आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांज-सोबत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वृद्धत्वाच्या प्रवासातही प्रकृती स्वास्थ्यानुसार वेगवेगळे टप्पे येतात. त्यातून अनेक प्रकारच्या कौटुंबिक व सामाजिक गरजा निर्माण होतात. या प्रवासात आपली काळजी घेणारी व्यक्ती जवळ असणं, निदान हाकेच्या अंतरावर असणं, ही प्रत्येकाचीच मानसिक गरज असते. अशी सांज-सोबत करणारी व्यक्ती लग्नातली जोडीदार जशी असू शकते, तशीच मुलं-मुली, शेजारीपाजारी, जवळचा मित्र वा मैत्रीण वा विस्तारित कुटुंबातील सदस्य कोणीही असू शकते. विवाह मंडळ ते पाळणाघर अशी ज्येष्ठ नागरिकांच्या गरजांची ही व्याप्ती आहे...

पुण्यातील एका विवाह मंडळाचं कार्यालय. मंडळाच्या चालकांनी एक वेगळा उपक्रम सुरू केला होता - ‘ज्येष्ठ नागरिक लिव्ह-इन रिलेशन मंडळ’. माहिती वाचून तिशीतली एक सून आपल्या सत्तरीच्या सासऱ्यांसमवेत भेटायला आली होती. सासरे विधूर होते. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी जेव्हा त्यांच्या पत्नी गेल्या, तेव्हा मुलं वाढत्या वयातली होती, त्यामुळे त्यांनी मुलांवर सगळं लक्ष केंद्रित केलं. आता सगळ्यांची लग्न झाली. तेही निवृत्त झाले. त्यातच मुलगा-सून कामानिमित्त वेगळ्या शहरात आणि सासरे पुण्यातील घरात एकटे, अशी परिस्थिती तयार झाली. सूनबाईंनी पार्श्वभूमी सांगितल्यावर सासऱ्यांनी बोलायला सुरुवात केली. “मी आणि माझं कुटुंबं पॉझिटिव्ह विचारांचं आहे. बायको गेल्यापासून आजपर्यंत त्याच विचारानं आम्ही एकत्र राहिलो. पण आता या वयात आपल्याला विचारणारी, आपली अशी कोणीतरी जोडीदारीण असावी, असं खूप दिवसांपासून वाटतंय. मी मुलांनाही सांगितलं आणि त्यांचीही काही हरकत नाही. उलट त्यांनी मला सपोर्टच केला!” यानंतर पुढे या सासरेबुवांना हवी तशी जोडीदारीण मिळविण्यात मंडळाने मदत केली. त्यांच्या सारख्याच जवळपास पंचवीस जोडप्यांना मंडळाचे चालक माधव दामले यांनी गेल्या तीन वर्षांत एकत्र आणलंय...

माणसाला प्रत्येक वयात साथ-सोबतीची गरज असते, पण वाढत्या वयासोबत नातेसंबंधांची निवृत्ती ही एकप्रकारे लादलीच जाते. उतारवयातील मैत्री वा लग्न म्हटल्यावर तर लोकांच्या भुवया अधिकच उंचावतात. स्वत:च्या सासरेबुवांना घेऊन येणारी सून हे दृश्य तर विरळाच, कारण पहिला विरोध घरातूनच होतो, असा या मंडळाचा आणि यासारखे काम करणाऱ्या इतरही संस्थांचा अनुभव आहे. लोक काय म्हणतील, या सामाजिक भीतीपोटी किंवा कौटुंबिक मालमत्तेवरील ताबा जाईल, या व्यावहारिक भीतीपोटी आई वा वडिलांच्या वेगळ्या नात्यांकडे, आणि पर्यायाने त्यांच्या मानसिक-भावनिक गरजांकडे बघण्याची विचारांची मोकळीक त्यांची मुले-मुली दाखवतातच, असं नाही. पण अनेकांना अशा स्नेहपूर्ण नात्याची ऊब हवीशी वाटते. मंडळाचं सभासदत्व घ्यायला येणाऱ्यांची संख्या वाढतेय. त्यातील काही जणांना स्वत:पुरतं मैत्रीचं नातं हवंय. घरच्यांच्या वा समाजाच्या संभाव्य विरोधाची कल्पना असल्यानं आपलं मैत्रीचं नातं अापल्यापुरतंच असावं, ते उघड करू नये, अशा विचारानंही काही सदस्य आपले भावनिक आधार मिळवताहेत.

