आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वह न दुखिया, जिस ने मन को जाना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दु:ख, अशांतीचे कारण अंतर्मनात दडलेले आहे. अंतर्मनातील ते कारण दूर झाल्याशिवाय मानव कधीच दु:खमुक्त होत नाही. खरे तर हजारो वर्षांपासून सर्व खरे संत हे हाच दु:खमुक्तीचा उपाय सांगत आहेत; पण बहिर्मुख, भोगवादी, सत्तालालसी, लोभी मनाला त्यांचा उपदेश अज्ञानामुळे आवडत नाही...
पहिल्या लेखात आपण सद्य:स्थितीचा आढावा घेतला, तेव्हा आपल्याला असे आढळले की, जगात सर्वत्र दु:ख, अशांती, असमाधान, अतृप्ती याचे साम्राज्य पसरले असून बहुतेक सर्व लोक, मग ते गरीब असो की श्रीमंत असो; ते दु:खीच असल्याचे दिसून आले. अफाट वैज्ञानिक प्रगती, सर्व प्रकारची सुखसाधने, प्रचंड पैसा, शिक्षण यांची रेलचेल असलेल्या जगात सुख, शांती, समाधान, प्रेम, दया, करुणा, प्रज्ञा यांचा मात्र खूपच तुटवडा जाणवतो. या दैवी गुणांची खूपच वानवा सर्वत्र आढळते. आजच्या या तथाकथित प्रगत मानवाला प्रश्न पडलेला आहे की, असे का झाले? श्रीमंत शिक्षित माणसाला आपण दु:खी, चिंताग्रस्त का आहोत? या प्रश्नाचे खरे उत्तर माहीतच नसते. या प्रश्नांविषयी आज आपण सखोल चिंतन करणार आहोत.
आतापर्यंत ज्या व्यक्तींनी हे दु:ख करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यापैकी ९९% लोक बहिर्मुख होते. त्यांनी जगात भौतिक बदल केले; पण भौतिक बदलांनी दु:ख, अशांती, असमाधान, अतृप्ती पूर्णपणे दूर होत नसल्याचेच आढळते व हे सर्व भौतिक विकासवादी, विज्ञानवादी, भोगवादी, भांडवलवादी, सत्ताप्रेमी, स्वत:च बहिर्मुख आहेत, म्हणून दु:ख, अशांतीचे साम्राज्य अस्तित्वात आले आहे. या लोकांना या दु:ख, अशांतीच्या खऱ्या कारणांचा बोधच झालेला नाही. म्हणूनच ते दु:खाचे कारण बाहेर पाहतात व बाहेरच्या जगाची घडी नीट बसवण्याचा प्रयत्न करतात. खरे पाहू गेल्यास या दु:ख, अशांतीचे कारण बाहेर नसून आपल्या मनात दडले आहे व खोलवर अगदी अनकॉन्शस स्तरावर दडले आहे, पण याचा या लोकांना पत्ताच नाही. या लोकांना मनाचा संपूर्ण बोध झालेला नसल्याने त्यांच्या अपूर्ण बुद्धीने अपूर्ण समजेतूनच ते बहिर्मुख झालेले असतात. पण बहिर्मुख माणसाला कधीच खरे समाधान, खरी तृप्ती प्राप्त होत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
या दु:ख, अशांतीचे कारण अंतर्मनात दडलेले आहे. अंतर्मनातील ते कारण दूर झाल्याशिवाय मानव कधीच दु:खमुक्त होत नाही. खरे तर हजारो वर्षांपासून सर्व खरे संत हे हाच दु:खमुक्तीचा उपाय सांगत आहेत; पण बहिर्मुख, भोगवादी, सत्तालालसी, लोभी मनाला त्यांचा उपदेश अज्ञानामुळे आवडत नाही व आपली बहिर्मुखता हे अज्ञानी लोक अधिकाधिक वाढवत आहेत व बहिर्मुखता वाढवणारा उपदेशच अज्ञानी लोकांना आवडत असतो व ते अधिकाधिक बहिर्मुख होणेच पसंत करतात. ज्यांनी बहिर्मुख होण्याचा अतिरेक टाळला व अंतर्मुखतेचा ध्यास घेतला, त्यांनाच कदाचित दु:खमुक्तीचा अनुभव येतो.
