आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताना बाबा ताना... (वीरा राठोड )

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘तुन तुन ताना, ताना बाबा ताना
भूत-भूती के ताना, ताना बाबा ताना
कोना कुची भूत भूतनी के ताना
लुकल छिपल भूत भूतनी के ताना
ताना बाबा ताना तुन ताना
कासा पितर मना ढकनी मे खाना
मासमदिरा मना दोना पतनी खाना
ताना बाबा ताना तुन तुन ताना’
(ओ पिता! ओ माता! देशाचा जीव घेणाऱ्यांना, आदिवासींना लुटणाऱ्या, मारणाऱ्या सर्व प्रकारच्या भूत-सैतानांना ओढून देशाच्या बाहेर करण्यासाठी आम्हाला मदत करा. मांस-मदिरा वर्ज्य करा. सात्त्विक जीवन जगा) कुरुख-उराँव भाषेतील भारतीय स्वातंत्र्य संग्रामात १९१२ पासून सुरू झालेलं ताना भगतांचं हे क्रांतिगीत आजही ताजंतवानं आहे. ब्रिटिश जाऊन सात दशकं उलटली तरी संपूर्ण स्वातंत्र्यासाठी, हक्क आणि अधिकारांसाठी ‘देशी इंग्रजां’विरोधात आजही ताना भगत आणि बिरसायतवाले तेवढ्याच प्राणांतिकतेने लढत आहेत. जे गीत २१ एप्रिल १९१४रोजी जतरा भगतने चिंगरी, बिशुनपूर (झारखंड) येथे २६ हजार उराँव, मुंडा, खडिया आदी आदिवासींच्या उपस्थितीत गायले होते; ज्यामुळे ताना भगतांच्या धार्मिक आणि सुधारणावादी आंदोलनाने तीव्र रूप धारण केले होते; हे गीत, गांधीपूर्व असहकार आंदोलनाचे प्रेरणागीत होते.
तसे पाहता ताना भगत आंदोलनाची सुरुवात १९१२ पासूनची. दिवस-रात्र गावागावांत जाऊन स्वातंत्र्यासाठी जनतेमध्ये जागृती घडवून आणत होते. इंग्रजांविरुद्ध असहकार आंदोलन उभे करून, गावागावात सभा घेऊन जल-जमीन-जंगल आमचे आहे... ज्यावर आम्ही मेहनत करतो, त्यावर आमचाच अधिकार आहे, असे आव्हान दिले होते. ते बिरसा मुंडाच्या ‘उलगुलान’ची प्रेरणा घेऊन सामंतशाहीविरोधी सुधारणावादी आंदोलन होते. इंग्रजांचे, जमीनदारांचे राज्य, त्यांची गुलामी, सत्ता झुगारून द्या, त्यांना देशातून हाकलून लावा. ब्रिटिश लोक, त्यांना मदत करणारे महाजन, जमीनदार, लोक सैतान आहेत. त्यांना ताना, खेचा, आपल्या मातृभूमीतून हाकलून लावा. ही घोषणा करताच दोन दिवसांनी जतरा भगत आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना इंग्रजांनी अटक केली. दीड वर्ष तुरुंगात डांबून ठेवले. अतोनात छळ केला. मारझोड झाली. त्यातच ते गतप्राण झाले. परंतु त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी खेमनी उर्फ बंधनी आणि इतर अनेक साथीदारांनी हे आंदोलन अधिक तीव्र केलेे. १९१२ ते १९२५ पर्यंत या आंदोलनाने आदिवासींच्या नेतृत्वाचे व्यापक रूप धारण केले होते. कालांतराने म. गांधी आणि काँग्रेस पक्ष ताना भगत आंदोलनाने प्रभावित झाले. यातून ते गांधीजींच्या असहकार आंदोलनाशी जोडले गेले. आदिवासी लेखकांच्या मते, असहकार आंदोलनाची कल्पना गांधींनी झारखंडच्या याच तानाभगत आंदोलनापासून घेतली. असे असले तरी गांधींचा प्रभाव त्यांच्यावरही पडला, ज्यामुळे आजही या पंथातील लोक खादीचे पांढरे कपडे, टोपी, स्त्रिया पांढऱ्या साड्या अशी साधी राहणी देशभरात आढळते. त्यांचे आचार, विचार, आहार आणि कर्मावरही गांधीजींचा पगडा आढळतो. कालांतराने म. गांधीचे असहकार आंदोलन चौराचौरी घटनेमुळे स्थगित करण्यात आले. परंतु ताना भगतांनी आपले आंदोलन चालूच ठेवले. ते आजतागायत चालूच आहे. देश स्वतंत्र होऊन अनेक दशकं झालीत तरी आजही ते आपल्या अधिकारांसाठी अहिंसक, शांततेच्या मार्गाने लढा देताहेत. ते तिरंग्याला देवतेसमान मानतात. त्यांच्या दिवसाचा प्रारंभदेखील तिरंग्याला सामुदायिकरीत्या वंदन करूनच होतो.
ताना भगत आंदोलन खरे तर बिरसा मुंडांच्या सशस्त्र आंदोलनाच्या पलीकडे जाऊन त्यांच्या धार्मिक दृष्टीला आदर्श मानून झालेला विस्तारच होता, असे म्हणावे लागेल. आदिवासी जनतेला संघटित करण्यासाठी एका धार्मिक तथा राजकीय हित जोपासणाऱ्या पंथाची स्थापना करून हा मुक्ती संघर्ष आदिवासी जनतेने चालू ठेवला होता. ज्याला तानाभगत, बिरसायत अशी अनेक नावे दिली गेली आहेत. बिरसा मुंडांच्या सशस्त्र लढ्यानंतर जतरा ताना भगताने नवे आदर्श आणि मापदंड स्थापित करून, शांततेच्या अहिंसक मार्गाने असहकार आंदोलन आरंभले होते. ताना म्हणजे खेचा, ओढा, ताणून धरा. भगत म्हणजे भक्त, अनुयायी, अर्थात संघर्षलढ्याचे अनुयायी.

