आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आय अॅम ए मॅन आऊट ऑफ टाइम'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर आर्थर कॉनन डायलने अजरामर केलेला त्यांचा जगप्रसिद्ध गुप्तहेर हीरो शेरलॉक होम्सचा आर्च प्रतिस्पर्धी खलनायक म्हणजे ‘मोरियार्र्टी’; ‘जेम्स मोरियार्र्टी’. याचा पूर्वेतिहास कोणालाच माहीत नाही. किंवा फार थोडी माहिती मिळू शकते. आपल्या विकृत खेळासाठी किंवा चाळ्यांसाठी हा व्हिलन निष्पाप लोकांच्या जिवावर सहजी उठतो. त्यांची हत्या करून याला अमाप सुख, आनंद मिळतो.
शेरलॉक होम्सला एका कथेमध्ये अडकवण्यासाठी हा मोरियार्र्टी वीस वर्षांपूर्वी मारलेल्या कार्ल पॉवर नावाच्या मुलाच्या बुटाचा वापर करतो. तसं करण्यासाठी तो बूट त्यांनी वीस वर्षे जपून ठेवलेला असतो. हे एक प्रकारे विकृत मनोवृत्तीचे लक्षण आहे. अशा मनोवृत्तीची माणसे कधी आणि कशी वागतील, हे सांगणे अत्यंत कठीण असते; पण हीच गोष्ट त्यांना रंगतदार बनवते. एका ठिकाणी मोरियार्टी शेरलॉक होम्सला म्हणतो, ‘मी तुला मारण्यासाठी आलो आहे, पण मारणार नाही. कारण माझ्या बुद्धीला चालना देणारी, कोडे घालणारी, आव्हान देणारी परिस्थिती तूच निर्माण करू शकतोस.’ येथेही तो आपणच वरचढ आहोत, हे सूचित करत असतो. काही जण म्हणतात, हा शेरलॉक होम्सचाच ‘आल्टर इगो’चा एक प्रकार आहे. सत् आणि असत् या प्रवृत्तीच्या दोन पांढर्‍या- काळ्या बाजू आहेत. मोरियार्टी शेरलॉक होम्सला म्हणतो, ‘तुला सर्व स्वच्छ, बारीक सारीक तपशिलात जाऊन बघण्याची सवय आहे, त्यामुळे तू जे ढोबळ आहे, ऑम्बिग्वस आहे, त्याच्या बाबतीत हमखास धोका खातोस.’
शेरलॉकच्या बेकर स्ट्रीटवरील घरामध्ये सहजपणे घुसणारा, त्याला सतत चकवा देणारा, हा व्हिलन उत्तम नटही आहे. वेगवेगळ्या वेशभूषा करून वेगवेगळी सोंगे वठवत, हिरोचा पाणउतारा करण्यामध्ये आनंद देणारा हा व्हिलन त्याला वैश्विक सत्य सांगतो. म्हणतो, ‘तू बोअर आहेस, तर मी अधिक इंटरेस्टिंग आणि रंगतदार.’
अशा रंगतदार रोलसाठी जगभरातील उत्तम नट जीव नाही टाकणार तर काय? अँड्र्यू स्कॉट नावाच्या नटाने ‘हाउस ऑफ बास्करव्हिले’, ‘स्लॅडल इन बेलगाव्हिया’, ‘द ग्रेट गेम’ आणि अत्यंत प्रसिद्ध अशा
‘द रायचेन बाक्स फॉल्स्’ या कथांमध्ये मोरियार्टी साकारला. तर ‘गेम ऑफ शॅडो’मध्ये जेरार्ड हॅरिसने मोरियार्टी जिवंत केला. मोरियार्टीच्या पात्राने भुरळ घातलेले अनेक नट आहेत आणि त्यांच्यासाठी देशाच्या सीमारेषांना काही अर्थ नाही. जपान, चीन, कोरिया, आफ्रिका आदी देशांमध्ये मोरियार्टी वारंवार जिवंत झाला आहे.

एवढंच काय, हिचकॉकसारख्या रहस्यपटांच्या बादशहानेही ‘हिचकॉक प्रेझेंट्स’ या मालिकेमध्ये ‘माय डिअर वॅटसन’ या कथेमध्ये मोरियार्टीला आणले आहे. ‘टॉम अँड जेरी मिट शेरलॉक होम्स’ अशा नावाच्या अ‍ॅनिमेशनपटामध्येसुद्धा मोरियार्टी येतो आणि या पात्राला माल्कम मॅकडोवेलसारखा नट आवाज देतो. यावरून या खलनायकाचे महत्त्व आणि वजन लक्षात येते.

