आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विपरित रतींची परंपरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही लेखांमध्ये वात्स्यायनाने सांगितलेल्या आलिंगन, चुंबन, दंतक्षत, नखक्षत, प्रहार इत्यादी क्रियांबद्दलचे वर्णन आपण क्रमाक्रमाने पाहिले आहे. प्रहसन आणि सित्कृत या अनुक्रमे पुरुष आणि स्त्रीने संभोगसमयी करावयाच्या क्रियांनंतर वात्स्यायनाने ‘पुरुषायित’ या प्रकरणाचे विवेचन आपल्या कामसूत्रात केलेले आहेत. पुरुषायित याचा अर्थ स्त्रीने पुरुषाप्रमाणे आचरण करणे, असा होतो. यालाच वात्स्यायनाने विपरित-रती असे म्हटले आहे. या प्रकरणात या विपरित रती क्रियेप्रमाणे नवविवाहितांना मार्गदर्शक अशीही काही सूत्रे कामसूत्रकार सांगतो.
सामान्यतः संभोग प्रक्रियेमध्ये संभोगसमयी पुरुष हा स्त्रीवर आरूढ झालेला असतो. परंतु विपरित रतीमध्ये मात्र स्त्रीने पुरुषावर आरूढ होणे अपेक्षित मानले आहे. स्त्री पुरुषावर आरूढ होण्याचे कारण म्हणजे पुरुष संभोग करून शिथिल झालेला असणे, आणि स्त्रीची कामेच्छा मात्र पूर्ण झालेली नसणे, असे ‘कामसूत्र’कार सांगतो. त्याचप्रमाणे स्त्री-पुरुषांमधील कुतूहल आणि मनोरंजनाचा एक भाग म्हणूनही असे घडते, असेही ‘कामसूत्र’कार पुढे सांगतो.
विपरित रतीमध्ये स्त्री आपल्या स्तनांनी पुरुषाची छाती दाबते आणि तिची कामेच्छा पूर्ण झाल्यावर पुरुषाच्या अंगावर पडून राहते. यानंतर वात्स्यायनाने नवविवाहितांसाठी मार्गदर्शक ठरावे, असे विवाहानंतरच्या पहिल्या रात्रीचे वर्णन केले आहे. त्यानुसार नववधू पहिल्या रात्री तिच्या गुप्तेंद्रियाला स्पर्श करू देत नाही, तिच्या दोन्ही जांघा जोडून घेते. अशा वेळी पुरुषाने त्या दोन्ही जांघा आपल्या हातांनी बाजूला कराव्या. त्यानंतर आचार्य सुवर्ण नाभांनी स्त्रीला कामोत्तेजक करण्यासाठी उपाय सांगितला आहे. त्यानुसार स्त्रीचे जे अंग दाबल्यावर ती इकडे तिकडे डोळे फिरवते, तेच अंग पुरुषाने पुन्हा पुन्हा दाबावे. यानंतर संभोगकाळी स्त्रियांमध्ये दिसून येणाऱ्या भाव-भावनांचे वात्स्यायन वर्णन करतो. अंग शिथिल करणे, डोळे बंद करणे, लज्जेचा नाश होणे, पुरुषाचे गुप्तेंद्रिय स्त्रीच्या गुप्तेंद्रियाबरोबर संपर्कात ठेवणे आदी. यानंतर संभोगाचे अखेरीस स्त्री हातपाय झटकते, तिला खूप घाम फुटतो. ती पुरुषाला दाताने चावते, नखाने ओरबाडते, पाय आपटते. याच वेळी कदाचित पुरुष स्खलित होतो, असेही ‘कामसूत्र’कार सांगतो.
स्त्रीची तृप्ती न झाल्यास ती पुरुषाला दाबण्याचा प्रयत्न करते. लाज सोडून पूर्ण वेगाने त्याला धक्के देते. अशा वेळी संभोगापूर्वी पुरुषाने स्त्रीच्या गुप्तेंद्रियात हळुवारपणे बोट फिरवावे आणि ती स्खलित झाल्यावर नंतर संभोग करावा, असे पुढे ‘कामसूत्र’काराने सांगितलेले आहे.
यानंतर वात्स्यायनाने संभोग समयीच्या दहा प्रकारच्या धक्क्यांचे वर्णन केले आहे. उपसुप्त, उपसृप्तक, मन्थन, हूल, अवमर्दन, निघार्त, वराहघात, वृषाघात, चटकविलसित आणि संपुट हे पुरुषोपसुप्त पिडितक आहे. या धक्क्यांमधील उपसुपत्क या प्रकाराला वात्स्यायन न्याययुक्त मानतो. कारण त्यामध्ये कोमलता आहे, वैज्ञानिकता आहे. यामध्ये सामान्य पद्धतीने इंद्रियाचे मिलन होते. या ठिकाणी नवविवाहितांना मार्गदर्शन करणारे वरील सूत्र वात्स्यायनाने सांगितले, ते त्याच्या ज्ञानवर्धनासाठी आणि प्रबोधनासाठी. हे ज्ञानवर्धन आणि प्रबोधन जसे आजच्या काळात आवश्यक आणि उपयुक्त आहे, तसेच ते वात्स्यायनाच्या काळातही नवविवाहितांसाठी आवश्यक आणि उपयुक्त होते, असे यावरून आपल्याला म्हणता येते.
आज नवविवाहितांसाठी अशा प्रकारच्या योग्य मार्गदर्शनाची व्यवस्था सर्व स्तरांवर निर्माण करणे, ही काळाची गरज वाटते. यानंतर पुढे वात्स्यायनाने असे म्हटले आहे की, स्त्रीची कोमलता आणि अनुकुलता बघून मगच या धक्क्यांचा प्रयोग करावा. यानंतर वात्स्यायनाने विपरित रतींचे तीन प्रकार वर्णन केले आहेत. १. संदंश २. भ्रमरक ३. प्रेडखोलित इत्यादी. संदंश म्हणजे, स्त्रीने पुरुषाचे लिंग आपल्या योनीमध्ये दाबून ठेवणे, तर भ्रमरक म्हणजे भ्रमरासारखे फिरणे आणि विपरित रतीच्या तिसऱ्या प्रकारात झोक्यासारखे फिरणे, असे वात्स्यायनाला अभिप्रेत आहे. विपरित रती झाल्यानंतर थकल्यावर स्त्रीने आपले डोके हलकेच पुरुषाच्या डोक्यावर ठेवण्यास ‘कामसूत्र’कार पुढे सांगतो. विपरित रती झाल्यावरही स्त्रीची कामतृप्ती झाली नाही, तर पुन्हा स्त्रीने खाली आणि पुरुषाने तिच्यावर आरूढ होऊन संभोगरत व्हावे, असे या प्रकरणाच्या शेवटी वात्स्यायनाने सांगितले आहे.
या प्रकरणाच्या समाप्तीला वात्स्यायनाने विपरित रती खालील स्त्रियांनी करू नये, असे स्पष्टपणे सांगितलेले आहेत. १. रज:स्वला स्त्री. २. बाळंतीण ३. गर्भवती ४. मृगी ५. स्थूल इ. विपरित रतीची परंपरा प्राचीन काळीदेखील अस्तित्वात होती, हे वात्स्यायनाच्या ‘कामसूत्र’मधील या प्रकरणावरून दिसते. अर्थात, विपरित रती योग्य किवा अयोग्य, याबद्दलचे भाष्य मात्र वात्स्यायनाने ‘कामसूत्र’मध्ये केल्याचे मला तरी अद्याप आढळलेले नाही.
ayurvijay23@rediffmail.com