आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्लोबल गांव का गायब देश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आदिवासी समाज विकासविरोधी नाहीये. त्यांनासुद्धा विकास हवाय, पण तो विकास जल-जमीन-जंगलच्या सोबतीने न्यायपूर्ण, समतामूलक पद्धतीचा असायला हवा. समाज, भाषा, संस्कृती सभ्यतांना सोडून एका अर्थाने जगण्याला मारून केलेला विकास काय कामाचा?
“भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत” एवढे म्हटल्याने आपले देशाप्रतीचे उत्तरदायीत्व संपले, अशी ज्यांची भावना असते त्यांना खरंच देश नावाची संकल्पना कळलेली असते का? हा अस्वस्थ करून जाणारा प्रश्न या सव्वाशे कोटींच्या देशात किती जणांना पडत असेल, असा विचार उगीच मनात डोकावून जातो. त्यांना कसं सांगावं की, बाबांनो देश म्हणजे काही केवळ भूगोल नसतो वा नसतो सीमा आखून दिलेला जमिनीचा भला मोठा विशालकाय तुकडा. शिवाय देश म्हणजे काही केवळ भगवा नसतो. नसतो निळा, हिरवा, लाल, पांढरा, की कुट्ट काळा, जे आम्ही रंगवत जातोय. देश तिरंगा आहे, इंद्रधनुष्यासारखा सप्तरंगी रंगांतून मिसळलेला. खांद्याला खांदे, बाहूत बाहू, नि सुरात सूर मिळवून समूहगीत गाणारा. देश म्हणजे आहे एक महानदी लाखो झऱ्यांनी बनलेली. देश म्हणजे अनेक समाज, संस्कृतींनी, संस्कृतींच्या इतिहासाने आकारास आलेला. या नाना विश्वतेवर निस्सीम प्रेम करणाऱ्या माणसांचा मिळून बनत असतो देश. तेव्हा ठरत असतो देशवासी खरा देशभक्त. केवळ ‘भारतमाता की जय’ म्हटल्याने कुणाला देशभक्तीची उपाधी बहाल करण्याची चवचाल प्रथा शहाण्यांनी तरी आवरती घ्यावी. कारण फक्त घोषणेपुरता नसतो देश आणि देशप्रेम. ज्यांना ज्यांना कळला होता देश त्यांनी त्यांनी स्वत:ला बाजूला सारून देश उभा केला. आपल्या घासातला अर्धा घास दिला. अंगावरचा नेसू नागडेपणावर झाकला. वेळप्रसंगी गोळ्याही झेलल्या नसत्या तर कधीचाच हरवून गेला असता हा देश. जो ग्लोबल युगात गायब होत चालला आहे आणि तो गायब करताहेत ग्लोबल गावातले शिकारी देवता. या गायब होत असलेल्या देशाची कहाणी आपल्या ‘ग्लोबल गाव के देवता’ आणि ‘गायब होता देश’ या बहुचर्चित हिंदी कादंबऱ्यांतून सांगितली आहे रणेंद्र नावाच्या झारखंडी लेखकाने.

काय सांगायचंय या शीर्षकांमधून लेखकाला? कोणत्या गावाबद्दल, कोणत्या देशाबद्दल बोलतोय तो? आणि त्यांच्याबद्दलच का बोलायचंय त्याला गैर आदिवासी असताना? ही गोष्ट इथे समजून घेण्याची गरज आहे. यापूर्वीही आदिवासींच्या लढाईत मानवीय आंतरिक कळवळ्यातून डॉ. यू. आर. अनंतमूर्ती, महाश्वेतादेवी, रमणिका गुप्ता, गणेश देवींसारख्या लेखकांनी आदिवासींची वेदना विदित केलेली आहे. ‘ग्लोबल गाव के देवता’ नि ‘गायब होता देश’ या कलाकृती आहेत, भारतीय आदिवासींच्या जगण्या-मरण्याच्या भयावह वर्तमानाला शब्दांकित करणाऱ्या. आधुनिक विकासाच्या गतिमान झालेल्या नकाशावरून रातोरात गायब होत जाणाऱ्या आदिवासींची आतून-बाहेरून हादरवून सोडणारी वास्तवपूर्ण हकिगत उजागर करू पाहणाऱ्या आहेत.

