आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vijaya Bhope Writes About Why Big Salarys Husband, Madhurima, Divya Marathi

मोठ्या पगाराचा नवरा कशाला?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जकाल लग्न हा खूप गंभीर विषय झाला आहे. कारण मुला-मुलींच्या अटी. त्या अटींची पूर्तता होईपर्यंत लग्नाचे खरे वय केव्हा निघून जाते, हे त्यांच्या आई-वडिलांनासुद्धा कळत नाही. एकदा वय वाढायला लागले की, त्यांचे विचार अजून पक्के होत जातात. परवाच मुलींच्या आईवडिलांचे विचार ऐकण्यात आले. प्रत्येकाला वाटते, माझी मुलगी हुशार, दिसायला चांगली, आम्ही तिला चांगले शिकवले, तिच्यावर संस्कार केले. आमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. मग?
मग, मुलगा दिसायला चांगला, स्मार्ट, शिकलेला पाहिजे, त्याचे पॅकेज चांगले पाहिजे, त्याला कुठलेही व्यसन नको, त्याच्या घरचेपण शिकलेले पाहिजेत, घरचे वातावरण आधुनिक पाहिजे, त्याच्यावर जबाबदारी नको, घरात सोवळे-अोवळे नको, सणवार नकोत, घरात म्हातारी माणसं नकोत, सासूसासरेपण नकोत... एक प्रश्न तर थक्क करणारा होता, तो म्हणजे, मुलाच्या आईवडिलांनी वृद्धाश्रमात नाव नोंदवले आहे का? यातील अर्ध्या अटी मुलींच्या आईवडिलांच्या.
आमची मुलगी नोकरी करते तर ती काय घरात सोवळे-अोवळे, सणवार करत बसणार? माझी मुलगी स्वयंपाक नाही करणार. आम्ही तिला एवढे शिकवले ते काय घरात बसवण्यासाठी की स्वयंपाक करण्यासाठी? छे छे, ते शक्य नाही. म्हणजे त्यांचे म्हणणे की, सासूने किंवा स्वयंपाकवाल्या बायकांनी हे सगळे करायचे.

आज स्त्रिया जर पुरुषांची बरोबरीच करत आहेत, तर मग आपल्यापेक्षा जास्त शिकलेला, जास्त पगार असलेला मुलगा का बरं बघतात? तुम्हीच पुरुषप्रधान संस्कृतीला खतपाणी घालता. मग त्यांच्या नावाने ओरडता कशाला? मुली जर चांगला पगार कमावत असतील तर पुरुषाला कमी पगार का नाही चालत? मुली बक्कळ पगार कमावू लागल्या असतील तर त्यांनीच संपूर्ण कुटुंबाची आर्थिक जबाबदारी घ्यावी. पुरुष घर सांभाळेल. आपण करू तो कायदा असतो. एकाने घरात राहायचे आणि एकाने कमवायचे. नोकरांचा प्रश्न मिटेल आणि घराला घरपणही येईल. पण नाही, एकाच्या पगारात काय होतंय, हे या पिढीचं म्हणणं. पैसा कितीही आला तरी आपण त्यावर समाधानी नसतो. माणसाने समाधानी राहून कुठेतरी आळा घातला पाहिजे. त्या परिस्थितीशी जुळवून घेतले पाहिजे. तडजोड करायला शिकले पाहिजे. तडजोडीची तयारी असेल तरच मुला-मुलींनी लग्नाला संमती द्यावी.

सगळ्याच मुलींना उच्चशिक्षित, बक्कळ पगाराचा मुलगा हवा असेल तर कमी शिकलेल्या, कमी पगाराच्या, नोकरी नसलेल्या मुलांनी काय लग्न करायचे नाही का? मुलींनो, तुम्ही नोकरी करा. खूप पैसा कमवा. हाउस हजबंड व्हायची तयारी असेल त्याच्याशीच लग्न करा. जेवढे आहे, त्यात सुख माना. नवरा-बायकोने एकमेकांवर एवढे प्रेम करा की, पैसा, घर ही सुखे एकदम किरकोळ व दुय्यम वाटायला लागतील.