आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुन्हेगार जमातींची तालेवार भाषा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वसाधारणपणे भाषा या नैसर्गिकपणे उदय पावलेल्या आहेत. परंतु भटक्यांची सांकेतिक भाषा ही परिस्थितीजन्य भाषा आहे. अस्थिर, असुरक्षित, वाऱ्यावरचे जगणे पदरी आले. प्रशासन, पोलिसांचा दापदडप, छळ, समाजाचीही पूर्वग्रहदूषित भेदाभेदरहित वागणूक यामुळे आणखीनच भयंकर हालअपेष्टा त्यांच्या वाट्याला आल्या. या लादलेल्या जीवनसरणीतूनच उपजीविकेसाठी आणि सुरक्षेसाठी सांकेतिक भाषेचा जन्म झाला. स्वसंरक्षण आणि जगण्याच्या मार्गावर धोके येऊ नयेत, म्हणून या जमातींनी या भाषेचा वापर करायला सुरुवात केली होती.

परिस्थितीनुसार निसर्गही प्राणिमात्रांशी न्याय करतो. त्यांना क्षमता बहाल करत असतो. शेवटी ही तर माणसे होत. परिस्थितीजन्य गरज म्हणून गुन्हेगार जमातींनी ही भाषिक रूपे निर्माण केली, म्हणून त्या काही चोर भाषा ठरत नाहीत. तिचे थोरपण नावे ठेवल्याने, दुर्लक्षिल्याने कमी होत नाही; उलट परिस्थितीत जगवणारी आणि संरक्षण करणारी कोणतीही भाषा तालेवारच असते.

भा षा एक संकेतप्रणाली अर्थात ध्वनिसंकेत. व्यक्त होण्याचे, विचार करण्याचे माध्यमरूप ठरत आली आहे. एकूणच भाषा ही जीवन जगण्याचे महत्त्वाचे साधन मानावे लागते. भाषा जन्मायला आणि विकास पावण्यासाठी हजारो वर्षे लागत असतात, असा जगभरातल्या भाषांचा इतिहास आणि भाषातज्ज्ञांचा निष्कर्ष आहे. कुठल्याही भाषेची घडण घडायला जेवढा काळ लागत असतो, त्याचप्रमाणे ती भाषा नामशेष होण्याला तेवढाच कमी-अधिक कालावधी लागत असतो. परंतु एक भाषा अशी आहे जिचा इतिहास केवळ दोन-अडीच शतकांचा आहे. एवढ्या कमी कालावधीत भाषा सर्वश्रुत होणे, ही तशी इतकी सोपी गोष्ट नाही; परंतु परिस्थितीने घडवले. तसे पाहिले तर कुठलीच भाषा श्रेष्ठ आणि कुठलीही भाषा कनिष्ठ, कोणतीच भाषा कुलीन आणि कोणतीही भाषा अस्पृश्य नसते, ती फक्त भाषा असते.

तरी आमच्या समाज संरचनेतील माणसांनी भाषेलासुद्धा श्रेष्ठ-कनिष्ठत्वाच्या श्रेणीत जखडून टाकले आहे. नाहीतर १९६१च्या अहवालानुसार १६५२ आणि नुकत्याच झालेल्या भारतीय भाषा सर्वेक्षणानुसार ७८० भारतीय बोलीभाषा बोलल्या जात असताना, गेल्या ७० वर्षांत आम्ही फक्त २४ भाषांना संविधानाच्या आठव्या परिशिष्टात सामावून घेऊ शकलो आहोत, ही बाब नजरेआड करून चालणार नाही. भारतामध्ये भटक्या, गुन्हेगार, मागत्या जमातींनी अशी एक भाषिक शृंखला जन्माला घातली होती, जिचा प्रवास केवळ दोन-अडीच शतकात सामावलेला आहे. अतिशय कमी कालावधीत विस्तीर्ण अशा भूभागावर पसरलेल्या जमातींमध्ये सार्वत्रिकरूपात वापरात येऊन सिद्ध पावलेले हे कदाचित जगातले एकमेवाद्वितीय भाषिक उदाहरण असू शकेल. ती भाषा आहे भारतातील भटक्या, गुन्हेगार, मागत्या जमातींची ‘सांकेतिक भाषा’. तिला ‘गुप्त भाषा’सुद्धा म्हटले जाते, ‘पारुशी’ भाषा म्हणूनही उल्लेख केला जातो. ती चोरी करून, भीक मागून जीवन जगणाऱ्या जातीसमूहांची भाषा म्हणून नावारूपास आली आणि त्यांचे चोरी करण्याचे, जीवन जगण्याचे आणि स्वसंरक्षणाचे साधन बनली होती. कालांतराने समाजप्रवाहाच्या बदलानुरूप तिचा वापर न होऊ लागल्याने ती आज इतिहासजमा होत आहे.

