आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चावेझ यांची दोन रूपे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हेनेझुएलाचे अध्यक्ष ह्युगो चावेझ यांच्या निधनानंतर त्यांच्यावर निहायत खुश असलेल्यांनी त्यांचा स्वप्नदर्शी म्हणून गौरव केला. टीकाकारांनी भडिमार केला नाही. तारिक अली हे ट्रॉटस्कीवादी पाकिस्तानात न राहता इंग्लंडमध्ये राहतात आणि क्रांतीची स्वप्ने पाहत असतात. त्यांचे व चावेझ यांचे मैत्रीचे संबंध होते. ‘गार्डियन’मध्ये लिहिलेल्या लेखात त्यांनी चावेझ व ते यांच्यात जे दुवे होते त्यात साहित्यविषयक प्रेम हा एक होता, असे म्हटले आहे. मध्यरात्रीही चावेझ तारिक अली यांना फोन करून एखाद्या साहित्यकृतीबद्दल बोलत राहत. एक समाजवादी व लोकशाहीवादी असे तारिक अलींनी चावेझ यांना संबोधले आहे.

गडाफी, इराणचे अहमदीनेजाद व स्वत:च्याच साठ-सत्तर हजार लोकांचा बळी घेणारा सिरियाचा बशार आसाद हे चावेझ यांचे मित्र होते. समाजवादी लोकशाहीच्या आधारस्तंभाचे हे संबंध ट्रॉटस्कीवादात बसत असल्यास गोष्ट वेगळी. तथापि हे कबूल करावे लागेल की व्हेनेझुएलाच्या अतिशय सामान्य लोकांत आपण आपल्या देशाच्या व्यवस्थेचे एक घटक आहोत, अशी भावना निर्माण केली ती चावेझ यांनी. अमेरिकेने निदान दुसर्‍या महायुद्धानंतर दक्षिण अमेरिकन देशांसंबंधीचे धोरण बदलून त्यांच्याशी मित्रत्वाचे संबंध निर्माण करायला हवे होते. तसे झाले नाही. शीतयुद्धाचाही परिणाम होता. ते देश स्पेन व पोर्तुगालच्या साम्राज्यांचे अंकित देश होते. यातून फक्त हुकूमशहा तयार झाले. व्हेनेझुएला त्यातलाच एक. अत्यंत गरिबीत वाढलेल्या चावेझ यांनी सर्व प्रकारची हलाखी अनुभवली. बेसबॉलच्या आवडीमुळे ते लष्करात दाखल झाले. ते रणगाडे पथकात होते आणि छत्रीधारी सैनिकही झाले. या रीतीने प्रारंभीपासून लष्करी जीवन जगत असलेल्या चावेझ यांनी कायम लष्कराशी संबंध ठेवले आणि त्यांचे आदर्शही निरनिराळ्या देशांतले लष्करशहाच होते. लष्करी अधिकार्‍यांचे जाळे त्यांनी तयार केले होते. त्यातर्फे तेव्हाच्या राजसत्तेविरुद्ध उठाव घडवून आणण्यात ते सामील झाले. पण 1989 मधील उठाव फसल्यामुळे त्यांना शिक्षा झाली. तरी देशाच्या प्रमुखावरचे आरोप सिद्ध झाल्यामुळे चावेझ यांची शिक्षा दोन वर्षांवर आली. पण नव्या राज्यकर्त्यासही देशत्याग करावा लागला.

लष्करी उठाव करून सत्ता ताब्यात न घेता निवडणुकीचा मार्ग अधिक योग्य, अशी शिकवण त्यांना देणारांत क्युबाचे फिडेल कॅस्ट्रो हे एक होते, असे सांगितले जाते. त्याप्रमाणे 1998च्या निवडणुकीत त्यांनी सर्वसामान्य लोकांना आवाहन केले; अनेक आश्वासने दिली. सर्व व्यवस्थाच बदलण्याचे आश्वासन त्यात प्रमुख होते. चावेझ प्रमुखपदी आल्यावर त्यांनी सत्तेचे केंद्रीकरण करण्याचे धोरण अवलंबले. अनेक उद्योग सरकारी मालकीचे होत गेले. याविरुद्ध 2002 मध्ये उठाव झाला. चावेझ पदच्युतही झाले. पण केवळ दोन दिवस. नंतर त्यांच्याच हाती सत्ता आली. ती बळकट करण्याचे सर्व प्रकारचे प्रयत्न त्यांनी केले. प्रथम घटना बदलून घेऊन जनमत घेतले. ते त्यांना अनुकूल पडले. यामुळे चावेझ यांना वारंवार अध्यक्षपदासाठी उभे राहण्याचा मार्ग मोकळा झाला. सामान्य लोकांना आकर्षित करणारा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला. यात माफक भाड्याची घरे आणि मोफत शिक्षण आणि वैद्यकीय उपचार यांचा समावेश होता. बँकांपासून अनेक उद्योग सरकारी मालकीचे झाले. अनेक मळे आणि काही लाख एकर शेतजमीन सरकारी मालकीची झाली. पण तेल उद्योग सरकारी मालकीचा झाल्यामुळे सरकारच्या हाती घबाड आले.

जेव्हा तेल उद्योग हाती आला, तेव्हा एका पिंपाला दहा डॉलर असा भाव होता. पण नंतर तो वाढत जाऊन शंभरपर्यंत वा त्याहीपेक्षा अधिक अशी वाढ झाली. सरकार अनेक क्षेत्रांत मालक म्हणून वावरू लागल्यावर त्यांतील कर्मचारी वर्ग सरकारच्या नियंत्रणाखाली आला. चावेझ यांनी वर्गसंघर्षाचे धोरण अवलंबून समाजात कायम तेढ वाढेल हे पाहिले.

