आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ काव्याचाच आग्रह!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशीमसारख्या गावातून विष्णू जोशींची कविता चळवळ
सध्याचे युग हे टीव्ही, इंटरनेटचे आहे. त्यामुळे आता मुद्रित माध्यम रेडिओप्रमाणे पडद्याआड होतील, अशी हाकाटी दशकभरापूर्वी ऐकायला मिळत होती; पण तसे काही झाले नाही. उलट मुद्रित माध्यमांची लोकप्रियता वाढून दिवसेंदिवस त्याचा खपसुद्धा वाढत आहे. असे असताना मराठी साहित्याला समृद्ध करणारी महाराष्‍ट्रातील वाङ्मयीन नियतकालिकांची चळवळ थंडावली. 1980 नंतरची ‘शब्दवेध’, ‘सौष्ठव’, ‘शब्द (लातूर)’ ‘अभिधानंतर’, ‘अनाघ्रात’ ही दर्जेदार नियतकालिके बंद पडली. मात्र, वाशीमसारख्या आडवळणाच्या गावातून जिथे की अद्ययावत मुद्रणालयाची कुठलीच सोय नाही वा वाङ्मयीन नियतकालिकांचा वाचकवर्गही नाही, अशा ठिकाणाहून विष्णू जोशी यांनी आपले बी.एड्चे शिक्षण अर्धवट सोडून 2010 मध्ये ‘काव्याग्रह’ हे केवळ कवितेसाठी वाहिलेले त्रैमासिक सुरू केले. एवढेच नाही, तर यापुढील आयुष्य केवळ काव्य चळवळीसाठीच जगण्याचा निर्धार केला. अनेकांनी विष्णू जोशीला वेड्यात काढल. कारटं वाया गेलं म्हणून घरच्यांचा तुसडेपणा वाढला; परंतु विष्णू खचला नाही. आपल्या ध्येयापासून ढळला नाही. केवळ काव्याचाच आग्रह घेऊन काव्याग्रहचा प्रवास त्याने सुरू ठेवला.
केवळ दोन वर्षांच्या वाटचालीत ‘काव्याग्रह’ला मुंबईचा गोपाळ गणेश आगरकर उत्कृष्ट मराठी वाङ्मयीन नियतकालिक पुरस्कार
काव्याग्रहाच्या प्रत्येक अंकाचे मुखपृष्ठ, आतील रेखाटने, उत्तम वाङ्मय मूल्य असलेले साहित्य, आकर्षक मांडणी अशा सर्वांगाने ‘काव्याग्रह’ कसा दर्जेदार करता येईल, याचाच विचार विष्णूने केला. त्यामुळेच केवळ दोन वर्षांच्या वाटचालीत ‘काव्याग्रह’ने मराठी साहित्य जगताला आपली दखल घ्यायला भाग पाडले. या काळात काव्याग्रहाला मुंबईचा गोपाळ गणेश आगरकर उत्कृष्ट मराठी वाङ्मयीन नियतकालिक पुरस्कार मिळाला. काव्याग्रहने केवळ मराठीतील नामवंत साहित्यिकांच्या रचनांना स्थान दिले असे नाही, तर गजानन फुसे, संदीप जगदाळे, प्रियांका डहाळे, गजानन कदम, रा. मु. पगार, प्रवीण हटकर, डॉ. दामोदर काळे या नव्या पिढीतल्या प्रतिभावंत कवींचा शोध घेऊन त्यांच्या रचनांना प्रस्थापितांच्या कवितेसोबत स्थान दिले. आज या सर्व कवींची नावे महाराष्टÑभर गाजतायत ते केवळ काव्याग्रहमुळेच. काव्याग्रहने आता प्रकाशन विश्वातसुद्धा आपले पाऊल टाकले आहे. सहा कवितासंग्रह आणि एक आत्मचरित्र प्रकाशित केले आहे. या सगळ्या साहित्यकृतींना मानाचे अनेक पुरस्कार मिळालेत; पण हे सगळं करत असताना मोठी अचडण होती ती आर्थिक. अशा स्थितीत विष्णूचे मोठे भाऊ विठ्ठल जोशी हे त्यांच्या पाठीशी उभे राहिले.
काव्याग्रहातील कवितांचा अनेक भाषांमधून अनुवाद
काव्याग्रहमध्ये प्रकाशित झालेल्या अनेक कवितांचा इतर अनेक भाषांमधून अनुवादसुद्धा झाला. आज काव्याग्रहमध्ये आपले साहित्य छापून यावे, यासाठी महाराष्‍ट्रातील मातब्बर कवी स्वत:हून आपल्या रचना पाठवत आहेत, हेच काव्याग्रहचे खरे यश आहे.
पत्ता : ‘काव्याग्रह’, संपादक :
विष्णू जोशी, डॉ. घुनागे हॉस्पिटलच्या मागे,
पोस्ट ऑफिससमोर, वाशीम.
संपर्क : 9623193480