२००९मध्ये आलेली ‘ग्लोबल गाव के देवता’ ही रणेंद्र यांची पहिलीच कादंबरी, ज्यामध्ये आदिवासी जगाचे आणि जगण्याचे भीषण वास्तव मांडले गेलेय. माणसांसारख्या माणसांना असूर ठरवून शोषण करणारी ही यंत्रणा आज एकाएकी तयार झाली नाही, तर ती प्राचीन काळापासून वेगवेगळ्या रूपात कशी चालत आलेली आहे, याची उकलच जणू लेखकाने यातून केली आहे. पूर्वी अनेक देवता आदिवासी लोकांचे शोषण करायचे आणि आज ग्लोबल बनलेल्या गावाच्या देवता (राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या, सरकारी व्यवस्था) शोषण करतात. झारखंड आणि असूर जमात जरी या कादंबरीच्या मध्यवर्ती असले तरी या माध्यमातून अवघा आदिवासी भारत प्रातिनिधिक रूपात उभा राहतो. लालचन असूर, रुमझूम या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून या सर्व लुटी विरोधात आवाज उठवला जातो. विरोध दर्शविला जातो. सर्व खाणींचे काम अनेक दिवस आदिवासी बंद पाडतात, आंदोलन छेडतात; पण विकाऊ व्यवस्थेमुळे त्यांच्या पदरी निराशाच पडते. ‘वेदांग, टाटा’सारख्या कंपन्या शिवदासबाबा आणि लोकप्रतिनिधींना हाताशी घेऊन शोषण करतात. ज्यांना दुर्भाग्यवश आदिवासींनी आपले उद्धारकर्ता मानले आहे, ते आज ग्लोबल गावातले अमर्याद देवता बनलेत.

आदिवासी शिक्षण कसे मारले जात आहे, मुख्य धारेतले लोक त्यांच्या जल, जमीन, जंगल आणि जीवन जगण्याच्या साधनांवर कशा पद्धतीने ताबा घेऊन आयत्या बिळावरच्या नागासारखे फणा काढून बसलेत, त्यांच्या लेकीबाळी कशा भाकरीच्या तुकड्यावर भोगल्या, चुरडल्या जाताहेत... या सर्व शोषणाच्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्या, आपल्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या, आंदोलन करणाऱ्या असूर जमातीच्या सामान्य विरोधालादेखील कसे नक्षली आंदोलनाचे नाव देऊन शासन प्रशासनाच्या मदतीने कंपन्या या आदिवासींना सुरुंग लावून उडवून देत आहेत. जे कुणी रस्त्यात येण्याचा प्रयत्न करतात त्यांना संपवून टाकण्यात येतं. या संपूर्ण वर्तमानाचा इतिहासच जणू रणेंद्र यांनी वेगवेगळ्या आदिवासी मिथकांचा वापर करून लिहिलेला आहे. ‘जो लडाई वैदिक युग में शुरू हुई थी, हजार हजार इंद्र जिसे अंजाम नही दे सके थे, ग्लोबल गाव के देवताओंने वह मुकाम पा लिया था।’ रणेंद्रनी मोठ्या सामर्थ्याने या सर्व शोषणकर्त्या देवतांना शासन, प्रशासन आणि न्यायाच्या पिंजऱ्यात उभं केलंय. २०१४मध्ये आलेली ‘गायब होता देश’ ही ‘ग्लोबल गाव के देवता’चा विस्तारच म्हणायला हवा. या कादंबरीची सुरुवातच पत्रकार किशन विद्रोहीच्या तपासाने होते. हा तपास आहे एका हत्येचा. या हत्येच्या पाठीमागे इतिहास लपलेला आहे, जो खूप जुना इतिहास आहे. आदिवासींच्या जमिनीच्या लुटीचा इतिहास. हा इतिहास किशन विद्रोही या ब्राह्मण पत्रकाराच्या तोंडून प्रतिपादित केला आहे.
सैन्यातून निवृत्त झालेले परमवीर चक्र प्राप्त सैनिक परमेश्वर पहान एका खाजगी कंपनीला विकलेल्या नदीवर होत असलेल्या खासगी धरणाला विरोध करण्यासाठी गावातल्या आदिवासींना एकत्र करून आंदोलन उभारतो. त्याला पोलिसांकरवी नक्षलवादी घोषित करून ठार मारण्यात येते. आदिवासी याविरुद्ध आवाज उठवतात. पोलिस आदिवासींची गावेच्या गावे नक्षली ठरवून, एक एक करून निर्दोषांना ठार केलं जातं. महिलांवर पाशवी अत्याचार करण्यात येतात. या खासगी प्रकल्पात ११७ गावे उठविली जातात. ही आधुनिक भारतातल्या सत्तेची नीती येथे दृश्य होत जाते.

