आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई का ‘डॅडी’ कौन?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अशिम अहलुवालिया दिग्दर्शित आणि अर्जुन रामपाल अभिनित "डॅडी'ने पुन्हा एकदा अंडरवर्ल्डबद्दलचे प्रेक्षकांचे कुतूहल चा‌‌ळवले. हे कुतूहल शमवणारा अरुण गवळी आणि त्याच्याशी जोडल्या गेलेल्या गुन्हेगारी विश्वातल्या दाहक वास्तवाचा हा वेध... 

अंडरवर्ल्डमध्ये वावरताना गुन्हेगारीच नव्हे तर आर्थिक, राजकीय, कामगार आदी निरनिराळ्या क्षेत्रात आपली ताकद दाखविणारा डॉन अरुण गवळी उर्फ ‘डॅडी’याचा जीवनपट चक्रावून टाकणाऱ्या घटनांनी इतका खचाखच भरला आहे की, रुपेरी दुनियेलाही त्याची पुन्ह:पुन्हा भुरळ पडली तरी, आश्चर्य वाटायला नको.

एरवी, दहशत निर्माण करणाऱ्या माफियांच्या जवळजवळ सगळ्याच कारवाया म्हणजे थरारक असा भयपट असतो. आपापल्या परीने ते ‘गॉडफादर’च्या अर्विभावात आयुष्य जगतात. अरुण गवळीचा दबदबाही असाच होता. त्यातूनच त्याच्यातील ‘डॅडी’चा दरारा अंडरवर्ल्डमध्ये निर्माण झाला. प्रामुख्याने कामगारांची वस्ती असलेल्या मध्य मुंबईत भायखळा, सातरस्ता भागातील दगडी चाळीत वाढलेला अरुण गवळी विक्रोळीतील गोदरेज कंपनीत नोकरीला होता. दुधाच्या छोट्या व्यवसायात असलेल्या गवळी कुटुंबाची आर्थिक स्थिती तशी बेताचीच होती. तो काळ टोळ्यांनी पैसे कमविण्यासाठी मटका, दारूचा अड्डा चालवण्याचा अथवा अड्डे लुटण्याचा, खंडणी उकळण्याचा, तसेच हप्ता वसुली करण्याचा होता. भायखळा रेल्वे स्थानकाजवळील भागात  रमा नाईक, बाबू रेशीम यांच्या नावाचा दबदबा होता. त्याच्या टोळीवर पोलिसांची नजर होती. तरीही येथून काही अंतरावरील दगडी चाळीत राहाणारा अरुणही रमा आणि बाबूकडे आकर्षित झाला.

प्रामुख्याने मध्य तसेच दक्षिण मुंबईच्या काही भागांत समाजकंटकांच्या निरनिराळ्या टोळ्या १९७०च्या दशकात कार्यरत होत्या. भायखळा येथून काही अंतरावरच चिंचपोकळी, आर्थर रोड भागात अमर नाईकची टोळी सक्रीय होती. लोअर परळला चंद्रकांत उर्फ बाब्या खोपडे याची ‘गोल्डन गँग’ सक्रीय होती. तर सैतान चौकी, दादर भागात वालजी-पालजी भावांची ‘डायमंड गँग’ धुमाकूळ घालत होती. मुंबई सेन्ट्रल परिसरात पोलिसाचा मुलगा असलेल्या शशी रासमच्या ‘कोब्रा’ गँगचा दरारा होता. याच भागातल्या पारसनाथ पांडे आणि कुंदन दुबे यांनीही पोलिसांचे लक्ष वेधून घेतले होते. आसपासच्या अशा गुंडांच्या टोळ्यांशी ‘भायखळा कंपनी’ला या ना त्या कारणांनी दोन हात करावे लागत होते. त्या संघर्षात अरुणही अडकत गेला. रमा, बाबूसोबत त्याचेही नाव अग्रक्रमाने घेतले जावू लागले. वर्चस्वाच्या चढाओढीत टोळ्यांत कित्येकदा जीवघेणा संघर्ष होऊ लागला. कधी वैयक्तिक वादातूनही ठिणगी पडू लागली. या पार्श्वभूमीवर भायखळा कंपनीने ‘कोब्रा’चा म्होरक्या शशीचा खून केला. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकासमोर भरदिवसा झालेल्या या हत्येने भायखळा कंपनीची दहशत एकाएकी वाढली. नंतर याच भागात दादागिरी करणाऱ्या पारसनाथ आणि कुंदन यांनाही या टोळीने संपविले.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीत १९७०च्या आसपास तस्करी, अंमली पदार्थाच्या काळ्या धंद्यात असणाऱ्यांची एक वेगळी दुनिया होती. हाजी मस्तान, युसूफ पटेल, ढोलकीया बंधू आदी तस्करीत गुंतले होते. तर करीमलाला अंमली पदार्थाची देवाण-घेवाण करण्यात आघाडीवर होता. त्या काळात मुंबईचा ‘गॉडफादर’ म्हणून कुविख्यात असलेला वरदराजन मुदलीयार उर्फ वरदाभाई चौरटी दारू, वॅगन फोडणे यासारखे गुन्हे करीत होता. आपापल्या परीने गुन्हेगारी साम्राज्य वाढविणाऱ्या उपरोक्त बड्या माफियांना आणीबाणीच्या पर्वाने मात्र जबरदस्त दणका दिला. यातले बहुतेक सगळे तुरुंगात जखडले गेले. त्यानंतर त्यांची जागा त्यांच्या जवळ वावरणारे दाऊद इब्राहिम कासकर व त्याचे भाऊ तसेच अमिरजादा, समरखान यांच्यासारख्या दुसऱ्या फळीतील गुंडानी घेतली. त्यातूनच झटपट पैसा कमविण्याच्या नादातून पुढील दोन दशकांत रक्तरंजित अशा ‘गँगवॉर’चा इतिहास रचला गेला.

