आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक होता वात्स्यायन...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कामसूत्र हा शब्द उच्चारला की, वात्स्यायन हे नावही आपसूक आपल्या डोळ्यासमोर येते. मात्र, याबाबतचे सांगोपांग ज्ञान आपल्याला असतेच असे नाही. एरवी, मानवी जीवनाचे चार पुरुषार्थ सांगितले गेले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. या चारही पुरुषार्थांची प्राप्ती हे मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट मानले गेले आहे. काम हा या चार पुरुषार्थांपैकी तिसरा पुरुषार्थ. भारतीय समाजात एकीकडे या विषयाची जिज्ञासा आहे, तर दुसरीकडे याबाबतचे अज्ञान आणि गैरसमज मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळेच काम हा विषय केवळ स्त्री-पुरुष शारीरिक संबंधांपुरताच मर्यादित राहिला आहे. परिणामी, देशात युवावस्थेत पदार्पण करणार्‍यांना योग्य दिशेने लैंगिक शिक्षण मिळताना दिसत नाही. किंबहुना, समाजमनात या विषयाबद्दल काहीसे विकृत चित्र उभे राहिल्यामुळेच युवा पिढी काहीशी भरकटलेल्या आणि गोंधळलेल्या मन:स्थितीत आहे की काय, अशी शंका घेण्यास पुरेसा वाव आहे.

भारतीय संस्कृतीला प्राचीन परंपरा आहे. या संस्कृतीमध्ये समाज जीवनाच्या अनेकविध अंगांचा विचार केलेला आढळतो. या विविध अंगांचा विचार करून त्यासंदर्भातील अनेक ग्रंथांचीही रचना त्या त्या काळी केली गेली आहे. त्या ग्रंथांवर विविध विद्वानांनी संस्कार केले आहेत. सामान्यपणे हे सर्व ग्रंथ संस्कृत भाषेत रचले गेले आहेत. आरोग्यासंबंधी मार्गदर्शन करणारे जे भारतीय वैद्यकशास्त्र आहे, त्या आयुर्वेदावर चरकसंहिता, सुश्रुतसंहिता, अष्टांगहृदय, अष्टांगसंग्रह आदी वििवध ग्रंथांची रचना संस्कृत भाषेत करण्यात आली आहे. आरोग्याप्रमाणेच प्राचीन काळी कामशास्त्रावरही विविध ग्रंथांची रचना झाली आहे. काम या विषयाबद्दल सविस्तर आणि शास्त्रीय ज्ञान देणारे शास्त्र म्हणजे कामशास्त्र होय. काम ही एक नैसर्गिक भावना आहे, हे लक्षात घेऊन भारतीय तत्त्ववेत्त्यांनी त्यासंबंधीचे ज्ञान संस्कृत भाषेत थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

कामशास्त्र या शब्दाचा उच्चार केल्यावर वात्स्यायन हे नाव ओघानेच समोर येत असल्याचा उल्लेख लेखाच्या सुरुवातीलाच आपण पाहिला आहे. वात्स्यायन हा एक मोठा भारतीय तत्त्वज्ञ होऊन गेला. कामशास्त्रावर ‘कामसूत्रम्’ हा अतिशय सखोल ग्रंथ वात्स्यायनाच्या नावाने प्रसिद्ध आहे. खरे तर या ग्रंथाची रचना झाल्यावर अनेक विद्वानांनी त्याचे संपादन करून विविध संस्करणे रचली. खूप मोठ्या विस्तृत ग्रंथाचे संपादन वात्स्यायनाने अतिशय डोळसपणे केलेले दिसते. त्यामध्ये कामशास्त्रामधील फापटपसारा सोडून योग्य तेच विषयांश संपादित करून ग्रंथबद्ध करण्यात आले आहेत.

वात्स्यायनाच्या काळाबद्दल इतिहासकारांमध्ये मतांतरे आहेत. काही जणांच्या मते, वात्स्यायन हा इ. स. पूर्व पहिल्या शतकात होऊन गेला, तर काहींच्या मते, त्याचा काळ हा इसवी सनानंतरचे पहिले शतक आहे. अन्य काही इतिहासकार तिसरे किंवा चौथे शतक हा वात्स्यायनाचा काळ समजतात. अर्थात, ही मतमतांतरे लक्षात घेतली तरीदेखील ‘कामसूत्रम्’ या वात्स्यायन रचित ग्रंथाचे आणि त्यामधील विविध विषयांचे महत्त्व खचीतच कमी होत नाही.

सर्वप्रथम कामशास्त्रावर नंदीने एक हजार अध्यायांचा भला मोठा विस्तृत ग्रंथ लिहिला. त्याचे ५०० अध्यायांमध्ये संपादन करून श्वेतकेतूने त्याची रचना केली. पुढे पांचाल देशाच्या ब्राभव्य या ग्रंथकर्त्याने हा ग्रंथ १५० अध्यायांचा केला. त्यापुढे आचार्य दत्तक आणि त्यापुढील विद्वानांनी या शास्त्राबद्दल संपादित विवेचन केले. याच मालिकेतील वात्स्यायन हा एक ग्रंथकार आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे, त्याने ‘कामसूत्रम्’ या ग्रंथाची रचना अतिशय मुद्देसूदपणे केलेली आहे. त्या काळच्या समाजजीवनाला अनुसरून संस्कृत भाषेमध्ये उपलब्ध असलेली ही ग्रंथरचना आजच्या काळातही म्हणजे सुमारे १५०० ते १७०० वर्षांनंतरही मार्गदर्शक ठरावी अशी आहे.

कामभावना ही मानवी शरीर आणि मन यांच्यातील एक नैसर्गिक भावना असली, तरीही आजच्या काळात तिचे विकृत चित्रण होताना दिसते आहे. अशा वेळी, कामशास्त्राबद्दल योग्य दिशेने ज्ञान देणारा ‘कामसूत्रम्’ हा वात्स्यायन मुनींचा याच मालिकेतील एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. पूर्वचार्यांनी कामशास्त्रावर रचलेल्या ग्रंथांचे सुयोग्य संपादन करून वात्स्यायनाने कामसूत्रम्ची रचना केलेली आहे.

कामभावना शांत करण्यासाठी आवश्यक असलेल्या स्त्री आणि पुरुष या भिन्नलिंगी मानवी शरीराचे संबंध योग्य चौकटीत गुंफणारा विवाह हा एक मानवी जीवनातील संस्कार आहे. वात्स्यायनाने या संस्काराचे आणि त्याबद्दलच्या अनेक विषयांचे सांगोपांग वर्णन केले आहे. तसे पाहता संस्कृतमधील एका सूत्रामध्ये बराच मोठा आशय सामावलेला असतो. प्रयत्नपूर्वक शिकली तर अत्यंत सोपी अशी ही देववाणी आहे. त्या अर्थाने कामसूत्रम् हा संस्कृत ग्रंथ कमी शब्दांमध्ये खूप मोठा आशय सांगणारा आहे. आजच्या युवा पिढीला तसेच सर्वच जिज्ञासूंना तो मार्गदर्शक आणि या विषयाचे सखोल ज्ञान देणारा असा आहे. या ग्रंथाबद्दल आणि ग्रंथकर्त्याबद्दल अधिक विस्ताराने पुढील लेखात वाचूया...
ayurvijay23@rediffmail.com