झारखंडच्या मुंडा आदिवासींना समोर ठेवून भारतातील संपूर्ण आदिवासी समाजाच्या संकटांकडे लक्ष वेधू पाहणाऱ्या या कादंबऱ्या भौतिकवादी होत चाललेली माणसं कशी कुरणाप्रमाणे आदिवासी जगाला चरत चालली आहेत, याचे यथार्थ दर्शन यातून घडते. अनुजा पाहन, नीरज, वीरेनसारखे तरुण, सोमेश्वर मुंडा आणि सामाजिक कार्यकर्त्या सोनामनी बादरा, किशन विद्रोहीच्या नेतृत्वाखाली संघर्षाला उभे राहतात. तेव्हा बंधुराव उरांवसारख्या तरुणाची माफियांकडून हत्या होते. याच माफियांकडून एनजीओ सुरू करून आदिवासी कल्याणाच्या फसव्या योजनाही सुरू केल्या जातात. आदिवासी विरोधी नीती, भ्रष्ट अधिकारी, राजकीय पक्ष, भूमाफिया यांच्या इशाऱ्यावर विकासाच्या आतंकीत काळगर्भात आदिवासी देश गिळंकृत केला जातोय. मुंडा आदिवासी समाजाच्या शोषण, लूट नि वंचनेचे इतिवृत्तच रणेंद्र मांडत जातात. यातून वर्तमानातील देशातल्या आदिवासी हक्क अधिकारांच्या लढ्याचा लेखाजोखाही येऊन जातो. या दोन्ही कादंबऱ्यांमधून नाव बदलून येणाऱ्या व्यक्तिरेखा, प्रसंग, घटना, या सत्य, प्रत्यक्षात घडलेले आहेत. एवढा क्रूर खेळ आधुनिक विकासाच्या नावावर चालवला जात आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे, आदिवासी समाज विकासविरोधी नाहीये. त्यांनासुद्धा विकास हवाय, पण तो विकास जल-जमीन-जंगलच्या सोबतीने न्यायपूर्ण, समतामूलक पद्धतीचा असायला हवा. समाज, भाषा, संस्कृती सभ्यतांना सोडून एका अर्थाने जगण्याला मारून केलेला विकास काय कमाचा, हा विचार रणेंद्रच्या लेखणीतून जणू आदिवासी बोलताहेत.

आज आपण पावलापावलांवर अनुभवतो आहोत, जातीपासून देशधर्मापर्यंत वर्चस्ववादाची लढाई सुरू आहे. आजचं आणखी एक वास्तव हेही आहे की, जे छळले, पिळले, नागवले जाताहेत तेच ही अस्तित्वाची लढाई लढताना दिसताहेत. परंतु ही लढाई त्यांची एकट्याची वाटत असली तरी त्यांची एकट्याची नक्कीच नाहीये. ही लढाई अशी लढाई आहे, जिला तो एकटा जिंकू शकणार नाही. ज्यांचा ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नि श्रद्धा आहे. मानवतावादाची चाड आहे, त्यांनी सर्वांनी मिळून ही लढाई लढायची आहे. नाहीतर ग्लोबल गावात देवता बनलेले भांडवलदार, कंपनीमालक, त्यांच्या इशाऱ्यावर डोलणारी सरकारी यंत्रणा देशाला लुटत, ओरबाडत हळूहळू अख्खा देशच गायब करून टाकतील. त्या आधी लोकशाहीच्या रक्षकांनी जागे व्हायला हवे. नसता खोट्या विकासाची यंत्रे आदिवासी, जल, जमीन, जंगलांबरोबरच दलित, वंचित भारत देशाला गिळून घेतील.
बातम्या आणखी आहेत...