आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ज्‍य औपरिष्‍टक (वैद्य विजय कुलकर्णी)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खरे तर मुखमैथुनाची प्रवृत्ती किंवा चालीरीती एकूण संभोग प्रक्रियेमध्ये फारशी सुसंगत आणि प्राकृतही नाही. तसे स्पष्ट मत वात्स्यायनाने या प्रकरणात नोंदवलेले दिसते. प्राकृत संभोग प्रक्रियेमध्ये मुखमैथुन वर्ज्यच समजावे. शिष्टजनांनी त्याचे अनुकरण करू नये. हे जरी खरे असले, तरी कामशास्त्राच्या व्याप्तीमध्ये ‘औपरिष्टक’ या प्रयोगाचा (तो अयोग्य असला तरी) समावेश होत असल्याने, त्याचे विवेचन करण्यासाठी ‘कामसूत्र’काराने एक संपूर्ण प्रकरण खर्ची घातले आहे.

या प्रकरणात वेश्यागमन करणाऱ्यांसाठी औपरिष्टक हा कदाचित रूढ असा प्रकार होता, असे ‘कामसूत्र’कार सांगतो. मुखमैथुनाचे एकूण आठ प्रकार या प्रकरणात वर्णन केले गेले आहेत. १. निमित २. पार्श्वतोदष्ट ३. बहि:संदंश
४. अन्त:संदंश ५. चुम्बीतक ६. परीमृष्टक ७. आम्रचुषितक ८.संगर. हे आठ प्रकार या चालीरीतीच्या विविध अवस्थांना अनुसरून केलेले दिसतात. वात्स्यायनाने याचे विवेचन करताना अन्य आचार्यांचेही मत विशेषत्वाने नोंदवले आहे.
मुखमैथुन हा कामशास्त्रातील दोष आणि जंगली प्रकार असल्याचे आचार्य सांगतात. त्याचप्रमाणे मुखमैथुन केलेल्या स्त्रीचे चुंबन घेणे, हे दु:खकारक असते, असे आचार्य सांगतात. याचा अर्थ, या प्रकाराचे समर्थन कोणतेही आचार्य करताना दिसत नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. परंतु कामशास्त्राचा संपूर्ण अभ्यास करताना मात्र मुखमैथुन हा विषय माहीत असणे चुकीचे ठरू शकत नाही. कोणत्याही शास्त्राचा अभ्यास करताना त्यातील योग्य आणि अयोग्य अशा सर्व गोष्टींचा परामर्श घ्यावा लागतो. हे सांगताना वात्स्याययाने वैद्यकातील एक उदाहरण दिले आहे. त्या काळचे वैद्यकशास्त्र म्हणजे अर्थातच आयुर्वेदशास्त्र होय. याच्या शास्त्रीय ग्रंथामध्ये कुत्र्याचे मांस आणि त्याचे गुणधर्म वर्णन केलेले आहे. पण सर्वांनी कुत्र्याचे मांस खावे, असा त्याचा अर्थ होत नाही. त्याचप्रमाणे मुखमैथुनासंबंधी आहे, असे ‘कामसूत्र’कार या प्रकरणात सांगतो. शिष्टजन आणि धर्मशास्त्र यामध्ये मुखमैथुनाचा निषेध आहे. याचा अर्थ असा की, त्याचे अवलंबन करणे म्हणजे अधर्म आणि शिष्टजनांसाठी तो वर्ज्य आहे.
जे लोक विद्वान आहेत, राजमंत्री आहेत, लोकनायक आहेत, जनप्रिय आहेत, इत्यादी मंडळींनी औपरिष्टकाचा अवलंब करू नये. ‘कामसूत्र’काराने कोणत्या गोष्टी स्वीकाराव्यात आणि कोणत्या स्वीकारू नयेत, याचेही सुंदर विवेचन या प्रकरणाच्या शेवटी शेवटी केले आहे. जे देश, काल, शास्त्र, व्यवहार यांना अनुसरून आणि आपल्याला उपयुक्त आहे. अशा गोष्टींचा स्वीकार आणि अवलंब करावा, तसेच ज्या गोष्टी निरुपयोगी आहेत, आपल्याला उपयुक्त नाहीत, त्या मात्र स्वीकारू नयेत आणि त्यांचा अवलंबही करणे टाळावे, असे वात्स्यायनाने म्हटले आहे.
कामशास्त्रातील विविध सूत्रांमध्ये मुखमैथुनासंबंधी वर्णन करताना विविध प्रदेशांतील लोकांच्या वर्तणुकीचा संदर्भ दिला आहे. याच्या अर्थ, त्याने अनेक ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तिथल्या लोकांच्या एकूण कामजीवनाचा सखोल असा अभ्यास केला असला पाहिजे. तो तसा केल्यानेच कोणत्या भागातील लोकांच्या वेश्यागमन तसेच अन्यही काय परंपरा आहेत, याचे वर्णन तो कामसूत्रात करू शकला. खरे म्हणजे, मुखमैथुन म्हणजे मुख आणि अन्य व्यक्तीचे लिंग यांचा संयोग होय. परंतु हा संयोग हा ‘निरामय कामजीवना’मध्ये अपेक्षित नाही. ती एक प्रकारची विकृतीच मानायला हवी. त्यामुळे हा प्रकार प्रकृतीला अनुसरून नसल्याने, एकूणच आपल्या कामजीवनाला आणि आरोग्याला हिताचा ठरत नाही, हे वात्स्यायनाने त्या काळीही ओळखले असावे. कामशास्त्रातील सर्व अंगांचा अभ्यास आणि मांडणी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला असल्याने, त्यामध्ये मुखमैथुनासंबंधी चालीरीती मानवी समाजात अस्तित्वात असल्याने त्याचे वर्णन त्याने टाळलेले नाही, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. या औपरिष्टक प्रकरणात कामसूत्रकाराने हा विधी काही तृतीय पंथीयांमध्ये प्रचलित असल्याचे नमूद केले आहे. वेश्यागमनासंबंधी या प्रकरणात आलेला उल्लेख आपल्याला वात्स्यायनाची विलक्षण निरीक्षणदृष्टी दाखवतो.
विजय कुलकर्णी
ayurvijay23@rediffmail.com
बातम्या आणखी आहेत...