आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोध मनाचा (विजय पांढरे)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगाच्या अस्तित्वाची प्रक्रिया म्हणजेच मनाची प्रक्रिया होय. मन आणि जगाचे अस्तित्व या दोन गोष्टी भिन्न नाहीत. अजून खोलात विचार केला तर जग, मन, आणि अहंकार या तिन्ही गोष्टी एकच होत. ही सर्व कार्यपद्धती कार्यकारणभावाने कार्यरत असते. येथे कोणीही व्यक्तीस्वरूप, मानवाच्या आकारासारखा नियंता नाही, फक्त निसर्गातील कार्यकारणभावाने अस्तित्वातील घडामोडी आपोआप घडत असतात, हाच कर्मसिद्धांत होय.

याच अर्थाने जगाला भगवान बुद्ध अनात्त किंवा अनात्म (नॉनसेल्फ) म्हणतात. अहंकाराने केलेल्या प्रतिक्रियेनुसार संस्कारांचे गाठोडे बळकट होत असते. त्या संस्कारांच्या गाठोड्यातून वर्तमान एक संस्कार पृष्ठभागावर येऊन अनुभव निर्माण करत असतो. अहंकाराने प्रतिक्रिया केली, तुलना केली, आसक्ती किंवा द्वेष केला, की पुन्हा संस्काराचे गाठोडे बळकट बनत असते. पुढच्या वेळी अजून बळकट झालेल्या अनुभवाच्या रूपाने वर्तमान म्हणून प्रकटते. अशा पद्धतीने भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ असे कालचक्र अव्याहत सुरू राहते.

विज्ञान-संज्ञा-वेदना-तृष्णा-संस्कार वा तुर्या-सुषुप्ती-स्वप्न-जागृती-अहंकार वा परा-पश्यंती-मध्यमा-वैखरी-अहंकार हे मनाच्या प्रक्रियेतील पाचही घटक एकत्रितपणे काम करत असल्याने, त्यांचे वेगळे स्वरूप प्रत्यक्षपणे आपल्याला समजत नाही. चहामध्ये जशा पाणी, दूध, साखर, चहा या गोष्टी एकजीव असतात, तसेच हे सारे आहे. तसे मनाच्या पाचही घटकांना वेगळे वेगळे करून प्रत्यक्ष जाणणे म्हणजेच, आत्मज्ञान किंवा स्वरूपज्ञान होय. यालाच ब्रह्मज्ञान किंवा आत्मसाक्षात्कार किंवा ईश्वर दर्शन असे बुद्ध आणि ज्ञानेश्वर आदी संतांनी म्हटले आहे. काही जण यालाच मोक्ष, मुक्ती, किंवा निर्वाण असेही म्हणतात. मनाच्या एका विशिष्ट अवस्थेत या सर्व गोष्टी अंतरंगात आकळत असतात, जी ध्यानाची प्रक्रिया असते. या प्रक्रियेलाच निर्विकल्प निरीक्षण, मेडिटेशन, विपश्यना, सामाईक, सहजसमाधी, योग, निष्काम कर्म, निष्काम भक्ती, ज्ञानयोग किंवा भक्ती योग, असेही म्हणतात. अस्तित्वाची, अहंकाराची प्रक्रिया अंतरंगात कळणे, म्हणजेच आत्मज्ञान किंवा आत्मसाक्षात्कार होय.

या मनप्रक्रियेविषयी तसेच ध्यान प्रक्रियेविषयी पुढील काही लेखांत आपण सखोल चिंतन करून, मन म्हणजे काय? ध्यान म्हणजे काय? हे खोलात शिरून आकलन करून घेणार आहोत.
सर्व संतांनी मानसिक दु:खाचे कारण मनाविषयीचे अज्ञान आहे, असे नि:शंकपणे सांगितले आहे. मन काय आहे? मनाचे कार्य कसे चालते? मन कोणत्या कोणत्या घटकांचे मिश्रण आहे? मनात दु:ख, चिंता, अशांती कशी निर्माण होते? मन शांती व आनंदाला कसे प्राप्त होऊ शकते. सांपत्तिक, भौतिक, वैज्ञानिक व शैक्षणिक प्रगती होऊनही मन अशांत, अतृप्त, असमाधानी का राहते? समाधान व तृप्ती यांचे रहस्य काय? आणि मनाला जाणायचे कसे? असे असंख्य प्रश्न आपल्या मनात निर्माण होत असतात. खूप शिकलेल्या माणसालाही मन म्हणजे काय, हे माहीत नसते, मग मी कोण? हा प्रश्न तर खूप दूर राहतो.