दाऊद, अमिरजादा, ढोलकीया बंधू या बड्या धेंड्यानी आपले जाळे वाढविण्यासाठी स्थानिक पातळीवरील टोळ्यांना पैशांची लालूच दाखवून आपल्या जाळ्यात खेचून घेतले. या टोळ्यांनाही भरभक्कम वरदहस्त मिळाल्याची जाणीव झाली. भूखंड हडप करणे, सुपारी घेऊन हत्या करणे यांसारखे भयानक गुन्हे मुंबईत दरदिवशी घडू लागले. चाकू, गुप्ती, तलवार घेणाऱ्यांच्या हाती देशी-विदेशी रिव्हॉल्वर, पिस्तूलच नव्हे, तर एके-४७ सारखी विघातक हत्यारे आली. ‘भायखळा कंपनी’ला दाऊदने आपल्या सोबतीला घेतले होते. कालांतराने या मैत्रीलाही तडा बसला.  त्याचे  भयंकर परिणाम झाले. रमा नाईक चेंबूर येथे पोलीस चकमकीत मारला गेला. बाबू रेशीम याला तर थेट पोलिस कोठडीतच ठार मारण्यात आले. रमा नाईक १९८८त पोलिस चकमकीत मारला गेल्यानंतर भायखळा कंपनीची सूत्रे प्रामुख्याने अरुण गवळी याच्याकडे आली. तो राहात असलेली दगडी चाळ या टोळीचे ‘हेडक्वॉर्टर’ बनले. या निमित्ताने अरुणला आपण काय चीज आहोत, ते अंडरवर्ल्डला दाखवून देण्याची संधी चालून आली. धूर्त आणि धाडशी चाली खेळून त्याने ती कालांतराने सिद्धही केली. भायखळा कंपनीचा सूत्रधार रमाची पोलिसांकरवी हत्या घडवून आणण्यात दाऊदच असावा, अशी पक्की खात्री झाल्याने  त्यालाच दणका देण्याचे ठरविले. त्याचा जवळचा माणूस सतीश राजे याची अरुण व त्याच्या साथीदारांनी भायखळा पूलाजवळ भरदिवसा हत्या घडवून आणली. गाडी सिग्नलला थांबली बघून सतीशच्या गाडीच्या काचा फोडून त्याच्यावर गोळ्यांचा अक्षरश: वर्षाव करण्यात आला. 

सतीशला ज्या पद्धतीने अरुणने संपविले त्याने  डी कंपनीला प्रचंड हादरा बसला. मुंबई बॉम्बस्फोटानंतर मुंबई पोलीस आणि  प्रतिस्पर्धी यांचा धसका घेऊन दुबईत निसटलेल्या दाऊदला गवळीने जेरीला आणलेे. त्याचाच एक भाग म्हणून दाऊदचा मेव्हणा इब्राहिम पारकरचीही त्याने हत्या केली होती. दुबईत  दाऊदसोबत त्याचे खास साथीदारही निघून गेले.त्यातच अरुणला नडू शकेल, असा छोटा राजनही दुबईला पसार झाला. त्यामुळे मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये आता फक्त  अरुण गवळी आणि त्याच्या साथीदारांचे अस्तित्व उरले . सदा पावले, सुनील घाटे, विजय तांडेल, अरुण जोशी आदी अरुणच्या सोबतीला होते. ‘बॉस’ मुंबईतच असल्याने, त्याच्या टोळीचा दबदबा वाढला होता. टोळीचे एखाद्या बड्या कंपनीसारखे व्यवहार होऊ लागले होते. टोळीत सामील असलेल्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी घेतली जाऊ लागली होती. कुणी समजा, चकमकीत संपला तर त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाऊ लागली होती. 

