा प्रभाव असतो त्या नावाने तो महिना ओळखावा. संपूर्ण महिन्यावर विशाखा नक्षत्राचा प्रभाव असतो. या विशाखा नक्षत्राचे एकेकाळचे नाव राधा हे होते. या काळात ज्याचा विवाह होतो त्यांना म्हणूनच सर्वात आधी राधा आणि कृष्ण यांचा दर्जा प्राप्त होतो की काय हे माहीत नाही. अनेक जोडप्यांना त्यांच्या प्रौढ वयात मात्र 'लक्ष्मीनारायणा'चा जोडा हे संबोधन प्राप्त होते. आपली भार्या राधेसारखी असावी असे कोणाला वाटत नाही? नशिबात राधाही असाव्या आणि गोपिकाही असाव्यात. या गोपिकांना कधीकधी पांचट बोलता यावे, या सर्व आकांक्षा या वैशाखातच पूर्ण होतात. म्हणूनच वैशाखात विवाह उरकायचा असतो.

  हे सदर दर आठवड्याला प्रसिद्ध होईल

Trending