आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोलाची मार्गदर्शक पुस्तिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘फॅमिली डॉक्टर’ ही संज्ञा आणि संकल्पना हळूहळू विरळ होत असताना, हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कपूर खानदान मात्र डॉ. ओ. पी. कपूर यांचा उल्लेख अत्यंत आदराने आणि अभिमानाने आपले कौटुंबिक वैद्यकीय सल्लागार, असाच करते. डॉ. ओ. पी. कपूर हे पृथ्वीराज कपूर यांच्यापासून आताच्या पिढीतील रणबीर कपूर, करीना कपूर यांच्यापर्यंत म्हणजेच जवळपास चार पिढ्यांचे आमचे कौटुंबिक डॉक्टर आहेत. जगातील कुठल्याही वैद्यकीय सल्लागाराकडे जरी आम्ही गेलो तरीही, आम्ही आजही डॉ. ओ. पी. कपूर यांच्याकडेच शेवटचा सल्ला घेण्यासाठी जातो. याचे कारण, डॉ. कपूर यांच्यावर आमचा असलेला विश्वास, असे अभिमानाने रणधीर कपूर सांगतात.

डॉ. ओ. पी. कपूर हे मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एम. डी. झाले. १९५७ पासून डॉ. कपूर दररोज रात्री आपल्याच महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना शिकवत. सुमारे तीस वर्षे म्हणजे, १९८७ पर्यंत डॉ. कपूर यांचा हा ज्ञानयज्ञ सुरू होता. काही विद्यार्थ्यांच्या आणि वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या डॉक्टरांच्या विनंतीनुसार डॉ. कपूर यांनी अध्ययन शिबिरे घेण्यास सुरुवात केली. सुमारे वीस वर्षे ही शिबिरे भारतभर सुरू होती. यातूनच डॉ. ओ. पी. कपूर यांच्या सहाध्यायी डॉक्टरांनी वैद्यकीय पुस्तके लिहिण्याचे सुचविले. परंतु डॉ. कपूर यांना बाजारात उपलब्ध असणार्‍या क्लिष्ट आणि बोजड पुस्तकांऐवजी साधी, सरळ आणि सोप्या भाषेत कमीत कमी पानांमध्ये सर्वसामान्य रुग्णांसाठी पुस्तिका तयार करावयाच्या होत्या. त्या उद्देशाने आपल्या अनेक दशकांच्या अनुभवाधारे ‘कपूर्स फॅमिली मेडिकल गाइड’ या दोन पुस्तिका प्रकाशित केल्या आहेत.

या पुस्तिका प्रकाशित करण्यामागची भूमिका विशद करताना डॉ. कपूर म्हणतात, प्रसिद्ध अभिनेते राज कपूर आणि विख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. एन. एच. अन्तिया यांनी वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी पुस्तक लिहिण्याचे सुचविले होते. परंतु अशा प्रकारची अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध असल्याचे मला जाणवले. अशी पुस्तके गरीब, अशिक्षित व सामान्य रुग्णांकरिता विकत घेणे परवडत नाही व वाचून समजून घेण्यासदेखील कठीण जाते. म्हणूनच वैद्यकीय आजार व उपचार या विषयाशी निगडित पुस्तके किमतीस योग्य व समजण्यास सोपी असावी, असा माझा आग्रह होता. म्हणूनच या दोन्ही पुस्तिका प्रामुख्याने गरीब रुग्ण व त्यांना प्रामुख्याने उद्भवणारे आजार, तसेच वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्या यांचे महत्त्व आदींवर केंद्रित करून लिहिल्या आहेत.

