आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'मस्त कॉफी'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळा संपत आला की मृग नक्षत्राकडे सर्वांचे डोळे लागलेले असतात. मृगाचा पाऊस एकदाचा पडला की सर्वत्र थंडावा सुरू होतो व साधारण आषाढ व श्रावण मास लागल्यावर सर्वत्र हिरवेगार दिसू लागते. असे वातावरण सर्वांना आल्हाददायी वाटत असते. अशा वेळी ऑफिसमध्ये बसल्या बसल्या किंवा मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारताना कॉफी न घ्यावी वाटली तर नवलच. या वातावरणातील कॉफीचा एक कप आपला कंटाळा झटकून आपणास एकदम ताजेतवाने करून टाकतो. कॉफी जरी मुळात चवीला कडू असली तरी त्याचे योग्य मात्रेत शरीरावर चांगले परिणाम व अधिक मात्रेत शरीरावर प्रतिकूल परिणाम दिसून येतात.


कॉफीच्या फळांवर विशिष्ट प्रक्रिया केल्यावर पेय म्हणून वापरण्याजोगी कॉफी तयार होते. कॉफीच्या फळापासून बी वेगळे केले जाते व धुऊन वाळवले जाते. या बियांवर प्रक्रिया करून कॉफी तयार केली जाते.


ब-याच वेळा कॉफीची कच्ची फळे तोडून त्यापासून कॉफी तयार करतात. ही फळे तोडताना हिरवी असतात म्हणून या प्रकारच्या कॉफीला ग्रीन कॉफी असे म्हणतात. ग्रीन कॉफी आरोग्याला जास्त उपयुक्त आहे, असे ब-याच तज्ज्ञांचे मत आहे.


ग्रीन कॉफी व साध्या कॉफीमध्ये सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे ग्रीन कॉफीच्या बिया न भाजता वापरण्यात येतात, तर साध्या कॉफीमध्ये बिया भाजून वापरतात. दोन्ही प्रकारच्या कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण 1 ते 2.5 टक्के एवढे असते. ग्रीन कॉफीमध्ये अल्प प्रमाणात paraxanthine theophyllineही सक्रिय तत्त्वे असतात व ही सक्रिय तत्त्वे ब्राऊन कॉफीमध्ये आढळून येत नाहीत व यामुळेच त्यांच्या कॉफीमध्ये फरक दिसून येतो. ग्रीन कॉफीमध्ये vitamin B6 व निकोटिनिक अ‍ॅसिड या पोषक मूल्यांचे प्रमाण आढळून येते. त्याचप्रमाणे प्रथिनांचे प्रमाण ग्रीन कॉफीमध्ये जास्त आढळून येते. मात्र ग्रीन कॉफीमध्ये अशी काही द्रव्ये आहेत, ज्यामुळे त्यास उग्र वास प्राप्त होतो.


कॉफीचे जे शरीरावरील गुणधर्म बघावयास मिळतात ते प्रामुख्याने कुठल्या प्रकारे आपण कॉफी तयार करतो व कॉफीचा कुठला प्रकार वापरतो यावर अवलंबून असते. आपण कॉफी किती वेळ उकळतो, त्यात पाण्याचे प्रमाण व उकळतानाचे तापमान यावर कॉफीचे बरेच गुणधर्म अवलंबून असतात. कॉफीची पावडर पाण्यात उकळून कॉफी तयार केल्यास कॉफीमध्ये जलविद्राव्य घटक येतात व तैलविद्राव्य घटक कॉफीत उतरत नाहीत.


मात्र एस्प्रेसो कॉफी किंवा यंत्राच्या साहाय्याने कॉफी तयार करताना त्यात पाण्याचे तापमान व पाण्याचा दाब जास्त असल्याने जल व तैलविद्राव्य असे दोन्ही घटक कॉफीमध्ये येतात. मशीनद्वारे केलेल्या किंवा इन्स्टंट कॉफीमध्ये उकळलेल्या कॉफीपेक्षा सक्रिय तत्त्वे अधिक असल्याने अशा प्रकारची कॉफी वारंवार घेणे टाळावे.
कॉफी हे पेय जगभरात आढळते व कॉफीचे चाहतेही सर्वत्र दिसून येतात. मात्र कॉफीच्या आरोग्यविषयक परिणामांबद्दल बरीच मतमतांतरे आहेत. कॉफीचे शरीरावर परिणाम होतात ते प्रामुख्याने त्यातील कॅफिन या सक्रिय तत्त्वामुळे दिसून येतात. याकरिता बरेच लोक डिकॅफिनेटेड कॉफी घेण्याचा सल्ला देतात. मात्र अशा प्रकारच्या कॉफीचा काही वेगळा परिणाम आढळत नाही.


सर्वसाधारणपणे उकळलेली कॉफी ही दिवसभरातून 2-3 कप घ्यावी व या प्रमाणात घेतलेल्या कॉफीचा चांगला फायदा दिसून येतो. 2-3 कप प्रतिदिवस कॉफी घेतल्यास हृदयविकार व मधुमेह यांसारख्या आजारांत त्याचा फायदा दिसून येतो. त्याचप्रमाणे यकृत विकारसुद्धा आटोक्यात राहतात. मात्र तेच कॉफीचे प्रमाण वाढल्यास यकृतामध्ये चरबी जमा होणास मदत होते. अल्प प्रमाणातील कॉफी ही मेंदूला उत्तेजक म्हणून कार्य करते, तर जास्त प्रमाणात सेवन केल्यास चेतासंस्थेच्या आजारात भर पाडते. याचाच अर्थ कॉफीचे परिणाम आपण किती प्रमाणात कॉफी सेवन करतो यावर अबलंबून असतात.


कॉफीच्या प्रमाणात सेवनाने आतड्यांचे कॅन्सर, पक्षाघाताचे प्रमाण, नियंत्रणात राहते असे काही संशोधनात आढळून येते.असे असले तरी ब-याच लोकांना कॉफीचे व्यसन असते व जे प्रमाणाबाहेर कॉफीचे सेवन करतात त्या लोकांमध्ये वजन वाढणे, कॉफी न घेतल्यास मनाची चंचलता होणे, हृदयविकार व इतर चयापचयात्मक व्याधी वाढतात. त्याचप्रमाणे ब्राऊन कॉफीमध्ये acrylamide चे प्रमाण अधिक असल्याने जास्त प्रमाणात कॉफी सेवन केल्यास कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढते. त्यासाठी कॉफी पिताना खालील काळजी घ्यावी.
कॉफी शक्यतो उकळलेली (Percolated)असावी. दिवसभरात 2-3 कप यापेक्षा जास्त घेऊ नये. साखर कमीत कमी वापरावी किंवा वापरू नये. स्थूल व्यक्ती, हृदयविकार, मधुमेह, अतिरक्तदाब या रुग्णांनी शक्यतो टाळावी.