आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वारसदार डॉक्टर!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साधारणपणे आदिवासी भागामध्ये कार्यरत राजकारणी मंडळी आपापल्या मतदारसंघावर पिढ्यान्पिढ्या कुटुंबाचे वर्चस्व राखण्यात यशस्वी ठरतात, असा आजवरचा सार्वत्रिक अनुभव आहे. वर्चस्वाच्या वा वरचष्म्याच्या बाबतीत मात्र प्रत्येक आदिवासी नेत्याचा हातखंडा वेगवेगळा असतो. त्यासाठी काही जण विकासकामांचा आधार घेतात, तर काही मंडळी भोळ्याभाबड्या आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेत फक्त ‘व्होट बँके’वर लक्ष केंद्रित करून त्यांना भुलवत असतात. महाराष्ट्राच्या आदिवासी पट्ट्यातील अतिदुर्गम जिल्हा म्हणून परिचित असलेल्या नंदुरबारने आजवर बरेच राजकीय वारसदार अनुभवले, पण विजयकुमार गावित यांच्या रूपाने एक डॉक्टर वारसदार गेल्या दीड दशकापासून या जिल्ह्यावर राज्य करत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील नटावद या छोट्याशा गावाने राजकीय क्षेत्रात ब-याच मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. राजकीय पटलावर उदयास आलेल्या आणि कालौघात नावारूपाला आलेल्या कुटुंबांपैकी बव्हंशी या गावाशी नाळ जुळलेले आहेत. अशा या गावामध्ये कृष्णराव गावित अर्थात पंचक्रोशीतील सर्वपरिचित कृष्णा गुरुजी यांच्या कुटुंबामध्ये डॉ. विजयकुमार यांचा जन्म झाला. त्यांना अतिदुर्गम आदिवासी जिल्ह्याची पार्श्वभूमी असली तरी कृष्णा गुरुजींच्या करड्या शिस्तीत डॉक्टरांची जडणघडण झाली. किंबहुना पुढील राजकीय वाटचालीत पदोपदी त्या संस्कारांचा उपयोग डॉक्टरांना होत गेला. कृष्णा गुरुजींच्या कुटुंबातील जवळपास प्रत्येक सदस्य डॉक्टरांप्रमाणे शिक्षित आहे हे विशेष. कृष्णा गुरुजींनी ज्ञानदानाचे कार्य करत आदिवासींच्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आरंभलेल्या समाजप्रबोधनामुळे आदिवासी सुशिक्षित होत गेला. ज्ञानदानाच्या कार्यात सातत्य राहावे म्हणून मग त्यांनी आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीची स्थापना नटावदमध्येच केली. शिक्षण क्षेत्रातील वाढत्या कार्यामुळे कृष्णा गुरुजींचा संपर्क सर्वदूर पसरत गेला. वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसे अन् भिन्न वैचारिक प्रवाह यामुळे कृष्णा गुरुजींनी काँग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांविरोधात भूमिका घेत थेट निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना आव्हान दिले. 1990 च्या सुमारास गुरुजींनी नंदुरबार विधानसभा मतदारसंघातूून जनता दलाच्या तिकिटावर उमेदवारी मिळवत काँग्रेसजनांपुढे आव्हान उभे केले होते. येथूनच ख-या अर्थाने गावित कुटुंबीयांमध्ये राजकारणाची नुसतीच मुहूर्तमेढ नव्हे, तर पुढील काळात डॉ. विजयकुमार गावित यांच्याही राजकीय वाटचालीची पायाभरणी झाली. कारण 1995 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी नंदुरबार विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवत हा मतदारसंघ जिंकला, तो आजतागायत वरचष्म्याखाली राखण्यात यशस्वी ठरले आहेत.
आदिवासी देवमोगरा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गावित कुटुंबीयांनी पंचक्रोशीतच नव्हे, तर राजकीय क्षेत्रातही चांगलेच बस्तान बसवले आहे. वास्तविक पाहता डॉ. गावितांना फार पूर्वीच राजकीय पार्श्वभूमी प्राप्त झाली होती. याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांचे काका तुकाराम हुरजी गावित यांनी अगदी प्रारंभी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. खासदार म्हणून कार्यरत असताना त्यांनी मतदारसंघाची चांगली बांधणी केली होती. त्यांनी लोकसभेचा पाच वर्षांचा कार्यकालदेखील पूर्ण केला होता. नंदुरबार, धुळे, औरंगाबाद आदी ठिकाणी शिक्षणाचे धडे गिरवल्यानंतर त्यांनी वैद्यकीय व्यवसायास सुरुवात केली. याच काळात डॉक्टरांचा विवाह तत्कालीन गृहराज्यमंत्री रमेश पान्या वळवी यांची कन्या कुमुदिनी हिच्याशी झाला. कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असतानाच सासरही तसेच मिळाले. डॉक्टरांचे सासरे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी गृहराज्यमंत्री आणि केंद्र सरकारच्या अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. विजयकुमार गावित यांचा 1995 च्या सुमारास विधानसभा सदस्य अर्थात आमदार म्हणून राजकीय प्रवास सुरू झाल्यानंतर उच्च शिक्षण अन्् नेतृत्वगुण यामुळे त्यांना अल्पावधीतच राज्याच्या मंत्रिमंडळाचे दरवाजे खुले झाले. आरोग्य राज्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, आरोग्य व वैद्यकीय शिक्षण मंत्री अशी पदे त्यांच्याकडे चालत आली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थिरस्थावर झाल्यानंतर डॉक्टरांनी नंदुरबार जिल्ह्यातील प्रस्थापित काँग्रेस पक्षाला धक्के द्यायला सुरुवात केली. परिणामी ज्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये इंदिरामाय, गांधी घराणे वा काँग्रेस हाच परवलीचा शब्द गेल्या काही दशकांपासून होता, त्याला डॉक्टरांच्या माध्यमातून छेद देण्यात राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरली.
नंदुरबारसह शेजारच्या जळगाव जिल्ह्यातही डॉ. गावित यांनी ब-यापैकी राजकीय बस्तान बसवले आहे. नवापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांचे बंधू शरद गावित गेल्याच निवडणुकीत विजयी झाले होते. काँग्रेसचे नवापूर मतदारसंघातील परंपरागत उमेदवार सुरूपसिंह हि-या नाईक यांना पराभूत करून गावितांनी नाईक कुटुंबीयांची पर्यायाने काँग्रेसचीही सद्दी संपवली. तसेच चोपडा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले जगदीश वळवी डॉक्टरांचे शालक आहेत. पत्नी कुमुदिनी यांनी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवत राजकारणात प्रवेश केला. त्या आता नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. डॉ. विजयकुमार गावित वैद्यकीय व्यवसायातील निष्णात, तसेच कोणत्या रोगावर कोणते औषध द्यायचे म्हणजे शंभर टक्के गुण येऊ शकतो, याचे जाणकार आहेत. कशावर कोणती मात्रा चालू शकते, याची पुरेपूर माहिती असणा-या डॉक्टरांनी त्याच अनुभवाचा योग्य वापर करत नंदुरबार जिल्ह्यामध्ये तळागाळापर्यंत पोहोचलेल्या काँग्रेसच्या वटवृक्षाला धक्का देण्याचे काम तर केलेच, पण गावित कुटुंबीयांची विजयी पताका फडकवत ठेवली आहे.