आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पडद्याआडचे क्रिकेट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकत्याच आटोपलेल्या ‘आयपीएल’ क्रिकेट स्पर्धेचा ढाचा असा विचित्र आहे की, एक यशस्वी ‘बिझनेस मॉड्यूल’ म्हणून त्याकडे पाहता येणार नाही. कोण किती खर्च करतो यावर निर्बंध नाहीत. कुणाला किती लाभ होतो याचा लेखाजोखा नाही. सामन्यांची तिकिटे उपलब्ध नव्हती, कुठे मिळणार ते कधीही स्पष्ट होत नव्हते. संकेतस्थळावर सर्वांनाच ती मिळत नव्हती. सामना मात्र ‘हाउसफुल्ल’ होता. यावर अनेक माजी क्रिकेटपटूंनीही शंका व्यक्त केली होती. तिकिटे नेमकी कोणी विकत घेतली हा प्रश्न होता. एकाच स्टॅण्डची तिकिटे वेगवेगळ्या किमतीत घेतल्याची प्रेक्षकांची तक्रार होती. तर ज्या स्टॅण्डच्या तिकिटांचा दर 1500 ते 1600 असल्याचे जाहीर करण्यात आले, त्याच स्टॅण्डमध्ये 7 ते 10 हजारांची तिकिटेही विकली गेली. या तिकिटांवर करमणूक करही भरावा लागतो. अशा तिकिटांचा खरा ग्राहक कोण ते मात्र अखेरपर्यंत गुलदस्त्यात राहिले. काळा पैसा तर या कामासाठी वापरला जात नाही ना? कारण याआधीच्या ‘आयपीएल’मध्ये स्टॅण्ड्स पूर्ण भरले नसतानाही कागदोपत्री सामने हाउसफुल्ल दाखवले गेले. नेमका कोणता हेतू त्यामुळे साध्य झाला?
तिकीट विक्रीतील व्यवहारांचा जसा संशय, तसेच खेळाडूंना विकत घेण्याच्या व्यवहाराबाबतही शंका उपस्थित झाल्या. ‘आयपीएल’ स्पर्धेसाठी नवोदित खेळाडूंसाठी 30 लाख रुपये मानधनाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र एखाद्या नवोदित खेळाडूला घेण्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू होतात. प्रत्यक्ष लिलावात त्या खेळाडूची किंमत वाढवून विकत घेता येत नाही. मग फ्रँचायझींचे एजंट त्या खेळाडूशी टेबलाखालून व्यवहार करतात. तसा आरोप स्टिंग आॅपरेशनमध्ये पकडण्यात आलेल्या खेळाडूंनीही केला आहे.
30 लाख अधिकृत मानधन आणि टेबलाखालून मिळालेले मानधन होते दीड कोटी रुपयांचे. मात्र काही खेळाडूंना याउलट अनुभव आल्याची चर्चा आहे. काही नवोदित खेळाडूंची योग्यता त्यांना मिळणा-या 30 लाख रुपये मानधनाइतकीही नव्हती. अशा खेळाडूंना अचूक हेरून निश्चित केलेल्या मानधनाची रक्कम अधिकृतपणे दिली जाते. मात्र त्याच खेळाडूंकडून रोखीने त्यातील बराच हिस्सा परत घेतला जातो.
आयपीएल स्पर्धेत उतरवण्यासाठी संघमालकांना स्वतंत्र कंपनी निर्माण करावी लागली. त्या कंपनीला स्वतंत्र सीईओ आला, व्यवस्थापक आले. खेळाडू, सपोर्ट स्टाफ, कार्यालयातील स्टाफ, बॅकअप स्टाफ, जाहिरात आणणारा विभाग, जाहिरात करणारा विभाग, खेळाडूंच्या जाहिराती करण्यासाठी प्रचार करणारा विभाग, संघांचे स्वगृही सामने असताना व त्यांच्या शहराबाहेर सामने असताना खेळाडूच्या राहण्याची, प्रवासाची व्यवस्था करणारा विभाग, तिकीट छापणारा व विकणारा विभाग आदी मिळून सुमारे 300 ते 350 जणांची ती एक मोठी कंपनीच असते. ही कंपनी चालवण्यासाठी खर्च कुठून येतो?
