आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुश... तिर्र... फकाट (वीरा राठोड)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फा र फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आटपाट नगराच्या बऱ्याच आधीची. आदिमानवाच्या टोळी युगातली. घनदाट जंगलातली. याच अरण्यातून निघून आलेल्या माणसांचा एक कळप आटपाट नगरात येऊन स्थिरावला होता. नगरात येऊनही रानटीपणाचा अंश अजून शिल्लक राहिलेल्या, या कळपाने राज्य आणि राजधानी नावाच्या अख्ख्या भूगोलावर अधिराज्य गाजवण्यासाठी अवघा नकाशा व्यापून घेण्याची कसरत सुरू केली होती. या कामी खास ठेवणीतले अस्त्र-शस्त्र, युक्त्या-क्लृप्त्या आजमावल्या जात होत्या. जंगलातल्या सवयीप्रमाणे नगरानगरात, चौका-चौकात, रस्त्या-नाक्यावर एकच नारा घुमत होता, ‘हुशऽऽ तिर्रऽऽ फकाट, हुशऽऽ तिर्रऽऽ फकाट.’ नगरवासीयांना हा उत्सवाचा जुलूस वाटला, तर काहींना जुलुसातला जयघोष. टाळ-मृदंगाच्या तालावर दिंड्यापताका निघाल्या. बारुदाचे गोळेच्या गोळे उठवून आतशबाज. विजयी आवेशात टोळीवाले कण्हूकुथू लागले. एकमुखी गजर घुमवू लागले. ‘हुशऽऽ तिर्रऽऽ फकाट.’ चारी कोनाच्या चारी दिशेला पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण एकच एक जयघोष ‘हुशऽ तिर्रऽ फकाट’. कालपरत्वे घोष गडद होत गेला. नगरवासी बघ्यांना हा खेळ मनोरंजक वाटला. त्यांनीही हीच जपमाळ जपायला सुरुवात केली. वारीत शरीक होऊन, बेधुंदपणे ताल धरू लागले. जिकडे
तिकडे ‘हुशऽ तिर्रऽ फकाटच फकाट’. काही जण तर अंगात आणून झुलू लागले. काहींचे पाय जमिनीवरच टेकेनात. जणू पूर्वजांची सवारी अंगात येऊन शिरली असावी. ‘हुशऽ तिर्रऽ फकाट, हुशऽ तिर्रऽ फकाट.’
ही भाषा कोणती? याच्या शोधात भाषातज्ज्ञ थकले. याचा नेमका अर्थ काय? बुद्धिवंत खल करीत बसले. लेखक, विचारवंत, कलावंत, मांत्रिक, शास्त्रज्ञ यांनाही काही सुगावा लागेना. इतिहासकार इतिहास धुंडाळू लागले. या भाषेचे कूळ कोणते? या भाषेचा इतिहास काय? कोणत्या काळातली ही भाषा? ही भाषा आदिवासी-भटक्यांसारखी गुप्त सांकेतिक म्हणावी, तर या घोषणा देणारे, नाचणारे आदिवासी नव्हते, वा ‘पीके’सारखे परग्रहवासीही नव्हते. कसलाच सुगावा लागेना. हा ‘हुशऽ तिर्रऽ फकाट’वाल्यांचा कळप कुठला? तरीही इथून तिथून सारेच, इकडचे आणि तिकडचे देश नावाचा साराच्या सारा भूगोल ‘हुशऽ तिर्रऽ फकाट’च्या चक्राने चक्रावून गेला होता. एडिसनचा बल्ब पेटला तसा येडालाल शोधेच्या मेंदूची बत्ती शिलगली आणि तो गावभर बोंबलत सुटला, ‘हुशऽ तिर्रऽ फकाट’, ‘हुशऽ तिर्रऽ फकाट’. नगरवासीयांना वाटले, त्याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालाय. तो ज्याला त्याला ‘हुशऽ तिर्रऽ फकाट’ची कथा सांगू लागला. लोकांनी त्याला वेड्यात काढले. इकडे दिवसेंदिवस टोळीचा गजर वाढतच होता.
येडालाल शोधे सांगायचा, एक घनदाट अरण्य होतं. अरण्यात पशूपक्ष्यांसोबत आदिवासी राहात होते. सारे सुखात गुण्यागोविंदाने नांदत होते. एक दिवस अचानक या अरण्यात एका शिकारी टोळीचा शिरकाव होतो. काही दिवसांतच टोळीवाले आपल्या सवयीनुसार सावज हेरू लागतात. अरण्याची शांतता हळूहळू भंग पावत गेली. टोळीवाल्यांनी पक्ष्यांना हेरले. सारे पक्षी भयभीत झाले. प्राण्यांना वाटले, टोळीवाले फक्त पक्ष्यांचीच शिकार करतात, म्हणून ते गाफील राहिले. मग टोळीवाल्यांनी प्राण्यांकडे मोर्चा वळवला. जागोजाग जाळे नि फासे टाकून शिकार घडू लागली. बाण, भाल्यांनी वार होऊ लागले. अाता पक्षी, प्राणी शिकार होऊ लागले.
