आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vijay Pandhare About Voice Of Conscience, Rasik, Divya Marathi, Divyamarathi.com, दिव्य मराठी

अंतर्मनाची जाण...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुभाषिते आणि लक्षवेधी वचने या पलीकडे जाऊन विवेकवादी विचारांचा वारसा सांगणारे संतसाहित्य. जात-धर्म-पंथ-ज्ञान-विज्ञान आदींचा खराखुरा अर्थ सांगणाऱ्या या साहित्याचा वर्तमानाशी असलेला बंध उलगडून सांगणारे हे पाक्षिक सदर...

आपण सर्वत्र नजर टाकली तर मोठ्या प्रमाणात दु:ख, अशांती, अज्ञान, चिंता, दहशतवाद, युद्ध, घृणा, हिंसा, खून, बॉम्बस्फोट, असहिष्णुता दिसते. मात्र प्रेम, दया, करुणा, शांती व सहिष्णुता अभावाने आढळते. हे दु:ख, अशांती, अज्ञान कशाने दूर होईल? यासाठी अनादि काळापासून अनेक जणांनी मार्गदर्शन करून ठेवले आहे. यातले बहुतांश लोक बहिर्मुख आहेत. त्यांनी बाहेरचे, भौतिक जग बदलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना असे वाटत होते की, बाह्य परिस्थिती बदलली तर दु:ख, अशांती दूर होईल. बाहेरचे भौतिक जग बदलण्यात ते बरेच यशस्वीही झाले; पण मानवाचे दु:ख, अशांती, अज्ञान, अतृप्ती काही कमी झाली नाही. उलटपक्षी ती वाढलीच. अमेरिकेसारख्या प्रगत, श्रीमंत पाश्चिमात्य देशांचे निरीक्षण केले तर तेथेही अशांती, अतृप्ती, दु:ख वाढल्याचेच स्पष्ट दिसून येते.

जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. सिग्मंड फ्रॉईडने मानवाचे दु:ख कधीच दूर होणार नाही, मानव सदैव दु:खातच मरेल, असे म्हटले आहे. उलट बुद्ध, कृष्ण, महावीर, कबीर, ज्ञानेश्वर या संतांनी जगातले दु:ख, अज्ञान, अविद्या दूर करण्याचा उपाय स्पष्ट सांगितला आहे. हे संत आत्मज्ञानी, अंतर्मुख होते. ते म्हणतात, दु:खाचे खरे कारण अंतर्मनात आहे, बाहेर नाही. आपली आपल्यालाच ओळख नाही. मी कोण, याचा बोधच आपल्याला नाही. हेच सर्व दु:खांचे खरे कारण आहे.

मनप्रक्रियेच्या अज्ञानातून मीपणाचा, अहम््चा भास निर्माण होतो व हा भासच सर्व दु:खांचे मूळ आहे. मनप्रक्रिया जर संपूर्ण आकलन झाली तर मीपणाचा, अहम््चा, मी कोणीतरी जगापेक्षा वेगळी व्यक्ती आहे, हा भ्रम दूर होऊन, दु:खाचे मूळच दूर होऊन दु:खाचा मुळापासून निरास होतो. या मनप्रक्रियेला, ‘प्रोसेस ऑफ कॉन्शसनेस’ला भगवान बुद्धाने धम्म म्हटले आहे. धम्म म्हणजे धारणा. ‘मी’ हा धम्म पंचस्कंधाने बनला असल्याचे बुद्ध सांगतात व पंचस्कंध अष्टकलापांचा असतो, असे स्पष्ट करतात.

