आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्जनात कामशास्त्र महत्त्वाचे !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वात्स्यायनाच्या कामसूत्रातील पहिल्या अधिकरणाच्या दुसर्‍या अध्यायात धर्म, अर्थ आणि काम या तीन घटकांची व्याख्या तसेच त्यांच्या परस्पर समन्वयाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. त्यानंतर विद्या समुपदेशन नावाच्या तिसर्‍या अध्यायात वात्स्यायनाने धर्मशास्त्र, अर्थशास्त्र आणि कामशास्त्र या तीन शास्त्रांच्या अध्ययनाबाबत विस्ताराने वर्णन केले.

मनुष्यप्राण्याने विद्यार्जन करताना अनेक शास्त्रांचा अभ्यास केला पाहिजे, हे त्यामागचे सूत्र आहे. आजच्या काळातही एखाद्याला नोकरी करायची असेल, तर आवश्यक तेवढे शिक्षण घ्यावे लागते. व्यवसाय करायचा असेल तरीही, त्यासाठी आवश्यक असे शिक्षण घेणे क्रमप्राप्त असते. पण याचबरोबर जीवन सुखकर होण्यासाठी काही गोष्टींचे ज्ञान करून घेणे आवश्यक असते. त्या गोष्टीमधील धर्म, अर्थ आणि काम या तीन बाबी प्राधान्याच्या आहेत, असे वात्स्यायनाचे सांगणे आहे.

कोणतेही शास्त्र म्हटले तरी, ते समजून घेण्याची एक विशिष्ट पद्धत असते. काही वेळा प्रत्यक्ष गुरूकडून शास्त्रज्ञान करून घ्यावे लागते, हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्याबरोबरच वाचन, श्रवण करण्यानेही शास्त्रज्ञान होते. मानवी जीवनात प्रत्यक्ष व्यवहारासाठी विविध शास्त्रांची रचना आणि निर्मिती झालेली आहे. उदा. आयुर्वेद हे आयुष्याचे ज्ञान देणारे शास्त्र आहे. त्यामध्ये निरोगी व्यक्ती निरोगीच राहावी, म्हणून दिनचर्या, ऋतुचर्या, आहारविहाराचे नियम यांचे सविस्तर मार्गदर्शन मिळते. तसेच मानवाला होणार्‍या विविध विकारांवर कशा प्रकारे औषधी योजना करावी, याचेही सविस्तर वर्णन आयुर्वेदात आले आहे. प्राचीन भारतीय विद्वानांनी अशा विविध शास्त्रांची रचना केली आहे. आजही ही शास्त्रे अत्यंत मार्गदर्शक अशी ठरत आहेत. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र आणि कामशास्त्र या शास्त्रांचे अध्ययन कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करू इच्छिणार्‍या व्यक्तींसाठी पूरक ज्ञान म्हणून आवश्यक आहे. यासाठी धर्मशास्त्रकार मनु, अर्थशास्त्रकार कौटिल्य आणि कामशास्त्रकार वात्स्यायन या तिन्ही विद्वानांच्या साहित्याचा आजच्या पिढीने अभ्यास करणे गरजेचे आहे.

वात्स्यायनाने विद्यार्जन करते वेळी कामशास्त्राचेही अध्ययन करावे, असे सांगतानाच त्याबरोबर संगीतशास्त्राचाही आवर्जून उल्लेख केला आहे, हे या ठिकाणी नमूद केले पाहिजे. याचा अर्थ, संगीतशास्त्राचा उपयोग कामशास्त्राला पूरक असा होत असावा. याच अध्यायात वात्स्यायनाने कामशास्त्राचे शिक्षण स्त्री आणि पुरुष या दोन्ही घटकांनी घ्यावे, असेही म्हटले आहे. येथे स्त्री शिक्षणाचा आग्रह वात्स्यायनाने त्या काळीही धरलेला होता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. विवाहापूर्वी स्त्री पित्याच्या घरी असताना, अशा शिक्षणाची व्यवस्था तिच्या पित्याने करावी आणि कामशास्त्राचे हे शिक्षण त्या स्त्रीला दुसर्‍या एका अनुभवी आणि विश्वासू अशा स्त्री शिक्षिकेकडून द्यावे, असे त्याने सूचकपणे म्हटले आहे. विवाहापूर्वी पित्याकडून अशी व्यवस्था न झाल्यास विवाहानंतर त्या स्त्रीच्या पतीने कामशास्त्राच्या शिक्षणाची व्यवस्था करावी, असा सल्लाही वात्स्यायनाने दिला आहे. कामशास्त्राचे शिक्षण देण्यासाठी स्त्री शिक्षिका कशी असावी, याचेही वर्णन वात्स्यायनाने केले आहे.

आजच्या पार्श्वभूमीवर वात्स्यायनाचे वरील मार्गदर्शन महत्त्वाचे आहे, असे लक्षात येईल. आज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर लैंगिक शिक्षण देण्यासंबंधित बरेच उलटसुलट मतप्रवाह आहेत. वात्स्यायनाचे मत विचारात घेतले, तर कामशास्त्राचे शिक्षण विशिष्ट गुरूकडून प्रत्येकाला मिळणे अपेक्षित धरले आहे. तेव्हा आजच्या सामाजिक परिस्थितीत ‘कामसूत्र’काराच्या मताला शिक्षणाचे धोरण ठरवणार्‍या धुरीणांनी किंमत दिली, तर लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे आजच्या पिढीचा होणारा वैचारिक गोधळ टाळता येऊ शकेल.

दुसरी एक महत्त्वाची गोष्ट यानिमित्ताने लक्षात येते ती म्हणजे, एकूणच स्त्री शिक्षणाबद्दल वात्स्यायन आग्रही दिसतो. इ. स. तिसर्‍या-चौथ्या शतकातही स्त्री शिक्षणाचा वात्स्यायनाने धरलेला आग्रह विशेष उल्लेखनीय आहे. या ठिकाणी वात्स्यायनाने स्त्रियांनी कामशास्त्र अभ्यासावे, असे म्हटले आहेच. पण या अध्यायातील एकूण वर्णन पाहता धर्मशास्त्र आणि अर्थशास्त्र या अन्य दोन्ही शास्त्रांचा अभ्यास करणे, हे त्याने स्त्रीकडूनही अपेक्षित धरल्याचे स्पष्ट होत आहे. जसे स्त्रियांनी शिक्षण घेण्याचा आग्रह वात्स्यायन धरतो, तसेच कामशास्त्राचे शिक्षण स्त्र आचार्यांकडून घ्यावे, असे सांगतो. याचा अर्थ, एकूण शिक्षणक्षेत्रातही त्या काळी स्त्रियांची भूमिका महत्त्वाची होती, असे म्हणता येईल. याच अध्यायात स्त्रीने चौसष्ट कलांचा अभ्यास कामशास्त्राच्या अध्ययनाच्या वेळी करावा, असाही उल्लेख आला आहे. याबद्दल पुढील लेखात विस्ताराने आढावा घेऊ या.
ayurvijay23@rediffmail.com