टोळीवाले शिकार करताना ‘हुशऽ तिर्रऽ फकाट’चा गजर करायचे. कुणालाच कळेना, काय होतंय? आदिवासी या सर्वांपासून अजून तरी अनभिज्ञ होते. टोळीवाल्यांनी आता अरण्यावर दहशत निर्माण केली होती. ही शिकारी टोळी आता नरभक्षक बनली, पशूपक्ष्यांबरोबर आदिवासींची शिकार करू लागली. आदिवासींनाही टोळीचे ‘हुशऽ तिर्रऽ फकाट’ तंत्र कळेना. रोज एक आदिवासी शिकार होऊ लागला. जाळ्यात, सापळ्यात, पिंजऱ्यात अडकलेला हा आदिमानव जिवाच्या आकांताने आक्रोश करायचा, गयावया करायचा, पाय धरायचा, जिवाची भीक मागायचा, ऊर बडवून घ्यायचा. टोळीवाल्यांना अजूनच असुरी आनंद व्हायचा. मजा वाटायची आणि मग ते त्याला भंडावून सोडायचे. हाल हाल करून मारायचे. जिवाच्या भयाने सारेच अरण्यवासी चिंताक्रांत झाले होते. आदिवासींना भाषांचे संकेत समजून घ्यायची निसर्गदत्त देणगी होती. त्यावरून त्यांनी टोळीवाल्यांच्या शिकारी मंत्राचा जप ओळखला. टोळीवाले शिकार करताना तीन दिशेला तीन ठिकाणी थांबत, टेहळणी करीत. एक जण ‘हुश’ करायचा, दुसरा ‘तिर्र’ आणि तिसरा ‘फकाट’ म्हणायचा. ‘हुश’ म्हणणारा सावजाला हुसकावून लावायचा, आणि पुढच्याला सूचना करायचा. दुसऱ्याला हुशची सूचना मिळाली की, त्याच्या अंगात स्फूर्ती यायची नि तो जोरजोरात ‘तिर्रऽऽ तिर्रऽऽ’ चिरकायचा, तिरकायचा. त्याच्या या चिरकण्याने हुशला दचकून पळालेले सावज अजूनच गोंधळून जायचे. त्याला काही सुचायचे नाही, ते सैरावैरा पळू लागायचे. त्याला गोंधळलेले बघून टोळीवाले अजूनच तिरकायचे-चिरकायचे, तिसऱ्याचा फकाटचा संकेत मिळेपर्यंत, आणि शिकार जाळ्यात अडकली की, तिसरा फकाट फकाट फडफडायचा. मग शिकारी टोळीवाले हुल्लड माजवायचे, नाचायचे, ‘हुशऽ तिर्रऽ फकाट’चा जयघोष आळवायचे...
आता मात्र आदिवासींच्या हे ध्यानात आले की, हा काही नामजप नाही, वा वनक्रीडा नाही. हे शिकारीचे तंत्र-मंत्र आहे. आदिवासींनी सर्व अरण्यबांधवांना ‘जंगल बुक’सारखे पक्षी-प्राणी सारे भेद विसरून एकत्र आणले. टोळीवाल्यांचा शिकारी डाव समजून सांगितला. अरण्यवासीयांनी अरण्य वाचवण्यासाठी एकमेकांना मदत करण्याचे, साथ देण्याचे वचन दिले. टोळीवाल्यांनी हुश केले की, सारे अरण्यवासी हुशार व्हायचे, आणि टोळीवाल्यांनी ‘तिर्रऽऽ’ करण्याआधी एका सुरात सारेच ‘हुर्रर्रऽ’ करायचे. सर्वांच्या आवाजाने जणू अरण्यच धमकावू लागल्यासारखे भासायचे टोळीवाल्यांना. या प्रचंड आवाजाने धडकी भरायची. ते शिकार सोडून ‘भुुर्रर्रऽ’ पळ काढायचे. असे वारंवार घडू लागले. टोळीला आता कळून चुकले होते की, अरण्यवासी एकत्र येऊन लढाईला सिद्ध झालेत. इथे आता आपला निभाव लागणार नाही, अरण्य आता हुशार झालंय. टोळीवाले शिकारी वृत्तीचे असल्याने मिळेल ते खाऊन जगू शकणार नव्हते, नि श्रम करण्याचा त्यांचा धर्म नव्हता. नाइलाजाने शिकारी टोळीने अरण्य सोडलं नि आटपाट नगरात आले होते. तिथेही मौका बघून ‘हुशऽ तिर्रऽ फकाट’चा शिकारी खेळ सुरू केला होता. या नगरातले लोक फार बुद्धिमान, हुशार आहेत, अशी चारी दिशांत ख्याती होती. येडालाल शोधे हाही याच आटपाट नगरातला होता. येडालाल शोधे म्हणायचा, ‘हुश म्हटले की हुशार व्हायचे. तिर्र म्हणायच्या आधी तयार, आणि फकाट होण्याआधी फटका द्यायचा.’ येडालाल शोधेचे सांगणे, या आटपाट नगराला कळले नाही. त्यांनी येडालालला वेड्यात काढले. त्याच्या कथनाला वायफळ बडबड म्हटले. येडालाल एके रात्री अचानक गायब झाला. जंगलात रस्त्याच्या कडेला छिन्नविच्छिन्न अवस्थेत त्याचे प्रेत सापडले. राजाच्या शिपायांनी येडालालचा पंचनामा लिहिला, ‘वेडेपणाच्या लहरीत येडालाल रस्ता चुकला होता. जंगलातल्या हिंस्र श्वापदांनी त्याला फाडून टाकले.’ आकस्मित मृत्यूची नोंद करून नगरवासीयांच्या साक्ष नोंदवून घेतल्या, नि प्रेत नगरवासीयांच्या हवाली केले. खरी गोष्ट अखेरपर्यंत कुणालाच कळली नाही. आटपट नगरवासीयांनीही येडालालला वेडा ठरवून त्याच्या थडग्यावर लिहून टाकले होते. ‘हुशऽऽ तिर्रऽऽ फकाट’.
veerarathod2@gmail.com