मनोरंजनाच्या प्रत्येक माध्यमात वेगवेगळ्या काळात हा खलनायक प्रकट झाला आहे. मग ते मुळातील वाचनसंस्कृतीमधील पुस्तक असो, नाटकाचा रंगमंच असो, सिनेमाचा पडदा असो, कार्टूनपटामधील चित्रे असो वा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका असो. ‘स्टार ट्रेक’ या ड्रामा सिरिजमध्येसुद्धा मोरियार्टीचे आगमन झाले होते. हे त्याच्या अजरामर होण्याचे काळातीत उदाहरणच नाही काय? याच मालिकेमध्ये तो म्हणतो-
‘आय अ‍ॅम अ मॅन आऊट ऑफ टाइम, कॅप्टन! दॅट आयसोलेट् मी.’
असा स्वत:ला ‘आयसोलेट’ करणारा हा व्हिलन खतरनाक वगैरे विशेषणाच्या पलीकडलाच असतो. शेरलॉक होम्ससारख्या ‘शेर’ डिटेक्टिव्ह हीरोला ‘सव्वाशेर’ व्हिलन हवाच.

‘मोरॉल’ म्हणजे मानसिक धैर्य, ‘मोरॉलिटी’ म्हणजे नीतिमत्ता, अशा अर्थावर आधारित शब्दाचा आधार घेऊन ‘मोरियार्टी’ हा शब्द कॉइन केला असावा, असे वाटत असतानाच ‘मोरियार्टी’ हे एका गावाचेही नाव आहे, असे वाचनात आले.

अर्थात, नीतिमत्ता खुंटीवर टांगून, मानसिक धैर्याला आव्हाने देत क्रूरपणे आपल्या हाताशी अव्वल गुन्हेगारांचा ताफा बाळगणारा. प्रसंगी आपल्याच माणसांचा, निरोप्याचा जीव घेणारा. वेगवेगळे अवतार धारण करून धक्कातंत्राने क्षणभर खिळवून ठेवणारा हा खलनायक. कोणत्या क्षणी कोणत्या रूपात आपल्या शेजारी उभा राहील, सांगता येत नाही.
‘दचकलात? नाही ना?’
कारण, ही सर्व जणांमध्ये सदासर्वकाळ वास करणारी वृत्ती आहे.

‘द रायचेन बॉक्स कॉल्स्’ या कथेच्या शेवटी सर आर्थर कॉनन डायलसाहेबांनी या दोघांना, हीरो आणि खलनायकाला समोरासमोर आणून धबधब्यामध्ये टाकले आणि त्यांच्या वाचकांवर आभाळच कोसळले. नायक आणि खलनायक एकत्र मरतात? निदान नायक तरी वाचायला हवा, अशी सर्वत्र प्रतिक्रिया उमटली. अर्थात, अशा जीवघेण्या प्रसंगामध्ये हीरोला जिवंत ठेवणे-सारासार बुद्धीला गहाण ठेवण्यासारखे होते. त्यात पुन्हा शेरलॉक होम्ससारखा लॉजिकली विचार करणारा हीरो असताना, हे शक्य नव्हते. तो काही हिंदी चित्रपटाचा सारासार बुद्धीला आणि विवेकाला फाटा देऊन लिपस्टिक लावलेल्या आणि भुवया कोरलेल्या गावंढळ हीरॉइनला मिठी मारून, गाणे गात सूर्यास्ताकडे जाणारा हीरो नव्हता.

अर्थात, वाचकांच्या दबावापोटी हीरो शेरलॉक पुन्हा अवतरला आणि त्याच्या दसपट वेगाने ‘मोरियार्टी’ विविध माध्यमांत विस्तारला. अगदी अंतराळात काळाच्या पलीकडे जाणार्‍या आणि ‘बिमिंग’ करून हाडामांसाच्या माणसांना परग्रहावर पाठवणार्‍या ‘स्टार ट्रेक’सारख्या विज्ञान कथेमध्येसुद्धा! मोरियार्टी ही वृत्ती आहे. विश्वासघातकी, दगाबाज, बहुरूपी, क्रूर, कृतघ्न, आपमतलबी या दुर्गुणांचा अर्क असणारी ही व्यक्तिरेखा. स्वत:चा विजय व्हावा म्हणून आपल्या डोक्यात स्वत:च गोळ्या घालून आत्महत्या करणारी विकृती आहे.

शेरलॉक होम्सच्या नवीनतम मालिकेमध्ये त्यांच्या (होम्सच्या) अत्यंत प्रिय व्यक्तींना मारण्यासाठी नेमबाज नेमून होम्सला आत्महत्या करण्यास भाग पाडणारा मोरियार्टी आनंदाने विजयी झाल्याच्या भ्रमात असताना होम्स त्याला म्हणतो, की या निष्पाप व्यक्तींना केवळ तूच वाचवू शकतोस, तूच त्यांना मारू नकोस, अशी आज्ञा तुझ्या मारेकर्‍यांना दे. तेव्हा आपला पराभव होतो आहे, हे बघून स्वत:च गोळी घालून मरणारा मोरियार्टी आपल्या मनात अजरामर होतो.
कसलेल्या नटाची परीक्षा घेणारा आणि प्रेक्षक, वाचकांना भुलवणारा हा मोरियार्टी एक सर्वश्रेष्ठ खलनायक आहे.
(raghuvirkul@gmail.com)