याचा अर्थ खासगी कायदेशीर व बेकायदेशीर व्यवहार चालत नाहीत, असे नाही. पण त्याचे भवितव्य केवळ एका व्यक्तीच्या म्हणजे चावेझ यांच्या हाती आले. अशा उद्योगातला पैशाचा वाटाही आला. इतक्यावर न थांबता चावेझ यांनी वृत्तपत्रे व दूरचित्रवाणीच्या वाहिन्या यांच्यावर अनेक निर्बंध बसवले. विरोधी पक्षांवरही बंधने आली. त्यांना जाहिरात द्यायची असेल, तर पाच-सात मिनिटांसाठी. चावेझ यांची एक वाहिनी मात्र चोवीस तास चालते आणि ते स्वत: दर रविवारी किमान तीन तास भाषण करत असत. यात गाणी, नाच, विनोदी चुटके इत्यादींचा समावेश होता. चावेझ यांच्यापाशी भाषणकौशल्य होते. त्यांचा आवाजही उत्तम होता.

अमेरिका हा त्यांनी सर्वात मोठा शत्रू मानला. दक्षिण अमेरिकेतील सर्व देशांचा निदान सात-आठ देशांचा एक गट करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले होते. सौदी अरेबियाच्या खालोखाल व्हेनेझुएलात तेलाचा साठा आहे.अमेरिकाविरोधी एक शस्त्र म्हणून चावेझ तेलाचा उपयोग करत आले. ते स्वत: कॅस्ट्रो यांना गुरू मानत, कधी पिता म्हणूनही संबोधत. शत्रू मानलेल्या अमेरिकेला व्हेनेझुएलाचे तेल मात्र नियमित निर्यात होत होते.

सोव्हिएत युनियनचा अस्त झाल्यावर कॅस्ट्रो यांची आर्थिक दैनाच झाली असती. कारण रशियाच सर्व आधार होता व दुसरा काही दिसत नव्हता. समाजवादाचा त्याग करू नका, असे कॅस्ट्रो रशियास सांगत; तेव्हा त्या शेवटच्या दिवसांत गोर्बाचेव्ह यांचा राजकीय सल्लागार म्हणाला की, ही दाढी आमच्या रुबल्सवर अवलंबून आहे; तिने स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारावा. पण त्या दाढीस चावेझ यांचा आश्रय इतका मिळू लागला की रशियाची मदत होत नव्हती इतकी मदत चावेझ देऊ लागले. शिवाय बंदरे, हमरस्ते, इस्पितळे व काही कारखाने व्हेनेझुएलाच्या पैशावर क्युबात उभे राहिले. उलट डॉक्टर्स, गुप्त पोलिस यंत्रणा इत्यादी अनेक बाबतीत क्युबा माणसे पुरवू लागला. इतकेच काय, चावेझ यांचा राजकीय वारस निकोलस मडुरो याच्या नावाची सूचना कॅस्ट्रो यांनी केल्याचे प्रसिद्ध झाले आहे. अशी ही वाटणी आहे.

सरकारीकरणामुळे दिरंगाई वाढली. मध्यम आकाराचे हॉस्पिटल उभारण्यास दहा वर्षे लागल्याचे एका स्थानिक डॉक्टरनेच जाहीर केले आहे. तेलाच्या पैशाचा ओघ वाढत असताना देशातच अनेक उद्योग स्थापन होतील व वाढतील, हे चावेझ यांनी पाहिले नाही. चीनने नवे आर्थिक धोरण स्वीकारून मोठी प्रगती केली. ब्राझील अमेरिकेच्या वर्चस्वाखाली नाही. पण त्याने संघर्षाची भूमिका घेतली नाही आणि अंतर्गत विकासाचे धोरण अवलंबले.

व्हिएतनामही त्याच मार्गाने जात आहे. व्हेनेझुएलात शिक्षणाचा प्रसार झाला. परंतु उद्योग उभे करणारे निर्माण झाले नाहीत. सरकारीकरण सर्वंकष होऊ लागल्यामुळे बाहेरून भांडवल येत नाही. शिवाय ज्या तेलाचा आधार आहे, त्याचाही पैसा चावेझ यांच्या आंतरराष्ट्रीय राजकारणामुळे उधळला जातो. क्युबाला रोज एक लाख पिंपे तेल अतिशय स्वस्तात दिले जाते. निकारागुआ इत्यादी देशांचाही यात समावेश आहे. यामुळे व्हेनेझुएलातच तेलाची अडचण भासत आहे. उत्पादन वाढवण्यासाठी भांडवल नाही. चीनकडून कर्ज घेतले त्या बदल्यात चीनशी तेलाचा दीर्घकाळाचा करार करावा लागला. या आर्थिक घसरणीमुळे गेल्या महिन्यात व्हेनेझुएलाच्या चलनाचे 32 टक्क्यांनी अवमूल्यन सरकारनेच जाहीर केले. कर्ज झाले आहेच. आता चावेझ यांच्या राजकीय वारसास क्युबा व दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांना स्वस्तात तेलाचा पुरवठा करणे कठीण होणार आणि देशाचा वाढता आर्थिक भार पेलणेही सोपे नाही. त्यातच मडुरो यांच्यापाशी चावेझ यांच्यासारखे प्रभावी व्यक्तित्व नाही व वक्तृत्व नाही. देशापुढे अनेक कठीण प्रश्न आहेत. तेव्हा व्हेनेझुएलाचे भवितव्य काय, हा प्रश्न आहे.