आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधिनाट्य आणि भक्तिनाट्याचे चिंतनशील प्रयोगविज्ञान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोहाडा, गोंधळ, जागरण, भराड यांसारखी विधिनाट्ये आणि कीर्तन, भारुड, लळीत, दशावतार यांसारखी भक्तिनाट्ये यांच्यामागील प्रयोगविज्ञान उलगडून दाखवण्याचा प्रयत्न अद्याप झालेला नव्हता. लोककलेतील सर्व प्रयोगांमागे एक विशिष्ट प्रेरणा आणि ऊर्जा असते. या प्रेरणांचा आणि ऊर्जांचा नेमकेपणाने शोध ‘भंडार-बुका!’ या मैत्रेय प्रकाशनाच्या पुस्तकात डॉ. प्रकाश खांडगे यांनी घेतला आहे.

भंडार-बुका! म्हणजेच अनुक्रमे विधिनाट्य आणि भक्तिनाट्य. याविषयीचेच हे पुस्तक. महाराष्ट्रातील लोकदैवत संप्रदायातील विधिनाट्ये आणि भक्तिसंप्रदायातील भक्तिनाट्ये यांची विलक्षण ओढ डॉ. प्रकाश खांडगे यांना बालवयापासूनच होती. विठ्ठलाचा हरिजागर आणि खंडोबाचे जागरण यांचे श्रवण डॉ. प्रकाश खांडगे यांना हे पुस्तक लिहिण्यास उपयुक्त ठरले. संतांच्या अभंगांची पारायणे आणि तंताच्या म्हणजेच हाती तुणतुणे घेत ‘तृणतृण’ अशा आवाजात खंडोबाची गाणी गाणा वाघ्यांच्या पदांची मोहिनी त्यांच्यावर आहे. टाळ आणि घाटीच्या, पखवाज आणि दिमडीच्या, वीणा आणि तुणतुण्याच्या तालासुरांचे जणू संस्कारच बालवयात झाले, आणि पुढे कळत्या वयात कुतूहल, रंजन आणि श्रद्धेची जागा अभ्यासाने घेतली. गुरू दगडूबाबा साठी यांचे एक पद शंकरराव जाधव धामणीकर या वाघ्याकडून त्यांनी ऐकले, या पदात महाराष्ट्रातील लोकदैवत संप्रदाय आणि भक्तिसंप्रदाय यांचा कृष्णा, कोयना संगम घडलेला आहे.
या पुस्तकात जागरण , गोंधळ व भराड ही विधिनाट्ये; तर कीर्तन, भारुड, दशावतार, लळीत ही भक्तिनाट्ये म्हणून त्यांचा विचार केला आहे. बोहाड्याचे स्वरूप खरे तर दोन्हींच्या सीमेवरचे (आविष्कारदृष्ट्या) आहे. बोहाडा हा गावाचा विधीही आहे. गावदैवतासाठी केला जाणारा उत्सवही आहे. ‘बोहाडा’ शब्दाचा अर्थ वृष्टी-पाऊस. सांगलीजवळ अष्टा गावी असाच जोगव्यांचा उत्सव असतो. सांगलीत आजही आदिम भूतनृत्याशी नाते सांगणारी ‘तककडतय्’ श्रावणात पिसे (वेड) घेऊन धावताना दिसते. आदिमतेच्या खुणा असलेले, यात्वात्मक धारणा असलेले अनेक लहानमोठे आविष्कार, चालीरीती, रूढी, समजुती अजूनही भारतात सर्वत्र आढळतात. आदिम यात्वात्मक धारणा आदिपेशीसारख्या समूहाच्या मनात अबोधपणे वसत असतात आणि प्रसंगपरत्वे व्यक्तही होत असतात. त्यातील श्रद्धास्वरूपांच्या सीमारेषा ठरवणेही कित्येकदा कठीण होते.
विधिनाट्यांची उपास्य दैवते खंडोबा (जागरण), रेणुका व तुळजाभवानी (गोंधळ), भैरवनाथ (भराडी) ही मूलत: क्षेत्रपाळ दैवते आहेत. ती आदिम पंचमहाभूतकेंद्री ‘यातु’ श्रद्धेतून आलेली मूर्त दैवते आहेत. त्यांच्या उपासना, त्याविषयीच्या समूहमनातील श्रद्धा आणि त्यांच्या आचरणाची मूळ रूपे ही अधिक प्राचीन असण्याची शक्यता जास्त आहे. पैकी खंडोबा व भैरवनाथ ही शिव संप्रदायी पुरुष दैवते, तर रेणुका व तुळजाभवानी ही शक्तिसंप्रदायातील स्त्री-दैवते. महाराष्ट्राच्या दैवत मंडळात प्रामुख्याने तीन संप्रदायातील देवता (संख्येने कितीही असल्या तरी) आहेत, हे डॉ. रा. चिं. ढेरे यांचे ‘महाराष्ट्राचा देव्हारा’ या ग्रंथातील मूळ सूत्र आहे. शैव, वैष्णव आणि शाक्त (शक्तिदेवता/स्त्रीदेवता) या तीन संप्रदायांनी महाराष्ट्रातील जनमानसात देव्हारा गजबजलेला आहे.
खरे तर मुख्य संप्रदाय दोनच! शैव व शाक्त! वैष्णवांची विष्णू ही देवता शिवाचेच एक रूप (शिपिविष्ट विष्णू हा शिवच) आहे. आदिम भू-देवतांमधून सर्व स्त्रीदेवता वा मातृदेवता विस्तारत गेल्या आणि ‘द्यौ’ (आकाश), पर्यायाने सूर्य/पर्जन्य या निसर्गतत्त्वातून पुरुषदेवता-शैव व वैष्णव विस्तारित झाल्या आहेत. आदिम माणसाने प्रथम सर्व निसर्गतत्त्वातच एक सर्वश्रेष्ठ शक्ती अनुभवली. तिलाच यातु, असु, माया, जादू (मॅजिक), माना अशी विविध नावे मानववंशशास्त्रज्ञांनी दिली.