मंडळाच्या नावातील ‘लिव्ह इन रिलेशन’ हा जरा हटके भाग. कोणतंही नातं जुळवताना असलेली जोखीम या मोठ्या वयातील नात्यातही आहेच. त्यासाठीची खबरदारी म्हणूनही ‘लिव्ह इन’ची तजवीज. भेटा, बोला, सोबत वेळ घालवा, मन आणि विचार जुळताहेत का बघा आणि मग निर्णय घ्या, अशी मुभा देणारा हा पर्याय. स्वभाव, आवडी-निवडी, अपेक्षा यांचा सांधा जुळतोय की नाही, हे अोळख आणि जवळीक वाढण्यातूनच समजते. या खेरीज संभाव्य नात्यातून एकमेकांच्या काय अपेक्षा आहेत, याचे एक करारपत्रच करण्यावर मंडळाचा भर आहे. त्याचे तपशील वा प्राधान्यक्रमाचे मुद्दे बदलू शकतात. राहते घर वा मालमत्तेची मालकी, आर्थिक जबाबदाऱ्यांचे वाटप यापासून ते लैंगिक संबंध असणार की नाही, इथपर्यंत संबंधित व्यक्तींना जरुरीचे वाटणारे मुद्दे या करारपत्रात येऊ शकतात. आज तसेही ‘लिव्ह इन’ नात्याला कायद्याने ना नाही, पण कायदेशीर संरक्षणही नाही. म्हणूनच मंडळाने आपल्या अनुभवातून काही खबरदारीचे उपाय तयार केले आहेत.”

दामले यांच्या निरीक्षणातून ज्येष्ठांच्या नात्यातील सगळ्यांत महत्त्वाचा मुद्दा आहे, परस्परांकडून असलेल्या अपेक्षांचा. या नात्यात एकटेपणा दूर व्हावा, ही आस असते. मात्र पुरुषांना आपल्यावर सर्वस्वी अवलंबून असलेली बाई नको असते; तर बाईची केवळ सेवा वा देखभाल करायला किंवा करून घालायला म्हणून कुणाशी नाते जोडायची तयारी नसते. या खेरीज विविध कारणांमुळे नात्याला कायदेशीर लग्नाचे स्वरूप देण्याची दोघांचीही इच्छा नसते, त्यामुळे पूर्ण खबरदारी बाळगून उचललेले ‘लिव्ह-इन’चे पाऊल विचारांती मान्य होताना दिसते आहे.

आज कुटुंबसंस्थेच्या बदलत्या रूपांमुळे, वेगवेगळ्या जीवनशैलींमुळे कुटुंबांतर्गत बदल होताहेत किंवा पर्यायी कुटुंब सदृश व्यवस्था आकाराला येत आहेत. या नव्या व्यवस्थेत मायेचा, आपुलकीचा अोलावा शोधत नवे नातेसंबंध बनताहेत. डोंबिवलीच्या ज्योती पाटकरांचं ‘दिलासा’ केंद्र हे याच प्रकारचं एक प्रातिनिधिक उदाहरण. साठीपासून पंचाऐंशी वा त्याहूनही अधिक वयाच्या आजींची विसाव्याची वा वास्तव्याची जागा. “आमच्या केंद्रात काही जणी थोड्या दिवसांसाठी येतात, त्यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेले की, त्यांना राहता येते. काही जणी जास्त काळ राहतात. कुटुंबातल्या ज्येष्ठांनाही एकटेपणा वाटू लागतो. नेहमीच मुलांचा दोष असतो, असं नाही. त्यांनाही त्यांचे व्याप असतात. वृद्धांनी मैत्रीपूर्ण आणि आनंदी वातावरणात जगावं, हीच ‘दिलासा’ची धडपड आहे. अगदी किमान नियम सोडले, तर इथे सगळी मोकळीक आहे. सगळ्या खेळीमेळीने राहतात आणि एकमेकींची काळजीही घेतात...”

‘दिलासा’ची खरी सुरुवात डे-केअर सेंटर म्हणून झाली. म्हणजे, ज्येष्ठ नागरिकांचे पाळणाघर. “आमच्या डोंबिवली भागात अनेक वयस्कर मंडळी दिवसभर घराबाहेर, सार्वजनिक बागेत वेळ काढताना मी पाहिलं. दिवसा त्यांना घरात एकटं ठेवणं, कुटुंबीयांना असुरक्षित वाटतं. त्यांची देखभाल करायला कुणाला ठेवायचा खर्च त्यांना परवडत नाही. त्यामुळे खाणं-पिणं, बागेचा पास काढून देऊन त्यांची रवानगी घराबाहेर होत होती. घराबाहेर अवघडत दिवस घालवणाऱ्या या ज्येष्ठ नागरिकांसाठी मिड-डे-केअर सुरू केलं, जिथं त्यांना घरच्यासारखा आराम मिळाला. समवयस्कांसोबत चांगला वेळ घालवता येऊ लागला.” जागेअभावी हे डे-केअर बंद करावं लागलं. ‘दिलासा’ची आताची जागा शहराबाहेर आणि रोज जा-ये करणाऱ्यांसाठी गैरसोयीची आहे. तर मध्यवर्ती भागात भाडे जास्त. त्यामुळे महानगरपालिकेकडून एखादी जागा मिळाली, तर ज्येष्ठांचे ‘डे-केअर’ पुन्हा सुरू होऊ शकते, त्यांचाही तसा प्रयत्न चालू आहे.

vidyakulkarni.in@gmail.com