ज्यांना मन म्हणजे काय? याचा संपूर्ण बोध अंतरंगात होतो, जे अनकॉन्शस स्तरावरचे दु:खाचे मूळ नष्ट करू शकतात, तेच दु:खमुक्तीला प्राप्त होतात, हेच मुख्य सूत्र आहे, हे आपल्याला प्रथम समजून घ्यावे लागेल. जर आम्ही अंतर्मुख झालोच नाही व आम्ही मनाची कार्यपद्धती समजून घेतलीच नाही तर आमचे दु:ख अनंत जन्मापर्यंत, अनंत काळापर्यंत कधीच नष्ट होत नसते, जी आज सर्वत्र परिस्थिती आहे. आज बहिर्मुखतेचे, भोगवादाचे, लोभीपणाचे, महत्त्वाकांक्षांचे प्रचंड वादळ आधुनिकतेच्या, विज्ञानवादाच्या, प्रगती व विकासाच्या नावाखाली घोंगावत आहे, हे वादळ सर्व जगात प्रचंड ताकदीने पसरले असून अज्ञानाचे, ना-समझीचे साम्राज्य जगात पसरले असून संपूर्ण जगाचा ताबा अज्ञानाने घेतला आहे, यालाच संतांनी कलियुग म्हटले आहे. मनाविषयीच संतांनी चर्चा केली आहे. संतांनी तर स्पष्टपणे सांगितले आहे की, मनच सर्व बंधनांचे कारण आहे. “मन एव् कारणम् बंध मोक्षयो।” तुकाराम महाराज सांगतात की, “मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण।” आणि कबीर म्हणतात, जगात राजा, प्रजा, धनी, रंक, धुत, अवधुत सर्व दु:खीच आहे. फक्त जे मनाला जाणतात तेच दु:खी नसतात. “वह न दुखिया, जिसने मन को जाना।”
खरे तर सर्व संतांनी हेच सांगितले आहे; पण धर्माच्या ठेकेदारांनी त्यांचा उपदेश नीट समजून न घेता आपल्या संप्रदायासाठी, संघटनासाठी, सत्ताप्राप्तीसाठी धर्माला कर्मकांडाचे विकृत वळण दिले असून जगात देवा-धर्माच्या नावाखाली गैरसमज, अंधश्रद्धा, अज्ञान पसरवले आहे. मन प्रक्रिया ओळखण्याचा, मनातील दु:खाचे कारण दूर करण्याचा प्रयत्न न करता भलत्याच गोष्टींना महत्त्व दिल्याने जगातील अंधार, दु:ख, अशांती वाढल्याचेच चित्र सर्वत्र आहे. ज्ञानेश्वरीत मनाला जाणणेच महत्त्वाचे आहे, हे सांगितले आहे. संत ज्ञानेश्वरांनी अध्याय दुसरा, ओवी १२९ मध्ये म्हटले आहे की,
ना तरी जाणीवेच्या आयणी, करता दधीकडसणी।
मग नवनीत निर्वाणी, दिसो लागे।।
(जाणीव=कॉन्शसनेस) अवधानात, ध्यानात, समाधीतच सर्व रहस्यांचा खुलासा होतो. केवळ वरवर श्रवण, प्रवचन ऐकून उपयोग नाही. हे स्पष्ट करताना माउली ज्ञानेश्वरीत अध्याय सातवा ओवी १९८मध्ये सांगते,
एऱ्हवी अवधानचेनि वाहीलेपणे, नाना प्रमेयांचे उगाणे।
काय श्रवणाचेही आंगवणे, बोलो लहाती ।। (ज्ञानेश्वरी)
केवळ शब्दाने कधीच ज्ञान होत नाही. हेच माउलीने जाणून चारही वाचांचा अंत अमृतानुभवात स्पष्ट केला आहे. श्रुती तर स्पष्ट सांगतात,
‘न अय आत्मा लभ्यते प्रवचेन वा श्रवणेन।।’
ज्ञानेश्वरीत अध्याय १६मधील ओवी ५० व ५१मध्ये माउली द्रष्टा-दृश्याचे मनातील द्वैत समजावून घेणे, हा सगळ्यात प्रभावी उपाय असल्याचे सांगतात.
‘एवढ्या लाठेपणाचा उपायो, आनु नाहिच म्हणे देवो
सम्यक ज्ञानाचा रावो, उपाया माजी।।’ (ज्ञानेश्वरी)
अंतर्मनातील जे दु:खाचे खरे कारण आहे ते जोपर्यंत दूर होत नसते तोपर्यंत कोणत्याही बहिर्मुख उपायाने, भौतिक विकासाने, भौतिक प्रगतीने, आर्थिक वा वैज्ञानिक प्रगतीने दु:खमुक्तीचा अनुभव प्रकटतच नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणून पुढील लेखात या दु:खाचे जे मूळ आहे ते अज्ञान काय आहे? अविद्या काय आहे? ज्याला द्वैत म्हटले आहे ते काय आहे? माया काय आहे? अस्तित्व प्रक्रिया काय आहे? मन काय आहे? जाणीव (कॉन्शसनेस) म्हणजे काय? याचा जरा खोलात जाऊन आपण विचार करणार आहोत. मनाची कार्यपद्धती समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. दु:ख, अहंकार, भय, लोभ, वासना, क्रोध, अशांती या गोष्टी नेमक्या कशा निर्माण होतात, कशा वाढतात व त्या कशा निरास पावू शकतात, त्यासाठीचा उपाय काय आहे? साधन काय आहे? मार्ग काय आहे? पद्धत काय आहे? ध्यान म्हणजे काय? अवधान म्हणजे काय? द्रष्टा-दृश्याचा खेळ म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? वगैरे गोष्टींचे सखोल चिंतन आपण यापुढे करणार आहोत.
समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलेच आहे की,
खरे शोधता शोधता शोध आहे ।
मना बोधता बोधता बोध आहे।।
vbpandhare@gmail.com
पुढे पाहा, संबंधित फोटो....