विज्ञान - नाम - रूप - वेदना - संखार (पंचस्कंध)
शुद्धजाणीव - नाम - रूप - अनुभव - अनुभवणारा (अष्टकलाप)
पंचभूतात्मक
अशा रीतीने धम्म हा अष्टकलापाचा खेळ असल्याचे बुद्ध सांगतात, तर अस्तित्व हा अष्टधा प्रकृतीचा खेळ असल्याचे भगवान श्रीकृष्ण प्रतिपादन करतात. वेदांतात या खेळालाच दर्शन-द्रष्टा-दृष्य म्हटले आहे. तर सर्व संतांच्या खालील त्रिपुट्या म्हणजे अस्तित्व प्रक्रिया, म्हणजेच या मनप्रक्रिया आहेत. म्हणजेच अष्टकलाप अर्थात अष्टधा प्रकृतीचा हा सर्व खेळ आहे.
ज्ञान - ज्ञाता - ज्ञेय (गीता)
विज्ञान - संज्ञा - वेदना (बुद्ध)
सत - चित - आनंद (संत वाङ‌्मय)
दर्शन - द्रष्टा - दृष्य (वेदांत)
कर्म - कर्ता - कार्य (कर्मयोग)
कारण - कर्ता - कार्य (वेदांत)
युनिव्हर्सल कॉन्शस - अनकॉन्शस - कॉन्शस (मानसशास्त्र)
सर्व संतांच्या त्रिपुट्या म्हणजे अस्तित्व प्रक्रिया वा मनप्रक्रियाच आहेत. त्रिपुटीकारण निर्माण होणाऱ्या मीपणाच्या भासाला म्हणजे ‘इगो’ला, कॉन्शस, अनकॉन्शस, युनिव्हर्सल कॉन्शस स्तरापर्यंत प्रत्यक्षपणे, अपरोक्षपणे जाणले तर संपूर्ण मनप्रक्रियेचा म्हणजे अस्तित्व प्रक्रियेचा बोध होत असतो. हा मन प्रक्रियेचा बोध अहम््चा निरास घडवतो. तो अहम‌्चा भास संपला की, दु:खाचा भासही संपत असतो. हाच केवळ एकच दु:ख मुक्तीचा उपाय आहे, ज्याला कृष्णमूर्ती ‘एंडिंग ऑफ आय कॉन्शसनेस’ म्हणतात. मीच्या धारणेचा त्याग म्हणजेच अहम््चा निरास, म्हणजेच पंचस्कंधाचा निरास होय. व्यक्तित्वाच्या भ्रमाचा निरास होय. म्हणून गीतेत भगवान कृष्ण स्पष्ट सांगतात, ‘सर्व धर्मान परित्याज्य मामेंकं शरणं व्रज’।। हाच मोक्ष होय, हेच निर्वाण होय. सर्व खरे संत याच गोष्टीचे प्रतिपादन करतात. पण काळाच्या ओघात मनप्रक्रियेची समज, साक्षीभाव, अंतरंगात डोकावणे, कॉन्शसनेस अनफोल्डिंग, चार अवस्थांचा निरास, चार वाचांचा निरास, मनोनिरास, स्वरूप दर्शन, आत्मबोध, आत्मज्ञान, विवेक, वैराग्य खरी ध्यान प्रक्रिया या गोष्टी या बाजारू जगात जवळजवळ लोप पावल्या व त्या जागी स्वार्थी गुरू, पोटभरू उपदेशक, वरवरचे शाब्दिक ज्ञान स्थूल ज्ञान पसरवणारे तथाकथित दांभिक, पाखंडी, अज्ञानी लोकांनी या क्षेत्राचा ताबा घेऊन विविध नावांचे धर्म, पंथ, संप्रदाय, ग्रंथ, ध्यानपद्धती याचा प्रसार करून खऱ्या ज्ञानाचा लोप घडवला आहे. यांच्या कट्टर विचारधारेमुळे जगात स्थूल ज्ञान, स्थूल परंपरा, स्थूल प्रथा, बाह्य कर्मकांड, अंधविश्वास, अंधश्रद्धा, काल्पनिक गोष्टी पसरल्या आहेत.
या जगात सुखाने राहायचे असेल तर जग म्हणजे काय, मी म्हणजे काय, जगाचा व माझा काय संबंध आहे, हे जाणून घेतलेच पाहिजे. हेच बुद्धिवंताचे काम आहे. जग म्हणजे काय, याचा जो शोध आपण घेतो त्याला विज्ञान म्हणतात; तर मी म्हणजे काय, याचा जो शोध आपण घेतो त्याला अध्यात्म म्हणतात. सत्य, ईश्वर किंवा ती मूळ शक्ती, ते जे काही आहे, ते मन जाणत नाही. मनाला ते माहीतच नाही. मग जे मनाला माहीतच नाही त्याचा शोध मी मनाने कसा घेऊ शकतो? म्हणून सत्याचा शोध प्रयत्नाने किंवा मनाने लागतच नसतो. कारण सर्व प्रयत्न हे जे यापूर्वी माहिती आहे त्या क्षेत्रातच असतात आणि सत्य तर अज्ञात आहे; म्हणून मन जोपर्यंत कार्यरत आहे तोपर्यंत सत्य उमजतच नाही. मात्र ज्या मनाला ही गोष्ट उमजते, की मनच अडथळा आहे, तेव्हा मनाकडूनच मनाचा त्याग होतो व मन स्वत:चे स्वत: विसर्जित होते आणि मनाच्या त्या विसर्जनातच सत्याचे प्रकटन होते. खरे तर सत्य स्वत:हून तेथे आधीच प्रकट होते. ते प्रकट केले जाऊ शकत नाही. कारण मनच असत्य आहे व असत्याचे विसर्जन झाले की, सत्य तर असतेच असते. ते आणावे लागत नाही. फक्त सत्यावर असलेला असत्य मनाचा लेप दूर झाला की, सत्याला सत्याचे आकलन होते. अन्यथा जोपर्यंत मन कार्यरत आहे, तोपर्यंत मनाचेच मनाला भास जाणवतात व हीच माया आहे. सत्य तर मन व मायेच्या पलीकडे आहे. म्हणून सध्याच्या मनाचे विसर्जन हीच आत्मज्ञानाची गुरुकिल्ली आहे. ज्या मनाला हे साध्य होते, त्या मनाला संपूर्ण अस्तित्वाचा खुलासा आपोआप होतो. कारण आत्मज्ञानानंतरचे ते मन व अस्तित्व हे दोन्ही एकच असतात. त्या मनाला संपूर्ण विश्व आत्मस्वरूपच असल्याचा बोध होतो. अशा बोधातच मग प्रेम, शांती, करुणा व प्रज्ञा याचा उगम होत असतो आणि हिंसा, घृणा, द्वेष, असहिष्णुता यांचा अंत होऊन खरे रामराज्य निर्माण होईल. खऱ्या संताचा उपदेश समजून न घेता मंदिर, मशीद पाडणाऱ्या कट्टरपंथी विचारधारा या जगात प्रेम, करुणा, शांती, दया निर्माण करू शकणार नाहीत; उलट अशा विचारसरणीमुळे जगात तेढ, अशांती, दु:ख, युद्धच होत आली आहेत. ते आपण अफगाणिस्तान व सिरियात अनुभवत आहोत.
(vbpandhare@gmail.com)