आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेदकालीन लिखाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘आहार’ हा मानवी जीवनातील महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक प्रांतानुसार, धर्मानुसार आहाराची संकल्पना बदलते. पाश्चिमात्त्य, चायनीज, मेडिटेरेनियन, इटालियन असे विविध प्रकारचे आहार आपणास बघावयास मिळतात. या आहार संकल्पनेमध्ये विशेष वैज्ञानिक दृष्टिकोन आढळून येत नाही.


अशीच एक भारतीय आहार संकल्पनासुद्धा आहे हे आपण भारतीय विसरत चाललो आहोत. भारतीय आहार संकल्पनेच्या मागे विशेष अशी बैठक आहे की, ती संकल्पना व्यक्तीचा प्रदेश, व्यक्तीचे आरोग्य, त्याची भूक अशा ब-याच गोष्टींला विचार करते. भारतीय आहार या विषयावर वेदकालापासून लिखाण झाले आहे. वेद, कौटिल्य अर्थशास्त्र, मनुस्मृती, भगवद््गीता यांसारख्या ग्रंथांमधून आहारावर विखुरलेली पण महत्त्वाची माहिती पाहावयास मिळते. आयुर्वेदात चरकसंहिता, अष्टांग संग्रह, भावप्रकाश यासारख्या ग्रंथांमधून आहारावर विशेष माहिती मिळते. ही माहिती वैज्ञानिक तर आहेच, पण मनोरंजकसुद्धा आहे.


विविध प्रकारच्या चटण्या, लोणची, कोथिंबिरी, पुरणपोळी, पाकपु-या, विविध प्रकारचे लाडू, श्रीखंड, बासुंदी, विविध दुग्धजन्य पदार्थ तयार करावयाच्या पद्धती, त्यांचे गुणधर्म व त्यांचा आरोग्यावर होणारा परिणाम याचे विस्तृत वर्णन या ग्रंथांत आढळते. धन्वंतरी जसे वैद्यकशास्त्राचे दैवत आहे तसेच अन्नपूर्णा अन्नाचे दैवत मानले जाते. पंधराव्या शतकानंतर आहारशास्त्रावर विविध ग्रंथांचे लेखन करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने पाकाधिकरण, पाकमार्तंड, पाकवल्ली, भीमभोजनम, कुतूहलम् व्यंजनवर्ग, शाकवर्ग यांचा समावेश करण्यात येईल. ‘शाकगुण’ पुस्तकामध्ये विविध प्रकारच्या भाज्या व त्या तयार करण्याची शास्त्रीय पद्धत व गुणधर्म यांचे वर्णन आढळते. ‘अन्नपान विधी’मध्ये दुधाचे पदार्थ, मद्य तयार करण्याच्या पद्धती व सेवन करण्याच्या पद्धतींची माहिती आहे. त्याचबरोबर अतिआहार सेवन केल्यावर तो पचवण्याचे उपायसुद्धा वर्णन केलेले आहेत. ‘क्षेत्रकुतूहल’मध्ये स्वयंपाक करण्यासाठी उपयुक्त भांड्यांबद्दल माहिती आढळते. इतक्या विविध पैलूंनी आहाराबद्दल विचार भारतीय आहारशास्त्रातच आढळून येतो. याच्या एक एक पैलूचा आपण विचार करू या. ‘जे पिंडे ते ब्रह्मांडे’ हा भारतीय वैद्यकाचा पहिला नियम. आपले शरीर व आपण घेत असलेला आहार दोन्ही पंचमहाभूतात्मक आहेत, त्यात तो फरक मन व आत्म्याचा. हा आहार आपल्या शरीरामध्ये सामावून घेण्यासाठी ‘अग्नी’चा मोठा वाटा आहे आणि म्हणूनच भारतीय आहार व वैद्यकशास्त्रात अग्नीला अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. आपला आहार अग्निसापेक्ष असावा हा या शास्त्राचा महत्त्वाचा नियम. अग्नी हे आपल्या चयापचयाचे द्योतक समजले जाते. आहारामध्ये ज्या महाभूताचे आधिक्य, त्याचा परिणाम शरीरावर दिसून येतो.


आधुनिक वैद्यकशास्त्रात जसे प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध असे वर्गीकरण आहे तसे भारतीय आहारशास्त्रामध्ये सहा रसांप्रमाणे व पदार्थाच्या वीर्याप्रमाणे केले असते. मधुर, आंबट, खारट, तिखट, कडू व तुरट असे वर्गीकरण आहे. हे वर्गीकरण फक्त चवीपुरते मर्यादित नसून पदार्थाच्या शरीरावर होणा-या परिणामावर अवलंबून आहे. पदार्थाचा प्रमुख परिणाम यास वीर्य असे समजले जाते. वरील माहिती बघितल्यास असे लक्षात येते की, भारतीय आहारशास्त्र, मानवी शारीर क्रिया व शरीरातील चयापचयात्मक घटना यांचा खूप जवळचा संबंध आहे व त्यानुसारच आहाराची मांडणी केलेली आहे. थोडक्यात, आपली पचनशक्ती, आपली भूक व आहाराचा रस व आहाराचे पाच भौतिक संघटन यावरच आपला दैनंदिन आहार अवलंबून असायला हवा.