आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्रोही साहित्य म्हणजे निव्वळ विरोधाला विरोध नव्हे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


धुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या प्रांगणात आणि क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी साहित्यनगरीत अकरावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन 13 व 14 डिसेंबर रोजी पार पडले. वादाची नांदी ठरलेल्या चिपळूणच्या साहित्य संमेलनाचे वादातच सूप वाजले. विद्रोही साहित्य संमेलनात मात्र याउलट चित्रं पाहायला मिळाले. व्यासपीठावरून विद्रोही साहित्यिकांची भाषणे आक्रमक झाली; पण त्यातून परिवर्तनाचाच विचार ध्वनित झाला. परंपरागत ब्राह्मणी, प्रस्थापितांच्या साहित्याशी विद्रोह करून अन्याय, अत्याचार, विषमता आणि शोषणाच्या वेदना जगापुढे मांडणारे साहित्य म्हणजे विद्रोही साहित्य होय.

विद्रोह म्हणजे समाजद्रोह नाही, याचीही स्पष्टता या संमेलनातून करण्यात आली. विद्रोही साहित्य हे प्रक्षुब्ध, आक्रमक आणि ज्वालामुखीचे रूप धारण करणारे, निव्वळ विरोधाला विरोध करणारे आहे, हा समज म्हणजे गैरसमजच आहे, हेही या संमेलनातून अधोरेखित झाले. दोन दिवस झालेल्या या संमेलनात चर्चासत्र, परिसंवाद, एकपात्री, नाटक, पथनाट्य यातून समता, बंधुत्व आणि सामाजिक न्यायाचीच अपेक्षाही व्यक्त झाली.

विद्रोही साहित्य म्हणजे काय?
विद्रोही साहित्य आणि विद्रोह म्हणजे आक्रोश, अकांडतांडव, शिवराळ भाषेचा सर्रास वापर, जुन्याच गोष्टींचा दाखला देत नव्या पिढीपुढेही तोच विचार मांडणे आणि व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणे म्हणजे विद्रोह, असाच अनेकांचा समज आहे; पण हा समज गैरसमज असून विद्रोह म्हणजे द्रोह नाही. द्रोह आणि विद्रोह यात फार मोठे अंतर आहे. द्रोहाच्या ठायी सूडाची भावना असते. विद्रोह परिवर्तनासाठी असतो. द्रोह विध्वंसक असतो. विद्रोह नवनिर्मिती करतो. द्रोह समाजाशी शत्रुत्व पत्करतो. विद्रोह समाजाचा मित्र असतो. विद्रोही कधी-कधी आक्रमक होतो; ती नैसर्गिक सहज प्रतिक्रिया असते. पण तात्कालिक असते. विद्रोहाचे अर्थ अनेक प्रकारे घेतले जातात, पण विद्रोही साहित्य म्हणजे काय? याचे विश्लेषण अकराव्या संमेलनातून स्पष्ट केले गेले.

परिवर्तनासाठी प्रबोधन व्हावे...
भारताला स्वातंत्र्य मिळाले; पण या देशातील भटक्या, विमुक्त समाजाला स्वातंत्र्य मिळाले नाही. आजही हे लोक एका गावात, एकाच ठिकाणी तीन दिवसांपेक्षा अधिक काळ राहत नाहीत. त्यामुळे त्यांच्या पिढ्यान्पिढ्या अशिक्षितच राहिल्या आहेत. त्यांच्या पूर्वजांनीही या गोष्टींसाठी संघर्ष करण्याचे कधी धाडस केले नाही. या उपेक्षित समाजाला जगण्याचा सन्मान मिळाला पाहिजे म्हणून सरकारशी संवाद झाला पाहिजे.

असा संवाद घडवून आणण्यासाठी नाटक हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. यातून समाजाचे प्रबोधन आणि सरकारचे धोरण बदलते, असा नवा विचार आणि समाजपरिवर्तनाचा नवा प्रवाह विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटक आणि अहमदाबादचे लोककलाकार दक्षिण बजरंगी यांनी याच संमेलनातून दिला. संमेलनाच्या अध्यक्षा ‘आयदानकार’ ऊर्मिला पवार यांनीही परिवर्तनाचा विचार मांडताना व्यवस्थेवर टीका केली.

दलित-बहुजन समाजाला रोजीरोटीमध्ये व्यवस्थेने अडकवून ठेवले आहे. त्यांच्या मुलांचं शिक्षणाकडेही फारसं लक्ष नसतं. याबाबत जागरूकता निर्माण होणं आवश्यक असल्याच्या विचारावरही जोर देण्यात आला. प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे, प्रा. रणजित परदेशी, संध्या नरे-पवार, सरोज कांबळे या मान्यवरांनीही वेगवेगळ्या परिसंवादांतून परिवर्तनाचा विचार दिला.