आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vijay Kulkarni Article 'Dantaksat' In Vatsyayanache Jag

दंतक्षत!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील लेखांकात कामसूत्रातील नखाने ओरबाडण्याच्या विधीबद्दल आपण विस्ताराने माहिती घेतली. या नखछेद प्रकरणानंतर ‘कामसूत्र’काराने दशनछेद्यविधी नावाच्या प्रकरणाची मांडणी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने स्त्री आणि पुरुष यांच्या एकत्र येण्यातील दातांनी चावा घेण्याच्या क्रियेचे वर्णन आढळते. यामध्ये सुरुवातीला दाताने चावा घेण्यायोग्य शरीरावरील स्थाने, तसेच दाताने चावा घेण्याचे प्रकार सांगितलेले आहेत. दाताने चावण्याच्या क्रियेला वात्स्यायनाने संस्कृतमध्ये ‘दंतक्षत’ असे म्हटले आहे. या दंतक्षताची स्थाने सांगताना कामसूत्रात पूर्वी सांगितलेल्या चुंबन क्रियेच्या स्थानाशी त्याची तुलना करण्यात आली आहे. वरील ओठ, जीभ आणि डोळे ही स्थाने सोडून चुंबनाची आधी सांगितलेली सर्व स्थाने, दाताने चावा घेण्याची आहेत.

यापुढे वात्स्यायनाने दातांच्या गुणांचे वर्णन केले आहे. दात सरळ एका रांगेत असणे, ते स्निग्ध आणि चमकदार असणे, पान वगैरे खाल्ल्यावर दात लाल होणे, ते खूप मोठे किंवा खूप लहान नसणे, दातांमध्ये फटी नसणे, तसेच दातांमध्ये चिरा नसणे, हे दातांचे गुण आहेत. यापुढे दातांचे दोषही कामसूत्रकार सांगतो. दात खडबडीत असणे, खूप लहान किंवा खूप मोठे असणे, दातांमध्ये फटी असणे हे दातांचे दोष आहेत. या ठिकाणी दंतक्षत प्रकरणात दाताचे गुण आणि दोष सांगण्याचे प्रयोजन काय? असा प्रश्न जिज्ञासू वाचकांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक समजले आहे. परंतु त्याचे उत्तर अगदी सोपे आहे. दात हे आपल्या शारीरिक सौंदर्याचे प्रतीक आहे. दात निरोगी आणि निर्दोष असण्याने आपले सौंदर्य खुलते. कामजीवनात सौंदर्याला असलेले महत्त्व आणि दातांचे सौंदर्याशी असलेले नाते बघितले, तर वात्स्यायनाने कामसूत्रात दातांचे गुण का वर्णन केले असावे, याचे उत्तर आपल्याला मिळते.

वात्स्यायनाने दंतक्षताचे आठ भेद या कामसूत्रात वर्णन केलेले आहेत. ते भेद पुढीलप्रमाणे... गूढक, उच्चुनक, विन्दूमाला, प्रवाळमणी, मणिमाला, खंडाभ्रक आणि वराहचर्वित. गूढक या प्रकारात खालच्या ओठांना अत्यंत हळूवारपणे दातांनी चावा घेतला जातो. परंतु, त्याच ठिकाणी जोराने चावा घेतल्यास त्यास ‘उच्चुनक’ असे म्हणतात. दातांनी, ओठांनी व वारंवार एकाच ठिकाणी चावा घेणे, या प्रकाराला प्रवाळमणी असे म्हटले आहे. तर अनेक स्थानांवर शरीरावर दाताने चावा घेण्याच्या प्रकाराला ‘मणिमाला’ असे म्हटले आहे.

यापुढे वात्स्यायनाने प्रेमीयुवक कशाप्रकारे प्रेम प्रगट करतो, याचे अतिशय सुंदर उदाहरण याच अध्यायात दिले आहे. येथे दात आणि नखे यांचा वापर वनस्पतीच्या पानांवर करण्याबद्दल वात्स्यायन सांगतो. मस्तकावरील भोजपत्र, कानातील नीलकमल आणि पानाचा विडा किंवा तमालपत्र, नख आणि दात यांच्यावर प्रेमी युवक आपल्या प्रेमभावना प्रकट करतो. यानंतर वात्स्यायनाने विविध प्रदेशातील रीतीरिवाजांचेही वर्णन केले आहे. विंध्य आणि हिमालयाच्या मध्ये मध्य देश यातील स्त्रिया आर्य जातीच्या असतात. त्या चुंबन, नखक्षत पसंत करीत नाहीत. बाहिक आणि अवंती यातील स्त्रियांची तीच परिस्थिती असते. मात्र मालवा आणि अभीर देशातील स्त्रिया मात्र आलिंगन, चुंबन, नखक्षत आणि दंतक्षत या क्रिया पसंत करतात. त्यांच्या नखांमुळे किंवा दातांच्या चाव्यामुळे कोणतीही इजा किंवा पीडा होत नाही. सिंधू आणि सतलज या नद्यांच्या अंतरामध्ये राहणाऱ्या स्त्रिया औपरीष्टक विधी (मुखाने संभोग) पसंत करतात. अपरांतक म्हणजे सह्याद्रीच्या आसपास राहणाऱ्या तसेच लाट देशातील (सुरत, भरूच) स्त्रिया कामातुर असतात. कोमल देशातील स्त्रियांना भोगेच्छा शांत करण्यासाठी प्रचंड वेगाची आवश्यकता असते.

अशा प्रकारे वात्स्यायनाने विविध प्रदेशातील स्त्रियांच्या कामजीवनाबद्दल अतिशय स्पष्ट वर्णन केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील स्त्रियांचेही त्याने वर्णन केले आहे. या सर्व वर्णनावरून कामसूत्रकाराने यासंबंधी किती सखोल निरीक्षण केले असावे, याची कल्पना आपल्याला येऊ शकेल. आजच्या काळातही एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल निरीक्षण मांडण्यासाठी संशोधक मोठ्या प्रमाणावर शास्त्रीय पद्धतीने सर्वेक्षण करतात. वात्स्यायन हा त्या काळचा कामशास्त्रज्ञ होता, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. काही अन्य विद्वानांच्या मते, या प्रत्येक प्रदेशातील कामजीवनाच्या चालीरीती वात्स्यायनाच्या काळाप्रमाणेच आजही तशाच असतील, असे नाही. कारण एक तर लोक विविध प्रदेशात काही कारणाने आपला प्रदेश सोडून स्थलांतरही करताना दिसतात. त्यामुळे एका विशिष्ट प्रदेशात आजच्या काळात कामजीवनाच्या मिश्र चालीरीती दिसून येऊ शकतील.

वात्स्यायनाच्या मते, आलिंगन, चुंबन, नखक्षत, दंतक्षत, प्रहणन आणि शित्कार या विधींमध्ये एकानंतर दुसरा विधी अधिक कामोत्तेजक आणि रागवर्धक असा असतो. आणि आधीपेक्षा पुढचा विधी हा विचित्र असतो. स्त्रीने प्रतिबंध करूनही पुरुषाने नखक्षत आणि दंतक्षत यांचा प्रयोग तिच्यावर केल्यास, तिने दुप्पट वेगाने त्या पुरुषावर या क्रियांचा प्रयोग करावा, असे ‘कामसूत्र’कार या प्रकरणात पुढे सांगतो.
ayurvijay23@rediffmail.com