आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंदसुगंध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरशासमोर उभं राहून नृत्यातील वेगवेगळे आकृतिबंध करून बघायला कोजागिरीला खूप आवडायचे. तिला कधी कधी वाटायचे आपल्या हातातील टिपरीवर कोणीतरी हळूच येऊन लय साधणार आहे. आईने शिवलेला नृत्याचा खास पोषाख घालून, केसांना गोंड्याची लांब वेणी लावून वेगवेगळ्या पोझेस करून पाहायचा विशेष छंद जडला होता. आईचे ब-याच वेळा लक्ष नसायचे. कोजागिरीचा आरशासमोरचा हा संवाद तासन्तास चालू राहायचा.


तिला तिची पावलं आणि हाताची लांबसडक बोटं खूप आवडायची. त्यांची वेगवेगळ्या मुद्रा करून पाहायलाही आवडायचे. आरशातली कोजागिरी चित्रातल्या राधेसारखी दिसायची. चमकणारे डोळे, भरलेले गाल, रुंद खांदे, वळवलेली मान, हातांच्या बोटांनी केलेल्या वेगवेगळ्या मुद्रा, उचललेली पावलं, सुंदर दिसणा-या टाचा. अल्लारिपुतील सर्व अडावू संपून कोजागिरी तिल्लाना गुणगुणत स्वत:भोवती गिरक्या घेत असे. आरशातील कोजागिरीकडे पाहायला तिला खूप आवडायला लागले होते.


एकदा अशीच आरशासमोर कोजागिरीची स्वारी दंग झाली होती. तिच्या डान्स टीचर गाण्यांचा अर्थ समजावून सांगायच्या. अर्थ समजून नृत्य चांगले करावे असे त्या म्हणायचा. आरशातील कोजागिरीला ओळी आठवल्या. ‘पूर्ण चंद्र आकाशात किरणांचा उत्सव मांडत आहे. वेलीवर कळ्या बहरल्या आहेत. सुगंधच जणू राधेच्या घुंगरात नाद झालाय. तोच मंजूळ सुगंधी नाद कृष्णाला वेडा करतोय.’


आनंद ओसंडून वाहत असताना, आत्ममग्न तंद्रीत असताना जणू ऋतुचक्र कोजागिरीसाठी क्षणभर थांबले. कानात हळुवार कुजबुजले ‘हं, कोजा मी आले आहे!’ कोजागिरी क्षणभर गोंधळली. आईने काही गोष्टी समजावून दिल्या होत्या. त्याप्रमाणे हे काहीतरी घडलंय हे तिला उमजलं. नृत्य थांबवून ती आईकडे धावली. आईचा हात हातात घेऊन म्हणाली, ‘माऊ (हा तिचा आईला संबोधण्याचा खास प्रकार) तू म्हणत होतीस न, त्याप्रमाणे मी आता ’्र३३’ी ६ङ्मेंल्ल, छोटी बाई झाले.’ शांताला खूप आनंद झाला. त्याबरोबर कोजागिरीला विशेष काळजी घ्यावी लागणार, त्यासाठी तिची तयारी करावी लागणार असेही वाटून गेले.


आजचा दिवस हा खास दिवस. आपण आज खूप आनंद मनवायचा. शांताचा मनातल्या मनात विचार सुरू झाला. कोजागिरीला मिठीत घेऊन ती म्हणाली, ‘आज माझी सोनी मोठी झाली. आजपासून आई आणि बाबा दोघेही तुला खूप खूप भाव देणार. हे आपलं आधीपासून ठरलं होतं की नाही?’ कोजागिरी थोडीशी बावरलेली आणि बरीच उत्साही दिसत होती. ‘आज आपण राधा-कृष्णाचे चित्र पूर्ण करूया. तुला ते किती दिवसापासून काढायचे होते,’ शांता कोजागिरीला कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील याचा विचार करत म्हणत होती.
ही गोड बातमी बाबालाही सांगितल्यावर तो म्हणाला, ‘आधी आपण नृत्याच्या पोझेसमध्ये कोजागिरीचे फोटो काढूया. म्हणजे या दिवसाची चांगली आठवण राहील.’ गजरे वेणीवर सजवले. हातापायांना आळता लावला. पायात घुंगरू घातले. नृत्यासाठी खास सजायला कोजागिरीला फार आवडायचे. फोटो काढून झाल्यावर चित्र पूर्ण करण्याकडे तिचा मोर्चा वळला. शांताने कोजागिरीला आवडणारे खास पदार्थ जेवणात केले. चांगले संगीत लावले. या विशेष दिवसासाठी आणून ठेवलेल्या भेटी बाहेर काढल्या. ‘बघ बरे तुला काय मिळालेय ते,’ बाबाने भेटी देत म्हटले.
एक सुंदर डायरी होती आणि एक सुंदर कवितांचे पुस्तक होते. कोजागिरीच्या आजी हा सोहळा कशाचा ते मनोमन समजल्या. त्यांनीही प्रेमाने तिचा चेहरा कुरवाळला आणि आलाय बलाय करून ‘पोरगी माझी गुणाची गं’ म्हणत स्वत:च्या हाताची बोटे मोडली. आजी असे करायच्या आणि त्याचा अर्थ कोजागिरीला कळायचा नाही. आजीचे आपल्यावर मनापासून प्रेम आहे एवढे मात्र तिला माहीत होते.
चित्र पूर्ण करून त्यावर कोजागिरीने तारीख टाकली. ........1987. बराच उशीर झाला होता. शांता कविता वाचत होती. कोजागिरीचे डोळे पेंगुळले होते. पूर्ण चंद्र हसत होता. वेलीवर कळ्या फुलल्या होत्या. त्यांचा मंद सुगंध कोजागिरीच्या घुंगरांचा नाद झाला होता. जणू स्वप्नातील प-यांशी अलगद कुजबुज चालली होती. पहाटेच्या धूसर धुक्यात मंद मंद काहीतरी चमकत होते. कोजागिरीला नीज घेरून होती. कोजागिरीच्या वाढीचा नवीन टप्पा सुरू झाला या विचाराने शांताचा पुढचा दिवस सुरू झाला.