उराँव जमातीत जन्मलेल्या जतरा भगताने आदिवासी जमातीत पशूबळी, मांसभक्षण, जीवहत्या, दारूप्राशन विरोधी प्रचार केला. सात्त्विक जीवनाचा आग्रह धरला. इंग्रज, जमीनदार, वतनदारांना भूत-सैतान संबोधून संबंधितांमध्ये धडकी भरवली. यातून अन्याय, अत्याचार, शोषणाविरुद्ध एक नवी दृष्टी आदिवासी समाजात तयार होत गेली. धार्मिक मुलामा चढवलेले राजकीय आंदोलन उभे राहात गेले. सात्त्विक जीवनाबरोबरच नव्या पथावरून चालणाऱ्या या पंथाने सामंत-सावकार, ब्रिटिशांविरुद्ध आदिवासींची अहिंसक सेनाच जणू तयार केली होती. या सगळ्यांनी सरकारी कामांवर बहिष्कार टाकला होता. ‘मालगुजारी नही देंगे, बेगारी नहीं करेंगे और कर नही देंगे’, अशी जणू घोषणाच करून टाकली होती.

पुढे म. गांधींचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाल्यानंतर १९२०च्या दरम्यान म. गांधी रांची येथे या ताना भगत आंदोलनकर्त्यांना जाऊन भेटले होते. याच काळात राष्ट्रीय काँग्रेसचे कलकत्ता येथे असहकार आंदोलनाची मांडणी करून घोषणा करण्यासाठीचे विशेष अधिवेशन भरविण्यात आले होते, हे सर्वश्रुत आहे. या अधिवेशनात लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्याच्या मागणीसाठी गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला. असहकाराची कार्यसूची जाहीर केली. योगायोगाने यातील बरीच सूत्रे ताना भगतांशी साम्यदर्शकच होती. आदिवासी शिकलेले नसल्याने त्यांना बापूजींसारखी आंदोलनाची सूत्रबद्ध मांडणी करता आली नसेलही; पण त्यांची दिशा, मार्ग, आणि ध्येय मात्र अचूक होते. पुढे ताना भगतांनी स्वत:ला गांधींच्या असहकार आंदोलनाशी स्वत:ला जोडून घेतले. आंदोलनासाठी आर्थिक निधीदेखील जमा केला. काळ-तिथींचा विचार करता, ताना भगतांचे असहकार आंदोलन म. गांधींच्या भारतीय राजकारणातील प्रवेशाच्या एक दशक आधीचे आहे. मात्र राष्ट्राचा इतिहास लिहिणाऱ्या एकाही इतिहासकाराने याची नोंद घेतली नाही. कालांतराने आदिवासींमधील रीतीरिवाजांच्या भिन्नतेमुळे ताना भगतांच्या अनेक शाखा निर्माण झाल्या. ज्यात सादा भगत, ‘बाछीदान भगत’, ‘करमा भगत’, ‘लोदरी भगत’, ‘नवा भगत’, ‘नारायण भगत’, ‘गौरक्षणी भगत’ आदी मुख्य होत.

स्वातंत्र्यानंतर ‘ताना भगत रैयत अॅग्रिकल्चरल लँड रेस्टोरेशन अॅक्ट’ पास केला गेला, ज्यात ताना भगत आंदोलनातील सहभागी आदिवासींना त्यांच्या हडपलेल्या जमिनी परत करण्याचा विशेष कायदा होता. त्यानुसार किती आदिवासींना त्या परत दिल्यात, याविषयी स्पष्ट आणि नेमकेपणाने आजवर कुणीच बोलले नाही. उलट आदिवासींच्या भूमीचे अधिग्रहण केले जातेय. या भूमी अधिग्रहण कायद्याच्याविरुद्धच वेळोवेळी ते आंदोलन करीत असतात.
नि:संकोचपणे आणि मोठ्या मनाने आपणाला हे मान्यच करावे लागेल की, स्वातंत्र्याच्या आंदोलनाची राष्ट्रव्यापी मोहीम असहकार आंदोलनामुळे बळकट झाली होती. या आंदोलनाला गांधीजींनी राष्ट्रीय रूप प्राप्त करून दिले होते. याला कारण उत्तरेतील मुस्लिमांची खिलाफत चळवळ आणि पश्चिमेतील ताना भगतांचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग होता. राष्ट्रवादी इतिहासकारांनी जरी ताना भगत आंदोलनावर फार भाष्य केलेले नसले तरी राष्ट्रीय असहकार आंदोलनाची बीजे मात्र गांधीपूर्व काळात जतरा भगतांच्या ताना भगत आंदोलनाने पेरली गेली होती, हे नव्याने मांडण्याची आज खरी गरज आहे. हिटलरी प्रवृत्तींनी दिलेल्या धमक्यांना प्रेमाने आणि नथुरामी प्रवृत्तींनी झाडलेल्या गोळ्यांना शांती-अहिंसेच्या मार्गाने उत्तर देणारी आंदोलने उभी राहणे गरजेचे आहे. म्हणूनच पुन्हा एकदा एका सुरात गाऊ या, ‘ताना बाबा ताना, भूत-भूतनी के ताना’...
veerarathod2@gmail.com
बातम्या आणखी आहेत...