‘कॅपिटल’मधून खर्च करत राहिल्यास शिल्लक काहीच उरणार नाही. फ्रँचायझींनी लिलावात कबूल केलेली रक्कम 10 वर्षांत बोर्डाला द्यायची आहे. बदल्यात प्रत्येक संघाला तिकीट विक्रीद्वारे मिळणारे उत्पन्न आणि टेलिव्हिजन राइट्सद्वारे होणारी आवक हाच आधार आहे. त्या शिवाय फ्रँचायझींना स्वत:च्या संघातील सेलिब्रेटी खेळाडूंच्या जाहिरातींचा हक्क मिळालेला असतो. यापासून किती लाभ होतो, याची कुठेही वाच्यता होत नाही. काही फ्रँचायझी पाचव्या आयपीएलनंतरही तोट्यातच असल्याचे कळते. एका फ्रँचायझीने यंदा आपल्याला प्रथमच फायदा झाल्याचे खासगीत जाहीर केले. मात्र याच फ्रँचायझीचा मालक प्रत्येक वर्षी सामने हरूनही आपल्याला किती लाभ झाला, हे जगाला ओरडून सांगत होता. याचाच अर्थ असा की आयपीएल मालकांचे आर्थिक व्यवहार गुलदस्त्यात राहतात. तिकीट विक्रीद्वारे होणा-या उत्पन्नाच्या मिळकतीचे मूळ स्रोत अज्ञात राहतात. रोखीने केलेले व्यवहार गुप्त राहतात. अधिकृत उत्पन्न जास्त दाखवता येत नाही. मात्र रोखीच्या हिश्शावरून भागीदारांमध्ये बेबनाव झाल्याची उदाहरणे आहेत. एकीकडे अवाढव्य खर्च, भागीदारांमध्ये सुंदोपसुंदी होऊनही संघ खेळताहेत. तोट्यात असूनही संघ चालवले जात आहेत. हवाला रॅकेट््स, सामन्यांवरील सट्टेबाजी यांचे पाठबळ तर या संघमालकांना लाभत नाही ना? बेटिंगसाठी ही स्पर्धा चालवली जात असल्याचे आरोप आता खुलेआम व्हायला लागले आहेत. कारण या संघमालकांनीच संगनमताने आळीपाळीने विजेते निश्चित केले असल्याचा संशय बळावत आहे.
मुळात ‘आयपीएल’चे नियमच असे करण्यात आले आहेत की सामन्यांचे निकाल कुणीही सांगू शकणार नाही. युरोपियन फुटबॉल लीगमध्ये दर्जेदार खेळाडूंच्या मानधनावर मर्यादा नाही, तसे खेळाडू किती घ्यायचे यालाही बंधन नाही. आयपीएलने मात्र दर्जेदार खेळाडू किती असावेत यावर बंधने घातली आहेत. खेळाडूंच्या मानधनाच्या रकमेलाही मर्यादा आहे. त्यामुळे टेबलाखालून व्यवहार होताहेत. दर्जेदार खेळाडू कमी करून सर्व संघ समतोल करण्याचा आव ‘आयपीएल’ने आणला आहे. प्रत्यक्षात ती एक चलाखी आहे. संघ समतोल केल्यामुळे सामन्यांच्या निकालांचे ठाम अंदाज कुणीही बांधू शकत नाही. याच अनिश्चिततेचा लाभ सट्टेबाजांना होत आहे.
कोणत्याही संघाला प्रबळ होऊ न दिल्यामुळे निकालांची अनिश्चितता वाढली. त्याचा लाभ कुणाला किती झाला असेल? कल्पनेपलीकडील ते विश्व आहे. कुणीही बाद फेरीत पोहोचू शकतो, कुणीही विजेता होऊ शकतो, असे चित्र निर्माण केल्यामुळे सट्टेबाजांना प्रचंड लाभ झाला आहे. यापुढेही होत राहणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा आयपीएलच्या रात्रीच्या पार्ट्यांची रसभरित वर्णनेच ऐकायला मिळाली. ललित मोदी यांच्या राजवटीत रात्री 12 नंतर या पार्ट्या रंगायच्या. ज्या खेळाडूंना गुलामांसारखे लिलावात विकत घेण्यात आले होते, त्या खेळाडूंना या पार्ट्यांना हजेरी लावणे सक्तीचे करण्यात आले होते. त्यामुळे रात्री 11.30 पर्यंत आयपीएल सामना खेळून थकलेले खेळाडू इच्छा नसतानाही या पार्ट्यांना हजर राहत होते. अर्थात अशा पार्ट्यांची प्रतीक्षा असलेले आणि राखीव खेळाडूंमध्ये असल्यामुळे ताजेतवाने असलेले खेळाडूही होतेच. सीनियर क्रिकेटपटूंना अशा पार्ट्यांचा उबग आला होता. त्यांनी जाहीरपणे त्याविरुद्ध आवाजही उठवला होता. परिणाम असा झाला की आवाज उठवणारे ते खेळाडू संघाच्या बाहेर गेले. पार्ट्या सुरूच राहिल्या. एका खेळाडूने तर त्या वेळी म्हटले होते, ही मालक मंडळी उद्या असेही तिकीट
काढतील ज्यावर म्हटलेले असेल की, खेळाडूंच्या मांडीवर बसून सामने पाहा. यातील अतिशयोक्तीचा भाग सोडला तरीही
मालक मंडळी कुठल्या थराला जाऊ शकतील याचे खेळाडूंनी केलेले ते निदान होते.
या पार्ट्यांना कोण कोण येतात?