दाऊद मुंबईत नव्हता. त्याचे खास साथीदारही नव्हते, अशा वेळी त्याने प्रतिस्पर्धी  अमर नाईक  टोळीला हाताशी धरली. पोलिसांना वश केले आणि अरुणच्या साथीदारांना चकमकीत संपविण्याचे षड््यंत्र रचले. पुढे पनवेलजवळ अरुणचा खास साथीदार अरुण जोशी व इतरांना गोळ्या घालून संपविले गेले.  मतलबी पोलीस, राजकारणी यांच्या बळावर प्रतिस्पर्धी दाऊद भारतात न राहता आपल्याला संपवू शकतो, याची जाणीव अरुणला झाली. दाऊद दगडी चाळीत कुणालाही घुसवून आपला काटा काढू शकेल, याची खात्री असल्याने त्याने दगडी चाळ परिसराला कडेकोट किल्ल्याचे स्वरूप दिले.  पुढे चाळीतील काही खोल्यांत त्याने तयार केलेले तळघरही पोलिसांनी उघडकीस आणले. मात्र,त्याच्याविरोधात कारवाई करण्यास पोलीस आले तेव्हा दगडी चाळीतल्या महिला त्यांना रोखण्यासाठी पुढे सरसावल्या. 

एकीकडे,दाऊदला सोडून पोलीस गवळीच्या मुलांना टार्गेट करत असल्याचा आरोप शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या जाहीर सभेत केला आणि दाऊद-गवळी हा राजकीय विषय बनला. गवळी आणि त्याची टोळी म्हणजे‘आमची मुले’ असा उल्लेख  या वेळी होत राहिला. मात्र त्या वेळी दाऊदसोबत असणाऱ्या छोटा राजनने अरुणला ‘हिंदू डॉन’ बनवू नका, असा इशारा दिला. शिवसेनेविषयी तशी भायखळा कंपनीला पूर्वीपासून सहानभूती होती. त्यांचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत, यासाठी  गवळीही एकेकाळी सक्रीय होता. पण गुन्हेगारी प्रवृत्तीचा सेनेचा नगरसेवक के.टी. थापा याला सेनाप्रमुख पाठीशी घालतात, असे लक्षात आल्याने या सलोख्यात दुरावा निर्माण झाला.

दरम्यानच्या काळात ‘टाडा'कायद्यान्वये कारवाई झालेल्या अरुणला पाच वर्षे कारागृहात घालवावी लागली.  तुरुंगातला हा काळ त्याच्यासाठी सर्वार्थाने आव्हानात्मक ठरला. कारण, दाऊदची माणसं आपल्याला संपवतील ही भीती या काळात त्याच्या मनातून कधी गेली नाही. स्वत:ला सेफ ठेवण्यासाठी राजकीय, कामगार क्षेत्रात आपण उतरावे,असे अरुण गवळीला अनेकदा वाटायचे. पुतण्या ( की भाचा?) सचिन अहीर यांना राष्ट्रीय मिल मजदूर संघात पाठवून त्याने त्याची एका परीने सुरुवातही केली. हे खरे की, सचिन अहिरना गवळीच्या वलयाचा राजकीय प्रवासात लाभ झाला. ते पुढे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत उमदे नेतृत्व म्हणून पुढे आले. आमदार झाले. मंत्रीही झाले. पण ‘डॅडीं’च्या हाती फारसे काही लागले नाही. अखेर ‘अरुणोदय’ झाला, अशा थाटात त्यांनी स्वत:चाच राजकीय पक्ष स्थापन केला. अखिल भारतीय सेना सुरू करून राजकीय पट मांडून पाहिला. 

रूग्णवाहिका, शैक्षणिक सहाय्य, नागरी समस्यांची सोडवणूक यासारखे उपक्रम राबवून सामाजिक सेवेचा देखावा निर्माण करण्यात अरुण आणि त्याचे सहकारी यशस्वी ठरले. स्थानिकांनाही ही जनसेवा भावली. त्यातूनच अरुण गवळीने प्रथम लोकसभा निवडणूक लढविली. अपयश आले, पण लाखभर मते मिळवून जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. या शिदोरीवर गवळी पुढे चिंचपोकळी येथून काँग्रेसचे आमदार मधु चव्हाण यांचा पराभव करून राज्याच्या विधानसभेत निवडून गेला. पाठोपाठ अखिल भारतीय सेनेच्या नावावर त्याची कन्या गीता, साथीदार सुनील घाटे आदी मुंबई महापालिकत नगरसेवक झाले.  

परंतु, ‘डॉन’चा हा प्रवास तसा अनेकांना खुपत होता. लोकप्रतिनिधी बनून तो ‘सेफ’ झाल्याची भावना विरोधकांत होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेवक शांताराम जामसंडेकर यांची हत्या करण्याची सुपारी घेतल्याचे प्रकरण अरुणवर शेकले. त्याला जन्मठेप झाली. वयाची साठी ओलांडलेला छोट्या चणीचा, सडपातळ बांध्याचा पण अजूनही नजर कमालीची भेदक असलेला हा डॉन आता कारागृहात दिवस काढतो आहे. तुरुंगाबाहेर त्याच्या इच्छेबरहुकुम त्याची बायको आणि मुलगी सारे व्यवहार पाहात आहेत. मुंबईच्या गुन्हेगारी विश्वाचे कंबरडे मोडले असले तरीही, अरुण गवळी उर्फ डॅडी या नावाभोवतीचे वलय आणि या नावाशी जोडलेल्या दंतकथा अजूनही पूर्वीइतक्याच भूरळ घालत आहेत...

- विजयकुमार बांदल
बातम्या आणखी आहेत...