आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मसाक्षात्काराचे सूत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गात सर्वत्र दु:ख असून दु:खाचे कारण मनाविषयाचे अज्ञान असल्याचे आपण या पूर्वीच्या लेखांत संतविचारांच्या माध्यमातून समजावून घेतले आहे. मनप्रक्रियेतील हे जे महत्त्वाचे घटक किंवा टप्पे आहेत, हे संतांनी परोक्ष-अपरोक्षपणे अनुभवलेले असतात. फक्त देशपरत्वे, कालपरत्वे वेगवेगळे शब्द त्यांनी या घटकांसाठी वापरलेले असतात. काही संत त्यांना पंचकोष म्हणतात. काही संत त्यांना पाच देह म्हणतात, आधुनिक मानसशास्त्र इगो, कॉन्शस, सबकॉन्शस, अनकॉन्शस, युर्निवर्सल कॉन्शस अशा पाच अवस्था सांगते. ज्ञानेश्वर माउली वैखरी, मध्यमा, पश्यंती, परा, परे पलीकडील परातीत अशा पाच वाचा असे म्हणून त्या अवस्थाचे वर्णन करतात. तर भगवान बुद्ध त्यांना पंचस्कंध असे म्हणतात.

हे शब्द वेगवेगळे वाटत आहेत, पण या शब्दांनी जी वस्तू निर्देशित केली आहे, ती वस्तू एकच आहे. जसे पाणी ही एकच वस्तू आहे, पण पाण्यास कोणी ‘वॉटर’ म्हणेल, कोणी ‘जल’ म्हणेल, कोणी ‘नीर’ म्हणेल, कोणी ‘जीवन’ म्हणेल. पण सर्वांना अभिप्रेत असलेली गोष्ट एकच आहे. खरे तर संपूर्ण अस्तित्व एकाच शक्तीचा खेळ आहे, एकाच शक्तीची ही वेगवेगळी विविध रूपे आहेत. ही शक्तीच निरनिराळे आकार, अवस्था धारण करत असते. या शक्तीच्या ठिकाणी निरनिराळे बदल घडत असतात. त्यामुळे निरनिराळ्या अवस्थांचा भास होत असतो. जसे, बाष्प, ढग, पावसाचे थेंब आणि बर्फ या जशा एकाच पाण्याच्या विविधावस्था आहेत, तसेच मूळ शक्तीला कॉन्शसनेस, कोष, देह, स्कंध असे निरनिराळ्या शब्दांनी संतांनी संबोधले आहे. ज्ञानेश्वर माउली ‘ज्ञानेश्वरी’मधील अध्याय ओवी १०८ मध्ये म्हणतात की,
जैसेविरजनाचे संगे, दुधची आटे लागे,

तैसे प्रकृती अंगा रीघे, सुष्टीपणा।।
जसे,बाष्प, ढग, वास, पाणी, बर्फ यांच्या अवस्था बदलत असतात, तशाच अस्तित्वाच्याही अवस्था बदलत असतात. म्हणूनच त्या शक्तीचे वर्णन करताना संत ती शक्ती अनित्य असल्याचे सांगतात. अनित्य म्हणजे, बदलणारी. खरे म्हणजे, सतत नवनिर्मिती करणारी, हे तिचे अधिक समर्पक वर्णन होईल. म्हणून ज्ञानेश्वर माउली या सततच्या नवनिर्मितीला ‘चिद््विलास’ म्हणतात. संत या नवनिर्मितीच्या खेळाला सत, चित्त, आनंद म्हणतात. सत, चित्त, आनंद म्हणजे, सर्व अस्तित्व नवनिर्मितीचा सततचा सोहळा होय. काहीतरी मूळ निर्गुण निराकार शक्तीच्या ठिकाणी होणारा सततचा बदलाचा भाग, म्हणजेच चिद््विलास होय. म्हणून सत, चित्त, आनंद हे ईश्वराचे स्वरूप असल्याचे संत सांगतात. काही संत ही प्रक्रिया पंचकोष, पंचअवस्था, पंचस्कंध स्वरूपात सांगतात. सगळे संत एकाच गोष्टीचे वर्णन करतात, त्यांच्यात पूर्ण ऐक्य आहे, पण आपण आपल्याला समज नसल्याने, उगाच वाद घालत असतो.
ब्रह्म, धम्म, वाहे गुरु, कैवल्य, ईश्वर, सत्य, मोक्ष, ज्ञान, झेन, ताओ, अल्लाह, आकाशातला बाप, हे सर्व शब्द एकाच वस्तूची निरनिराळी नावे आहेत. आपण अज्ञानी असल्याने आपण धर्म, पंथ, संप्रदाय हे वेगळे असल्याचे मानतो. खरे म्हणजे, सर्व एकाच शक्तीचे उपासक आहेत. सगळेच एकाच ईश्वराचे अंश आहेत, एकाच अल्लाहची लेकरे आहेत. सगळी निर्मिती एकाच शक्तीपासून अथवा एकाच तत्त्वापासून झाली आहे. त्या एका तत्त्वाचा बोध होण्यासाठी सर्व धर्म, पंथ, संप्रदाय, साधना, विधी शास्त्रे कार्यरत आहेत, पण ज्ञानाचे खरे रहस्य माहीत नसल्याने बहुतांश लोक दिशाहीन झाले आहेत. बोधाचे सूत्र समजावून प्रत्यक्ष बोध होण्याची प्रक्रिया संत समजावून सांगतात. परोक्ष-अपरोक्षपणे अंतरंगात या एकाच तत्त्वाचा बोध झाल्याशिवाय मानवी मनाचे अज्ञान दूर होत नसते. त्या तत्त्वाचा बोध, त्या एका शक्तीचा बोध, निर्गुण निराकाराचे आकलन हे ज्ञानाचे, आत्मज्ञानाचे, आत्मसाक्षात्काराचे सूत्र होय.
ज्ञानेश्वर माउली अध्याय दुसरा ओळी १४८ १४९मध्ये म्हणतात की,
हातर्काचिये दिढी, गोचर नव्हे किरटी,

ध्यान याची या भेटी, उत्कंठा वाहे।।१४८।।
हा सदा दुरलभु मना, आपु नव्हे साधना,
नि:सिमु हा अर्जुना पुरुषोत्तमु।।१४९।।

मनाचीप्रक्रिया नीट समजावून घेतल्याशिवाय खऱ्या ध्यानाची म्हणजे, साक्षीभावाची सुरुवातच होत नसते. मन कसे संमोहन प्रक्रिया आहे, मनात द्वैत कसे निर्माण होते, मन भवचक्र कसे निर्माण करते, मनाठायी तसे कालचक्र अविरत चालते, मनाठायी विचार, तर्क, भावना, विकार, आशा, कामना, इच्छा इत्यादी विकार कसे सतत निर्माण होतात, हे नीट समजावून घेतले की माणूस साक्षीभावाला प्राप्त होतो. साक्षीभावाची म्हणजेच, सजग निष्कामतेची अवस्था प्राप्त झाली की, मग त्या साक्षीभावात संपूर्ण अस्तित्वाचा शोध लागतो. तो नेमका कसा लागतो, हे पुढील लेखांत संतविचारांचा मागोवा घेत समजावून घेण्याचा प्रयत्न करू या.
vbpandhare@gmail.com