आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन जिवांचे मिलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील लेखांकात नायकाने नाियकेची निवड करताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात, यासंबंधी वात्स्यायनाने केलेले मार्गदर्शन आपण पाहिले. त्याचबरोबर संभोग करण्यास कोणती स्त्री अयोग्य आहे, हेदेखील जाणून घेतले. यानंतर कामसूत्रातील ‘सांप्रयोगिक’नावाच्या अधिकरणाला सुरुवात होते. त्यामधील ‘रतावस्थापण’ नावाच्या प्रकरणाची माहिती आपण घेणार आहोत.

या प्रकरणाच्या सुरुवातीला वात्स्यायनाने पुरुष आणि स्त्री या दोहोंच्या गुप्तांगांचे आणि त्यांच्या एकत्र येण्याचे वर्णन केले आहे. हे वर्णन करताना ‘कामसूत्र’काराने या गुप्तांगांच्या तीन प्रकारांचेही वर्णन केले आहे. पुरुषांचे गुप्तांग पुढीलप्रमाणे तीन प्रकारचे असते- १) शश (ससा),
२) वृष (बैल), ३) अश्व (घोडा). स्त्रीचे गुप्तांग पुढीलप्रमाणे तीन प्रकारचे असते- १) मृगी (हरिणी), २) बडवा (घोडी), ३) हस्तिनी (हत्तीनी) हे प्रकार गुप्तांगाच्या आकाराला अनुसरून वात्स्यायनाने सांगितलेले दिसतात. ते सांगताना विविध प्राण्यांची उपमा त्याने दिलेली दिसते. याचा अर्थ, वात्स्यायनाने त्या काळी मनुष्यप्राण्याप्रमाणेच पशु-पक्ष्यांच्याही शरीरशास्त्रांचा सखोल अभ्यास केलेला होता, असे लक्षात येते. हे प्रकार सांगितल्यानंतर वात्स्यायनाने ‘समरत’ हा एक संभोग प्रकार सांगितला आहे. याचा अर्थ, समान प्रकारच्या नायक-नाियकांनी एकत्र येणे, असा आहे. उदा. शश-मृगी, वृष-बडवा, अश्व-हस्तिनी. याचा अर्थ, सशाच्या गुप्तांगाप्रमाणे ज्या पुरुषाचे गुप्तांग आहे, त्याने मृगीच्या गुप्तांगाप्रमाणे जिचे गुप्तांग आहे अशा स्त्रीशी संभोग करावा. तसेच बैलाच्या गुप्तांगाप्रमाणे गुप्तांग असणाऱ्या पुरुषाने, बडवा या पशुप्रमाणे (घोडी) गुप्तांग असणाऱ्या स्त्रीशी संभोग करावा. तर अश्व म्हणजे घोड्याप्रमाणे गुप्तांग असणाऱ्या पुरुषाने हस्तिनी म्हणजे, हत्तीनीप्रमाणे गुप्तांग असणाऱ्या स्त्रीशी संभोग करावा.

