काही क्षणापूर्वी रडत-धुमसत असणारी ‘ती’ चेहर्यावरील दु:ख पुसून पूर्वीच्याच उमेदीने स्वत:च्या कामात मग्न झाली होती. जणू काही घडलेलं ते एखादं स्वप्नच होतं. एक खूप हळवं,मनाला रडवणारं, दुखरं स्वप्न, ज्यात कोंडलेलं वास्तव होतं. ते पाणीदार डोळे, अगदी निष्पाप, ओतप्रोत भरलेलं दु:ख, त्या मनाला झालेल्या तळमळींच्या यातना... एका क्षणी ते सर्व बाहेर आलं. जे आज एखाद्या ओसंडून वाहणार्या पाण्यासारखं वाहत होतं. ते घळघळते डोळ्यांतले अश्रू आणि मनातली वेदना जणू एक होऊन गेली होती आणि डोळ्यांसमोर दिसणारं धगधगतं वास्तव होतं.
‘असलं मूल जन्माला येण्यापेक्षा मी माझी राहिले असते तर बरं होतं. एवढा संताप आला होता त्याचा! एक वेळेस खरंच असं वाटलं, की त्याचा जीव घेऊन टाकावा. म्हणजे सगळ्याचीच सुटका होईल, पण शेवटी आई ना मी! ज्याला जन्म दिला त्याचाच जीव घेण्यास हात कसे सरसावतील? मग स्वत:ला सावरून सरळ हाताला धरून फरपटत पोलिस ठाण्यात नेऊन तक्रार नोंदवली. हा माझा मुलगा गेले कित्येक दिवस चोर्या, लूटमार, नशा आणि नशेसाठी लागणारे पैसे तो घरातल्यांना चाकूचा धाक दाखवून घेतो. आज तर त्याला पैसे न दिल्यामुळे स्वत:च्या वडिलांवर त्याने हात उचलला. याच्याविरुद्ध तक्रार नोंदवून घ्या आणि तुरुंगातच टाका. आज त्याला पोलिसातच देऊन आले. कायमचा डांबला तर नशीब माझं.’
गल्लीत घंटागाडी घेऊन कचरा गोळा करणारी ती सतत स्वत:च्या कामात मग्न असायची. तिचा आमचा संपर्क तसा रोजचा, पण कामापुरतीच. कचरा घेण्यासाठी मिनिटभर दारात थांबणार आणि पुढे सरकणार. आज मात्र ती मोबाइलवर कुणाशी तरी जोरजोरात ओरडत रडत होती. तिला कशाचंही भान नव्हतं. सर्व गल्ली तिच्याकडे अचंबून पाहत होती. आम्ही विचारलं, काय झालं म्हणून, पण कोणालाही काही माहीत नव्हतं. शेवटी मी तिच्या जवळ जाऊन काही न बोलता तिच्याकडे पाहिलं. तिने माझ्याकडं पाहिलं. भानावर आली. ‘काही नाही...’ म्हणत डोळे पुसू लागली. मला वाटलं, शांत होऊ दे, मग विचारू.
पण विचारण्याचा प्रसंगच आला नाही. दुसर्या दिवशी ती आमच्याकडे येऊन कहाणी ऐकवू लागली. अगदी सुरुवातीपासून. नवरा सफाईचं काम करतो, तेही मनाला करावे वाटेल तेव्हा. घर सांभाळणं, कष्टानं पैसा कमावून खाणं, चार मुलांच्या चार तºहा...
कितीही झालं तरी नवर्याबद्दल एक अपशब्द नव्हता. ‘जीवनात कधी काही वाईट केलं नाही, मग देव का आमच्या उण्यावर आहे काय माहीत. अशी मुलं पोटाला घालण्यापेक्षा मी वांझोटी बरी होती. माझ्या पोरानी त्याचं आयुष्य बरबाद केलं आणि माझंपण. घरात कोणी नवीन मनुष्य दिसला की धास्ती वाटते. कुठं पोराने डाका घातला तर नाही ना, का कुणा पोरीची छेड काढली? म्हणून काल पोलीस ठाण्यात डांबून आले त्याला. अन् बरं होईल. त्याची सुटका न झालेलीच बरी. उपकार होतील तेवढेच माज्यावर.’ तिच्या संतापाला शांत करत करत मी विचार करत होते. प्रत्येक स्त्रीचं आयुष्य ही एक अडगळ असते. लग्न, संसार, मुलंबाळं या सगळ्या गोष्टीकडे लक्ष तर बाईलाच द्यावे लागते, नाही का? कुणाचा नवरा व्यसनी आहे म्हणून, तर कुणाचा नवरा कमावत नाही म्हणून तर कोणाला सासू छळते म्हणून कधी नणंदेच्या जाचात तर कधी सवतीच्या त्रासाने हैराण... या सर्वांमध्ये स्त्री कसल्याही संकटाशी धैर्याने लढत असते.या सर्वांमधून कधी तरी कुणाजवळ मन मोकळं करणं ही तिची प्राथमिक गरज बनते. रडून आपली दु:ख वाटून घेतल्याने तिची लढण्याची शक्ती खरंच वाढत असेल का?
स्वत:च्या मुलाला आपण होऊन पोलिसांच्या ताब्यात देऊन ही बाई काम करते. खरंच आता तिला शांत वाटतंय का? तिच्या चेहर्यावरून मला काही अंदाज बांधता येत नाही. ‘तुमच्याशी बोलल्यावर बरं वाटलं,’ असं म्हणून ती गेली. पण नुसतं बोलून कसं बरं वाटेल? प्रश्न असेल तर उत्तरं पण असेलच म्हणून उत्तरं शोधली पाहिजेत आणि त्यावर अमलबजावणी करत राहिलं पाहिजे.
या एका आशेच्या किरणावर कसं जगत राहायचं? शांत, हसर्या चेहर्यामागच्या अशा किती तरी अपमानित, एकाकी, परिस्थितीशी झगडणार्या स्त्रिया आपल्या आजूबाजूला वावरताहेत. संकटं, दु:खांना पदरी बाळगून आहेत. चालत राहताहेत. आपण एकट्या नाही, तर त्रासल्या जीवांची आजूबाजूला कमतरता नाही हे जाणवतं.
vjthombre20@gmail.com