आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वात्स्यायनाचे जग: विवाहानंतरचे वर्तन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्त्रिया फुलाप्रमाणे कोमल असतात. त्यामुळे त्यांच्याशी पतीने सुकुमारतेने म्हणजेच हळुवारपणे व्यवहार केला पाहिजे. पतीबद्दल पत्नीच्या मनात प्रथम पूर्ण विश्वास निर्माण होणे कामसूत्रकाराला आवश्यक वाटते. तो विश्वास संपादन होईपर्यंत पतीने कोणतीही क्रिया घाईगर्दीनेे करू नये. त्यासाठीच विवाहानंतर पहिले तीन दिवस ब्रह्मचर्य पालनाचा सल्ला वात्स्यायनाने दिला असावा.
देशाचाराला आणि कुलाचाराला अनुसरून ब्राम्ह्य, प्राजापत्य, आर्य आणि दैव असे विवाहाचे चार प्रकार कामसूत्रकाराने वर्णन केले आहेत. परंतु, त्याचे स्पष्टीकरण मात्र या ठिकाणी आपल्याला मिळत नाही. विवाहाच्या प्रकारानंतर कामसूत्रकार असे सांगतो की, एकमेकांशी खेळणे, विवाह करणे आणि मैत्री करणे या तीन क्रिया करताना आपल्याशी समान स्थिती आणि समान शील असणाऱ्या पुरुषाची निवड स्त्रीने करावी. आपल्यापेक्षा उच्च किवा नीच पुरुषाची निवड करू नये. यापुढे जे करू नये किवा त्याज्य आहेत, अशा उच्च आणि नीच अशा दोन प्रकारच्या विवाहसंबंधांचे वर्णन वात्स्यायनाने या ठिकाणी केले आहे. एखाद्या पुरुषाने आपल्यापेक्षा धनवान असणाऱ्या कन्येशी विवाह केल्यास त्याला उच्च संबंध असे म्हणतात. बुद्धिमान पुरुष अशा प्रकारचा विवाह करीत नाहीत, अशीही पुस्ती कामसूत्रकार पुढे जोडतो. अशा प्रकारच्या विवाहानंतर त्या पुरुषाला कदाचित सेवकाप्रमाणे वागावे लागेल, असा धोका वात्स्यायनाने येथे दाखवला आहे. अशाच प्रकारे आपल्यापेक्षा अत्यंत गरीब स्त्रीशी विवाह करणे, हा नीच विवाह संबंध म्हणून वर्णन कामसूत्रात केलेले दिसते. आजच्या बदललेल्या सामाजिक परिस्थितीत एखाद्या पुरुषाने आपल्यापेक्षा गरीब स्त्रीशी विवाह करून सुखी संसार केल्याची अनेक उदाहरणेही आपल्याला आढळतील, त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या योग्य तो विचार करून प्राप्त परिस्थितीत विवाहासंबंधी निर्णय घेणे, हे केव्हाही चांगले. वात्स्यायनाने कदाचित त्या काळच्या सामाजिक स्थितीचे निरीक्षण, परीक्षण आणि सर्वेक्षण करून आपले मत यासंबंधी मांडले असावे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ज्या विवाहामुळे पती आणि पत्नी या दोन्ही घटकांना समान आनंद मिळतो आणि ते एकमेकांना पूरक आणि शोभावर्धक ठरतात, असा विवाह योग्य विवाह म्हणून कामसूत्रकाराचे वर्णन आहे. यावरून योग्य विवाहाची त्याने केलेली व्याख्या ही अत्यंत व्यावहारिक मानली पाहिजे. सदर प्रकरणात पत्नी निवडताना ती समान वर्णाची असावी, आपल्यापेक्षा अधिक श्रीमंत किंवा अधिक गरीब नसावी, हे सामान्य सूत्र सांगितल्यावरही वात्स्यायनाने प्रकरणाचा शेवट मात्र त्या काळच्या आणि आजच्याही एकूणच विवाहांसंबंधीच्या व्यवहाराला साजेसा असा केलेला दिसतो. यानंतर कामसूत्रकाराने कन्या सम्प्रयुक्त्क अधिकरणातील दुसऱ्या