माणूसही प्रकृतीच (निसर्ग) आहे. त्यामुळे बाह्य निसर्गशक्तींना तो प्रयत्नाने, आवाहन करून स्वत:मध्ये सामावू शकतो, प्रतिकूल ते अनुकूल करवून घेतो, या मूळ धारणेतून माणसाने प्रथम यातुक्रिया वा यातुविधी निर्माण केले. ही यातुविषयक धारणा आणि संबंधित विधी हे देव संकल्पनेचे व धर्म संकल्पनेचे आदिरूप म्हणायला हरकत नाही.
आदी निसर्गतत्त्वांमध्ये जन्मत: निरालंब असलेल्या माणसाला रक्षक व पीडक अशा परस्परविरोधी अनुभवांना सामोरे जावे लागले. जेव्हा अन्य कोणत्याही भौतिक सुविधांचा विकास झाला नव्हता, तेव्हा त्यांची तीव्रता जाचक ठरत होती. पाऊस, ऊन, पिके, शिकार, जोडीदार (वंशसातत्यासाठी नर-नारी) यांच्या सहज उपलब्धतेत माणसाला सुख, अनुकूलता वाटते, तर त्यात येणा अडथळ्यांत दु:ख-प्रतिकूलता वाटते. अनुकूलतेच्या भावनेतून माणसाला स्थिरता येते. स्वत:चे एक सुरक्षित क्षेत्र मिळते. ते ज्या शक्तींमुळे मिळते त्या शक्ती नंतरच्या काळात क्षेत्रपाळ देवता म्हणून स्थिर होतात. मानवी जीवनात आदिम काळापासून निसर्गनिर्मित साहाय्यक, रक्षक तत्त्वे अनुभवता येतात, त्यांना आदराचे, श्रद्धेचे, देवत्वाचे स्थान मिळत जाते. पण तीच तत्त्वे प्रतिकूल, दु:खद ठरली, पीडक ठरली तेव्हा त्यांच्यापासून भय तर वाटलेच, पण एक दुराव्याची भावनाही आली. अशा अनुभवांतून असुर (दैत्य, दानव, राक्षस) कल्पना आली. अशा प्रकारे मानवी जीवनात सुर (देव) आणि असुर यांच्यातील संघर्ष सुरू झाला. तो अनादि अनंत आहे. देवतांच्या विकसन कल्पनेबरोबर देवसुर संघर्षाची रूपेही बदलत गेली. मुळात ‘देव’ हेही भयभावनेचेच अपत्य. प्रतिकूल शक्तीने अनुकूल व्हावे, आपली उग्रता, कोप सोडून प्रतिपालक व्हावे यासाठी आजपर्यंत सर्व विधिविधानांचा, उपासनांचा पसारा संस्कृतीच्या प्रवासात विस्तारला गेला आहे, असे विवेचन या पुस्तकाची तोंड भरून प्रशंसा करताना डॉ. तारा भवाळकर यांनी केले आहे.
समाजात प्रचलित असलेल्या या सर्व लोकश्रद्धा, लोकभावनांचा आविष्कार करणा विधा आहेत. लोकजीवनाच्या भौतिक बदलांबरोबर मूळ श्रद्धा, कथा व आविष्कारांवर आवरणे चढत गेली. परंतु मूळ आदिमता कोणत्या ना कोणत्या रूपात शिल्लक राहिलेली दिसते.
डॉ. खांडगे यांना या सर्वांचे भान आहे व त्यांनी त्या-त्या ठिकाणी त्यांची नोंदही केली आहे. ‘गोंधळाला आपण आदिलोकनाट्यही म्हणू शकतो’, या बदलत्या स्वरूपाचे भान असल्याने त्यांनी असे म्हटले आहे. त्यामुळे आविष्काराच्या दृष्टीने विधिनाट्य आणि भक्तिनाट्य यातील साम्यभेदही त्यांनी नोंदवले आहेत. विधिनाट्य कुळाचार म्हणून तर भक्तिनाट्य निर्भेळ भक्तिभावनेचा आविष्कार म्हणून होतात. आविष्कारदृष्ट्या अनेकदा इतका सारखेपणा दिसतो की दोन्हीतल्या भेदरेषा पुसट होतात. भक्तिनाट्याच्या आविष्कारातून यात्वात्मक भाव अस्पष्टपणे का होईना टिकून राहतो. धर्मनाट्य किंवा भक्तिनाट्यात पुराणकथांचा विस्तार वाढत जातो.
परंपराशील मराठी कलाविष्कारांचा शोध त्या दृष्टीने घेतला जाणे, सजगपणे घेतला जाणे आवश्यक आहे. कलाक्षेत्रात अशी खूप मोठी भूमी ‘नांगरल्याविणा’ नव्याची वाट पाहते आहे. त्यासाठी परंपरेतील अस्सल सामग्री साधनभूत व्हावी म्हणून डॉ. खांडगे यांच्या या पुस्तकाचा उपयोग निश्चितपणे होऊ शकेल. लोककलांच्या अभ्यासकांना, संस्कृतीच्या अभ्यासकांना आणि जिज्ञासू वाचकांना ‘भंडार-बुका’ आकर्षित करील, यात शंका नाही.
भंडार-बुका!
(विधिनाट्य-भक्तिनाट्य)
लेखक - डॉ. प्रकाश खांडगे
प्रकाशन - मैत्रेय प्रकाशन
पृष्ठे - 160, मूल्य - 175