‘आयपीएल’ चारच्या सुमारास कोची संघावरून झालेल्या वादानंतर रात्रीच्या या पार्ट्यांवर सरकारची अवकृपा झाली. फ्रँचायझींच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या पार्ट्या अधिकृतरीत्या थांबल्या. मात्र अजूनही अनधिकृतपणे त्या पार्ट्या सुरू आहेत. दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, मुंबई यांसारख्या शहरांमध्ये वेगळे स्वरूप घेऊन तो उद्योग राजरोसपणे सुरू आहे. खेळाडूंना सक्तीने या पार्ट्यांना आधी हजर राहायला लागायचे. काहींनी मालकांचा रोष नको म्हणून तोंड दाखवून हॉटेलमध्ये परतण्याची पळवाट त्या वेळी काढली होती. आता या पार्ट्यांना हजर राहणे खेळाडूंसाठी सक्तीचे नाही. मात्र आयपीएलमध्ये सहभागी झालेले काही भारतीय तसेच परदेशी खेळाडू आजही या पार्ट्यांना जाणे पसंत करत आहेत. त्यांना कोट्यवधी रुपयांचा वर्षाव झालेल्या नवोदित भारतीय खेळाडूंची आजही साथ लाभत आहे. राखीव खेळाडूंच्या पंक्तीत बसून 40-45 दिवसांसाठी जर कोट्यवधी रुपयांची कमाई होत असेल तर विकृत विचार खेळाडूंच्या मनात यायला वेळ लागत नाही.
याआधी पार्टीची तिकिटे फ्रँचायझी अधिकृतरीत्या विकत होत्या. आता पार्टीचे आयोजक पडद्याआड असतात. फ्रँचायझींना खेळाडूंसाठी पासेस, तिकिटे देण्यात येतात. अशा पार्ट्यांमध्ये रस असलेले खेळाडू ते पासेस/ तिकिटे व्यवस्थापकांकडून मागून घेतात. आजही पूर्वीचाच तमाशा सुरू आहे. मात्र फ्रँचायझींनी स्वत:चा चेहरा त्यापासून लपवलेला आहे.
या पार्ट्यांना येण्यात रस असलेले अनेक आहेत. गर्भश्रीमंतांना क्रिकेटपटूंना थेट भेटता येते. त्यांच्यासोबत ड्रिंक्स, भोजन घेता येते, जी गोष्ट एरव्ही सहजपणे शक्य झाली नसती. क्रिकेटपटूंभोवती गोंडा घोळणा-या काही युवतींनाही जवळीक साधण्याची ही संधी आहे असे वाटते. त्याच वेळी लांडग्यासारखी लाळ टपकत असलेले सट्टेबाज क्रिक्रेटपटूंभोवती आपले मायाजाल फेकण्याची ही अभूतपूर्व अशी संधी साधत असतात. काही क्रिकेटपटूंमधील ‘श्वापदे’ या पार्ट्यांमध्ये जागी होतात.
ब-याच वेळा स्वखुशीचा मामला असतो. कुणालाही खेद, खंत, वा लाज वाटत नाही. क्रिकेट आणि क्रिकेटपटू याच्याशी संबंध नसलेली दोन टोकेही या पार्ट्यात एकत्र येतात. या पार्ट्यांचा काही लोक ‘जॉइंट्स’सारखा उपयोग करून घेत असतात. रात्री 12 नंतर सुरू झालेला, संपूर्ण जग झोपले असतानाचा व्यवहार पहाटेपर्यंत चालतो. ब-याच जणांचे हेतू साध्य होतात. त्यामुळे या पार्ट्यांची तिकिटे किंवा प्रवेशमूल्य कितीही असले तरीही ते तेथे जाणा-या विशिष्ट वर्गाला अधिक वाटत नाही.
एका माजी कसोटीपटूने ‘आयपीएल’मधील सांगितलेला एक किस्सा बोलका आहे. सीमेलगत क्षेत्ररक्षण करणा-या एका खेळाडूला चिअर लीडरने आपल्या मधाळ बोलण्याने वश केले. तिने त्याला आपल्या हॉटेल रूमचा नंबर दिला. स्वारी बाजीरावाच्या थाटात तेथे गेली. रूममध्ये शिरल्यानंतर त्या चिअरलीडरने त्या खेळाडूच्या खिशात किती माया आहे याचा अंदाज घेतला. खिशातील सगळे पैसे काढ, नाहीतर तू अतिप्रसंग केला असे ओरडून सांगेन, अशी धमकी दिली. मिसरूड फुटलेला, जगाची फारशी कल्पना नसलेला हा नवोदित खेळाडू घाबरला. होते तेवढे पैसे देऊन त्याने स्वत:ची सुटका करून घेतली. घडलेला प्रसंग सांगण्याचीही त्याची हिंमत नव्हती. वाच्यता झाली तर बदनामीची भीती होती. आलेल्या अनुभवाच्या मोबदल्यात ती शिकवणीची फी होती असे मानून तो गप्प बसला!
vinayakdalvi41@gmail.com