या पुस्तिकेमध्ये प्रामुख्याने सर्वसामान्य कुटुंबामध्ये ज्या प्रकारचे किरकोळ आजार उद्भवतात, त्यावरच लक्ष केंद्रित केले आहे. तसेच डॉक्टरकडे जाण्यापूर्वी घरच्या घरी काय उपाय करता येतील, यावर ऊहापोह केला आहे. डॉ. कपूर यांनी सर्वसाधारणपणे भारतीय कुटुंबामध्ये आढळणारे चोवीस प्रकारचे आजार किंवा वैद्यकीय तक्रारींची सूची तयार केली आहे. यामध्ये ताप, डोकेदुखी, सर्दी, वात, पोटाचे िवकार, पाठदुखी, सांधेदुखी, खाज, तसेच स्त्रियांमध्ये आढळणारे काही आजार यावर माहिती दिली आहे. सर्वसाधारणपणे ताप, सर्दी, डोकेदुखी आदी आजार प्रत्येक घरामध्ये वर्षातून कधीतरी होत असतात. डॉक्टरकडे जाणे हे योग्य असले तरीही बर्‍याच वेळेस काही आजार घरच्या घरी उपचार करून बरे होतात, हे या पुस्तकातून डॉ. कपूर यांनी पटवून दिले आहे. उदाहरणार्थ, सर्वसाधारण ताप आला असल्यास काय करायचे आणि कोणती औषधे घ्यावी, याची माहिती दिली आहे. परंतु ताप आला असल्यास इतर कोणती लक्षणे आढळल्यास, तो सर्वसाधारण ताप नसून दुसरा आजार असू शकतो, ही उपयुक्त माहिती या पुस्तिकेमध्ये दिली आहे.

डोकेदुखीसुद्धा प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना कधीतरी झालेली असते. डोकेदुखी वेगवेगळ्या कारणांमुळे होते. रक्तदाब वा तत्सम कारणांमुळे डोकेदुखी होत असल्याचा संशय येतो आणि आपण अधिक घाबरतो. यावर डॉ. ओ. पी. कपूर यांनी अतिशय उपयुक्त माहिती दिली असून प्रत्येक डोकेदुखीची लक्षणे आणि त्यावरील सोपे उपायसुद्धा दिले आहेत. तसेच डोकेदुखी कोणत्या कारणांमुळे होऊ शकते, तसेच कोणती काळजी घ्यावी, याचीसुद्धा माहिती दिली आहे. याच पुस्तिकेत पुरुषांच्या लैंगिक समस्येबाबत माहिती दिली आहे. समज-गैरसमजावर अतिशय सुंदर विश्लेषण करतानाच काही सोपे उपायदेखील सुचवले आहेत. पहिल्या पुस्तिकेनंतर डॉ. ओ. पी. कपूर यांनी ‘सामान्य रुग्णाच्या वैद्यकीय चाचण्या व त्यांची उपयुक्तता आणि अर्थ’ यावर प्रकाशझोत टाकणारी पुस्तिका लिहिली आहे. या पुस्तिकेमधून प्रत्येक आजाराच्या निदानासाठी वैद्यकीय चाचण्या खरोखरच आवश्यक आहेत का व असल्यास त्या चाचण्यांचा अर्थ कसा समजून घेता येईल, याचे सुंदर वर्णन केले आहे. हल्लीच्या ‘कट प्रॅक्टिस’च्या काळात काही डॉक्टर्स (सन्माननीय अपवाद वगळता) रुग्णांना वेगवेगळ्या चाचण्या करण्यास सांगतात. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक त्या डॉक्टरांनी निर्देशित केलेल्या ठरावीक वैद्यकीय सल्लागाराकडे जाऊन भलीमोठी फी देऊन चाचणी करून घेतात. या सर्व व्यवहारात रुग्णांना आवश्यक नसलेल्या चाचण्यांना सामोरे जावे लागते व त्याचबरोबर अनावश्यक आर्थिक झळदेखील पोहोचते.

व्यावसायिक प्राधान्य असलेल्या काळामध्ये डॉ. ओ. पी. कपूर मात्र या पुस्तिकांचे मोफत वितरण करण्याकरिता सेवाभावी संस्था आणि व्यक्तीची मदत घेतात. इंग्रजीबरोबरच मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू, कन्नड आणि जर्मन भाषेमध्ये या पुस्तिका तयार केल्या असून आजपर्यंत पाच लाखांहून अधिक कुटुंबांपर्यंत याचे वितरण केले आहे.
vikas.naik@gmail.com