यापुढे वात्स्यायनाने सहा प्रकारच्या विषमरतांचा उल्लेख केला आहे. उदा. शश-बडवा, शश-हस्तिनी, वृष-मृगी, वृष-हस्तिनी, अश्व-मृगी, अश्व-बडवा. वरील प्रकारच्या विषमरत संभोगांपेक्षा, समरत श्रेष्ठ असल्याचे वात्स्यायन सांगतो. यामध्ये श्रेष्ठ हा शब्द वात्स्यायनाने कामजीवनाच्या आनंदप्राप्तीच्या आणि एकत्र येणाऱ्या नायक-नायिका या दोन्ही घटकांना मिळणाऱ्या समाधानाच्या दृष्टीने वापरला असावा. एका अर्थाने, वैवाहिक जीवनाच्या यशाच्या दृष्टीने नायक-नायिकेची जोडी शारीरिक दृष्टीने योग्य कशी असावी, हे वात्स्यायनाला यामधून सांगायचे आहे. आजच्या काळात विवाह ठरवताना अनेक जण नायक-नायिकेची एकमेकांची पसंती, त्यांचे शिक्षण, घरदार, आर्थिक स्थिती या घटकांचा विचार करतात. तर काही जण नायक-नायिकेच्या जन्मकुंडलीतील गुणमिलनाचा विचार करतात. नायक-नायिकेच्या शरीराच्या दृष्टीने त्यांच्या गुप्तांगाच्या संदर्भात वात्स्यायनाने वर केलेले दिशादर्शन आजच्या व्यावहारिक जगात कितपत रूढ होऊ शकेल, याबद्दल शंका आहे. कारण, आजही विवाह ठरवण्यापूर्वी मुलगा-मुलगी या दोहोंची योग्य ती आरोग्य तपासणी केली पाहिजे, याची जाणीव अनेक पालकांमध्ये असली तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र अजूनही ही संकल्पना रूढ झालेली नाही.
प्राचीन भारतीय आयुर्वेदशास्त्राने सांगितलेला प्रकृती विचार आणि शरीरातील धातूंचा सारत्व विचार हादेखील या निमित्ताने लक्षात घेण्यासारखा आहे. विवाह करणाऱ्या जोडप्याचे प्रकृती परीक्षण आयुर्वेदानुसार केले तर त्यांचे एकूण वैवहिक जीवन सुखी होण्यास ते पूरक ठरू शकते. या प्रकृती परीक्षणातून त्या दोघांचे स्वभाव तसेच शरीराचा एकूण पिंड लक्षात येतो. शक्यतो हे दोघेही पित्त प्रकृतीचे नसावेत, कारण पित्तप्रकृतीच्या व्यक्तींमध्ये उष्णता जास्त असते आणि त्यांना रागही पटकन येतो. अशा दोन्ही पित्त प्रकृतीच्या व्यक्ती विवाहबद्ध झाल्यास त्यांचे जीवन सुखी होण्याची शक्यता कमी असते. त्याऐवजी जोडप्यापैकी एक जण कफप्रधान प्रकृतीचा असेल आणि जोडीदाराची प्रकृती पित्तप्रधान असेल, तर त्यांचे शरीर आणि मन एकत्र येण्यास फारशी समस्या येणार नाही. आयुर्वेदातील धातू सारत्वाची कल्पनादेखील या दोन जिवांच्या एकत्र येण्याच्या संदर्भात महत्त्वाची आहे. विवाह करणारा मुलगा आणि मुलगी हे दोघेही शुक्रसार असले, तर त्यांचे जीवन समृद्ध होण्यास फारशी अडचण येत नाही.

वात्स्यायनाच्या नायक-नायिकांच्या एकत्र येण्याच्या विवेचनाच्या निमित्ताने आयुर्वेदशास्त्राने सांगितलेला विचार आपण अत्यंत संक्षेपाने येथे पाहिला. विस्तारभयास्तव त्याचे सखोल वर्णन येथे टाळले आहे. वात्स्यायनाने कामसूत्रातील रतावस्थापन प्रकरणात समरताचे तीन प्रकार आणि विषमरताचे सहा प्रकार असे एकूण संभोगाचे नऊ प्रकार सांगितले आहे... यानंतर वात्स्यायनाने कामजन्य मानसिक आवेशानुसार स्त्री-पुरुष समागमाचे विविध भेद सांगितले आहेत. ज्या पुरुषाचे वीर्य अल्प असते, ज्याची रतीक्रीडेची भावना अल्प असते आणि जो स्त्रीचे नख, दात यांचा प्रतिकार करण्यास असमर्थ असतो, त्याला ‘मन्दवेग’ असे म्हणतात. या उलट मध्यम आणि तीव्र संभोग इच्छा असणाऱ्या पुरुषांना मध्यमवेग आणि चण्डवेग, असे म्हणतात. या प्रकारेच संभोगाच्या इच्छेनुसार स्त्रियाही मन्दवेग, मध्यमवेग आणि चण्डवेग अशा तीन प्रकारच्या असतात, असे वात्स्यायन सांगतो.
(ayurvijay23@rediffmail.com)
बातम्या आणखी आहेत...