'पुरुषार्थ केल्यावरच बायको मिळते. रामानं धनुष्य उचललं आणि बाण मारला, तेव्हा सीता मिळाली.हाताची घडी करून पिंपळाच्या पारावर मांडी घालून, गुटखा चघळणार्यांना पोरगी कशी मिळणार?'
मधुरिमाच्या 30 मेच्या अंकात ‘मुलीच मिळत नाहीत’ हा लेख वाचला. मनात लेखाने जरा खळबळ माजवली. वाटलं विचारावं, ‘किती मुली पाहिजेत?’ ढिगाने मुली आहेत. मुलीच मागं लागाय लागल्यात मुलांच्या. मुलांना गटवतायेत मुली. प्रेमविवाहांची संख्या वाढायला लागली आहे. (संदर्भ - होम मिनिस्टर कार्यक्रमातल्या जोड्या) असे असताना मुली का मिळू नयेत? उत्तर सोपं असताना, प्रश्नच अवघड वाटतोय. म्हणून म्हणतो, किती मुली पाहिजेत? पण आधी मुलगा काय करतोय ते सांगा!
आज मुलं काय करतात, या प्रश्नाकडे ना आईवडील बघतात, ना समाज बघतो, ना शिक्षणतज्ज्ञ, ना शासनकर्ते. मुलांचं तर सत्तर टक्के दुर्लक्ष आहे. तीस टक्के मुलं करिअर घडवतात. सत्तर टक्के मुलं स्वत:च्या भविष्याकडे दुर्लक्ष करतात. जे भविष्याकडे लक्ष देत नाहीत त्यांना मुली कशा मिळतील? मुलांचे आपल्या भविष्याकडे दुर्लक्ष असण्याची अनेक कारणे आहेत. आयतं पोटभर खायला मिळतंय, तो कशाला चिंता करील? पोटात भुकेची आग असली म्हणजे हातपाय हलवतो माणूस. आईवडिलांचा धाक नसलेली, कमावत्या आईबापाची मुलं काय करतात ते पाहा! कानाला मोबाइल, फिरायला दुचाकी, जीन्सची केव्हा तरी धुतलेली पँट, काही तरी लिहिलेला टी-शर्ट, तोंडात गुटखा. अशा मुलांचं भविष्य काय असेल? यांची कॉलेजमधली हजेरी पाहाच. ग्रामीण भागात हीच तर्हा आहे. यांची गुणपत्रके पाहावीत. धड शेती नाही, धड धंदा नाही, शिक्षण नाही. नुसतेच लोंबकळतेत. विचारायला जावं तर उत्तर देतात की, शेतीला पाणी नाही, धंद्याला भांडवल नाही, शिक्षणात डोकं चालत नाही. बायको तर नटीसारखी पाहिजे. सत्य डावलू नये. खरं सांगा. यांची अंगमेहनतीला तयारी आहे का? यांना एकदम साहेबी नोकरी हवी. एकदम साहेब होता येत नाही. आधी नोकर व्हावं लागतं. कामाची लाज वाटते. कष्टाची तयारी नाही. हात काळे व्हायला नकोत, कपड्याला डाग नको, धंदा एकदम मोठा असावा वाटतं. लहानसहान धंदे नकोत. कामाची लाज. कपड्याची लाज. घाम गाळायचा कंटाळा. अशांचं भवितव्य असून असून काय असणार आहे?
आजची मुलं, आजचे तरुण या गोष्टीचा विचार का करत नाहीत? आईबापाच्या जिवावर जगणार्यांना पोरी कोण देणार? पोरी गळ्यात येऊन पडण्यासारखं काही करा ना!
बरं, यांना ना आईबाप मार्गदर्शन करतात, ना यांना गुरू शोधता येतो, ना यांना समाजातले आदर्श ओळखता येतात, ना स्वत:ची बुद्धी चालते. अहो! हातपाय हलवल्याशिवाय काही मिळणार आहे का? यांना विचारायला जावा. म्हणा - ‘अरे काही तरी कर रेऽऽ!’ ते म्हणतील ‘काय करू?’
माणसानं स्वत:ला चार प्रश्न विचारावेत. 1) मी कोण आहे? 2) मी कोठून आलो? 3) मला कोठे जायचे आहे? 4) त्यासाठी मला काय करावे लागेल?
स्वत:ला काय येतं, काय जमू शकतं, याचा विचार करावा. जगात एकदम मोठं कोणीच झालं नाही. जगातला सर्वात श्रीमंत माणूस जॉन डी. रॉकफेलर. लहानपणी किराणा मालाच्या दुकानात नोकर होता. भारतात विमानांचा कारखाना काढणारे वालचंदशेठ कापडाचं गाठोडं डोक्यावरून वाहून नेऊन विकत होते. आमच्या तरुणांची अशा कामासाठी तयारी आहे का?
पुरुषार्थ केल्यावरच बायको मिळते. रामानं धनुष्य उचललं आणि बाण मारला, तेव्हा सीता मिळाली. अर्जुनानं मत्स्यभेद केला तेव्हा द्रौपदी मिळाली. हाताची घडी करून पिंपळाच्या पारावर मांडी घालून, गुटखा चघळणार्यांना पोरगी कशी मिळणार? आज टीव्हीवर चित्रं पाहा. मुली काय बातम्या सांगतात! काय मुलाखती घेतात! मुली स्मार्ट होत आहेत. शिकत आहेत. धाडस करत आहेत. करिअर करत आहेत. अशा मुली कोणाच्या गळ्यात माळ घालणार आहेत? विचार करावा तरुणांनी. बिहारमधली मुलं महाराष्ट्रात येतात. कर्नाटकातून, केरळमधून येतात. नेपाळी येतात. हे सगळे काय करतात, ते बघितलं कधी? कधी अभ्यास केलाय याचा? नाही ना? मग तुम्हाला पोरगी देणार कोण हो!