आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vikas Deshmukh Article About Aboriginal Art And E Aboriginal, Divya Marathi

आदिम झाले आता ई-आदिम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रानटी अवस्था संपली. माणूस व्यक्त व्हायला लागला. उत्तरोत्तर प्रगत झाला. हा आदिम इतिहास आपल्याला माहिती आहे तो चित्र, शिल्प आणि साहित्य या आपल्या ‘आदिम’ कलेमुळेच. हाच धागा पकडून जागतिक कीर्तीचे ख्यातकीर्त चित्रकार श्रीधर अंभोरे यांनी अहमदनगर येथून वर्ष 1979 मध्ये ‘आदिम’ हे नियतकालिक सुरू केले होते. चित्र, काव्य, कथा आणि ललित यांचे मिश्रण आदिममध्ये होते. त्यामुळेच ‘आदिम’ मराठी साहित्यात माइल स्टोन ठरले. ऐंशीच्या दशकातील साहित्याला ऊर्जित करून 1982 मध्ये आदिम बंद झाले. मधल्या 30-35 वर्षांत माध्यमांत बदल झाला, पण आदिम कला आहेत त्याच आहेत. याच कला येणार्‍या कैक पिढ्यांसाठी संदर्भ ठराव्यात आणि सकस, अभिजात साहित्य लिहिणार्‍यांना प्रेरणा मिळावी, या उद्दात्त हेतूने मराठीतील सिद्धहस्त गझलकार डॉ. श्रीकृष्ण राऊत यांनी अकोला येथून जानेवारी 2014 पासून ‘ई-आदिम’ सुरू केले. या ई आदिमचे स्वरूप पूर्वी होते तसेच आहे. फक्त कागदांच्या जागी संगणकाची स्क्रीन आहे. त्यासाठी राऊत यांनी अथक परिश्रम घेऊन आकर्षक ब्लॉग तयार केला. अल्पावधीत त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. आता डॉ. राऊत त्याचे कार्यकारी संपादक आहेत. राजन खान यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

‘आदिम’चा इतिहास
चित्रकार अंभोरे यांनी 1979 मध्ये ‘आदिम’ची सुरुवात केली. त्यावेळी ते आदिमचे कार्यकारी संपादक होते. सदशिव अमरापूरकर, प्रा. वसंत दीक्षित, चंद्रकांत पालवे आणि प्रा. वि.रा. दीक्षित यांचा संपादकीय मंडळांत समावेश होता. प्रसिद्ध कादंबरीकार भालचंद्र नेमाडे हे आदिमचे पहिले वर्गणीदार. पुढे अमरापूरकर यांनी नाट्यक्षेत्रातील अनेकांना आदिमचे वर्गणीदार करून घेतले. 1979-82 या काळात आदिमचे एकूण 33 अंक निघाले. त्यामध्ये तीन दिवाळी अंकांचाही समावेश आहे. अंभोरे हे त्या काळात -चक्रमद्रांकित (सायक्लोस्टाइल) : स्वरुपात आदिम काढायचे. पूर्ण अंक पेन्सिलवर हाताने लिहून अंक काढावा लागे. हे काम प्रचंड मेहनतीचे होते. ऑफिसमध्ये कागदांना टॅग बांधण्याकरिता छिद्र पाडण्यासाठी टोच्या असतो. त्या टोच्याचा उपयोग करून अंभोरे पेन्सिलवर लिहित आणि रेखाचित्रही काढत. असे काही अंक काढल्यानंतर खिळे जुळवून मॅटर कंपोज करणार्‍या मशीनवर छापील अंक काढायला सुरुवात केली.

आता ‘ई- आदिम’
पुढे काही अंकानंतर जे अनेक अनियतकालिकांचं होतं तेच आदिमचंही झालं आणि ते बंद पडलं. आता पुन्हा एकदा ‘फेसबुक’ आणि ब्लॉगच्या माध्यमातून ‘आदिम’ सुरू करू म्हणून गझलकार डॉ. राऊत हे अंभोरे यांच्याशी बोलले. त्यांनाही ही कल्पना आवडली. गेल्या सहा वर्षांपासून राऊत हे ‘गझलकार’ या ब्लॉगचा सीमोल्लंघन ई-विशेषांक प्रकाशित करतात. अंभोरे यांच्या भाषेत म्हणजे त्यासाठी लागणारा ‘कुटाणा’ करतात. आता राऊत हा कुटाणा आदिमसाठी करीत आहेत.

असे आहे ‘ई- आदिम’चे स्वरूप
‘ई-आदिम. ब्लॉगपोस्ट. इन’ या लिंकवर आदिम उपलब्ध आहे. कथा, कविता, पुस्तक परीक्षण आणि रेखाचित्र, रसग्रहणे, आपण टिपलेली आगळी-वेगळी छायाचित्रे यांचा यामध्ये समावेश आहे. सकस लिहिणार्‍या साहित्यांनी आपले साहित्य याद्वारे प्रकाशित केले जाणार आहे. सुरुवातीला ई आदिम हे द्वैमासिक स्वरुपात असणार. जाने-फेब्रुवारी, मार्च-एप्रिल, मे-जून, जुलै-ऑगस्ट आणि सप्टेंबर-ऑक्टोबर, नोव्हेंबर-डिसेंबर असे त्याचे अंक निघणार आहेत. यामध्येच दिवाळी अंकाचाही समावेश राहणार आहे. आदिमचे फेसबुक पेजसुद्धा आहे.

असे पाठवा आपले साहित्य
आदिमला लिहू इच्छिणार्‍यांनी त्यांचे साहित्य युनिकोड फाँटमध्ये पाठवावे. ज्यांच्याकडे युनिकोड फाँट नाही त्यांनी श्रीलिपी, कृतीदेव, एपीएस प्रकाश, आएसएम-डीव्हीबी यापैकी कुठल्याही एका फाँटमध्ये वर्ड फाइलने साहित्य पाठवता येते. त्यासाठी साहित्यिकांनी ‘आदिमअंभोरअ‍ॅटदरेटजीमेलडॉटकॉम’ किंवा आदिमचे फेसबुक पेज किंवा श्रीकृष्ण राऊत यांच्या फेसबुक पेजवरील मेसेजबॉक्समध्येसुद्धा साहित्य पाठवता येऊ शकते, पण फेसबुकवर मॅसेज करताना मजकूर कोणत्या फाँटमध्ये आहे याचा अगोदर इंग्रजीतून उल्लेख करणे आवश्यक आहे.