प्रकरणाला प्रारंभ केला आहे. या प्रकरणाचे नाव कन्या विश्रभ्मन असे आहे. या प्रकरणाच्या सुरुवातीलाच विवाहानंतर पती आणि पत्नी या दोघांनी पाळावयाचे काही नियम कामसूत्रकार सांगतो. विवाहानंतर पहिल्या तीन रात्री पती आणि पत्नी यांनी जमिनीवर निजावे आणि ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे. आपल्या भोजनात खूप मीठ असलेले आणि क्षारयुक्त पदार्थ असू नयेत. एक आठवड्यापर्यंत त्यांनी साग्रसंगीत असे मंगलस्नान करावे. पती-पत्नी या दोघांनाही अलंकाराने सजवावे. जेवण, गप्पागोष्टी, मनोरंजन यामध्ये दोघांनीही सोबत राहावे. आपल्यापेक्षा वडील मंडळींचा सन्मान करावा. हे नियम चारही वर्णांसाठी आहेत. आजही यातील काही नियमांचे पालन करण्याची परंपरा आहे. विवाहानंतर पहिले दोन-तीन दिवस काही धार्मिक उपक्रमांचे नियोजन कुटुंबात केले जाते. उदा. हिंदू धर्मामध्ये बहुतेक ठिकाणी श्री सत्यनारायण पूजन केले जाते. या निमित्ताने आपोआप ब्रह्मचर्याचे पालन होते. सोबत भोजन, गप्पागोष्टी, मनोरंजन हे काही दिवस घडावे, म्हणून विवाहानंतर एखादा आठवडा मधुचंद्रासाठी बाहेर फिरायला जाणे, हा अनेकांच्या घरी नवीन विवाहितांसाठी एक उपक्रम बनला आहे. यामध्ये नवविवाहितांनी मीठ आणि क्षारयुक्त पदार्थांचे सेवन टाळण्याचा विशेष सल्ला कामसूत्रकाराने दिलेला दिसतो. आयुर्वेद या भारतीय वैद्यकशास्त्राच्या मते, मीठ आणि क्षारयुक्त पदार्थांचे अतिसेवन हे शरीरातील सात धातूंपैकी विशेषकरून शुक्रधातू कमी करतो. विवाहितांच्या कामजीवनाच्या दृष्टीने आणि उत्तम संततीसाठी पती आणि पत्नी यांचा शुक्र धातू बलवान असणे, ही आवश्यक बाब आहे. वात्स्यायनाला ही गोष्ट त्या काळी माहीत असली पाहिजे. म्हणूनच त्याने वरीलप्रमाणे आहारासंबंधी सल्ला दिला आहे. वात्स्यायनाचा त्या काळच्या वैद्यकासंबंधी अभ्यास असला पाहिजे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. स्त्रिया फुलाप्रमाणे कोमल असतात. त्यामुळे त्यांच्याशी त्यांच्या पतीने सुकुमारतेने म्हणजेच हळुवारपणे व्यवहार केला पाहिजे. पतीबद्दल पत्नीच्या मनात प्रथम पूर्ण विश्वास निर्माण होणे कामसूत्रकाराला आवश्यक वाटते. तो विश्वास संपादन होईपर्यंत पतीने कोणतीही क्रिया घाईगर्दीनेे करू नये. त्यासाठीच विवाहानंतर पहिले तीन दिवस ब्रह्मचर्य पालनाचा सल्ला वात्स्यायनाने दिला असावा. यानंतर वात्स्यायनाने पती आणि पत्नी यांच्या प्रत्यक्ष येणाऱ्या शरीरसंबंधांचे वर्णन केले आहे. ते दोघेही एकमेकांना नवीन असल्याने पतीने पत्नीचे आलिंगन हळुवारपणे सुरुवातीला करावे, असे तो सांगतो. जर पत्नी विवाहाच्या आधीपासून पतीला माहीत असेल तर हे आलिंगन उजेडात करावे आणि ती विवाहाच्या आधीपासून माहितीची नसल्यास ते अंधारात करावे. पत्नीचा संकोच कमी झाल्यावर पतीने आपल्या तोंडात विडा धरून तो तिला खाण्यास सांगावा. तो तसा तिने न खाल्ल्यास पतीने तिला मनवण्याचा प्रयत्न करावा.
वैद्य विजय कुलकर्णी
ayurvijay23@rediffmail.com