आपल्याला जर मनाची कार्यपद्धती समजली किंवा मनाचे स्वरूप प्रत्यक्षपणे अंतरंगात समजले तरच दु:खाचा अंत होत असतो. कारण जोपर्यंत मनाविषयी अज्ञान अंतरंगात असते, तोपर्यंत मनाचा वापर आपण चुकीच्या पद्धतीने करत असतो, त्यामुळेच; दु:खाची निर्मिती मनात अनुभवाला येत असते. आपण सर्व प्रयत्न शांती, आनंद, समाधानासाठी करतो, पण प्राप्ती मात्र दु:ख, अशांती, असमाधानाची होते, हा आपल्या सर्वांचा अनुभव. आपले काहीतरी चुकत आहे, आपण कोणते तरी निसर्गाचे मनाविषयीचे नियम तोडत आहोत. म्हणूनच आपण दु:खाला, अशांतीला प्राप्त होतो, यात शंका ती काय? आपले नेमके चुकते तरी काय? मनाची कार्य पद्धती समजावून घेणे ही प्रथम पायरी आहे. अशा वेळी हे मन आहे तरी काय? या प्रश्नाचे चिंतन केले तर आपल्याला असे आढळते की, मन म्हणजे अनुभव निर्माण करणारी यंत्रणा आहे. पण ही यंत्रणा काम कशी करते? तर, संगणकाची कार्यपद्धती व मनाची कार्यपद्धती यात बरेच साम्य आहे. म्हणून मन समजावून घेण्यासाठी आपण संगणकाची कार्यपद्धती समजावून घेऊ.संगणकाचे कामकाज कसे चालते, हे समजले तर मनाचेही आकलन होणे सोपे जाते.

पहिली गोष्ट म्हणजे, संगणक विजेवर चालतो. वीज ही वैश्विक भौतिक शक्ती आहे. तर मनदेखील अज्ञात अशा वैश्विक शक्तीवर चालते. ज्या शक्तीला चेतना, चैतन्य, जाणीव, युनिव्हर्सल कॉन्शसनेस, तुर्या, परा, ज्ञान, दर्शन, सत्य, ईश्वर, ब्रह्म, पुरुष, शिव, महाकारण, ओंकार, ओम, अल्लाह, आकाशातला बाप, ताओ, झेन, धम्म अशी विविध नावे विविध संप्रदायांनी ठेवली आहेत. दुसरी गोष्ट, संगणकाचे कामकाज विजेच्या अधिष्ठानावर हार्डवेअरच्या साहाय्याने, सॉफ्टवेअरच्या मदतीने, मॉनिटरच्या पडद्यावर सुरू असते. तसेच मनाचे कामकाज चैतन्याच्या अधिष्ठानावर शरीरातील मेंदूत, अहंकाराच्या साहाय्याने, मनाच्या पडद्यावर सुरू असलेले दिसते. तिसरी गोष्ट, संगणकात एक हार्डडिस्क असते, जिच्या साहाय्याने सर्व घडामोडी सॉफ्टवेअरमार्फत मॉनिटरच्या पडद्यावर घडत असतात. तसेच मनात व मेंदूत मानसिक, भावनिक, वैचारिक, संस्कारांचे स्मृतीरूप गाठोडे असते, त्या संस्कारबद्धतेतून मनाच्या पडद्यावर विविध मानसिक, भावनिक, वैचारिक, अनुभव उमटतात. चौथी गोष्ट, संगणक वापरणारा या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवून संगणकाचे कामकाज सुरू ठेवत असतो, तसेच अहंकार हा मनाच्या यंत्रणेवर नियंत्रण ठेवत मनाचे कार्य सुरू ठेवत असतो. पाचवी गोष्ट, संगणकाला जशी स्मृती असते, तशीच स्मृती मनाठायीही असते. इंटरनेट, सायबरची स्मृती क्षमता जशी अनंत आहे, तशीच मनाची स्मृती क्षमतादेखील अनंत आहे. सहावी गोष्टी, संगणक वापरणारा जसा मॉनिटरवरील घडामोडी काही प्रमाणात नियंत्रित करू शकतो, त्याचप्रमाणे अहंकारही मनाचे नियंत्रण काही प्रमाणात करू शकत असतो. सातवी गोष्टी, वीज, हार्डवेअर, हार्डडिस्क, सॉफ्टवेअर, मॉनिटर, की बोर्ड, संगणक वापरणारा, हे सर्व जसे एकत्रितपणे कार्य करतात, तसेच चैतन्य, मानसिक संस्काराचे गाठोडे शरीरातील मेंदू, अहंकार हे सर्वदेखील एकत्रितपणे काम करत असतात. दोघांमधला फरक इतकाच की, मन ज्या चैतन्य शक्तीच्या अधिष्ठानावर चालते, ते तत्त्व एक जिवंत अाध्यात्मिक तत्त्व आहे, तर संगणक ज्या विजेच्या अधिष्ठानावर चालते, ती वीज एक भौतिक शक्ती आहे. आठवी गोष्ट, संगणकाची काम करण्याची पद्धत अत्यंत क्लिष्ट व सामान्य माणसासाठी अनाकलनीय असते. फक्त संगणक निर्माण करणारे शास्त्रज्ञच ते रहस्य पूर्णत: जाणून असतात. तसेच मनाचीही काम करण्याची पद्धत अत्यंत क्लिष्ट व सर्वसाधारण माणसासाठी समजण्यास अनाकलनीय असते. फक्त संतच मनाची यंत्रणा संपूर्ण प्रत्यक्षपणे, अपरोक्षपणे जाणत असतात. नववी गोष्ट, संगणकशास्त्रज्ञांना तरी विजेचे नेमके स्वरूप प्रत्यक्षपणे माहीत नसते, पण संत हे चैतन्य, चेतना, किंवा ‘युनिव्हर्सल कॉन्शसनेस’चे स्वरूप प्रत्यक्षपणे जाणत असतात. इतकेच नाही, तर स्वत:च ते तत्त्वस्वरूप होऊन गेलेले असतात.

vbpandhare@gmail.com
बातम्या आणखी आहेत...