सर्वसाधारणपणे भाषा या नैसर्गिकपणे उदय पावलेल्या आहेत. परंतु भटक्यांची सांकेतिक भाषा ही परिस्थितीजन्य भाषा आहे. वर्ण आणि जातआधारित समाजव्यवस्थेने भटक्या गुन्हेगार जमातींना गावगाड्याबाहेर लोटले. इंग्रजांचे शासन स्थापित झाल्याने या जमातींची उपजीविकेची साधने संपवली गेली. हिरावली गेली. ‘१८७१चा क्रिमिनल ट्राइब्ज अॅक्ट’ त्यांच्या माथी मारला गेला. अस्थिर, असुरक्षित, वाऱ्यावरचे जगणे पदरी आले. प्रशासन, पोलिसांचा दापदडप, छळ, समाजाचीही पूर्वग्रहदूषित भेदाभेदरहित वागणूक यामुळे आणखीनच भयंकर हालअपेष्टा त्यांच्या वाट्याला आल्या. या लादलेल्या जीवनसरणीतूनच उपजीविकेसाठे आणि सुरक्षेसाठी सांकेतिक भाषेचा जन्म झाला. स्वसंरक्षण आणि जगण्याच्या मार्गावर धोके येऊ नयेत, म्हणून या जमातींनी या भाषेचा वापर करायला सुरुवात केली होती. चोरीच्या तथा इतर गुप्त कामासाठी वापरली जात असल्यानेही इंग्रजांनी या भाषेला ‘गुप्त सांकेतिक भाषा’ म्हणून संबोधले आहे. आपले बोलणे गुप्त असावे, इतरांना कळू नये, यासाठी या भाषेचा अधिकाधिक वापर व्हायचा. अशाच स्वरूपाची गुप्तता पाळण्यासाठी म्हणून महानुभावी यांची ‘सांकेतिक सकळा लीपी’ उदयास आली होती.

पारुषी ही गुप्त सांकेतिक भाषा पारशी, पारोशी, चिडक(कटबु), डांगुरी(राजपूत भामटा), अंबुजी(मांग), अंबुशी(मांग गारोटी) अशा विविध नावानेही ओळखली केली. ‘साखोती’, ‘करपल्लवी’, ‘नेत्रपल्लवी’ असेही उल्लेख आढळतात. एकूणच रामोशी, कैकाडी, कटबू, बंजारा, भामटा, राजपूत भामटा, कंजारभाट, छप्परबंद, पारधी, वाघरी, वडार, कातकरी, भील्ल आदी ७०० ते ८०० जमातीत भारतभर या गुप्त सांकेतिक भाषेचा वापर होता. जशी भटक्या जमातींना भौगोलिक सीमा नाही, तशीच त्यांच्या सांकेतिक भाषेलाही क्षेत्रीय मर्यादा घालता येणे कठीणच आहे. देशभरात वास्तव्य करूनही थोडेअधिक बदल वगळता सर्वत्र त्या त्या जमातीत सारख्या स्वरूपात वापरली गेली आहे. भारतातील सर्वच भटक्या जमातींमध्ये अशी सांकेतिक भाषा रूढ होती, परंतु जात जमात परत्वे तिचे स्वरूप वेगवेगळे होते. ही भाषा ते इतरांना सांगत नसत.

या सांकेतिक भाषांवर सर्वप्रथम सुरक्षा आणि प्रशासकीय हेतूने ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रकाश टाकला. टी. ग्रहॅम बेली (१९०२), कॅप्टन अलेक्झांडर मॅकिंटॉश, इन्स्पेक्टर जनरल एम. केनेडी (१९०९), डब्ल्यू. एच. स्लीमन (१९३६) यांनी भारतातील विविध इलाख्यांतील भाषांच्या नोंदी केल्या. स्वातंत्र्यानंतर बी. पी. मलीक (१९६९), प्रभाकर मांडे (१९८६), लक्ष्मण माने, विश्वनाथ शिंदे ही काही नावे वगळता फारसे संशोधन होऊ शकले नाही. या सांकेतिक भाषेकडे भाषाअभ्यासक, भाषाशास्त्रज्ञांनी दुर्लक्ष केलेले दिसून येते. या भाषेचे स्वरूप म्हणजे शब्दांचे संक्षिप्त रूप करणे, अक्षरांचा क्रमबदल, अपभ्रंश करणे, यमक जुळवणे, भाषा व्यवहारात फारसे परिचित नसलेल्या बाबींना शब्दरूप देणे, खाणाखुणा, चिन्ह, हावभाव आदी बरोबरच अनेक नवीन शब्द जन्माला घातलेले आढळते.

विशिष्ट प्रकारचे आवाज आणि ध्वनींद्वारे संवाद साधण्याचे त्यांचे कौशल्य ज्यात खोकून खाकरणे (जपून बस), हलके खोकणे (पोलिस आहे), तोंड मिटून रातकिड्याप्रमाणे आवाज करणे (पोलिस येत आहेत), घुबडाप्रमाणे, कोल्ह्याप्रमाणे आवाज करणे (पळून जा), शिळ घालणे, भालू, शेळी, मांजरीचा आवाज काढत. पक्षी, प्राणी ज्याप्रमाणे आपल्या कळपातल्या इतरांना जागेची खूण म्हणून आवाज करतात, त्याचप्रमाणे वाघरी कोल्ह्याची हुक करतात (जिथे आवाज तिथे टोळी).

खाणाखुणांच्या भाषिक संकेतांमध्ये मुक्काम हलविण्यापूर्वी चुलीचे सर्व दगड एके ठिकाणी जमा करून बाजूला माती उकरून पायाची दिशा उमटविणे. छप्परबंद वाट फुटते त्या ठिकाणी एक फूट लांब व सहा फूट उंच मातीचा ढिग करतात. ज्या दिशेने गेले तिकडे बाण काढतात. असे तीन ढिग घालत असत. कैकाडी झाडाची डहाळी तोडून चुलीजवळ ठेवतात. दिशा म्हणून तिकडे मोडलेले देठ करतात. बौरी घरे, देवळे, धर्मशाळा, भिंतींवर कोळशाने खुणा करतात. जमिनीवर काठीने खुणा करतात.
शिवाय ‘करपल्लवी’, ‘नेत्रपल्लवी’ हे भामट्यांचे, गोंधळ्यांचे संकेत आहेत. हावभावाच्या नि हातवाऱ्यांच्या भाषेत ते आपला हेतू अंगविक्षेपाने एकमेकांना कळवत असत. कपाळ खाजवणे (पळून जा), डोके खाजवणे (भीती आहे), कोपर बाजूस केला(पाळत आहे), कोपराने विविध दिशादर्शक खुणा करणे. गोंधळ्यांनी ‘करपल्लवी’, ‘साखीत भाषा’ विकसित केली. पिंगळा आदी मागत्यांनाही ही कला अवगत आहे. सांकेतिक भाषेची काही भाषिक रूपे जशी ‘कुडमली इसमउ अन ओकना’(त्याला भाकरी द्या आणि जाऊ द्या), ‘कंटीक कयबडली’ (तो झोपलाय की पाहतोय), रस्ता तापलाय (पोलिस पाळतीवर आहे), यरमु नकू चानपाधारकरी (भिऊ नको, पाळत ठेव लढवय्या), येलडा वैरला कपुलून, धबेकी पैडे पैदल ऐच्छे अशा प्रकारची प्रत्येक जमातीची सांकेतिक शब्दांची सूची खूप मोठी आहे.

परिस्थितीने लादलेल्या जीवनसरणी, गांजलेपणातून समाजप्रवाहाने अव्हेरलेला आदिम समूहगट आपले सांस्कृतिक नीतिनियम तयार करत असतो. अशाच जातीनिष्ठ उपसंस्कृतीतून या सर्व भाषिक रूपांचा उदय झालेला होता, ज्यात त्यांनी आपली स्वत:ची न्यायपंचायत निर्माण केली. जगण्याचे स्वतंत्र कायदे; जगण्या, वागण्याची, बोलण्याची स्वतंत्र अशी गुप्त भाषा जन्मास घातली. यातून त्या त्या जमातींचा स्वतंत्र असा भटकणारा देशच निर्माण झाला. आपली उपजीविका भागवण्याच्या दृष्टीने ते, त्यांची संस्कृती, भाषा गुन्हेगार ठरली असली तरी त्यांना जगण्याच्या अपरिहार्यतेतून असे करणे अनिवार्य ठरले असेल तर त्यात गैर काय? परिस्थितीनुसार निसर्गही प्राणिमात्रांशी न्याय करतो. त्यांना क्षमता बहाल करत असतो. शेवटी ही तर माणसे होत. परिस्थितीजन्य गरज म्हणून गुन्हेगार जमातींनी ही भाषिक रूपे निर्माण केली म्हणून त्या काही चोर भाषा ठरत नाहीत. तिचे थोरपण नावे ठेवल्याने, दुर्लक्षिल्याने कमी होत नाही; उलट परिस्थितीत जगवणारी आणि संरक्षण करणारी कोणतीही भाषा तालेवारच असते.
veerarathod2@gmail.com
बातम्या आणखी आहेत...